Saturday, February 17, 2018

बालबुद्धी चलाखी - अय्यारी (Movie Review - Aiyaary)

अपेक्षाभंगाचं दु:ख एका अर्थी फार विचित्र असतं. अपेक्षा आपणच ठेवलेल्या असतात आणि त्यामुळे भंग होण्यासाठीही खरं तर आपणच जबाबदार असायला हवं, पण अपेक्षाभंगासाठी कारणीभूत मात्र आपण नसतोच ! मग नक्की चूक कुणाची ? हे कोडं सुटत नसल्याचं अ‍ॅडीशनल नैराश्य मूळच्या दु:खाला अजून वाढवतं. सरतेशेवटी आपण 'जाऊ दे तिज्यायला !' वगैरे मनातल्या मनात म्हणून भंगानंतरच्या तुकड्यांना व्हर्च्युअल लाथ मारून पुढे जात असतो. तसा मी पुढे आलोय आणि हा लेख लिहितोय !

'अय्यारी' पाहून जो अपेक्षाभंग झाला, तसा मी ह्यापूर्वी २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स टॉफीच्या फायनलला अनुभवला होता. मोठ्या अपेक्षेने तो भारत-पाक मुकाबला पाहिला होता आणि त्यात भारताने सपशेल नांगी टाकली होती. 'अय्यारी'मध्ये नीरज पांडेंनी सपशेल नांगी टाकली आहे.
'अय्यारी'चा अर्थ होतो, 'चलाखी, manipulation'. सिनेमाचं हे शीर्षक म्हणजे अगदी साजेसं आहे. कारण ट्रेलर्सवरून पांडेजींनी चांगलीच हवा केलेली होती आणि सिनेमाचा एकंदर पवित्रासुद्धा 'आता बघा हं, मी काय जबरदस्त सांगतोय ते' असा एक सॉलिड आव आणल्यासारखा आहे. प्रत्यक्षात मात्र पांडेजी एक पाचकळ ष्टोरी प्रेक्षकाच्या गळी उतरवायला पाहतात आणि हर तऱ्हेची 'चलाखी. manipulation' ही करण्याचाही प्रयत्न करतात. अगदी 'लॉजिक'च्या दोन्ही तंगड्या तोडून प्रेक्षकाच्या हातातही देतात !

तर होतं काय की -
एक बालबुद्धीचा सैनिक असतो. त्याला असं वाटत असतं की आपला देश नुसताच एक महान देश नसून आपली सिस्टीमसुद्धा अगदी धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे. ह्या सिस्टीममधले अधिकारी त्यांच्या कपड्यांच्या इस्त्रीसारखेच नीटनेटके आणि नेतेमंडळी त्यांच्या पांढऱ्याशुभ्र कुडत्यांप्रमाणेच निर्मळ आहेत. हा बालबुद्धी सैनिक सैन्याच्या एका गुप्त, खास आणि अत्यंत विश्वासू लोकांच्या युनिटचा महत्वाचा सदस्यही असतो. त्या युनिटचा चीफ त्याच्या इस्रायलमधल्या ट्रेनिंगनंतर 'मोसाद'कडून खास ऑफर असतानाही ती नाकारून मातृभूमीच्या सेवेसाठी भारतीय सैन्यातच राहिलेला असा एक चाणाक्ष, कर्तव्यनिष्ठ व कर्तबगार आर्मी कर्नल असतो आणि आपला बालबुद्धी सैनिक त्या चाणाक्ष कर्नलचा अगदी खासमखास, पट्टशिष्य, उजवा हात वगैरेसुद्धा असतो.
पण हरामखोर परिस्थिती बिचाऱ्या बालबुद्धी सैनिकाच्या समजुतीच्या भल्या-मोठ्या चिकन्या फुग्याला निर्दयी निर्विकारपणे सत्याची टाचणी लावते. त्याला अचानक जाणवतं की ही सिस्टीम भ्रष्ट आहे. हे नेते स्वार्थी आहेत. हे अधिकारी लाचार आहेत आणि मी ह्या सगळ्या नालायक लोकांसाठी उगाच स्वत:ची 'जान हथेली पे' घेऊन उंडारतो आहे ! हा साक्षात्कार त्याला आंतर्बाह्य हादरवून टाकतो ! इतक्या वर्षांचं ट्रेनिंग, काम, अनुभव, श्रद्धा, विश्वास सगळ्याला तो झटक्यात तिलांजली देतो आणि चक्क गद्दार बनतो !

Wait. We are not done yet. आत्तापर्यंत पांडेजींनी लॉजिकचं एकच तंगडं आपल्या हातात दिलेलं असतं. पुढील भागात दुसरं तंगडंसुद्धा तितक्याच सफाईदारपणे मिळतं. आणि हा सगळा सोहळा कर्णभेदी, ढणढणाटी पार्श्वसंगीतासह अगदी यथासांग पार पडतो. कार्य सिद्धीस नेण्यासाठी एक आरस्पानी सौंदर्य प्रेमकहाणीच्या निमित्ताने सहभागी होतं. तसेच काही तद्दन बालिश फ्लॅशबॅक्ससुद्धा लांबण लावण्याचं कर्तव्य पूर्ण करतात.
सैनिक जरी बालबुद्धी असला, तरी बाकी व्यक्तिरेखासुद्धा त्याच्याशी बऱ्यापैकी जुळवून घेतात. उदा. - 'मोसाद'ने गौरवलेला कर्नल गोळ्या न भरलेली बंदूक घेऊन हाय-प्रोफाईल टार्गेटला टिपायला पाळत ठेवून बसतो किंवा दस्तुरखुद्द आर्मी चीफची एका अक्षरश: फुटकळ धमकीमुळे तंतरते किंवा कुठल्याही हाय सिक्युरिटी फायलवॉलला भेदू शकणारी एक सॉफ्टवेअर जीनियस कसलीही खातरजमा न करता एका खोट्या कंपनीसाठी काम करायला लागते किंवा एका ऑडीओ रेकॉर्डिंगला ऐकून एक निर्ढावलेला भ्रष्ट माणूस हात-पाय गाळतो.


सिद्धार्थ मल्होत्रा हा काही जबरदस्त क्षमतेचा अभिनेता नसला तरी तो त्याच्या परीने बऱ्यापैकी प्रयत्न करतो.  मनोज वाजपेयीने त्याला मिळालेल्या पूर्ण लांबीच्या भूमिकेचं चीज केलंच आहे. पण हे त्याच्याकडून अपेक्षितच असल्याने, त्यात आश्चर्य काहीच नाही. जोडीला कुमुद मिश्रा, विक्रम गोखले, आदिल हुसेन आणि अगदी लहान भूमिकांत अनुपम खेर व नसिरुद्दीन शाह अशी सगळी दमदार कुमक आहेच. त्यामुळे 'अय्यारी' हा पडद्यावरील सगळ्या कलाकारांच्या उत्कृष्ट सादरीकरणाने नटलेला आहे. पण कथानकातच भलीमोठी भगदाडं असल्याने नावेला जलसमाधी मिळणं अटळच होतं !

रकूल प्रीत सिंगची व्यक्तिरेखा सिनेमात का आहे ? नसीरुद्दीन शाहची व्यक्तिरेखा सिनेमात का आहे ? घडणाऱ्या सगळ्या कथानकाचा 'वॉर विडोज'साठीच्या हौसिंग प्रोजेक्टशी संबंध तरी काय आहे ? असे अत्यंत बेसिक प्रश्न पावणे तीन तासांच्या पसाऱ्यानंतर पडतात.

नक्षीकाम केलेल्या सुंदर कपातून प्यायल्याने फिक्क्या चहाला चव येत नाही. चेहऱ्याची ठेवणच बिघडलेली असेल, तर नुसत्याच मेकअप चोपडण्यामुळे फरक पडत नाही. इतकंच काय, कोट, बो घालून आणि 'बो'च्या खाली टाय बांधून एखाद्या अस्सल बावळटाला स्मार्टही बनवता येत नाही.
तसंच, चकाचक निर्मितीमूल्यं, तांत्रिक सफाई आणि दमदार अभिनय वगैरे असला तरी तर्कशून्य, फुसक्या आणि रटाळ कहाणीचा उत्कंठावर्धक थ्रिलर बनूच शकत नाही.

विंडो शॉपिंगच्या नावाखाली कुठल्याही दुकानात बायकोने शिरावं, तसं सिनेमाचं कथानक अचानक १-२ जागांवर उगाच बागडून येतं. तेव्हा प्रश्न पडतो की वेन्सडे, स्पेशल २६ आणि बेबी सारख्या गच्च आवळलेल्या, विचार करायची उसंतही न देणाऱ्या वेगवान पटकथा लिहिणारे पांडेजी हेच का ? उत्तरादाखल 'एम एस धोनी - द अन्टोल्ड स्टोरी' आठवतो आणि आपलाच होमवर्क कमी पडल्यामुळे हा घोर अपेक्षाभंग झाला असल्याचा साक्षात्कार होतो.

'पद्मावत'च्या फुसकेपणासाठीची तयारी 'भन्साळीचा आहे' ह्या जाणीवेतच सुप्तपणे दडलेली असल्याने 'अय्यारी' हा २०१८ मधला एक महत्वाचा फुसका बार ठरणार आहे.

रेटिंग - * *

- रणजित पराडकर

2 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...