Friday, December 28, 2018

असामान्य माणसाची अविश्वसनीय कहाणी - झीरो (Zero - Movie Review)

२०१८ संपल्यात जमा आहे. ह्या वर्षीच्या यशस्वी-अयशस्वी सिनेमांचा विचार केला तर दोन ठळक बदल अगदी स्पष्टपणे जाणवतात. एक म्हणजे सिनेमा बनवणारे अधिकाधिक प्रयोगशील झाले आहेत आणि दुसरा म्हणजे प्रेक्षक ह्या प्रयोगशीलतेकडे पाहताना स्टारव्हॅल्यूचा विचार कमी करायला लागले आहेत. सामान्य माणूस - Layman - आणि त्याची कहाणी दाखवणारे सिनेमे प्रेक्षकांच्या जास्त पसंतीस पडले आहेत आणि असामान्य कहाण्या सांगणारे सिनेमे पाहताना प्रेक्षकांनी आपली सारासारविचारशक्ती परंपरागत सवयीनुसार थिएटरात येण्यापूर्वी मंदिराबाहेर चप्पल काढून ठेवल्यासारखी काढून ठेवायचं बऱ्याच अंशी बंद केलं आहे. त्यामुळेच रेस-३, ठग्स ऑफ हिंदोस्तान सारख्या मोठ्या स्टार्सच्या, बॅनर्सच्या सिनेमांना नेहमीप्रमाणे मिळणारं हमखास यश मिळालं नाही, तर बधाई हो, अंधाधून, स्त्रीसारखे 'लो प्रोफाईल' सिनेमे यशस्वी ठरले. 

सुपरस्टार्सच्या बाबतीत आजकाल बहुतांश प्रेक्षकांचा एक तक्रारीचा सूर ऐकू येतो की, इतकं नाव, पैसा कमवून झाल्यावर तरी हे लोक वेगळ्या वाटेचे प्रयोगशील सिनेमे का करत नाहीत. पण मला वाटतं, सलमान खान वगळता इतर स्टार लोक थोडेफार प्रयोग आताशा करायला नक्कीच लागले आहेत, असं मला वाटतं. सलमान खाननेही केले असते, पण त्याचा प्रॉब्लेम समज आणि कुवतीशी निगडीत असल्याने त्याच्याविषयीही एव्हढ्या बाबतीत सहानुभूती वाटायला हरकत नसावी. काही उदाहरणांचा विचार करायचा झाल्यास, अक्षय कुमारचा 'पॅडमॅन' हा एक खूप मोठा आणि वेगळ्याच वाटेवरचा यशस्वी प्रयोग होता. आमीरचा 'दंगल'ही तसाच खूप वेगळा आणि शाहरुखचा 'डिअर जिंदगी' एक हटके प्रयोग होता. हृतिकचे आशुतोष गोवारीकरसोबतचे दोन्ही सिनेमे प्रयोगशीलच मानायला हवे. शाहरुखच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'रा-वन' आणि 'फॅन' हेसुद्धा प्रयोगच होते. 
मात्र ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. हे लोक प्रयोग करतात पण त्यातही त्यांनी निवडलेलं पात्र हे 'लार्जर दॅन लाईफ'च असते. सामान्य माणसाच्या जवळ जाणारं पात्र साकारण्याचा प्रयत्न अजून तरी होताना दिसत नाही. प्रयोगशीलतेच्या नावाखाली अजूनही स्टार लोक असामान्य माणसांची सामान्य कहाणी किंवा सामान्य माणसाची असामान्य कहाणीच सादर करताना दिसतात आणि नेमकं असंच काहीसं 'झीरो'बाबतीतही आहे. किंबहुना, 'झीरो' अजून एक पाउल पुढे जाऊन 'असामान्य माणसाची असामान्य, नव्हे अविश्वसनीय कहाणी' सांगण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. प्रेक्षक पुन्हा एकदा एका कुठूनही कुठेही पोहोचणाऱ्या सिनेमाबद्दल शाहरुखवर टीकेची झोड उठवू शकतात, उठवत आहेतही. मात्र, गंडला असला तरी प्रयोग करण्याचा प्रयत्न तर केला आहे, ह्याचा विसर पडायला नको. कारण हीच भूमिका शाहरुखऐवजी कुणा दुसऱ्या नटाने साकारली असती, तर फसलेला असला तरी प्रयोग केल्याबद्दल त्याला दाद, शाबासकी सगळं नक्कीच मिळालं असतं. असा विचार मनात आल्यावर, प्रस्थापितांवर टीका करत असताना बहुतेक वेळा आपण अभावितपणे वाहवत जात असतो, असा एक संशयही स्वत:विषयी निर्माण होतो. 
असो.



मेरठच्या 'बौआ सिंग'ची ही कहाणी आहे. 'बौआ' ची शारीरिक रचना ठेंगणी आहे. घरच्या श्रीमंतीमुळे आणि (बहुतेक) शारीरक व्यंगामुळे लहानपणापासून मनात रुजलेल्या बंडखोर वृत्तीमुळे 'बौआ सिंग' एक बेदरकार, बेजबाबदार इसम आहे. 'झीरो' ही कहाणी 'बौआ सिंग'च्या 'मेरठ'च्या लहान-मोठ्या गल्ल्या, बाजारांपासून मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीपर्यंत, रस्त्यावरच्या टपोरीगिरीपासून बॉलीवूडमधल्या प्रसिद्ध व्यक्तींसोबत उठ-बस करण्यापर्यंत आणि जमिनीपासून ते अंतराळापर्यंतच्या प्रवासाची आहे. 
हा प्रवास 'तर्क' नावाच्या सिद्धांताचं बासन गुंडाळून पार अगदी मंगळ ग्रहापर्यंत भिरकावून देतो. 'बोटाने स्मार्टफोनला स्वाईप केल्यासारखं आकाशाच्या दिशेने हवेत स्वाईप करून आकाशातले तारे पाडणं', ही हिंदी सिनेमाच्या इतिहासात तर्काने मारलेल्या सर्वात खोल डुबक्यांपैकी एक डुबकी असावी. एका प्रसंगी तर आकाशातले तारे इतके सुदुरबुदूर होतात की त्या काळ्याभोर प्लॅटफॉर्मवर मुंबईतल्या ऐन ऑफिस अवर्सच्या वेळेची एखादी लोकल ट्रेन येऊन थांबली असावी आणि चहूदिशांनी सगळ्यांची धावपळ सुरु व्हावी, तसं काहीसं वाटतं.

मात्र असं असलं, तरी ही सगळी अतर्क्यता बऱ्यापैकी आत्मविश्वासाने सादर झालेली आहे.
शाहरुखचा चित्रपट म्हटला की चित्रपटभर शाहरुख आणि शाहरुखच असणं अपेक्षितच असतं. तसंच इथेही आहे. त्याचा वावर नेहमीप्रमाणे प्रचंड उत्साही आहे. मात्र ठेंगण्या व्यक्तींची देहबोली काही त्याला फारशी जमलेली नाही. नुसतीच वेगळी भूमिका करणं म्हणजे प्रयोगशीलता मानल्याप्रमाणे तो नेहमीच्याच देहबोलीने वावरला आहे. त्याचं ठेंगणेपण हे सर्वस्वी कॅमेऱ्याच्या करामती आणि स्पेशल इफेक्ट्सवर अवलंबून आहे. 'अप्पू-राजा'मध्ये कमल हसनने घेतलेली मेहनत (गुडघ्यावर चालणे, इ.) त्याने घेतल्याचे अजिबात जाणवत नाही. एरव्ही संवादफेक, मौखिक अभिनय, ऊर्जा इ. मध्ये शाहरुख नेहमीच दमदार असतोच. पण देहबोली अजिबातच न जमल्याने बौआ सिंग हा एक ठेंगणा आहे, ह्याचा आपल्यालाही काही वेळाने विसर पडतो. इथेच प्रयोग सपशेल फसतो.
अनुष्का शर्माने कमाल केली आहे. प्रत्येक चित्रपटात काही तरी वेगळं करण्यात अनुष्का शर्माचा हात कुणी धरू शकेल असं मला तरी वाटत नाही. चित्रपटभर शाहरुखच शाहरुख असला, चर्चासुद्धा त्याच्याविषयीच होत असली तरी प्रत्यक्षात हा चित्रपट अनुष्का शर्माने जिंकलेला आहे. तिने साकारलेली निग्रही 'आफिया' तिच्या आजवरच्या सर्वोत्तम कामांपैकी एक आहे.
'रईस'नंतर पुन्हा एकदा शाहरुखच्या पात्राचा 'साईड किक' म्हणून मोहम्मद झीशान अयुब सहाय्यक भूमिकेत जान ओततो. हा गुणी अभिनेता असल्या दुय्यम भूमिका करण्यातच गुंतत जातो आहे, ही हळहळ पुन्हा एकदा वाटते.
कतरिनाच्या भूमिकेची लांबी तिला जितका वेळ सहन केलं जाऊ शकतं, त्याच्याआत आहे. 
तिगमांशु धुलियासह बाकी सर्वांना अगदीच कमी काम आहे. त्यामुळे काही दखलपात्र असं जाणवत नाही.

'अजय-अतुल'कडे सध्या काही मोठ्या बॅनर्सचे सिनेमे आलेले आहेत. पैकी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फुसका बार ठरला. 'झीरो' त्या मानाने खूपच उजवा आहे. 'मेरे नाम तू..' हे गाणं तर मनाचं ठाव घेणारं आहे. त ऐकत असताना एक वेगळाच विचार मनात आला. प्रसिद्धीमध्ये ह्या गाण्याच्या तुकड्याला 'थीम'प्रमाणे वापरलं असतं तर ? एकंदरीतच संगीताच्या बाजूला अजून जास्त आक्रमकतेने सादर करायला हरकत नव्हती. त्यात तितकी कुवत आहे, असं वाटलं. 

'आनंद राय' हे काही दिग्दर्शकांपैकी खूप मोठं क्रिटीकली अक्लेम्ड नाव आहे, असं मला वाटत नाही. आनंद रायचे चित्रपट व्यावसायिक गणितं डोळ्यांसमोर ठेवूनच केलेले असतात, हे त्यांच्या फिल्मोग्राफीला पाहून लगेच लक्षात येतंच. त्यांनी इथेही दुसरं कुठलं गणित मांडलेलं नाही. मात्र आव मात्र तसा आणला असल्याने 'करायला गेले गणपती आणि झाला मारुती' अशीच गत झाली आहे ! 

शाहरुखच्या सुजाण चाहत्यांसाठी 'झीरो' म्हणजे पुन्हा एकदा एक अपेक्षाभंग आहे. मला मात्र ह्या अपेक्षाभंगाच्या दु:खापेक्षा त्याने प्रयोगशीलतेची कास सोडून पुन्हा एकदा 'हॅप्पी न्यू ईयर' किंवा 'दिलवाले' वगैरे टाईप आचरटपणा सुरु केला तर? - ही भीती जास्त सतावते आहे.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Saturday, November 24, 2018

नाविन्यशून्य अतिरंजित भडकपणाचा कडेलोट - मिर्झापूर (Mirzapur - Amazon Prime Web Series)

चालून आलेलं ऐश्वर्य, सत्ता असतानाही केवळ स्वत:च्या नाकर्तेपणाने त्यावर बोळा फिरवण्याची अनेक उदाहरणं इतिहासातही आहेत आणि आपल्या अवतीभवतीही. 
सर्व तऱ्हेची मोकळीक, मुभा असताना, चांगले रिटर्न्स मिळत असताना आणि बजेटचीही विशेष चिंता नसतानाही भारतीय सिनेमेकर्स वेब सिरीजच्या क्षेत्रात कशी चवीचवीने माती खात आहेत, ह्याचं अगदी ताजं ताजं उदाहरण म्हणजे 'अ‍ॅमेझॉन प्राईम'वरची 'मिर्झापूर' ही सिरीज. 
'मिर्झापूर'च्या पहिल्या सीजनचे ९ भाग प्राईमवर एकत्रच प्रदर्शित झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील 'मिर्झापूर' शहर. ह्या शहरावर वर्षानुवर्षं 'त्रिपाठी' ह्या बाहुबलींचं राज्य आहे. आधी सत्यानंद त्रिपाठी (कुलभूषण खरबंदा) आणि आता अखंडानंद त्रिपाठी उर्फ 'कालीन भैया' (पंकज त्रिपाठी). गालिच्यांच्या निर्मितीआड अफीम आणि देशी कट्ट्यांचा व्यापार करणाऱ्या कालीन भैयाचा बिगडेदिल शहजादा मुलगा म्हणजे 'फुलचंद उर्फ मुन्ना त्रिपाठी' (दिव्येंदू शर्मा) हा ह्या साम्राज्याचा पुढचा वारसदार. मुन्नावर एका खूनाचा गुन्हा दाखल होतो आणि एक इमानदार सरकारी वकील रमाकांत पंडित (राजेश तैलंग) त्याच्याविरुद्ध वकिली करायला उभा राहतो. पंडितजींचे दोन मुलगे गुड्डू (अली फझल) आणि बबलू (विक्रांत मासी) आणि एक मुलगी असते. गुड्डू वर्चस्व आणि सत्तालोलुप असतोच आणि बबलूकडे थोडा सारासारविचार असतो. मुन्नाविरुद्धची केस ह्या दोघा मुलांना वर्चस्वाच्या, इर्ष्येच्या संघर्षात ओढते आणि सगळ्या मिर्झापूरचा चेहरामोहरा बदलतो.


ही सगळी कहाणी आजकालच्या टिपिकल गँगवॉर फिल्म्ससारखीच पुढे पुढे सरकत, पसरत जाते. अनावश्यक भडक चित्रिकरणामध्ये मात्र 'मिर्झापूर' आजपर्यंतच्या सगळ्या भारतीय सिनेमा व सिरीजच्या अनेक पाउलं पुढे आहे. अतिरक्तरंजितपणा जागोजाग भरलेला आहे. एखाद्याला गोळी घातली आणि तो मेला, इतकं सरळसोट तर काहीच नाही. त्याची लिबलिबणारी आतडी पोटातून बाहेर लोंबली पाहिजेत, फुटलेला डोळा बाहेर लटकला पाहिजे, रक्ताचे फवारे तर उडलेच पाहिजेत पण सोबत मांसाचे तुकडेही आलेच पाहिजेत, गळा चिरतानाच्या चिळकांड्या साक्षोपाने दिसल्या नाहीत तर माणूस मेल्यासारखा वाटणारच नाही अश्या अत्यंत कल्पक डिटेलिंगवर भरपूर वेळ घालवला आहे. 
जोडीला अनावश्यक आणि अगदी हास्यास्पद सेक्सची दृश्यंसुद्धा आहेत. मग लायब्ररीत बसून मुलीने केलेलं हस्तमैथुन असो किंवा कुणाचे अनैतिक संबंध, एकाही प्रसंगाचा मूळ कथेशी काही एक संबंध नाही आणि ते केवळ धाडसीपणा, बिनधास्तपणा म्हणून चित्रित केलेले असावेत, असंच जाणवतं, कारण झाडून सगळी दृश्यं फसलेलीही आहेत ! 
इतकी भडक हिंसा आणि उथळ सेक्स दृश्यं असल्यावर शिव्यांनीच काय पाप केलंय ? त्यामुळे त्यामुळे प्रत्येक वाक्यात विरामचिन्हं वापरावीत इतक्या सढळपणे परस्परांच्या माता-भगिनींचं आदरपूर्वक स्मरण केलं जातं. हे तर इतकं अति आहे की ह्या व्यक्तिरेखा सकाळी झोपेतून जाग आल्यावर मनातल्या मनात स्वत:लाही 'उठ की आता मायघाल्या' असं म्हणत असाव्यात. त्याशिवाय त्यांची सकाळच होत नसावी किंवा त्यांना प्रेशरच येत नसावं कदाचित. संवादांतले बहुतांश 'पंचेस' आणि विनोद हे केवळ शिव्यांमुळे आहेत. सर्जनशीलतेच्या दिवाळखोरीचं ह्याहून मोठं दुसरं उदाहरण बहुतेक तरी नसावंच. 
['ब्रिजमोहन अमर रहे' नावाचा 'नेटफ्लिक्स' ओरिजिनल सिनेमाही ह्याच पंथातला असावा. मी तो पूर्वी पाहायला घेतला होता आणि पहिल्या काही मिनीटांतच ह्याच सगळ्या दिवाळखोरीचा उबग येऊन बंद केला होता.]

ह्या सगळ्यावरून एक स्पष्टपणे लक्षात येतं की स्वातंत्र, मोकळीक मिळून काही उपयोग नसतोच. उलट ती एक अजून मोठी जबाबदारी असते. पिसाळल्यासारखं, वखवखल्यासारखं अनावश्यक चित्रण करत सुटणं म्हणजे त्या स्वातंत्र्याला ओरबाडणं झालं. ह्याच्या आधी हा अनुभव 'सेक्रेड गेम्स'मध्ये आला होता. अनुराग कश्यपच्या बहुतांश सिनेमांमध्ये येतच असतो. मोकळीक मिळाली की भडक हिंसा आणि सेक्स दाखवणं, हा अगदी सोपा मार्ग आहे. ह्या मोकळीकीचा वापर करून काही नाविन्यपूर्ण किंवा वादग्रस्त विषय, जे एरव्ही हाताळता येणार नाहीत, ते कुणी हाताळत नाही कारण ते अवघड असेल. सोपं हेच आहे की फाडा पोटं, उडवा मुंडकी, काढा कपडे, झवा मागून पुढून ! हिंसा आणि सेक्स अगदी सहज विकले जातील म्हणून दाखवायचे, इतका सरळसाधा व्यावसायिकपणा ह्या मागे असून, त्यावर उद्या सेन्सॉरची गदा आली की मात्र ह्याच व्यावसायिकपणाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवणार. 

'मिर्झापूर' हा ह्या हलक्या विकृत व्यावसायिकतेचा अजून एक किळसवाणा, तिरस्करणीय चेहरा आहे. हा चेहरा सर्जनशील वगैरे अजिबात नसून मिळालेलं स्वातंत्र्य ओरबाडून उपभोग घेण्यासाठी वखवखलेला आहे. 

अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा हे चौघे मुख्य भूमिकांत आहेत. तर श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा अशी सगळी मंडळी सहाय्यक भूमिकांत. सगळ्यांचीच कामं जबरदस्त झाली आहेत. त्यांच्या प्रभावी कामांमुळे सिरीज पाहात राहावीशी वाटते, हे मात्र नक्कीच. कुणाही एकाचा पॉवरहाऊस पर्फोर्मंस असा इथे नसून सगळे एकाच पातळीवर दमदार आहेत, हे विशेष. 'अमित सियाल' ह्या गुणी अभिनेत्यांच्या एन्ट्रीला आपल्या भुवया अपेक्षांसोबत उंचावतात. मात्र तो सिरीजमध्ये कशासाठी आहे, हे शेवटपर्यंत समजतच नाही. त्याला पूर्णपणे वाया घालवला आहे. 
कथानकात अनेक ठिकाणी तर्क वगैरे वास्तववादी पाखरांना भुर्रकन उडवून लावलं आहे. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट पात्र अमुक एक कृती का करतो, त्या मागे त्याचा विचार काय आहे, हे अनेकदा समजत नाही. किंबहुना, हे त्या त्या वेळी अगदी स्वाभाविक घडायला हवं असतं, ते घडलं असतं तर कहाणी कधीच संपली असती त्यामुळे हा सगळा पाणी ओतून ओतून वाढवत नेण्याचा प्रकार आहे, दुसरं काही नाही. 

एकंदरीत प्रभावी अभिनय आणि हिंसक दृश्यांमुळे साहजिकपणे निर्माण होणारा थरार ह्या जोरावर 'मिर्झापूर' उभी आहे. ह्यात कुठल्याही प्रकारची कल्पकता शोधू नका आणि ती शोधणं हा जर तुमचा स्वभावधर्म असेल, तर हिच्या वाटेलाच जाऊ नका !

मिर्झापूर (An Amazon Prime Original Series)
निर्मिती - एक्सेल एन्टरटेनमेंट (फरहान अख्तर, रितेश सिधवानी)
दिग्दर्शक - करण अंशुमन, गुरमीत सिंग, मिहीर देसाई, निशा चंद्रा 
लेखक - करण अंशुमन, पुनीत कृष्ण, विनीत कृष्णन,
कलाकार - अली फझल, विक्रांत मासी, पंकज त्रिपाठी, दिव्येंदू शर्मा, श्वेता त्रिपाठी, श्रिया पिळगांवकर, कुलभूषण खरबंदा, रसिका दुग्गल, शीबा चढ्ढा, अमित सियाल 
छायाचित्रण - संजय कपूर
पार्श्वसंगीत - जोएल क्रेस्टो

- रणजित पराडकर

Saturday, October 13, 2018

अभूतपूर्व भयाविष्कार -तुंबाड' - (Movie Review - Tumbbad)

पाऊस, अंधार आणि एकटेपण, ह्या तिन्हींत एक समान धागा आहे. अजूनही असतील, पण एक नक्कीच आहे. तो म्हणजे 'भय'. अंधार आणि एकटेपणातल्या भयाचा अंश चित्रपटांतून व कथांतून अनेकदा समोर येतो, आला आहे. 'पाऊस' मात्र फार क्वचित अश्या रुपात समोर आला आहे.
'सत्या' मध्ये पावसाची एक मुख्य भूमिकाच होती. तो पाऊस 'सत्या'मध्ये मुंबईची ओळख देत होता. कथानकातल्या जवळजवळ प्रत्येक महत्वाच्या प्रसंगात त्याची उपस्थिती, त्याची साक्ष होतीच. चित्रपटात पावसाचा इतका प्रभावी वापर 'सत्या'नंतर आत्ता वीस वर्षांनंतर 'तुंबाड' मध्ये दिसतो. अर्थात पावसाच्या ह्या दोन्ही भूमिका पूर्णपणे भिन्न आहेत. 'तुंबाड'चा पाऊस अनिश्चिततेचं गूढ भयप्रद सावट आणणारा आहे. त्याच्या सततच्या कोसळण्यातून एक उद्गार ऐकू येत राहतो. तो उद्गार हृदयाचा स्पंदनं वाढवतो, मन अस्थिर करतो. त्याचं कोसळणं नेहमीच अशुभ वाटतं आणि तरीही त्यात एक प्रकारची विचित्र अपरिहार्यताही अटळपणे जाणवत राहते. 'तुंबाड'च्या कथेचा अनन्यसाधारण महत्वाचा भाग - भय - हा ह्या पावसाने 'अंधार' आणि 'एकटेपणा'च्या जोडीने समर्थपणे पेलला आहे.
हे भय, ही भीती वेगळ्या प्रकारची आहे. तिचा जन्म लोभ, लालसेतून झाला आहे. इथली अमानवी शक्ती भुताची नसून देवाची आहे. इथला मनुष्य फक्त स्वत:च घाबरत नाही, तो त्या अमानव्यालाही घाबरवतो. किंबहुना, भय विरुद्ध भय असा हा सामना आहे, ज्यात अर्थातच भयाचाच विजय होणार असतो आणि होतोही.

ही कहाणी तीन कालखंडांत घडते. सुरुवात १९१८ मध्ये होते.
'तुंबाड' हे साताऱ्यापासून थोडं दूर असलेलं एक गाव. तिथला एक भयाण, गूढ वाडा. त्याचा मालक एक म्हातारा 'सरकार'. ह्या वाड्यात अमर्याद किंमतीचा खजिना लपलेला असल्याची निश्चित माहिती 'सरकार' कडे असते. पण अख्खं आयुष्य खर्ची पडूनही त्याला काही तिचा शोध घेता येत नाही.
मात्र त्याचा अनौरस पुत्र 'विनायक' ह्या संपत्तीच्या शोधाचा ध्यास घेतो. त्याच्या बालपणापासून ह्या कथानकाची सुरुवात होते. म्हाताऱ्या 'सरकार'च्या मृत्युनंतर आईच्या हट्टामुळे त्याला 'तुंबाड' सोडावं लागतं. मात्र पंधरा वर्षांनंतर त्याचा ध्यास त्याला पुन्हा तिथे यायला भाग पाडतो.
कहाणीचा तिसऱ्या भागात लोभ आणि स्वैराचारात गुरफटलेला विनायक त्याच्या मुलाला ह्या शोधाचा लोभी वारसा सोपवतो. आत्तापर्यंत भारत स्वतंत्र होऊन संस्थानं आणि राजांच्या मालमत्तांचं विलिनीकरण सुरु झालं असतं. 'मग त्या खजिन्याचं, वाड्याचं काय होतं?' हा प्रश्न चित्रपट पाहूनच सुटेल.

नारायण धारप ह्यांच्या एका कथेवर बेतलेला हा चित्रपट लेखक-दिग्दर्शक राही अनिल बर्वे ह्यांचं एक 'ड्रीम प्रोजेक्ट' आहे. हे स्वप्न सत्यात उतरायला अनेक पावसाळे जावे लागले आहेत. बऱ्याच संघर्षानंतर त्यांच्या ह्या स्वप्नाचं जे सत्यस्वरुप समोर आलं आहे, ते पाहता 'the wait was worth it' असंच म्हणावं लागेल ! पटकथेवर अनेक वर्षांचे संस्कार झाल्याने खूप विचारपूर्वक तिची अगदी घट्ट अशी बांधणी झाली आहे. अनावश्यक रेंगाळणं वगैरेला इथे बिलकुल स्थान नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षक अनिश्चित भयाच्या सावटाखाली राहतो, त्याला अजिबात उसंत मिळत नाही. हे कथानक काही action packed किंवा सतत हेलकावे आणि वळणं घेणारं थरारनाट्य नाहीय. ह्यात धक्कातंत्र नाहीय. मात्र तरीही गूढ आणि भयाचा ताण मनावरून कुठेच हलका होता होत नाही.

प्रेक्षकाच्या मनावरची ही पकड ढिली न होऊ देण्याचं श्रेय कमालीच्या साउंड डिझाईनिंगचंही वाटलं. आधीच म्हटल्याप्रमाणे पावसाचा आवाज हा ह्या साउंड डिझाईनिंगमधला एक महत्वाचा भाग आहेच. मात्र त्याशिवायही अनेक ठिकाणी बारकाईने काम केलं आहे.
जोडीला प्रभावी पार्श्वसंगीत सगळी तीव्रता अजून वाढवतं. एरव्ही भयपटांमध्ये पार्श्वसंगीताचं एक महत्वाचं काम 'भो:' करून घाबरवण्याचं असतं. इथे असला कुठलाच ढणढणाट नाही. घाबरवण्यासाठी, अस्सल भयनिर्मिती करण्यासाठी असल्या उसनेपणाची गरज 'तुंबाड'ला भासतच नाही.

संपूर्ण कथानक महाराष्ट्रात आणि मराठी पात्रांचंच असल्याने साहजिकच पडद्यावरील कलाकारांचे हिंदी उच्चार मराठाळलेले असणं आवश्यक होतं. इथे अनिता दाते, दीपक दामले सारखे मराठी सहकलाकार आहेतच मात्र प्रमुख भूमिकेत असलेला सोहम शाह आणि इतर काही सहकलाकार अमराठी आहेत. तरीही त्यांचे हिंदी उच्चार सफाईदार वाटणार नाहीत ह्याची खबरदारी घेतली गेली आहे, हे खूप वाखाणण्याजोगं वाटलं. बालकलाकार मोहम्मद समादकडूनही ह्यासाठी मेहनत करवून घेतली असल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवतं.

'तुंबाड' हे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात घडणारं कथानक आहे. तेव्हाचा भूभाग, राहणी, घरं हे सगळं खूप अस्सल वाटेल अश्या प्रकारे चित्रित करण्यात आलं आहे. वारंवार हा उल्लेख होतो आहे, पण 'पाऊस' वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या रूपांत अप्रतिम सादर केला आहे. वाडा, त्याच्या आतला भाग आणि गुहा व इतर गूढगम्य जागा ह्यांचं चित्रण अंगावर येतं. ह्या अंगावर येण्यामागे 'किळस' किंवा 'बीभत्सपणा' नसून त्यातून सतत डोकावणारं 'भय' आहे.

सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, घट्ट बांधलेली व वेगळेपण असलेली कथा-पटकथा, पकड घेणारं ध्वनीदिग्दर्शन व पार्श्वसंगीत, भेदक नजर असलेलं कॅमेरावर्क, लोभ व लालसेने बरबटलेला मानवी चेहरा, दैवी शक्तीचं दानवी रूप अश्या सगळ्यांतून 'तुंबाड' नावाचा एक अभूतपूर्व भयाविष्कार दृश्य स्वरूप घेतो. मोठ्या पडद्यावर आणि दमदार आवाजासह हा अनुभव घेणं केवळ चित्तथरारक आहे. चित्रपटाची लांबी फक्त पावणे दोन तासांची आहे, हेही विशेष उल्लेखनीय आहे.
सहज विकल्या जाऊ शकणाऱ्या इतर काही चित्रपटांसमोर हे वेगळं प्रोडक्ट बाजारात फार काळ टिकेलच, ह्याची दुर्दैवाने खात्री देता येत नाही. मात्र चित्रपट पाहताना पाहणाऱ्याच्या पाहण्याची धैर्यपरीक्षा 'तुंबाड'च्या भयाकडून घेतली जाईल, ह्याची खात्री नक्कीच देता येईल.

रेटिंग - * * * * *

- रणजित पराडकर

--------------------------------

"तुंबाड"

दिग्दर्शन : राही अनिल बर्वे, आनंद गांधी
निर्मिती : सोहम शाह, आनंद एल. राय, मुकेश शाह, अमिता शाह
पटकथा : मितेश शाह, आदेश प्रसाद, राही अनिल बर्वे, आनंद गांधी
कलाकार : सोहम शाह, अनिता दाते, मोहम्मद समाद, दीपक दामले
संगीत : अजय-अतुल, जेस्पर किड
छायाचित्रण : पंकज कुमार
संकलन : संयुक्ता कज़ा
ध्वनी : ध्रुव पारेख, कुणाल शर्मा

Friday, September 14, 2018

हार्मनी विथ ए. आर. रहमान (Harmony with A. R. Rahman)


ही 'अॅमेझॉन प्राईम'वर रिलीज झालेली पाच भागांची एक सिरीज. ह्यात ए. आर. रहमान भारतातल्या चार वेगवेगळ्या राज्यांतल्या चार कलाकारांशी संवाद साधून, त्यांच्या कलेशी ओळख करून व करवून देतो आणि पाचव्या भागात हे चार जण चेन्नईला रहमानच्या स्टुडीओत येऊन रहमान आणि त्याच्या ensemble सह एक मैफल करतात. 

हे चार भाग असे -

भाग-१. सजित विजयन - केरळ - मेळावुवादन (Mizhavu) 

भाग-२. बहाउद्दीन डागर - नवी मुंबई - रुद्रवीणा (धृपदवादन)

भाग-३. लौरेबम बेदबाती - मणिपूर - खुनुंग इशेई गायन (Khunung Esei)

भाग-४. मिकमा त्शेरिंग लेपचा - सिक्कीम - पन्थोंग पलित वादन (Ponthong Palit)


'मेळावु' हे एक तालवाद्य. साधारणपणे एका मोठ्या गोलाकार माठाच्या तोंडाला चामडे बांधून तयार केलेले हे वाद्य. नादनिर्मितीची अत्यंत संकुचित मर्यादा असल्याने ह्यात वैविध्य फारसं दिसत नाही आणि असल्यास ह्या भागातून ते धुंडाळलंही जात नाही. सिरीजचा हा पहिलाच एपिसोड, ह्या खूप मर्यादित स्कोप वाटणाऱ्या वाद्यावर आधारलेला असल्याने खरं तर पुढील भागांबद्दलची उत्सुकता जरा कमी करतो. 
'केरळ'चं अप्रतिम चित्रीकरण ह्या भागात आहे. एकूणच ह्या सिरीजमध्ये एरियल शॉट्सने अप्रतिम असं निसर्गदर्शन होणार आहे, हे ह्या पहिल्या भागातच स्पष्टपणे जाणवतं. मात्र ह्या निसर्गदर्शनाशिवाय फारसं काही ह्या भागात हाती लागत नाही. सांगीतिक बाजूबाबत बोलायचं, तर रहमान आणि विजयन ह्यांचं जेव्हा एकत्र वादन होतं, तेव्हा ते खऱ्या अर्थाने एकत्र वाटतच नाही. दोघं समांतर चालले आहेत, असंच वाटत राहतं. 

अगदी असाच अनुभव तिसऱ्या एपिसोडमध्येही येतो. त्यात रहमान मणिपूरला जातो. तिथलं लोकसंगीत, जे 'खुनुंग इशेई' ह्या नावाने ओळखलं जातं, त्याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो. खुनुंग इशेई गायक कलाकार 'श्रीमती लौरेबम बेदबाती' ह्यांचा ह्या भागात सहभाग आहे. बहुतेक तरी ह्या एपिसोडमध्येही लोकसंगीताचा हा प्रकार पुरेसा धुंडाळला गेला नसावा. कारण संगीताचा जो आत्म्यापासून आत्म्यापर्यंत किंवा मनाचा मनाशी असा संवाद, भाषा आणि संस्कृतीच्या बंधनांना पार करून थेट व्हायला हवा, तो काही होत नाही. केरळ आणि मणिपूर, ह्या दोन्ही जागांच्या नैसर्गिक सौंदर्यावर ह्या दोन्ही भागांचा पाया बेतलेला वाटतो. संगीतावर नाही. इथेही रहमानचं वादन आणि बेदबातींचं गायन एकमेकांत मिसळत नाही. 

पहिल्या भागाच्या अपेक्षाभंगावर दुसरा भाग एक प्रकारचं औषध आहे. खऱ्या अर्थाने 'सांगीतिक श्रीमंती' आणि 'संगीताचं तत्वज्ञान' ह्या भागात जास्त चांगल्या प्रकारे आपल्या भेटीला येतं. कदाचित शहरी भागातलं चित्रीकरण असल्याने निसर्गदर्शनावर फोकस जाण्यासाठी स्कोपच नसल्यामुळे हा भाग मूळ मुद्दा - संगीत - बऱ्यापैकी धरून ठेवतो. ह्या भागात रहमानचा पवित्राही इतर तीन भागांपेक्षा खूप वेगळा आहे. तो खूपच बचावात्मक नम्र वाटला आहे. नम्रता तर चारही भागांत त्याच्यात जाणवतेच, मात्र इथे तो स्वत:च बॅकसीटवर जातो आणि बहाउद्दीन डागरसाहेब व त्यांचं कथन पुढे येतं. इथलं रहमानचं एकट्याचं डागरसाहेबांसमोरचं एक छोटं सादरीकरण, त्यावरून सुरु होणाऱ्या चर्चेत राग चारुकेसीचा उल्लेख येऊन नंतर त्याने 'तू ही रे..' मधलं चारुकेसीचं अंग उलगडणं, हे सगळं उत्स्फूर्त आणि सुंदर झालं आहे. त्यानंतरचं डागर साहेब आणि रहमान ह्यांचं एकत्र वादनही रंगतदार वाटतं.

चौथा भाग सांगीतिक पातळीवर दुसऱ्याच्या खालोखाल वाटला. 'मिकमा त्शेरिंग लेपचा' हे सिक्कीमचे मूलनिवासी 'लेपचा' ह्या समाजाचे प्रतिनिधी. बासरीसारखं दिसणारं पण चारच छिद्रं असलेलं 'पन्थोंग पलित' हे वाद्य, त्याचं विशिष्ट पद्धतीचं वादन व स्वत: मिकमा ह्यांचं गायन, ह्याच्याशी आपली ओळख ह्या भागातून होते. सिक्कीमच्या पहाडी भागातली 'लेपचा' ही एक पहाडी, शिकारी जमात. त्यांचं हे संगीत. त्या संगीतातून एक प्रकारचं गूढ, पण हवंहवंसं कारुण्य जाणवलं. ह्या भागात सगळ्यात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, मिकमा ह्यांची अतीव विनयशीलता. बिकट आर्थिक परिस्थितीतून वर आलेल्या ह्या कलाकाराच्या वागण्या-बोलण्यातून आपण सोसलेल्या प्रतिकूलतेबाबत कुठलाही विचित्र अभिमान - जो आजकाल हलाखीतून वर आलेल्या अनेकांत दिसतो - किंवा त्या काळाबाबत कसलाही असंतोष जाणवत नाही. त्यांचा हाच विनय त्यांच्या वादन व गायनातूनही दिसून येतो. 

पाचवा आणि अखेरचा एपिसोड, आधीच सांगितल्याप्रमाणे सर्वांच्या एकत्र मैफलीचा आहे. त्यासाठी सर्वांनी चेन्नईला येणं. तयारी करणं. ह्या सगळ्या प्रोसेसबाबत, रहमानबाबत त्यांना काय वाटलं, ह्याचं कथन आणि सरतेशेवटी वादन, मैफल. साधारण १०-११ मिनिटांची ही मैफल अस्सल रहमानस्पर्श झालेली संगीतनिर्मिती आहे. ही मैफल खूप आवडली, मात्र त्यात पाहुण्या कलाकारांचा सहभाग फार काही लक्षणीय वाटला नाही. खासकरून रुद्रवीणा तर सगळ्या कोलाहलात हरवून गेल्यासारखीच वाटली. 
ह्या मैफलीइतकंच मला शीर्षक संगीतही आवडलं. त्यात वापरली गेलेली छोटीशी धून खूपच मेलडीयस आहे. 

To conclude, 'हार्मनी' मला सिनेमॅटिकली जास्त आवडलं. पाचपैकी दोन एपिसोड तर म्युझिकली फारच कमी पडल्यासारखे वाटले. सर्वोत्तम एपिसोड डागरसाहेबांचा. Shows why Classical Music is the supreme. 
माझी ह्या सिरीजने निराशा झाली कारण 'रहमानसाठी पाहणं' म्हणजे 'संगीतासाठी पाहणं' असतं, छायाचित्रणासाठी नव्हे. छायाचित्रणाचं काम अफलातून झालं आहेच, पण सिरीजचं नेमकं प्रयोजन जर त्या त्या भागातील संगीत आणि त्यांचं त्या त्या भागातील निसर्गाशी नातं उलगडणं हे असेल, तर त्यात एक असमतोल नक्कीच आहे. भारतीय सिनेसंगीत एकसुरी आणि सामान्यत्वाकडे वेगाने घसरत चालले असतानाच्या काळात 'ए. आर. रहमान' एक वेगळा साउंड आणि वेगळं सृजन घेऊन समोर आला होता. He was a Knight in Shining Armour. अधूनमधून त्याने काही अदखलपात्र कामं जरी केली असली, तरी आजही 'रहमान' हे नाव संगीतास्वादकांसाठी अपेक्षांच्या एका मोठ्या उंचीवरच आहे. प्रत्येक वेळी, जसं सचिनकडून शतकाची अपेक्षा असायची, तशी रहमानकडून जादूची अपेक्षा असते. पाच भागांच्या ह्या वेब सिरीजमध्ये असे जादूचे क्षण शोधत राहावे लागले, हा माझा अपेक्षाभंग आहे. 'रहमान'ऐवजी दुसरं काही नाव असतं, तर कदाचित ह्याच निर्मितीने मला अधिक जास्त आनंद दिला असता.

- रणजित पराडकर

Friday, September 07, 2018

पहारा

तुझ्या प्रश्नांमधे असते भयानकशी अनिश्चितता
तुला उलथायची असते स्वत:च्या आतली सत्ता
नवी अन् वेगळी किंमत असे प्रत्येक बदलाला 
कधी मोजायची असते, कधी साभार नशिबाला

कुणाला काळजी नाही, कुणी ना चौकशी करते
तुला पाहून हळहळते, असे नाही कुणी येथे
जराशी भूल घेण्याला मनाची मान्यता नसते 
व्यथांवर प्रेम जडल्यावर व्यथांनाही व्यथा कळते

कधी थांबायचा झगडा, असे चालायचे कुठवर ?
कधी मिळणार प्रश्नाला बरोबर नेमके उत्तर ?
तसा खंबीर तू दिसतोस पण आहेस ना नक्की ?
पहा, होतील आता तर स्वत:ची माणसे परकी 

घड्याळातील काटाही तुला न्याहाळतो आहे
तुझ्या संवेदनांवरचा पहारा वाढतो आहे
नजर चोरुन, तरी मोजुन, गणित तू मांड श्वासांचे
स्वत:हुन सांगते पत्ते दिशा पाऊलवाटांचे

....रसप....
७ सप्टेंबर २०१८

Saturday, July 21, 2018

संक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)

क़यामत से क़यामत तक़, इशक़जादे, साथिया अश्या काही सिनेमांचं 'सुधारित मिश्रण' असलेल्या 'सैराट'चं सुधारित मिश्रण 'धडक' नावाने सिनेमागृहांत धडकलं आहे. मात्र आचरट प्रादेशिक अस्मिता आणि भयाण जातवास्तवाच्या सत्यकथनाबाबत असलेला एक अनाठायी आग्रह, 'धडक'ला मारक ठरणार, ही रिमेकची घोषणा झाली तेव्हापासून वाटत असलेली भीती अगदी सेंट-पर्सेंट खरी ठरत आहे. प्रत्यक्षात जातीभेदाने पोखरलेल्या ग्रामीण भागातलं अत्यंत वास्तववादी चित्रण वगळता बाकी काहीही विशेष नसलेल्या 'सैराट'च्या तब्बल तीन तासांच्या पसरट आणि रटाळ मांडणीसमोर 'धडक'चं अडीच तासांचं कथन खूप नेमकं आणि संक्षिप्त वाटतं. जातविस्तवाचे चटके 'धडक' देत नाही, हे मात्र खरं. तरी, 'धर्मा'चा चित्रपट आहे म्हटल्यावर त्याला जरासा 'टोन डाऊन' केलं जाणार, हे अपेक्षित ठेवायलाच हवं होतं म्हणून नंतरच्या नाकं मुरडण्यालाही अर्थ उरत नाही. 'धडक'चा खरा लेट डाऊन आहे, तो म्हणजे 'त्या'च्या मित्रांचा एकंदर भाग. सल्या-लंगड्या हे 'सैराट'च्या पूर्वार्धाची जान होते. सहाय्यक भूमिकांत सहाय्यक भूमिकेत असूनही 'तानाजी गालगुंडे'ने साकारलेला लंगड्या प्रदीप आजही सगळ्यांच्याच लक्षात आहे. 'श्रीधर वत्सर' आणि 'अंकित बिश्त' ह्यांची कामं उत्तम झाली असली, तरी त्या मानाने लक्षात राहण्यासारखी नाहीत. कारण एकूणच त्यांच्या 'ट्रॅक'मध्ये 'सैराट'वाली मजाही नाही आणि वावही नाही.

मराठीतून हिंदीत आणताना हे कथानक महाराष्ट्रातून राजस्थानमध्ये गेलेलं आहे. उदयपूरमधील एक मोठ्या खानदानातली मुलगी 'पार्थवी सिंग' (जान्हवी कपूर) आणि उदयपूरमधल्याच एक हॉटेलव्यावसायिकाचा मुलगा मधुकर बागला (इशान खट्टर) ह्यांचं हे प्रकरण आहे. चित्रपटात २-३ वेळा 'वो लोग ऊँची जात के हैं' असा उल्लेख येत असला, तरी संघर्षाचं मुख्य कारण निवडणूक, राजकीय स्थानाला लागलेला धक्का असं सगळं आहे. 'सैराट'चं कथानक महाराष्ट्रातून हैद्राबादपर्यंत पोहोचतं, तर 'धडक'चं कथानक उदयपूरहून मुंबई व नागपूर व्हाया कोलकात्यात स्थिरावतं. ह्या संपूर्ण कथानकात 'धडक'ची कथा कुठेही अनावश्यक रेंगाळत, घुटमळत नाही. हा वाढवलेला वेग 'धडक'चं मुख्य आणि पहिलं बलस्थान आहे. 

दुसरं बलस्थान पात्रांची निवड आणि त्यांची कामं.
इशान खट्टर आणि जान्हवी कपूर, हे वशिल्याचे घोडे जरी असले तरी ठोकळे अजिबातच नाहीत. इशान खट्टर तर खूपच सहजाभिनय करणारा वाटला. मोठ्या भावाने सुरुवातीच्या सिनेमात जी चमक दाखवली होती, त्याची तुलना केली तर 'छोटे मियां भी सुभानअल्लाह' निघू शकतात, असा विश्वास वाटतो. चित्रपटातील बरेचसे प्रसंग मूळ चित्रपटातूनच घेतले असल्यामुळे त्या त्या जागी दोन कलाकारांची थेट तुलना नकळतच केली जाते. तिथे इशान आणि जान्हवी, आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरूपेक्षा खूप सरस ठरतात. (रिंकू राजगुरूला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार आश्चर्यकारकच वाटला होता.) तरी, जान्हवी कपूरचा नवखेपणा जाणवत राहतो. खासकरून शेवटच्या प्रसंगात तिच्या मर्यादा स्पष्टपणे दिसून येतात. एरव्ही, दोघांची जोडी खूप टवटवीत आणि प्रभावीही वाटते.
आशुतोष राणाला ट्रेलर्समध्ये पाहताना खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. दुर्दैवाने, त्याच्या वाट्याला फारशी भूमिकाच नाही. मात्र वाट्याला आलेल्या काही मोजक्या प्रसंगांतही आतल्या गाठीचा, बेरक्या राजकारणी त्याने जबरदस्त वठवला आहेच. 
कहानी - १, कहानी - २, स्पेशल छब्बीस सारख्या चित्रपटांत सहाय्यक भूमिकांत दिसलेला 'खराज मुखर्जी' इथेही सहाय्यक भूमिकेत जान ओततो. 'सैराट'मध्ये छाया कदमनी साकारलेल्या कर्कश्य आक्काच्या जागी बंगाली बाबू 'सचिनदा' म्हणून खराज मुखर्जी आणणं, दोन चित्रपटांच्या उत्तरार्धांच्या तुलनेत 'धडक'चं पारडं जड करतं.
मधुकरचे मित्र म्हणून 'अंकित बिश्त' आणि 'श्रीधर वत्सर' विशेष लक्षात राहणार नाहीत, अशी काळजी बहुतेक लेखकाने घेतली आहे. कारण 'धडक' हा ठळकपणे दोन स्टारपुत्र व कन्येच्या लाँचिंगसाठीचाच चित्रपट आहे. (इशानचा ह्यापूर्वी येऊन गेलेला माजीद माजिदी दिग्दर्शित 'बिहाईंड द क्लाऊड्स' म्हणजे त्याचं व्यावसायिक हिंदी चित्रपटातलं 'लाँचिंग' नाहीच म्हणता येणार.) 



गाण्यांच्या पुनर्निर्मितीवरून खूप उलटसुलट मतप्रवाह आहेत. 'झिंगाट' आणि 'याड लागलं' ची नवीन वर्जन्स कानाला मराठी शब्दांची सवयच झालेली असल्यामुळे खटकत राहतात. मात्र विचार केल्यास, ही दोन्ही गाणी त्यांच्या गरजेनुसार अमिताभ भट्टाचार्यनी उत्तम लिहिलेली आहेत. 'ढूँढ गूगल पे जा के मेरे जैसा कोई मिलेगा कहाँ..' सारख्या ओळी कथानकाच्या ग्रामीण ते निमशहरी भागाकडे येण्याला साजेश्या आहेत. शीर्षक गीत 'धडक'ही उत्तम जमून आलं आहे. अजय-अतुलकडे असलेल्या येणाऱ्या चित्रपटांची यादी वजनदार आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान, झीरो, सुपर 30, पानिपत आणि शमशेरा हे सगळे आगामी चित्रपट मोठ्या बॅनर्सचे आहेत. आत्तापर्यंतचं त्यांचं हिंदीतलं कामही दखलपात्र आहेच. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षाही जास्त आहेत.

'धडक'मध्ये ओरिजिनल जर काही असेल तर तो फक्त शेवट. 'सैराट'चाही तोच उच्चबिंदू होता. तो बिंदू बदलण्याची, तरी उंची कायम ठेवण्याची करामत शशांक खेताननी केली आहे. त्यांचे ह्या आधीचे चित्रपट काही विशेष दखलपात्र वाटले नव्हते आणि हाही चित्रपट जवळजवळ जसाच्या तसाच बनवलेला असल्याने फार काही प्रभाव मान्य करता येणार नाही. 

एकंदरीत, मूळ चित्रपटातील पसरटपणा वगळणारा, तसेच त्याला बऱ्यापैकी मवाळ करणारा 'धडक', एक स्वतंत्र चित्रपट म्हणून ठरवलं तरी पाहता येत नाही. 'सैराट'च्या प्रेमात पडलेल्या लोकांना प्रत्यक्षाहून उत्कट प्रतिमा जरी दाखवली, तरी ते आवडणार नाहीच, त्यामुळे उत्कटतेत नव्हे तर तीव्रतेत कमी असणारी ही प्रतिमा पसंतीस उतरणं कठीण आहे. मात्र, जर तुम्ही (माझ्याप्रमाणे) 'सैराट'ला 'एक बरा चित्रपट'हून जास्त काही मानत नसाल, तर 'धडक' नक्कीच पसंतीस उतरू शकतो. कारण जवळजवळ २० टक्क्यांनी कमी केलेली लांबी, हे 'धडक'चं बलस्थान खूप महत्वाचं आहे. 'धर्मा'चा असल्यामुळे निर्मितीमूल्यही वाढीव आहे. ते छायाचित्रणातून स्पष्ट जाणवतं. 

'सैराट' एकदा पाहून विसरून गेलेल्यांनी 'धडक'ही एकदा पाहून विसरून जाण्यास हरकत नसावी.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Thursday, July 12, 2018

थोडा है थोडे की जरुरत थी (Sacred Games - सेक्रेड गेम्स)



मुंबईवर होणार असलेल्या एका मोठ्या हल्ल्याची वरवरची खबर एका इन्स्पेक्टरला एका मोस्ट वॉण्टेड गँगस्टरकडून मिळते. मग त्या कटाचा तपास व त्या गँगस्टरच्या आयुष्याचा प्रवास दोन्ही जोडीने, आलटून पालटून उलगडत जातं. हा 'सेक्रेड गेम्स'चा मुख्य गाभा आहे. नेहमीच्या क्राईम, थ्रिलर कथांप्रमाणे हा चांगला आणि वाईटातला थेट संघर्ष नाही. इथे जवळजवळ सगळ्याच पात्रांचा रंग कमी अधिक प्रमाणात फिक्कट राखाडी ते काळा आहे. हा संघर्ष मुख्यत्वेकरून प्रत्येक पात्रासाठी 'स्व'चा आहे. 'माझ्यातही काही तरी दम आहे' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला ही केस म्हणजे ती संधी आहे, तर 'मी इतकाही नालायक नाहीय' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला हे कांड म्हणजे ती संधी आहे. इथे सिस्टममधल्या लोकांचा परस्परांशी असलेला संघर्ष आहे, सिस्टमशी असलेला संघर्ष आहे आणि एका सिस्टमचा दुसऱ्या सिस्टमशी असलेला संघर्षही आहे. मानवी भावभावनांच्या हळुवारपणा वगैरेला अर्थातच इथे दुय्यम स्थान आहे. महत्वाकांक्षा, वासना, लोभ, ईर्ष्या अगदी ठळक आणि बेधडकपणे पात्रांच्या मनांचा व बुद्धीचा ताबा घेत आहेत. 

'सेक्रेड गेम्स' हे एक नग्न सत्य आहे. नग्नता जितकी आक्रमक, प्रभावी, भडक आणि धक्कादायक असते, तितकं ते आहेच. 'वेब सिरीज' हा प्रकार अजून सेन्सॉर बोर्डच्या पट्ट्यात आलेला नसल्याने हिंसा, विचार आणि आचारांतली भडकता खुलेपणाने दाखवता आलेली आहे. कथानक मुंबईबाबत आहे आणि मुंबईतच घडतं, त्यामुळे पात्रंही बहुतांश मराठी आहेत. त्यांच्या तोंडी अस्सल मुंबईच्या शिव्या आहेत. चांगली गोष्ट ही की त्यांचा अनावश्यक भरणा कुठेही वाटत नाही. 

सिरीजच्या सर्व आठही भागांत लेखक-दिग्दर्शकांची कथानकावरची पकड ढिली पडत नाही. मांडणीमध्ये एकसमान वेग पहिल्यापासून शेवटपर्यंत पकडून ठेवलेला आहे. अनेक पात्रं आहेत. ती येतात, जातात. काही उपकथानकं आहेत. पण त्यांच्यात रेंगाळत बसवलं जात नाही. 

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, नीरज कबी, गिरीश कुलकर्णी, गीतांजली थापा, आमीर बशीर अश्या सगळ्या गुणी कलाकारांची फौज इथे आहे. ह्या सगळ्यांपैकी नावाजुद्दिनवर सध्या खूप स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. मला तर तो अगदी स्टिरियोटिपिकल वाटला, अन्कन्व्हिन्सिंग आणि थोडा कंटाळवाणाही वाटला. वासेपूर, मॉन्सून शूटआउट, रमन राघव नंतर सेक्रेड गेम्स. सेम एक्स्प्रेशन्स. नो एफर्ट. उच्चार तर खूपच चुकलेले आहेत. तो एकाही प्रसंगात मराठी वाटतच नाही. स्वत:चं नाव नाव तो वारंवार 'गनेस गायतोंडे' सांगतो. इतकी वर्षं काम केल्यावर आणि मेकर्सकडेही दुनियाभरच्या लोकांची टीम असताना प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्याकडून 'श' ऐवजी 'स' च्या चुका क्षम्य नाहीत.  बरं, हा बाप भिक्षुकी करणाऱ्या बापाचा मुलगा दाखवला आहे. म्हणजे ब्राह्मण. मग तर हे उच्चार अजिबातच शोभत नाहीत. असल्या अगदीच प्राथमिक पातळीच्या ठसठशीत आणि बाळबोध चुका करूनही जर ह्या लोकांना 'क्रिटीकल अक्लेम' मिळत असेल तर कुठे तरी मोठा घोळच आहे. वास्तववादी दाखवायचं म्हणून भडक व बेधडकपणाच दाखवायचा, शिव्या पेरायच्या, नग्नदृश्यं दाखवायची का ? थोडासा अभ्यास, थोडंसं संशोधन कमी पडलं का इथे ? नवाज एक वेळ गँगस्टर म्हणून पटतो, पण 'मराठी' गँगस्टर म्हणून नाहीच पटत. त्याला मराठी दाखवायची गरजही नव्हती खरं तर. पण जर दाखवायचाच होता, तर सफाईने तरी दाखवता आला असता.

राधिका आपटे सादरीकरणात कमी पडत नाहीच, पण तिचं व्यक्तिमत्व 'रॉ एजंट' म्हणून शोभलं नाही. मात्र ही उणीव ती भरपूर उर्जा दाखवून भरून काढते. तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याभोवत तयार झालेल्या कोशातून बाहेर पडण्याची तिची धडपड ती उत्तम प्रकारे दाखवतेच.

जितेंद्र जोशी भाव खाऊन जातो. साध्या साध्या संवाद व प्रसंगांतही हा माणूस त्याच्या टायमिंगच्या जोरावर जबरदस्त मजा आणतो. त्याचा हवालदार काटेकर प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीत पूर्णपणे खरा वाटतो. तेच गिरीश कुलकर्णीच्या बाबतीतही. एक आतल्या गाठीचा, टिपिकल मस्तवाल राजकारणी त्याने जबरदस्त उतरवला आहे. 

नीरज कबी हा एक ताकदीचा अभिनेता आहे. तो त्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून देतो. 
मात्र भूमिकेची लांबी सगळ्यात मोठी नावाजुद्दिन आणि सैफचीच आहे. सैफ अली खानचा इन्स्पेक्टर 'सरताज सिंग' खूप प्रभावी आहे. त्याने स्वत:ची बॉडी लँग्वेज मस्त मेंटेन केली आहे. त्याला नैराश्यग्रस्त आणि ओव्हरवेट असल्याचं म्हटलंय. कपडेही तसेच घट्ट दिलेयत. पण त्याने चाल आणि धावणं वगैरेही फोफश्यासारखं केलंय. कुठल्याही जागी तो बेअरिंग सोडत नाही. 

एकुणात 'सेक्रेड गेम्स' थरारक आहे. धक्कातंत्राचा वापर खूप प्रभावीपणे केला आहे. काही ठिकाणी खूप काही कमी पडल्यासारखं वाटतं, पण जे आहे तेही नसे थोडके. गेल्या वीसेक वर्षांत भारतीय गँगवॉर मूव्हीजने कात टाकली आहे. त्यामुळे अस्सलपणाकडे जाणारं प्रभावी चित्रण आताशा अनपेक्षित नाहीच आणि ज्या 'सत्या'सारख्या सिनेमांनी ही लाट आणली, त्यांच्या मागे 'अनुराग कश्यप' हेच नाव मुख्य होतं. त्यामुळेही 'सेक्रेड गेम्स'च्या अस्सल चित्रिकरणाबाबत खरं तर खात्रीच होती. शेवट मात्र फारसा प्रभावीपणे पोहोचल्यासारखा वाटला नाही. एक विशिष्ट पातळीचं ज्ञान व माहिती प्रेक्षकांकडे असेलच, असं गृहीत धरून केलेलं कथन मला स्वत:ला फारसं भिडत नाही. अगदी बाळबोधपणे सगळं विशद करून सांगावं ही अपेक्षा नाहीच. थोडीशी संदिग्धता हवीच. पण 'नेमकं असतं काय, होतं काय'; हे चटकन समजूही नये ह्याला संदिग्धता नाही, अनाकलनीयता म्हणतात; ती पटत नाही. 
तसेच बिनधास्तपणाच्या नावाखाली सेक्सदृश्यं दाखवणं, ह्या मानसिकतेतून आपण आता बाहेर पडायला हवं. बिनधास्तपणा तुमच्या कथेच्या उद्गारातूनही आला पाहिजे. जर एक विशिष्ट पात्र तृतीयपंथी आहे, तर त्या जागी एका तृतीयपंथीयालाच कास्ट का केलं नाही ? असाही एक आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हवा. सेन्सॉरची भीती नाही म्हणून मोकाट उधळण्यापेक्षा ह्या मिळणाऱ्या मुक्ततेचा वापर प्रभावी कल्पकपणे करायला हवा. आपण प्रत्येक बाबतीत आपल्या भोवती एक चौकट आखून घेतली आहे, इतकंच नव्हे. तर त्या चौकटीबाहेर पडल्यावर काय करायचं, ह्याचीही एक चौकट आखलेली आहे. चौकटीबाहेरच्या चौकटीच्याही बाहेर पडायची वेळ आलेली आहे पण तसा प्रयत्न कुणी करताना दिसत नाही.

अस्तु !

- रणजित पराडकर

Tuesday, July 03, 2018

सिम्प्लीफाईड संजू - (Movie Review - Sanju)

लिहायला उशीर झाला आहे, तरी 'संजू'बाबत लिहिणं खूप आवश्यक आहे कारण हा एक मोठी आर्थिक उलाढाल करणारा चित्रपट असणार आहे आणि वैचारिक उलाढाल तर आधीच सुरु झालेली आहे. 

संजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. त्याची शेकडो अफेअर्स असोत, ड्रग्स आणि दारूच्या आहारी जाणं असो किंवा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला त्याचा सहभाग असो, हे सगळं टपऱ्या आणि नाक्यांपासून न्यायालयांपर्यंत, कमाल मर्यादेपर्यंत चर्चिले गेले आहे.  
पण मुन्नाभाई १ व २, थ्री इडियट्स, पीके सारखे चाकोरीबाहेरचे विषय हाताळूनही हेवा वाटेल असं व्यावसायिक यश मिळवत असतानाच जाणकारांकडूनही पसंतीची पावती मिळवणाऱ्या राजकुमार हिरानींना, इतर काही समकालीन दिग्दर्शकांप्रमाणे एक 'सेफ बेट' म्हणूनदेखिल कुठलाही चरित्रपट करायची काहीच गरज नाही. असं असूनही हिरानी हा विषय का हाताळतात ? 
कारण मुळात संजय दत्तच्या आयुष्याची कहाणी 'असामान्य' आहे. असं, इतकं पराकोटीचं आयुष्य आपल्याकडे इतर कुणीही जगलेलं नसावंच. लोकांना वाटतं की असल्या माणसावर फक्त भारतातच चित्रपट बनू शकतो. माझं मत विरुद्ध आहे. ह्या आयुष्यावर भारताबाहेरील एखाद्या चित्रपटकर्त्याने कदाचित एखादी चित्रपटमालिकाच बनवली असती. एका आदर्श व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेला सगळा मसाला - उदाहरणार्थ, रोमान्स, क्राईम, अॅक्शन, देशभक्ती, थरार, दोस्ती, कौटुंबिक ओढाताण, इ. जे म्हणाल ते - ह्या कहाणीमध्ये 'रेडी मिक्स' स्वरुपात उपलब्ध आहे! ह्या सगळ्या मसाल्याचा पुरेपूर आणि चविष्ट उपयोग हिरानी करतील, ह्याची व्यावसायिक खात्री चित्रपट पाहण्याआधीपासूनच वाटत होती आणि तसंच झालंही आहे!

'संजू'ची ही कहाणी सांगणं म्हणजे खरं तर खूप धोक्याचं काम आहे. कुठल्याही एका बाजूला आपला तोल झुकला तर ते कथन कोलमडून पडेल इतकं हे आयुष्य व्यामिश्र आहे. Living on the edge म्हणता येईल, असं हे आयुष्य. ही कहाणी सांगताना काही भाग मात्र सोयीस्करपणे गाळला आहे. माधुरी दीक्षितसोबची जवळीक, बाळासाहेब ठाकरेंची सुनील दत्तनी घेतलेली भेट व नंतर हललेली पानं, संजय दत्तच्या मान्यता दत्तव्यतिरिक्तच्या इतर दोन पत्नी, तसेच कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहानपणी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने कहाणी खूप सरळ सोपी केलेली आहे. हे आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे, इतकं सरळसाधं नक्कीच नाही की झाल्या घटनांचं खापर सरसकटपणे वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांच्या माथ्यावर फोडता येईल. 
अर्थात चित्रपट माध्यमाची मर्यादा लक्षात घेता संजय दत्तच्या आयुष्याचा गुंता थोडासा सोडवून ठेवून मगच ते मांडणं एका प्रकारे नाईलाजाचंही असू शकतं. त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा. कारण, संपूर्ण चित्रपटात असं कुठेही दाखवलं नाही की ड्रग्स, मुलींची प्रकरणं किंवा बॉम्बस्फोटाचा कट ह्यांपैकी कशातही अडकलेला संजय दत्त स्वत: प्रत्यक्षात अगदी सुतासारखा सरळ वगैरे होता. लाडावलेला, दुर्लक्षही झालेला एक बिघडलेला रईसजादा, एक कलाकार आणि माणूस म्हणूनही अत्यंत सामान्य असलेली एक व्यक्ती जिने गैरकृत्यं करण्यासाठी स्वत:च लहान-मोठी निमित्ते शोधली आणि ती कृत्यं केली, अशी संजय दत्तची छबी हा चित्रपट तयार करतो. सार्वजनिक आयुष्यातील संजय दत्तने प्रत्यक्षातही कधी स्वत:ला 'निष्पाप, निरागस, साधा, सरळ' म्हणून प्रेझेंट केलेलं नाहीच, त्यामुळे चित्रपटातूनही त्याची तशीच इमेज बनणं स्वाभाविकच.


मात्र, 'संजू' ही कहाणी फक्त संजय दत्तची नाही. ती एका अश्या असामीचीही आहे जिला उच्चभ्रूंपासून गरीबांपर्यंत, फिल्म इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंत, घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच एक आदराचं, मानाचं स्थान होतं. एक अशी व्यक्ती जिच्याविषयी जेव्हा कुणी काही बोललं आहे, चांगलंच बोललं आहे कारण त्यांनी कधी कुणाचं वाईट कधी केलंच नसावं. ही व्यक्ती म्हणजे 'सुनील दत्त.' 
वाया गेलेल्या मुलाला पुन्हा माणसांत, योग्य रस्त्यावर आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणारा एक बाप जे जे काही करेल ते सगळं सुनील दत्त साहेबांनी केलं होतं. कायदेपंडितांची मदत घेणं, स्वत:च्या राजकीय वजनाचा वापर करून पाहणं, त्यासाठी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांसमोरही जाणं हे सगळं तर सर्वश्रुत आहेच. त्याशिवायही मुलाला पुनर्वसन, व्यसनमुक्ती केंद्रात पाठवणं, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही एक प्रकारे करणं असं सगळं दत्तसाहेबांनी केलं आहे (असावं). हे बाप-मुलाचं नातं चित्रपटात खूप प्रभावीपणे सादर झाले आहे. 

'परेश घेलानी' नावाचा संजय दत्तचा अतिशय जवळचा मित्र चित्रपटात 'कमलेश कपासी' नावाने आहे. हे पात्र 'विकी कौशल'ने साकारलं आहे. संजय आणि कमलेश ह्या दोघांची मैत्री चांगली रंगली आहे. विकी कौशलने ह्यापूर्वीच स्वत:ची कुवत मसान, रमन राघव 2.0 मधून दाखवली आहेच. सहाय्यक भूमिकेत असूनही त्याने साकारलेला कमलेश खूप भाव खाऊन जातो. माझा मित्र व्यसनांत वाया चालला आहे, मरतो आहे; हे त्या मित्राच्या वडिलांना सांगतानाचा प्रसंग भावनिक करणारा आहे. विकी कौशलने पकडलेला गुजराती अ‍ॅक्सेन्टही खूप सहज आहे. 

प्रेक्षकाला भावनिक करून डोळे पाणावणं, हे हिरानींना अचूक जमतं. दत्त बाप-लेकांचे काही प्रसंगही असेच भावनिक करतात. सुनील दत्तंच्या भूमिकेत 'परेश रावल' कुठल्याही गेट अपशिवाय कमाल करतात. बहुतांश भागात त्यांना बापाची घुसमटच दाखवायची होती, त्यामुळे ह्या भूमिकेला अनेक पैलू होते, असं नाही म्हणता येणार. ज्या तोडीच्या भूमिका त्यांनी ह्यापूर्वी केल्या आहेत, त्यांच्या तुलनेत this was an easy job for him. पण निराशा दाखवतानाही हताश दिसणार नाही, मदत मागत असला तरी लाचार वाटणार नाही; खमकाच वाटेल, असा सुनील दत्त त्यांनी खूप संयतपणे उभा केला आहे.

'संजय दत्त'च्या भूमिकेत 'रणबीर कपूर' आहे, हे फक्त श्रेयनामावलीपुरतं. एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.

अनुष्का शर्मा, मनीषा कोईराला, सोनम कपूर, बोमन इराणी, सयाजी शिंदे ह्यांच्या भूमिका छोट्या छोट्या आहेत. पण सगळ्यांनीच आपापली कामगिरी चोख बजावली आहे. चक्क सोनम कपूरनेसुद्धा !

थोडासा मेलोड्रामा कमी केला असता ('कर हर मैदान फतेह..' गाण्याचं चित्रीकरण), थोडंसं कमी सिम्प्लीफिकेशन केलं असतं (अनेक पात्रं, घटना पूर्णपणे गाळणं, सगळं खापर माध्यमांच्या माथ्यावर फोडणं) तर 'संजू' व्यावसायिक चरित्रपट म्हणून मापदंड ठरू शकला असता. तसा तो दुर्दैवाने ठरत नाही. कारण हा चत्रपट, 'संजय दत्त कुणी निष्पाप, निरागस नव्हता; तो एक नालायकच होता, ज्याने व्यसनाधीनतेपायी स्वत:चं आयुष्य बरबाद तर केलंच आणि इतरही आयुष्यं नासवली', हे भडकपणे नसलं, तरी संयत प्रभावीपणे दाखवत असला तरी, 'याकुब मेननसोबत जर तुलना केली, तर पैसा, सत्ता आणि कायद्यातील पळवाटा ह्यांचा फायदा घेऊन संजय दत्त काहीच्या काही स्वस्तात सुटलेला एक गुन्हेगार होता', हे सत्य म्हणावं तितक्या ठळकपणे चित्रपटातून समोर येत नाही. 
असं असलं तरी एक सुंदर चित्रपट म्हणून 'संजू' पुरेपूर जमला आहे. पडद्यावर असणाऱ्या सर्वांचं काम अप्रतिम झालं आहे. जोडीला अभिजात जोशींचे खुसखुशीत, खुमासदार व अर्थपूर्ण संवाद आहेत आणि सगळ्यावर हिरानींची मजबूत पकडही आहे.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर 

Wednesday, June 27, 2018

'संजू'च्या निमित्ताने

जेव्हा 'संजू' चित्रपटाची घोषणा झाली, तेव्हाच वाटलं होतं की टिपिकल संस्कारी पोलिसांकडून आज ना उद्या उलटसुलट प्रतिक्रिया येतील. तश्या आल्या आहेत आणि त्यांवर जिकडे तिकडे चर्चासुद्धा सुरु आहे.
अगदी अपेक्षित आर्ग्युमेंट्स केली जात आहेत. उदाहरणार्थ - असल्या फालतू माणसावर चित्रपट बनवावासं वाटणं, ही बौद्धिक दिवाळखोरी आहे. आपल्याकडचे प्रेक्षकच मूर्ख आहेत. ते असल्या नालायक माणसांना डोक्यावर घेतात. हॉलीवूडमध्ये अम्क्यावर चित्रपट बनतो, तमक्यावर बनतो आणि आपण कुणावर बनवतो ? 'संजय दत्त!' वगैरे.



इथे एक गोष्ट लक्षात आधी घ्यायला हवी.
संजय दत्तवर एक चित्रपट येतो आहे, त्याला काही 'भारतरत्न' दिलं जात नाहीय. आणि चित्रपट हा कशावरही येऊ शकतो, कुणावरही काढला जाऊ शकतो. बायोपिक आहे तो. एखाद्या पिसाळलेल्या जनावरापासून एखाद्या हलकट माणसापर्यंत कुणाही सजीवाच्या आयुष्याला एक 'कहाणी' म्हणून दाखवलं जाऊ शकतं. कारण मुळात, कुठलाही चित्रपट बनवण्यासाठी प्राथमिक गरज असते 'कहाणी'चीच. (अपवाद - सल्लूपट)  प्रत्येक आयुष्य, मग ते एखाद्या संताचं असो वा गुन्हेगाराचं, एक कहाणी असते. ती सांगितली जाऊ शकते. मग तो अगदी सामान्यातला सामान्य मनुष्य असो किंवा कुणी सेलिब्रिटी. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, कहाणी वेगळी.

दुसरं म्हणजे, ह्यापूर्वीही अनेक ह्याहीपेक्षा अट्टल आणि भयंकर गुन्हेगारांवर चित्रपट येऊन गेलेले आहेत. त्यात काही नवीनही नाही आणि नैतिक/ अनैतिक तर अजिबातच नाही. 'अ‍ॅण्टी हीरो' असलेलेही असंख्य चित्रपट येऊन गेलेले आहेत. १९४३ सालच्या 'ग्यान मुखर्जी' दिग्दर्शित 'किस्मत' चित्रपटाने सर्वप्रथम भारतीय चित्रपटाला अ‍ॅण्टी हीरो दाखवला होता. त्यानंतर १९७५ च्या यश चोप्रा दिग्दर्शित 'दीवार' पर्यंत चित्रपटातील मुख्य व्यक्तिरेखा अनेकदा लहान-मोठा गुन्हेगार असल्याचं दाखवलं आहे. अर्थात हे सगळे खूप गोड-गोजिरे, गोंडस चित्रपट होते. 'दीवार' मधला अमिताभचा विजय वर्मा एक un-apologetic गुन्हेगार असला तरी त्याला कठीण परिस्थितीने गुन्हेगार बनवल्याचं दाखवलं होतं. मात्र तरी तो 'हाजी मस्तान'वर आधारलेला असल्याचं लपलं नाहीच. शोले, शान सारख्या ब्लॉकबस्टर्समधूनही गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत दाखवलं गेलं. राम गोपाल वर्माच्या 'सत्या'ने १९९८ साली खऱ्या अर्थाने गुन्हेगार आणि गुन्हेगारी जगत समोर आणलं. आपल्याकडचा पहिला 'निओ नॉयर' माझ्या मते 'सत्या'च. किस्मत, दीवार आणि सत्या, हे तीन चित्रपट 'गुन्हेगार' चित्रीकरणातले मैलाचे दगड आहेत. 'सत्या'नंतर भडक बिनधास्तपणे अनेकदा गुन्हेगारांची कहाणी चित्रपटांतून दाखवली गेली आहे. 'गँग्स ऑफ वासेपूर - १ आणि २' सारख्या चित्रपटांतून इतके रक्ताचे पाट वाहिले आहेत जितका आमच्या मराठवाड्यात पाऊसही होत नाही ! राजेश खन्नापासून शाहरुख खानपर्यंत प्रत्येक सुपरस्टारने   'अ‍ॅण्टी हीरो' रंगवला आहे. ते एक आव्हानात्मक काम आहे. 

मात्र 'चरित्रपट' ह्या बाबतीत आपल्याकडचा चित्रपट आजही खूप बचावात्मक आहे. अनेक अनुकरणीय व्यक्तींच्या चरित्रपटांतही त्या त्या व्यक्तीचे अवगुण सफाईने झाकले, टाळले गेले आहेत. इथे मला एक उल्लेख करावासा वाटतो. 

काही दिवसांपूर्वी, मी 'हंसल मेहता' दिग्दर्शित 'ओमेर्ता' पाहिला. हा चित्रपट तर 'ओमर शेख' वर आहे. जो एक कन्व्हीक्टेड दहशतवादी आहे. माझ्या मते बायोपिक कसा असावा ह्याबाबतचा 'ओमेर्ता' हा आपल्याकडचा मापदंड असायला हवा. दिग्दर्शकाने फक्त एक कहाणी सांगितली आहे. कुठल्याही ठिकाणी कोणतंही स्टेटमेंट नाही. पूर्णपणे न्युट्रल. मला स्वत:ला 'संजू'बाबत 'ओमेर्ता' सारखी अपेक्षा नाही. कारण दोघांचं 'प्लेईंग ग्राउंड'च वेगळं आहे. 'संजू' हा स्पष्टपणे एक व्यावसायिक चित्रपट आहे. त्यात संजय दत्तची कहाणी सहानुभूती ठेवून दाखवली असल्याचीच शक्यता जास्त आहे.

But as I said, चित्रपटातून गुन्हेगार, गुन्हेगारीचं उदात्तीकरण नवीन नाही आणि गुन्हेगारावर चरित्रपट काढणंही नवीन नाही. चुकीचं तर अजिबातच नाही. चित्रपट हे एक 'स्टोरी टेलिंग' आहे. कुठलीही कहाणी, कुणाचीही कहाणी ही सांगता आली पाहिजे आणि सांगितली गेलीही पाहिजे. तो संजय दत्त असो वा ओमर शेख, पानसिंग तोमर असो वा मिल्खा सिंग आणि टाटा-बिर्ला-अंबानी असो वा रणजित पराडकर, त्या त्या कहाणीला फक्त 'कहाणी' म्हणूनच पाहायला हवं. पिढ्यांवर संस्कार करणे हे चित्रपटांचं काम नसून ते पालकांचं काम आहे. ज्या पिढीच्या लोकांनी संस्कारांचा कैवार घेतला आहे, त्यांच्याच मुशीतून संजय दत्त आणि सलमान खानसारखे लोक घडले आहेत. असे चित्रपट बनतात, तसे चित्रपट बनतात वगैरे कारणांसाठी कुठल्याही पिढीवर नेम साधणं किंवा सरसकट एखाद्या समाजाला दूषणं देणं, हाच खरं तर दुटप्पीपणा आहे, दांभिकपणा आहे. हिंदी चित्रपट बदलतो आहे. धाडसी होतो आहे. त्याचा प्रेक्षकही हळूहळू करत बदलत चालला आहे. परिस्थितीला दोष देण्याचं उदात्तीकरण तरी 'संजू'च्या ट्रेलर्समधून दिसत नाहीय, जे गेल्या ७५ वर्षांतल्या चित्रपटांत सर्रास दिसून आलं आहे.

एक कलाकृती म्हणून कुठल्याही चित्रपटाकडे तटस्थपणे पाहण्याची सवय जोपर्यंत एक प्रेक्षकम्हणून आपल्या नजरेला आणि बुद्धीला होत नाही, तोपर्यंत 'चांगले चित्रपट बनत नाहीत' असं रडगाणं गाण्याचा अधिकारही आपल्याला मिळायला नको, खरं तर.

टीप - 'संजू'चं पहिल्या दिवशीच्याच तिकीटाचं बुकिंग केलेलं आहे.

- रणजित पराडकर 

Monday, April 30, 2018

'चित्रा'तली यमुना - [Nude (Chitraa) - Marathi Movie - न्यूड (चित्रा)]

आपण आपल्या स्वत:समोर नेहमी नागडे असतो. स्वत:पासून काहीही लपवणं शक्य नसतं. दुनियेच्या, जवळच्या लोकांच्या, अगदी जिवलगांच्यापासूनही आपण लपवाछपवी करू शकतो. पण शेवटी स्वत:समोर नागडेच.
एम एफ हुसेनवरून प्रेरित वाटणारं 'न्यूड' मधलं नसिरुद्दीन शाहने साकारलेलं 'मलिक' हे पात्रसुद्धा साधारण ह्याच अंगाने जाणारं भाष्य करतं. 'कपडे हे शरीराला झाकण्यासाठी असतात. आत्म्याला नाही. मी माझ्या चित्रांद्वारे आत्म्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत असतो म्हणून मी नग्न चित्रं काढतो.'

स्वत:ला स्वत:ची माहित असलेली नग्नता अनेक प्रकारची असते. आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, वैचारिक इ.
'न्यूड'च्या कथानकात प्रेक्षकाला स्वत:ची वैचारिक नग्नता आठवून देण्याची कुवत आहे. पण सिनेमात ती ताकद जाणवत नाही. हा सिनेमा 'यमुना'ची कहाणी म्हणूनच दिसतो आणि तेव्हढाच राहतो. अनेक प्रसंगात अपेक्षित तीव्रता येत नाही आणि प्रभाव कमी पडतो, असं वाटलं.

'यमुना' (कल्याणी मुळे) बाहेरख्याली पतीच्या जाचाला कंटाळून घर आणि गाव सोडून मुलासह मुंबईत तिच्या मावशीकडे (आक्का - छाया कदम) कडे येते. परिस्थितीच्या रेट्यामुळे आक्का 'जे जे स्कूल ऑफ आर्ट्स'मध्ये सफाई कर्मचारी असल्याच्या नोकरीआड प्रत्यक्षात तिथेच चित्रकला, शिल्पकला वर्गांसाठीची 'न्यूड मॉडेल' म्हणून काम करत असते. परिस्थितीच्याच रेट्यामुळे यमुनासुद्धा तिथे तेच काम करायला लागते. आपल्या मुलाने शिकून सवरून कुणी तरी मोठं माणूस बनावं, ह्या एकमेव आकांक्षेपोटी यमुना मनापासून स्वत:चं काम करत असते.

ही व्यावसायिक पातळीवर एक खूप वेगळी आणि आव्हानात्मक कहाणी आहे. असा चित्रपट झी आणि रवी जाधव हे अस्सल व्यावसायिक समीकरण जुळवणारी दोन नावं करतात, हे खूपच आनंदाचं आहे. अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असली, तरी नवऱ्याच्या आधाराला लाथ मारून निघून जाणारी आणि 'मुलाला शिकवीन, मोठं करीन' ह्या जिद्दीने झगडणारी यमुना नुसती डोळ्यांसमोर आणून पाहा. अंगावर रोमांच उभे राहतात ! 
मात्र, 'यमुना'ची ही कहाणी कोणत्या वळणावर संपणार ह्याचा आपल्याला आधीच साधारण अंदाज येतो. ती तिथेच संपते.
यमुनाच्या आयुष्याचा सहा-सात वर्षांचा प्रवास 'न्यूड'मधून दिसतो. प्रत्येक प्रवासातले काही महत्वाचे मुक्काम ठराविक असतात. इथे ते मुक्काम रंजकतेत नव्हे, तर परिणामकारकतेत कमी पडतात. उदाहरणार्थ (स्पॉयलर अलर्ट) -

१. यमुना नवऱ्याचं लफडं पकडते तो प्रसंग. पहाटे उठून घाटावर कपडे धुवायला जाणं आणि एकदम मिश्कील भाव चेहऱ्यावर आणून पाण्यात सूर मारणं, त्यावर आजूबाजूच्या बायकांनी शून्य प्रतिक्रिया - जणू काही घडलेलंच नाहीय - देणं. पुढे पोहत पोहत जाताना दुसऱ्या किनाऱ्याच्या फांदीवर माणिक (नेहा जोशी) पाण्यात पाय सोडून बसलेली असणं आणि पाण्यातून यमुनेचा नवरा (श्रीकांत यादव) बाहेर येऊन तिच्याशी लगट करणं. हे सगळं चित्रण स्वप्नातलं वाटतं. प्रत्यक्षात ते वास्तवच असतं !
२.  आक्का न्यूड मॉडेलचं काम करते आहे. हे समजल्यावर यमुना तिला उलटसुलट बोलते. त्यानंतर आक्काची प्रतिक्रिया आणि अखेरीस स्वत: यमुनालाच तिने ह्या कामासाठी तयार करणं, हा सगळा प्रसंग अपेक्षित तीव्रता साधत नाही.
३. कट्टरवाद्यांनी कॉलेजवर 'नग्न चित्रांवर बंदी आणा' चे फलक घेऊन हल्ला चढवणं. त्यांना प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांनी सामोरं जाणं, हा सगळा प्रसंग नाट्यमयतेत फारच कमी पडला. त्यांचं आपसातलं झगडणं लुटुपुटूचं दिसतं.
४. धो धो कोसळणाऱ्या पावसात समुद्रकिनाऱ्यावर चहा घेऊन येणं. कसं शक्य आहे हे ? चहा फ्लेवरचं पावसाचं पाणी प्यायचं असतं का ?
५. शेवट खूप सुंदर लिहिला आहे. पण चित्रीकरण पुन्हा एकदा सपक वाटतं. नंतरचा आक्रोश वगैरे अगदीच वरवरचं दिसतं.
६. आर्ट गॅलरीतल्या चित्रासमोर तो पच्चकन् थुंकतो. आजूबाजूला असलेले १५-२० लोक चित्रं पाहण्यात दंग असतील त्यामुळे कुणाला कळलं नसेल, असं मानू. पण पुढच्याच फ्रेममध्ये त्याच चित्रासमोर तो तिथेच उभा असताना त्याच्या आजूबाजूला लोक फिरतायत, पण कुणाला पायाखाली घाण दिसत नाही. नक्की थुंकला होता की नाही ? असा प्रश्न पडतो.
७. शेवटानंतरचा अजून एक शेवट असला की सिनेमा ३-४ पायऱ्या खाली उतरूनच थांबतो, असं एक वैयक्तिक मत.



लोकगीतं, अभंगांचा खूप सुंदर वापर सिनेमात केला आहे. 'दिस येती' मनात रेंगाळणारं आहे. पार्श्वसंगीतही प्रभावी आहे. शेवटाच्या वेळचं पार्श्वसंगीत कल्पक आहे.

झाडून सगळ्यांची कामं ताकदीची झाली आहेत. कल्याणी मुळेचं काम सुरुवातीला जरा काही तरी कमी किंवा जास्त झाल्यासारखं वाटलं. पण नंतर मात्र कमालच आहे. छाया कदमनी साकारलेली खमकी आक्कासुद्धा जबरदस्तच ! सहाय्यक कलाकारांत ओम भूतकर आणि मदन देवधर खरोखर दोघा मुख्य अभिनेत्रींना ताकदीचं सहाय्य करतात. श्रीकांत यादव, नेहा जोशी, किशोर कदम आणि नसिरुद्दीन शाह अगदीच छोट्या भूमिकांत आहेत. एकूणच अख्खा सिनेमा उत्कृष्ट अभिनयाचं एक अप्रतिम दर्शन आहे.

सारांश सांगायचा झाल्यास, नाविन्यपूर्ण प्रभावी कथानक जोडीला सशक्त अभिनय आहे पण अनेक जागी सिनेमाची पकड काही न काही कारणाने ढिली पडते. असं असलं तरी 'न्यूड' एकदा तरी पाहावाच असा सिनेमा नक्कीच आहे.

जाता जाता - सिनेमाचं शीर्षक 'न्यूड' ऐवजी काही दुसरं असतं तर ? 'न्यूड' हे खूपच सरळसोट वाटतं आणि त्या नावातून काही विशेष वेगळं पोहोचवायचं आहे, असंही वाटलं नाही. 'चित्रा'सुद्धा चाललं असतं की ! पण मग कदाचित सिनेमा वरून वादंग झालं नसतं. सगळीकडे सहज प्रवेश मिळाला असता आणि प्रदर्शनही कुणाही इतर सिनेमाप्रमाणे नेहमीसारखं झालं असतं.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

Tuesday, April 24, 2018

ओघळता अव्यक्त प्राजक्त - ऑक्टोबर (Movie Review - October)

पत्नी सत्यभामेच्या आग्रहाखातर भगवान श्रीकृष्णाने पारिजातक स्वत:च्या महालात लावला होता. पण त्याच्या फुलांचा सडा मात्र श्रीकृष्णाची लाडकी पत्नी रुक्मिणीच्या महालात, जो शेजारीच होता तिथे सांडत असे. प्रेमाचं प्रतिक म्हणून असं एक गंमतीशीर महत्व पारिजातकाला आहे.
कवींच्या आवडीच्या पाऊस, चंद्र, मोगरा अश्या विषयांपैकी एक 'पारिजातक'सुद्धा आहेच. 

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातहि बघता भामारोष मनीचा मावळला
(बालकवी)

मैं टहनी हूँ पारिजात की
प्रथम-प्रथम मुझको ही चूमे अरुण किरण स्वर्णिम प्रभात की
मैं टहनी हूँ पारिजात की
(विमल राजस्थानी)

झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
ह्याचा अर्थ असा नाही
की त्याला इजा होत नाही
(चंद्रशेखर गोखले)

अश्या वेगवेगळ्या आशयरूपांनी पारिजातक कवितेत ओघळला आहे. त्याचं कवितेत येणं मात्र त्याच्या स्वत:सारखंच हळुवार असतं. ज्याप्रमाणे पहाटेच्या नीरव शांत वेळी पारिजातकाची फुलं मूकपणे ओघळतात आणि इतर घमघमाटी, बटबटीत फुलांच्या आक्रमणाच्या आतच त्याच शांतपणे कोमेजतातही, तसंच ह्या पारिजातकाचं कवितांमधून प्रकट होणं आहे, असं जाणवतं.
फारच कमी काळासाठी उमलणारं हे अत्यंत नाजूक, गोंडस फूल त्याच्या सुगंधाची मोहिनी घालतं. हा सुगंध ओढ लावणारा असतो. फार लगेच कोमेजण्यामुळे चुटपूट लावून जाणाराही असतो. असफल प्रेमासारखा. असफलता लक्षात येईपर्यंत ती प्रेमभावना मोरपिसासारखी मनावर फिरत असते आणि नंतर उरणारी पोकळी दु:खाची असली, तरी ते दु:ख आपण आवडीने मनात जपतच असतो, त्याची एक विचित्र अशी ओढच असते.
हे पारिजातक आणि प्रेम ह्यांच्यातलं असं एक वेगळंच नातं आहे.

ऑक्टोबर महिन्यात बहरणाऱ्या पारिजातकाच्या फुलांवर प्रेम करणाऱ्या 'शिउली' (बनिता संधू) ची कहाणीसुद्धा ह्या फुलांसारखीच चुटपूट लावणारी आहे. स्वत:च्या टवटवीतपणाने सगळ्यांत उठून दिसणारी शिउली. एक हॉटेल मॅनेजमेन्ट ट्रेनींच्या एका बॅचमधली ज्युनियर, तरीही खूप हुशार मुलगी. त्याच बॅचमध्ये असलेला तिला सिनियर असलेला 'डॅन' (वरुण धवन). डॅनला झटपट यश हवं आहे. मेहनत करायची नाहीय. त्याला ज्युनियर असूनही मेहनत आणि हुशारीच्या जोरावर शिउली ह्या बॅचची सगळ्यांची आवडती आहे, तर डॅन म्हणजे एक 'ब्लॅक शीप' आहे.
हे दोघे एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न. पण दोघांमध्ये एक हळुवार नातं निर्माण होतं. पारिजातकाच्या मूक ओघळण्यासारखंच एक अव्यक्त नातं. एकमेकांशी कधी चार वाक्यंसुद्धा धड न बोलेलेले हे दोघे जण एका अपघातामुळे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत बांधले जातात. बेमुर्वत, बेजबाबदार, असंवेदनशील डॅन स्वत:च्याही नकळत आमुलाग्र बदलत जातो. ह्या बदलाला सकारात्मकही म्हणता येणार नाही कारण स्वत:लाच न समजणाऱ्या आणि त्यामुळे न रोखता येणाऱ्या ओढीमुळे तो विक्षिप्त वागत जाऊन स्वत:च्या करियरला बरबाद करून घेतो.
पण हा काही कुणी मूर्ख आत्मघातकी देवदास नाहीय. तो 'डॅन' आहे. तुमच्या-आमच्यासारखा. अधूनमधून सावरतो आणि भानावरही येत राहतो. डॅन आणि शिउलीची हे कहाणी कुठलाही फिल्मीपणा करत नाही.


'ऑक्टोबर' जमिनीवरचा सिनेमा आहे. तो उगाच मोठमोठ्या बाता मारत नाही की आभाळाशी गप्पा हाणत नाही. तो आपल्याला त्या कहाणीचा एक भाग बनवत जातो. कुणी 'डॅन' चा जिवलग यार 'मनजीत' बनतो, कुणी 'आदी'; तर कुणी 'शिउली' ची जवळची मैत्रीण बनते तर कुणी तिची आई. कुणी 'डॅन'सुद्धा बनतात. कुठल्या न कुठल्या कोनातून ही कहाणी आपल्याला येऊन भिडते.
तिचा वेग धीमा आहे, नव्हे खूपच धीमा आहे. पण ती लांबवलेली नाहीय. कारण एकेक फ्रेम, एकेक प्रसंग खूप विचारपूर्वक आखलेला, बांधलेला आहे. विषय गंभीर असला, तरी सिनेमा त्या गंभीरपणाचं ओझं सतत खांद्यावर वागवत नाही. मांडणीत नेमका समतोल साधला गेला आहे. एक भयंकर घटना घडली आहे, मान्य. पण आयुष्य पुढे चालूच राहणार आहे. ते तसं चालू राहतं. मैत्री, प्रेम, ममता अशी कुठलीही उत्कट नाती अंगावर येणाऱ्या प्रसंगांतून किंवा काळीज पिळवटणाऱ्या संवादांतून मांडली जात नाहीत. ती ओघानेच व्यक्त आणि विकसित होत जातात. शिउलीच्या घरच्यांसाठी पूर्णपणे अनोळखी असणारा डॅन त्यांच्या कुटुंबाचा एक भाग कधी बनतो, ते आपल्यालाही समजत नाही. तर दुसरीकडे, डॅनला शेअर्ड रूम सोडायला लावल्यानंतरसुद्धा मैत्रीत जरासुद्धा फूट पडत नाही, हेदेखील आश्चर्याचं वाटत नाही. बेशिस्त डॅनला अनेकदा शिक्षा करूनही अखेरीस त्याच्याविषयी मनात सहानुभूती असणारा आणि त्याला मदत करणारा हॉटेल मॅनेजरही असाच सहजपणे आपल्यासमोर मांडला जातो. 'देख यार..' म्हणून त्याचं  डॅनला समजावणं खूप ओळखीचं वाटतं. कधी तरी आपल्यालाही कुणी तरी असं सांगितलं होतं, असं जाणवतं.

'ऑक्टोबर' मनाला भावतो कारण सिनेमाने स्वत:चंच मन ओळखलेलं आहे. सुजित सरकार, जुही चतुर्वेदी आणि वरुण धवन ह्या तिघांना ह्या कहाणीचा आत्मा गवसला असावा, असं वाटतं. सरकार आणि चतुर्वेदींबद्दल इतकं आश्चर्य वाटत नाही कारण त्यांनी ह्यापूर्वी अनेकदा (पिकू, विकी डोनर, मद्रास कॅफे इ.) स्वत:ला सिद्ध केलंच आहे. पण वरुण धवन हे एक सरप्राईज पॅकेज आहे. 'बदलापूर'नंतर पुन्हा एकदा त्याने त्याच्यातला ठहराव दाखवला आहे. 'डॅन' ही व्यक्तिरेखा वेगळ्याच गुंत्यातली आहे. 'डॅन' एकीकडे उथळ, अपरिपक्व आहे आणि दुसरीकडे हळवा, इतरांना आधार देण्याइतका खंबीरसुद्धा. तो मॅनेजरला खोटं कारण सांगून सुट्टीसुद्धा मागणारा आहे आणि निराशाजनक परिस्थितीतही सकारात्मकता बाळगणारा आहे. त्याच्या संतापाचा उद्रेक होतो पण त्याच्या भावनिकतेचा कडेलोट कधी होत नाही. तो त्याच्या सध्याच्या आयुष्याने नाखूष जरी असला तरी नंतर आलेल्या अपयशातून शिकवणीही घेतो. हे सगळे काही वरुण धवन खूप समजूतदारपणे साकार करतो.

एकंदरीत 'ऑक्टोबर' एकदा अनुभवण्यासारखा आहेच. 'मीही प्रेम केलं होतं..', 'ते खरंच प्रेम होतं का..?', 'मी उगाच प्रेम केलं होतं..' अश्या अनेक हळव्या आठवणी ज्यांनी खपलीआड जपल्या आहेत, त्या सगळ्यांना 'ऑक्टोबर' स्वत:चा नाही, तरी आपलासा वाटेल. कारण सगळेच 'डॅन' किंवा 'शिउली' नसले, तरी सगळ्यांनी पारिजातक पाहिला आहे. त्याचा चुटपूट लावणारा सुगंध श्वासांत भरला आहे.

रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

Thursday, March 15, 2018

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

औरंगाबादमध्ये ४ मार्चला झालेल्या मुशायऱ्यातलं माझं सादरीकरण. एकूण ३ गझला सादर केल्या होत्या. पूर्ण कार्यक्रमाच्या सलग रेकॉर्डिंगमधून तिन्ही गझला एकत्र करून, जोडून एक अतिशय व्यावसायिक, सफाईदार असं काम श्री. स्वप्नील उपाध्ये ह्यांनी केलेलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन व त्यांना अनेक धन्यवादही !



सादर केलेल्या गझला -

१. तू गेल्यावर मला स्वत:चे व्यसन लागले

२. आठवणींची तुडुंब गर्दी कधीच नव्हती

३. तसा मी स्वत:च्या घरी राहतो

विशेष आभार - Girish Joshi
हा माणूस स्वत: एक उत्तम गझलकार तर आहेच पण कवितेचा एक धडपड्या, मेहनती आणि अत्यंत श्रद्धाळू कार्यकर्तासुद्धा आहे. सदर मुशायरा आणि त्याआधी झालेली गझल कार्यशाळा, हे ह्याच्याच मेहनतीचं चीज. (गेल्या अनेक वर्षांत प्रथमच औरंगाबादमध्ये गझल कार्यशाळा घेतली गेली, हे विशेष.)

आपापले अभिप्राय अवश्य नोंदवा !

धन्यवाद !

- रणजित पराडकर

Monday, March 12, 2018

तसा मी स्वत:च्या घरी राहतो

तसा मी स्वत:च्या घरी राहतो
तरी मी मला पाहुणा वाटतो

उश्याशी कधी रात्र माझी निजव
तुझी शाल ओढून मी जागतो

बहरणार होतीच माझी जखम
तिचा घाव आहे, तिचा शोभतो

नको फोन लावूस आता मला
जुना रिंगटोनच पुन्हा वाजतो

नवा एकही शब्द नाही सुचत
जगाला तरी मी नवा वाटतो

मला हाक देतेस तू, मुंबई
तुझाही अश्याने लळा लागतो

तुला अन् मला सोबतीने बघुुन
म्हणू दे जगाला 'पहा.. हाच तो !'

तुझा जन्म झालाय माझ्यामुळे
तुझ्यातून मी कैकदा जन्मतो

पुन्हा एक गाडी निघाली भरुन
पुन्हा रूळ रूळास न्याहाळतो

तिच्या एक नजरेस व्याकूळ तो
तिच्या एक नजरेत व्याकूळतो

....रसप....
९ मार्च २०१८

ध्यास गझल मुशायरा - औरंगाबाद

Saturday, February 17, 2018

बालबुद्धी चलाखी - अय्यारी (Movie Review - Aiyaary)

अपेक्षाभंगाचं दु:ख एका अर्थी फार विचित्र असतं. अपेक्षा आपणच ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे भंग होण्यासाठीही खरं तर आपणच जबाबदार असायला हवं, पण अपेक्षाभंगासाठी कारणीभूत मात्र आपण नसतोच ! मग नक्की चूक कुणाची ? हे कोडं सुटत नसल्याचं अ‍ॅडीशनल नैराश्य मूळच्या दु:खाला अजून वाढवतं. सरतेशेवटी आपण 'जाऊ दे तिज्यायला !' वगैरे मनातल्या मनात म्हणून भंगानंतरच्या तुकड्यांना व्हर्च्युअल लाथ मारून पुढे जात असतो. तसा मी पुढे आलोय आणि हा लेख लिहितोय !

'अय्यारी' पाहून जो अपेक्षाभंग झाला, तसा मी ह्यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स टॉफीच्या फायनलला अनुभवला होता. मोठ्या अपेक्षेने तो भारत-पाक मुकाबला पाहिला होता आणि त्यात भारताने सपशेल नांगी टाकली होती. 'अय्यारी'मध्ये नीरज पांडेंनी सपशेल नांगी टाकली आहे.
'अय्यारी'चा अर्थ होतो, 'चलाखी, manipulation'. सिनेमाचं हे शीर्षक म्हणजे अगदी साजेसं आहे. कारण ट्रेलर्सवरून पांडेजींनी चांगलीच हवा केलेली होती आणि सिनेमाचा एकंदर पवित्रासुद्धा 'आता बघा हं, मी काय जबरदस्त सांगतोय ते' असा एक सॉलिड आव आणल्यासारखा आहे. प्रत्यक्षात मात्र पांडेजी एक पाचकळ ष्टोरी प्रेक्षकाच्या गळी उतरवायला पाहतात आणि हर तऱ्हेची 'चलाखी. manipulation' ही करण्याचाही प्रयत्न करतात. अगदी 'लॉजिक'च्या दोन्ही तंगड्या तोडून प्रेक्षकाच्या हातातही देतात !

तर होतं काय की -
एक बालबुद्धीचा सैनिक असतो. त्याला असं वाटत असतं की आपला देश नुसताच एक महान देश नसून आपली सिस्टीमसुद्धा अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. ह्या सिस्टीममधले अधिकारी त्यांच्या कपड्यांच्या इस्त्रीसारखेच नीटनेटके आणि नेतेमंडळी त्यांच्या पांढऱ्याशुभ्र कुडत्यांप्रमाणेच निर्मळ आहेत. हा बालबुद्धी सैनिक सैन्याच्या एका गुप्त, खास आणि अत्यंत विश्वासू लोकांच्या युनिटचा महत्वाचा सदस्यही असतो. त्या युनिटचा चीफ त्याच्या इस्रायलमधल्या ट्रेनिंगनंतर 'मोसाद'कडून खास ऑफर असतानाही ती नाकारून मातृभूमीच्या सेवेसाठी भारतीय सैन्यातच राहिलेला असा एक चाणाक्ष, कर्तव्यनिष्ठ व कर्तबगार आर्मी कर्नल असतो आणि आपला बालबुद्धी सैनिक त्या चाणाक्ष कर्नलचा अगदी खासमखास, पट्टशिष्य, उजवा हात वगैरेसुद्धा असतो.
पण हरामखोर परिस्थिती बिचाऱ्या बालबुद्धी सैनिकाच्या समजुतीच्या भल्या-मोठ्या चिकन्या फुग्याला निर्दयी निर्विकारपणे सत्याची टाचणी लावते. त्याला अचानक जाणवतं की ही सिस्टीम भ्रष्ट आहे. हे नेते स्वार्थी आहेत. हे अधिकारी लाचार आहेत आणि मी ह्या सगळ्या नालायक लोकांसाठी उगाच स्वत:ची 'जान हथेली पे' घेऊन उंडारतो आहे ! हा साक्षात्कार त्याला आंतर्बाह्य हादरवून टाकतो ! इतक्या वर्षांचं ट्रेनिंग, काम, अनुभव, श्रद्धा, विश्वास सगळ्याला तो झटक्यात तिलांजली देतो आणि चक्क गद्दार बनतो !

Wait. We are not done yet. आत्तापर्यंत पांडेजींनी लॉजिकचं एकच तंगडं आपल्या हातात दिलेलं असतं. पुढील भागात दुसरं तंगडंसुद्धा तितक्याच सफाईदारपणे मिळतं. आणि हा सगळा सोहळा कर्णभेदी, ढणढणाटी पार्श्वसंगीतासह अगदी यथासांग पार पडतो. कार्य सिद्धीस नेण्यासाठी एक आरस्पानी सौंदर्य प्रेमकहाणीच्या निमित्ताने सहभागी होतं. तसेच काही तद्दन बालिश फ्लॅशबॅक्ससुद्धा लांबण लावण्याचं कर्तव्य पूर्ण करतात.
सैनिक जरी बालबुद्धी असला, तरी बाकी व्यक्तिरेखासुद्धा त्याच्याशी बऱ्यापैकी जुळवून घेतात. उदा. - 'मोसाद'ने गौरवलेला कर्नल गोळ्या न भरलेली बंदूक घेऊन हाय-प्रोफाईल टार्गेटला टिपायला पाळत ठेवून बसतो किंवा दस्तुरखुद्द आर्मी चीफची एका अक्षरश: फुटकळ धमकीमुळे तंतरते किंवा कुठल्याही हाय सिक्युरिटी फायलवॉलला भेदू शकणारी एक सॉफ्टवेअर जीनियस कसलीही खातरजमा न करता एका खोट्या कंपनीसाठी काम करायला लागते किंवा एका ऑडीओ रेकॉर्डिंगला ऐकून एक निर्ढावलेला भ्रष्ट माणूस हात-पाय गाळतो.


सिद्धार्थ मल्होत्रा हा काही जबरदस्त क्षमतेचा अभिनेता नसला तरी तो त्याच्या परीने बऱ्यापैकी प्रयत्न करतो.  मनोज वाजपेयीने त्याला मिळालेल्या पूर्ण लांबीच्या भूमिकेचं चीज केलंच आहे. पण हे त्याच्याकडून अपेक्षितच असल्याने, त्यात आश्चर्य काहीच नाही. जोडीला कुमुद मिश्रा, विक्रम गोखले, आदिल हुसेन आणि अगदी लहान भूमिकांत अनुपम खेर व नसिरुद्दीन शाह अशी सगळी दमदार कुमक आहेच. त्यामुळे 'अय्यारी' हा पडद्यावरील सगळ्या कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने नटलेला आहे. पण कथानकातच भलीमोठी भगदाडं असल्याने नावेला जलसमाधी मिळणं अटळच होतं !

रकूल प्रीत सिंगची व्यक्तिरेखा सिनेमात का आहे ? नसीरुद्दीन शाहची व्यक्तिरेखा सिनेमात का आहे ? घडणाऱ्या सगळ्या कथानकाचा 'वॉर विडोज'साठीच्या हौसिंग प्रोजेक्टशी संबंध तरी काय आहे ? असे अत्यंत बेसिक प्रश्न पावणे तीन तासांच्या पसाऱ्यानंतर पडतात.

नक्षीकाम केलेल्या सुंदर कपातून प्यायल्याने फिक्क्या चहाला चव येत नाही. चेहऱ्याची ठेवणच बिघडलेली असेल, तर नुसत्याच मेकअप चोपडण्यामुळे फरक पडत नाही. इतकंच काय, कोट, बो घालून आणि 'बो'च्या खाली टाय बांधून एखाद्या अस्सल बावळटाला स्मार्टही बनवता येत नाही.
तसंच, चकाचक निर्मितीमूल्यं, तांत्रिक सफाई आणि दमदार अभिनय वगैरे असला तरी तर्कशून्य, फुसक्या आणि रटाळ कहाणीचा उत्कंठावर्धक थ्रिलर बनूच शकत नाही.

विंडो शॉपिंगच्या नावाखाली कुठल्याही दुकानात बायकोने शिरावं, तसं सिनेमाचं कथानक अचानक १-२ जागांवर उगाच बागडून येतं. तेव्हा प्रश्न पडतो की वेन्सडे, स्पेशल २६ आणि बेबी सारख्या गच्च आवळलेल्या, विचार करायची उसंतही न देणाऱ्या वेगवान पटकथा लिहिणारे पांडेजी हेच का ? उत्तरादाखल 'एम एस धोनी - द अन्टोल्ड स्टोरी' आठवतो आणि आपलाच होमवर्क कमी पडल्यामुळे हा घोर अपेक्षाभंग झाला असल्याचा साक्षात्कार होतो.

'पद्मावत'च्या फुसकेपणासाठीची तयारी 'भन्साळीचा आहे' ह्या जाणीवेतच सुप्तपणे दडलेली असल्याने 'अय्यारी' हा २०१८ मधला एक महत्वाचा फुसका बार ठरणार आहे.

रेटिंग - * *

- रणजित पराडकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...