Thursday, July 12, 2018

थोडा है थोडे की जरुरत थी (Sacred Games - सेक्रेड गेम्स)



मुंबईवर होणार असलेल्या एका मोठ्या हल्ल्याची वरवरची खबर एका इन्स्पेक्टरला एका मोस्ट वॉण्टेड गँगस्टरकडून मिळते. मग त्या कटाचा तपास व त्या गँगस्टरच्या आयुष्याचा प्रवास दोन्ही जोडीने, आलटून पालटून उलगडत जातं. हा 'सेक्रेड गेम्स'चा मुख्य गाभा आहे. नेहमीच्या क्राईम, थ्रिलर कथांप्रमाणे हा चांगला आणि वाईटातला थेट संघर्ष नाही. इथे जवळजवळ सगळ्याच पात्रांचा रंग कमी अधिक प्रमाणात फिक्कट राखाडी ते काळा आहे. हा संघर्ष मुख्यत्वेकरून प्रत्येक पात्रासाठी 'स्व'चा आहे. 'माझ्यातही काही तरी दम आहे' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला ही केस म्हणजे ती संधी आहे, तर 'मी इतकाही नालायक नाहीय' हे दाखवण्यासाठी संधी शोधत असणाऱ्या कुणाला हे कांड म्हणजे ती संधी आहे. इथे सिस्टममधल्या लोकांचा परस्परांशी असलेला संघर्ष आहे, सिस्टमशी असलेला संघर्ष आहे आणि एका सिस्टमचा दुसऱ्या सिस्टमशी असलेला संघर्षही आहे. मानवी भावभावनांच्या हळुवारपणा वगैरेला अर्थातच इथे दुय्यम स्थान आहे. महत्वाकांक्षा, वासना, लोभ, ईर्ष्या अगदी ठळक आणि बेधडकपणे पात्रांच्या मनांचा व बुद्धीचा ताबा घेत आहेत. 

'सेक्रेड गेम्स' हे एक नग्न सत्य आहे. नग्नता जितकी आक्रमक, प्रभावी, भडक आणि धक्कादायक असते, तितकं ते आहेच. 'वेब सिरीज' हा प्रकार अजून सेन्सॉर बोर्डच्या पट्ट्यात आलेला नसल्याने हिंसा, विचार आणि आचारांतली भडकता खुलेपणाने दाखवता आलेली आहे. कथानक मुंबईबाबत आहे आणि मुंबईतच घडतं, त्यामुळे पात्रंही बहुतांश मराठी आहेत. त्यांच्या तोंडी अस्सल मुंबईच्या शिव्या आहेत. चांगली गोष्ट ही की त्यांचा अनावश्यक भरणा कुठेही वाटत नाही. 

सिरीजच्या सर्व आठही भागांत लेखक-दिग्दर्शकांची कथानकावरची पकड ढिली पडत नाही. मांडणीमध्ये एकसमान वेग पहिल्यापासून शेवटपर्यंत पकडून ठेवलेला आहे. अनेक पात्रं आहेत. ती येतात, जातात. काही उपकथानकं आहेत. पण त्यांच्यात रेंगाळत बसवलं जात नाही. 

सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दिकी, राधिका आपटे, जितेंद्र जोशी, नीरज कबी, गिरीश कुलकर्णी, गीतांजली थापा, आमीर बशीर अश्या सगळ्या गुणी कलाकारांची फौज इथे आहे. ह्या सगळ्यांपैकी नावाजुद्दिनवर सध्या खूप स्तुतीसुमनं उधळली जात आहेत. मला तर तो अगदी स्टिरियोटिपिकल वाटला, अन्कन्व्हिन्सिंग आणि थोडा कंटाळवाणाही वाटला. वासेपूर, मॉन्सून शूटआउट, रमन राघव नंतर सेक्रेड गेम्स. सेम एक्स्प्रेशन्स. नो एफर्ट. उच्चार तर खूपच चुकलेले आहेत. तो एकाही प्रसंगात मराठी वाटतच नाही. स्वत:चं नाव नाव तो वारंवार 'गनेस गायतोंडे' सांगतो. इतकी वर्षं काम केल्यावर आणि मेकर्सकडेही दुनियाभरच्या लोकांची टीम असताना प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्याकडून 'श' ऐवजी 'स' च्या चुका क्षम्य नाहीत.  बरं, हा बाप भिक्षुकी करणाऱ्या बापाचा मुलगा दाखवला आहे. म्हणजे ब्राह्मण. मग तर हे उच्चार अजिबातच शोभत नाहीत. असल्या अगदीच प्राथमिक पातळीच्या ठसठशीत आणि बाळबोध चुका करूनही जर ह्या लोकांना 'क्रिटीकल अक्लेम' मिळत असेल तर कुठे तरी मोठा घोळच आहे. वास्तववादी दाखवायचं म्हणून भडक व बेधडकपणाच दाखवायचा, शिव्या पेरायच्या, नग्नदृश्यं दाखवायची का ? थोडासा अभ्यास, थोडंसं संशोधन कमी पडलं का इथे ? नवाज एक वेळ गँगस्टर म्हणून पटतो, पण 'मराठी' गँगस्टर म्हणून नाहीच पटत. त्याला मराठी दाखवायची गरजही नव्हती खरं तर. पण जर दाखवायचाच होता, तर सफाईने तरी दाखवता आला असता.

राधिका आपटे सादरीकरणात कमी पडत नाहीच, पण तिचं व्यक्तिमत्व 'रॉ एजंट' म्हणून शोभलं नाही. मात्र ही उणीव ती भरपूर उर्जा दाखवून भरून काढते. तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याभोवत तयार झालेल्या कोशातून बाहेर पडण्याची तिची धडपड ती उत्तम प्रकारे दाखवतेच.

जितेंद्र जोशी भाव खाऊन जातो. साध्या साध्या संवाद व प्रसंगांतही हा माणूस त्याच्या टायमिंगच्या जोरावर जबरदस्त मजा आणतो. त्याचा हवालदार काटेकर प्रत्येक छोट्या छोट्या बाबतीत पूर्णपणे खरा वाटतो. तेच गिरीश कुलकर्णीच्या बाबतीतही. एक आतल्या गाठीचा, टिपिकल मस्तवाल राजकारणी त्याने जबरदस्त उतरवला आहे. 

नीरज कबी हा एक ताकदीचा अभिनेता आहे. तो त्याची ताकद पुन्हा एकदा दाखवून देतो. 
मात्र भूमिकेची लांबी सगळ्यात मोठी नावाजुद्दिन आणि सैफचीच आहे. सैफ अली खानचा इन्स्पेक्टर 'सरताज सिंग' खूप प्रभावी आहे. त्याने स्वत:ची बॉडी लँग्वेज मस्त मेंटेन केली आहे. त्याला नैराश्यग्रस्त आणि ओव्हरवेट असल्याचं म्हटलंय. कपडेही तसेच घट्ट दिलेयत. पण त्याने चाल आणि धावणं वगैरेही फोफश्यासारखं केलंय. कुठल्याही जागी तो बेअरिंग सोडत नाही. 

एकुणात 'सेक्रेड गेम्स' थरारक आहे. धक्कातंत्राचा वापर खूप प्रभावीपणे केला आहे. काही ठिकाणी खूप काही कमी पडल्यासारखं वाटतं, पण जे आहे तेही नसे थोडके. गेल्या वीसेक वर्षांत भारतीय गँगवॉर मूव्हीजने कात टाकली आहे. त्यामुळे अस्सलपणाकडे जाणारं प्रभावी चित्रण आताशा अनपेक्षित नाहीच आणि ज्या 'सत्या'सारख्या सिनेमांनी ही लाट आणली, त्यांच्या मागे 'अनुराग कश्यप' हेच नाव मुख्य होतं. त्यामुळेही 'सेक्रेड गेम्स'च्या अस्सल चित्रिकरणाबाबत खरं तर खात्रीच होती. शेवट मात्र फारसा प्रभावीपणे पोहोचल्यासारखा वाटला नाही. एक विशिष्ट पातळीचं ज्ञान व माहिती प्रेक्षकांकडे असेलच, असं गृहीत धरून केलेलं कथन मला स्वत:ला फारसं भिडत नाही. अगदी बाळबोधपणे सगळं विशद करून सांगावं ही अपेक्षा नाहीच. थोडीशी संदिग्धता हवीच. पण 'नेमकं असतं काय, होतं काय'; हे चटकन समजूही नये ह्याला संदिग्धता नाही, अनाकलनीयता म्हणतात; ती पटत नाही. 
तसेच बिनधास्तपणाच्या नावाखाली सेक्सदृश्यं दाखवणं, ह्या मानसिकतेतून आपण आता बाहेर पडायला हवं. बिनधास्तपणा तुमच्या कथेच्या उद्गारातूनही आला पाहिजे. जर एक विशिष्ट पात्र तृतीयपंथी आहे, तर त्या जागी एका तृतीयपंथीयालाच कास्ट का केलं नाही ? असाही एक आउट ऑफ द बॉक्स विचार करायला हवा. सेन्सॉरची भीती नाही म्हणून मोकाट उधळण्यापेक्षा ह्या मिळणाऱ्या मुक्ततेचा वापर प्रभावी कल्पकपणे करायला हवा. आपण प्रत्येक बाबतीत आपल्या भोवती एक चौकट आखून घेतली आहे, इतकंच नव्हे. तर त्या चौकटीबाहेर पडल्यावर काय करायचं, ह्याचीही एक चौकट आखलेली आहे. चौकटीबाहेरच्या चौकटीच्याही बाहेर पडायची वेळ आलेली आहे पण तसा प्रयत्न कुणी करताना दिसत नाही.

अस्तु !

- रणजित पराडकर

1 comment:

  1. Your blogs are always a treat, today it was like a Deja Vu, I did binge watching of sacred games and the feel was wowwww and while reading this now I was again experiencing the same feel. Bravo Man!!!

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...