Sunday, April 26, 2009

OUT of COVERAGE


सारं काही मनात ठेवायला
माझं मन लहान
भावनांना आवरायला
मी न कुणी महान

कुठे काढू कशी काढू
भडास सांग माझी
तुझ्याशिवाय ऐकतंय कोण
वटवट कटकट माझी?

शेवटी तळ्याकाठचा दगड घेतला
समोर त्याला ठेवला
म्हटलं बोलू ह्याच्याशीच
तर तो स्वत:च बोलला..!!

"माणसासारखा माणूस तू
कसा मूर्ख इतका?
सावली कधी तुटेल काय
पायांस देऊन झटका?

मातीशिवाय झाड नाही
वेगाशिवाय वारा
सूराविना गीत नाही
धाग्याविना माला

आज मी दगड आहे
कारण शेंदूर फासला नाही
मूर्ती आणि माझ्यामध्ये
दूसरा फरक नाही

तुझा सुद्धा दगड झालाय
शेंदूर तूच पुसलास
माझं तरी नशीब आहे
तुझा तूच फसलास.."

दात विचकून हसू लागला
मला संताप आला
माझा की त्याचा, माहीत नाही
पण फेकून त्यालाच दिला

त्याने सुद्धा पङता पङता
पाणी थोडं उडवलं
गाठण्याआधी तळ त्याने
तरंगांना फ़ुलवलं..

खिशातून मोबाईल काढला
नेटवर्क मध्ये नव्हता
पण तू नसशील "OUT of COVERAGE"
विश्वास मला वाटला..


....रसप....
२४ एप्रिल २००९

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...