Monday, May 04, 2009

मी चर्चा केली नाही

एक प्रयत्न.. संदीप खरे ह्यांच्या "मी मोर्चा नेला नाही"च्या विडंबनाचा..


मी चर्चा केली नाही
मी वाद घातला नाही
विधिनिषेधसुद्धा साधा
मी मुळी ठेवला नाही

भवताली गोंधळ चाले
तो निर्ढावुन बघताना
पोटातुन ओरडताना
अन् सभात्याग करताना
निर्लज्जपणे मी हसलो बरखास्ती केली जेव्हा
कर्तव्यपूर्तीला माझ्या मी कधी जाणले नाही

मी सुस्त वडाचे झाड
पारंब्या अपरंपार
पावसात, दुष्काळात
नेमेचि राहतो गार
ह्या मस्तवाल फुगलेल्या पोटात कितीश्या ढोल्या
त्यां द्रव्य दडवले इतके, मोजाया पुरले नाही

दिसण्या हा सात्विक सदरा
कोल्ह्याची वरती मुंडी
देशाला लावत आलो
ही समाजसेवी शेंडी
मी जनतेला ना भ्यालो, मी देवाला ना भ्यालो
मी भ्रष्टाचाराखेरिज कधी धंदा केला नाही

मज जन्म मनाचा मिळता
मी पंतप्रधानच असतो
देशाचे तोडून लचके
मी तृप्त जाहलो असतो
मज निवडून द्यावे ज्यांनी अन् सत्ता द्यावी ज्यांनी
मी सर्पासम त्यांनाही दंशलो, सोडले नाही


....रसप....
०३ मे २००९

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...