Sunday, July 31, 2016

Second Takes (Sairat & Sultan)

थोडंसं पुढे जाऊन मागे वळून पाहिलं की दिसणारं चित्र नेहमीच जरा वेगळं असतं आणि दृष्टीची व्याप्तीही वाढलेली असते. म्हणूनच आठवणींना उजाळा देताना, त्या कडवट असोत वा मधुर, गंमतच वाटत असते. भूतकाळात रमणे न रमणे हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे. पण गेलेल्या प्रत्येकच क्षणाला आयुष्याच्या पाटीवरून स्वच्छ पुसून टाकणारा माणूस मला तरी आजपर्यंत दिसला नाहीय. 

चित्रपटाबद्दल लिहिताना, जे लिहिलं जातं ते सहसा चटकन मनात आलेलं असतं. नंतर काही काळाने पुन्हा एकदा विचार केला की मत जरा बदलतंही, असा माझा अनुभव आहे. ही पोस्ट म्हणजे मी मागे वळून जेव्हा दोन सिनेमांकडे पाहिलं, तेव्हा मला काय वाटलं हे सांगण्यासाठी आहे.

-------------------------------------------

सैराट

गेल्या गुरुवारी, म्हणजे माझ्या वीकांताला अजून एकदा 'सैराट' पाहिला.

१. फारच विस्कळीत वाटला. 'सिनेमा काही 'ग्रीप'च घेत नाही आहे', अशी बरोबरच्या पाहुण्यांची सतत तक्रार चालू होती.
२. लांबण संपता संपेना वाटली. अगदी सुरुवातीच्या क्रिकेट सामन्यापासून तिची सुरुवात होते. ते क्रिकेट चित्रणही गंडलंय. म्हणजे कॅमेरावर्क वगैरे नाही. मंग्याने डॉट बॉल्स खेळत राहणं, नंतर परश्याला प्रदीपने 'एक फॉर तरी मार. झिकतोय आपन' म्हणणं, मग त्याने टोल्यांवर टोले हाणत सुटणं वगैरे फुल्टू टिपिकल फिल्मी मसाला. 
३. उत्तरार्धात ते अचानकच एकमेकांशी भांडायला लागतात असं वाटलं. त्यांच्यातले मतभेद किंवा त्यांच्या द्विधा मनस्थिती काही नीटश्या establish झाल्याच नाहीत.
४. तो बहुचर्चित शेवट तर अगदी ओढून ताणून आणलेला वाटला. हा शेवट आधी ठरवून मग बाकीचं लिहिलं असणार नक्कीच. 
५. 'आता गं बया..' हे गाणं जामच आवडलं. 'झिंगाट' छानच. पण 'याड लागलं' आणि  'सैराट झालं जी' एकमेकांचे पार्ट-१, पार्ट-२ वाटले.
६. रिंकू राजगुरूचं काम ठीकठाकच आहे. राष्ट्रीय पुरस्कार देण्याच्या लायकीचं तर अजिबातच नाही.
७. एकूणच सगळ्यांची संवादफेक अभिनयशून्य वाटली. उदा. - हैद्राबादच्या रस्त्यावर आर्चीच्या मागे जाणारा परश्या तिला हाक मारत असतो की, 'आर्चे.... आर्चे थांब.. मला तुज्याशी बोलायचंय.' ते त्याचं बोलणं तर इतकं सपाट आणि एकसुरी आहे की सीडी अडकल्यासारखं वाटतं.
८. मावशी खूपच बोअर आहे ! एकदम 'आवरा' कॅटेगरी !
९. सगळ्यात मस्त काम आहे ते लंगड्या प्रदीपचं. सुपर्ब टायमिंग आणि एकदम इंटेन्स्ड. 'सल्या'सुद्धा एक्सलंट. ह्या दोघांपैकी कुणी तरी लीड रोलमध्ये हवा होता. पण त्यांच्याकडे चिकना चेहरा नाही ना ! :(
१०. मी माझ्या 'सैराट'वरच्या लेखात खूपच मिळमिळीत टीका केलीय की !
११. 'एका 'मराठी' सिनेमाने कोट्यावधी कमावले', वगैरे फुटकळ अस्मिता मी बाळगत नाही. 'एका चांगल्या कलाकाराने चांगले पैसे कमावले', हा आणि इतकाच आनंद मला पुरेसा आहे. त्यामुळे 'सैराट'ने जमवलेला गल्ला आणि त्यामुळे नागराज मंजुळे ह्या गुणी दिग्दर्शक व इतर अनेक कलाकारांचा झालेला फायदा ह्याबद्दल भरपूर कौतुक व आनंद वाटतो. ह्या पैश्यामुळे ते भविष्यात काही चांगले सिनेमेही करू शकतील. त्या सिनेमांना कदाचित 'सैराट'इतकं यश नाही मिळणार, पण बऱ्यापैकी फायदा होईल व रसिक, जाणकारांची पसंतीही मिळेल, ही सदिच्छा ! दोन-तीन 'फॅण्ड्री' येण्यासाठी जर एखादा 'सैराट' येणं जर कमर्शियली आवश्यक असेल, तर आन्देव ! 

बाकी आर्ची-परश्याच्या फडतूस लव्हस्टोरीत स्वत:ची कहाणी दिसणाऱ्या लोकांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. त्यांनी 'क़यामत से क़यामत तक़'सुद्धा पाहावा. त्यातली सगळी गाणी एकमेकांपेक्षा वेगळी वाटतात आणि सुंदर तर ती गाणीही आहेत व तो सिनेमाही. 

धन्यवाद !

- रणजित 

टीप - ह्या पोस्टमुळे मला जातीयवादी ठरवायचा प्रयत्न करू नये. कारण ते सर्टिफिकेट तर मला कधीचंच मिळालं आहे. मरे हुए को अब और क्या मारोगे ? त्यामुळे मला दुसरं काही तरी ठरवा ! 

२७ जून २०१६

-------------------------------------------

सुलतान 

औघडाय !

एक कुणी तरी गुड फॉर नथिंग सांड अचानक एक दिवस एका नजरेत एका पोरीच्या प्रेमात इतका पडतो की वयाची तिशी गाठलेली असतानाही कुस्ती शिकायचं ठरवतो. 
ठीक आहे, अनेक बेसुरे टीव्हीवरचे थिल्लर 'टॅलेण्ट' शो पाहून संगीत शिकायची सूरसुरी येऊन जवळच्या एखाद्या किंचित गायकाकडे शिकायला जातातच की ! पण काही दिवसांसाठीच असतं. 
इथे हा उनाडटप्पू कुस्ती शिकायला सुरु करतो. आखाड्यात महिनोन्महिने तालीम घेणाऱ्या पहेलवानांना धूळ चारतो. ह्याहीपुढे जाऊन काही महिन्यांतच इतका तयार होतो की राष्ट्रीय पातळीला निवडला जातो. हे कमी की काय, म्हणून मग तो ऑलिम्पिकही जिंकतो आणि हे अगदीच फुटकळ असावं म्हणून की काय लगेच नंतर 'वर्ल्ड चॅम्पियनशिप' सुद्धा जिंकतो. 
हे म्हणजे अठ्ठाविसाव्या वर्षी आर्मीत भरती होऊन, मेजर होऊन शूरवीर बनणाऱ्या शारक्याच्या 'जब तक है जान' पेक्षा वरताण की ! 

पण इतक्या थापा ठोकूनही पोट भरत नाही.
मग तो चाळीशी उलटून गेल्यावर, मध्ये काही वर्षं तालीमीशी काहीही संबंध ठेवला नसताना, 'मिक्स्ड मार्शल आर्ट्स' वाल्या तुफान मारामारीत उडी घेतो आणि तिथल्या भल्या भल्या 'सूरमां'नाही लोळवतो ! 

च्या मायला ! 
आचरटपणाला काही लिमिट ? टेपा लावत सुटायचं म्हणजे किती ?

इची भन !
म्हणजे कोवळ्या वयापासून झीज झीज झिजणारे, मेहनत करून करून राप रापलेले दुनियाभरचे लोक वायझेड आहेत आणि हा वळू सगळ्यात शाना होय ? काही महिने घासली की ऑलिम्पिक मिळवता येतं, चॅम्पियन बनता येतं ? 

म्या बी इचार करतुय की औंदा पावसाळा संपला की क्रिकेट कोचिंग लावाचं. काय नाय तं दोन-तीन म्हैन्यांत एकांदं आयपीएल क्वॉन्ट्रॅक्टं तरी गावंलच. आपल्याला काय देशासाठी म्येडल-फिडल नकुय. (क्रिकेट नसतंयच म्हनी आलिम्पिकात !) पर म्हैना २-५ कोट जुगाड जरी झाला तरी अजुक काय पायजेल आविश्यात ?  

उपर अल्लाह, नीचे धरती, 
बीच में मेरा सुकून 
मै सुलतान !

अरे तिच्यायला मी पन सुलतान रे !

इची भन!

- रणजित 'फिलिंग_रेप्ड' खान

१३ जुलै २०१६

-------------------------------------------

'सैराट' आणि 'सुलतान' ह्या दोन सुपर हिट्स बाबत दोन स्वतंत्र पोस्ट्स फेसबुकवर टाकल्या होत्या. त्यांचं संकलन.

Saturday, July 30, 2016

D(is)hoom ची धूम ! - (Movie Review - Dishoom)

'अभिनय' नावाची हवा जॉन अब्राहमपर्यंत पोहोचेपर्यंत इतकी मंद होते की तिने त्याच्या नाकावरची माशी हलतसुद्धा नाही, उडणं तर सोडाच ! तो दिसायला चांगला आहे म्हणावं, तर अंघोळीच्या नावाखाली डोक्यावर एक बादली ओतून रोज अर्ध्या मिनिटात बाहेर येत असावा इतका तो पारोसा दिसतो. तो नाचायला लागला की थेट सनी देओलची आठवण येते. त्याची संवादफेक फार तर रामी रेड्डीपेक्षा थोडीशी बरी आहे.
तरीही जॉन अब्राहमला लोक सिनेमात का घेतात, हा प्रश्न मला कधी कधी पडतो.
'फॅन फॉलोईंग' हे एकमेव कारण असावं. कारण त्याच्या मागे त्याचे आई, बाप, बहिण, भाऊ वगैरे कुणीही नाहीत आणि ह्याच एकमेव कारणामुळे तो कितीही सुमार असला तरी मला त्याच्याबद्दल थोडासा आदरही वाटतो. पण थोडासाच. एरव्ही शैलेन्द्र सिंग, नितीन मुकेश वगैरेंचा सुरेलपणाशी आणि हनी सिंगचा एकूणच संगीताशी जितका संबंध आहे तितकाच जॉन अब्राहम मला सहन होतो.

हे का सांगितलं ?
तर 'असं' असूनही मी 'डीशूम' पाहायला गेलो कारण -
१. ठोकळा असला तरी 'बॉडी' जबरदस्त बनवली आहे त्याने. 'सुपर कॉप' वगैरे अभिनय आवश्यक नसलेल्या भूमिकांसाठी अगदी फिट्ट आहे आणि त्याचा फिटनेस सलमानसारखा बोदला नाहीय. 'सुलतान'मध्ये ट्रेनच्या बाजूने पाय न उचलता धावणारा फोफसा सलमान आणि 'डीशूम'च्या ट्रेलरमध्ये पाठलाग करताना धावतानाचा जॉन ह्यांच्यात इंझमाम आणि धोनीच्या धावण्याइतका फरक आहे.
२. ट्रेलरमध्ये दिसलेला वरुण धवन आवडला होता !
३. अक्षय खन्ना मला नेहमीच खूप सिन्सियर वाटला आहे आणि हे त्याचं पुनरागमन. (ह्यानंतर त्याचा कुठला सिनेमा येतो आहे, असं सध्या तरी ऐकिवात नाही !)
४. टाईमपास मूव्ही पाहायचा होता आणि 'डीशूम'चा दिग्दर्शक धवन-पुत्र आहे आणि 'डेव्हिड धवन' हे नाव माझ्या पिढीच्या मनावर विशिष्ट पद्धतीने कोरलं गेलेलं आहे. त्याच्या सिनेमांनी आमच्यावर असा संस्कार केला आहे की 'धवन' आडनावाच्या कुणालाही आम्ही फारसं गांभीर्याने घेतच नाही. कदाचित म्हणूनच वरुण धवनने केलेले 'मैं तेरा हिरो' वाले माकडचाळे विसरुन आम्ही त्याचा 'बदलापूर'च लक्षात ठेवतो. कदाचित म्हणूनच (काहीही नातं नसतानाही) शिखर धवनकडूनही विशेष काही अपेक्षा नसतात ! :-P 'रोहित धवन'ने वडिलांकडून निरुपद्रवी मनोरंजनाचा बोध घेतला आहे का, हे पाहायचं होतं.

सिनेमाबद्दल बोलण्यापूर्वी सिनेमाच्या शीर्षकाबद्दल बोलू.
'डीशूम' काय ? किती पोरकट नाव असावं ? काही अर्थ आहे का ह्याला ? वगैरे प्रश्न मला पडले. मग जाणवलं, च्यायला 'डिशक्याँव'सुद्धा असू शकलं असतं की ! त्यापेक्षा तरी बरं आहे !
तर ह्या नावावरुनच स्पष्ट होतं की हा एक 'अ‍ॅक्शन कॉमेडी' सिनेमा आहे आणि तो निराशा करत नाही !

कुठल्याश्या आखाती देशात होणाऱ्या कुठल्याश्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज विराज शर्मा (साकीब सलीम) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि भारताला सामने एकहाती जिंकून देतो आहे. पाकिस्तानशी खेळला जाणार असलेला अंतिम सामना दोन दिवसांवर असताना त्याचं अपहरण होतं आणि भारत व तो आखाती देश, अशी दोन्ही सरकारं खडबडून जागी होतात. त्याला शोधण्यासाठी एक स्पेशल टीम तयार केली जाते आणि तिचा भाग म्हणून भारतातून कबीर शेरगिल (जॉन अब्राहम) ह्या 'स्टार कॉप'ला पाठवलं जातं. स्वत:चा जोडीदार म्हणून कबीरला स्वत:चं डोकं न चालवणारा व स्थानिक माहिती असलेला एक माणूस हवा असतो. तो 'जुनैद अन्सारी' (वरुण धवन) ला निवडतो. विराजच्या अपहरणात एक बुकी 'वाघा' (अक्षय खन्ना) चा हात असतो.
बाकीची कहाणी कुणीही सुज्ञ प्रेक्षक स्वत:च जाणतो.



खुमासदार वनलायनर्स आणि काही परिस्थितीजन्य चटपटीत विनोद ह्यांची अचूक पेरणी, गतिमान कथानक आणि काही थरारक अ‍ॅक्शन ह्या सगळ्यामुळे पूर्वार्ध 'पॅक्ड विथ एण्टरटेन्मेंट' आहे. इंटरवलनंतर मात्र तो ढेपाळतो. शेवटी तर घाईघाईत गुंडाळून आवरतं घेतल्यासारखंच झालं आहे.

पण ह्या संपूर्ण वेळात, वरुण धवन धमाल करतो ! तो सहाय्यक भूमिकेत असला तरी जॉन अब्राहमला सहज झाकून टाकतो. अर्थात, जॉन अब्राहमला झाकणं ही काही फार मोठी अचिव्हमेंट नाहीच. तरी, चांगली गोष्ट ही की तो झाकला जातो आणि त्यामुळे सिनेमा बघावासाही वाटतो.
अक्षय खन्नाच्या भूमिकेची लांबी कमी आहे आणि तो फार काही छाप सोडत नाही. हे त्याचं पुरागमन फूसकंच ठरेल असं वाटतं. (त्याचं आखडून चालणं पाहता, तो एखाद्या रोबोच्या भूमिकेत शोभेल, खरं तर.)
फताड्या जिवणीच्या अभिनेत्र्या सध्या खूप झाल्या आहेत. ज्यांची जिवणी फताडी नाही, त्या शस्त्रक्रिया करून घेऊन ती फाकवत आहेत, हे त्याहून वाईट ! ह्या सगळ्या गायबाजारात (बैलबाजार तसा गायबाजार !) मला त्यातल्या त्यात जॅकलिन फर्नांडिस सहनीय वाटते. इथे मात्र ती नुसती सहनीयच नव्हे तर 'बघणीय'ही वाटली ! तिच्यात जाणवलेला खट्याळपणाही भावला ! आणि नर्गिस फाक्री फक्त काही मिनीटांसाठीच आहे, हे अतिशय उत्तम झालं.
पाहुणे कलाकार म्हणून अक्षय कुमार आणि सतीश कौशिक (फक्त आवाज) सॉलिड धमाल करतात ! विराज शर्मासोबतचा सेल्फी तर जबरदस्तच !

सिनेमादरम्यान एकच गाणं आहे. तेही उगाच आहे. बाकी आजचं सिनेसंगीत ही एक स्वतंत्रपणे गांभीर्याने विचार करण्याजोगी समस्या असल्याने त्यावर दोन-तीन वाक्यांची टिपणी पुरेशी नाही. दुसरं म्हणजे, 'भयाण' सदरात मोडणारी अनेक गाणी मी गेल्या काही वर्षांत सोसली आहेत आणि 'डीशूम-संगीत' कानांना फार त्रास तरी देत नसल्याने दुर्लक्ष करता येतं म्हणून केलं.

'डीशूम'वर 'धूम'चा प्रभाव सतत जाणवत राहतो. हे नावही फक्त दोन अक्षरं जोडून त्यावरुनच उचलल्यासारखं वाटतं. तोच वेग, तशीच हाताळणी असेल आणि त्यात 'उदय चोप्रा' नसेल तर 'धूम' कसा वाटेल ? तसाच 'D(is)HOOM' आहे, दुसरं काही नाही.

रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर

Saturday, July 23, 2016

दर्जेदार मनोरंजनाचा हंगामी पुरवठा - मदारी (Movie Review - Madaari)

मांजर, हे तसं पाहायला गेलं तर भित्रं. हूल दिली तरी पळून जाणारं. पण मांजराला जर एका खोलीत, एखाद्या कोपऱ्यात लोटलं तर ते काय करतं ? त्याला जर पळायला वाव राहिला नाही, तर ते शरणागती पत्करत नाही, हार मानत नाही. अश्या वेळी तो छोटासा प्राणी अतिशय आक्रमक होतो आणि प्रतिहल्ला चढवतो. धारदार व अणकुचीदार नखं आणि दात त्याच्याकडे असतातच. म्हणूनच म्हणतात की, 'पहले हाथ से बिल्ली मारना !' कारण जर 'पहले हाथ से' - पहिल्या प्रयत्नात - ते घडलं नाही, तर दुसरा प्रयत्न मांजर करू देत नाही.
हलाखीतून वर आलेला, संघर्ष करून टिकून राहिलेला एखादा सामान्य माणूस 'बाय चॉईस' एक मांजर बनलेला असतो. तो मत देतो आणि आलेलं सरकार स्वीकारतो. तो सिस्टीम जसं सांगेल, तसंच वागतो. त्याच्या भोवती चाललेले गैरव्यवहार त्याला जाणवत असतात, पण आपल्यापुरतं शांततापूर्ण आयुष्य जगण्याकडेच त्याचा कल असतो. कारण आजचं सुरक्षित आयुष्य त्याने एका होलपटीनंतर मिळवलेलं असतं, ते त्याला सॅक्रिफाईस करायचं नसतं. आपलं घर, कुटुंब, मित्रमंडळी ह्यांतच त्याला स्वारस्य असतं. देशाभिमान, धर्माभिमान, भाषाभिमान वगैरे बाणेदार मुद्दे राजकारणाच्या पटावरील प्यादयांच्या चाली असतात. त्याला ना त्या खेळात रस असतो, ना चालींत. तो ह्या पटाकडे लक्षही देत नाही. त्याचा भातुकलीचा खेळ स्वतंत्रपणे चाललेला असतो. पण ह्या पटावरच्या खेळातला एखादा उन्मत्त हत्ती किंवा सत्तांध वजीर आपला पट सोडून, भातुकलीत थैमान घालून डाव उधळून लावतो, तेव्हा मात्र ह्या सामान्य माणसातलं भित्रं मांजर कोपऱ्यात लोटलं जातं आणि प्रतिहल्ला केला जातो. तो जीवाचा विचार करत नाही, अस्तित्वाची फिकीर करत नाही. कारण ते असंही संपल्यातच जमा असतं. 'सर पे कफन' बांधून तो धिप्पाड शत्रूला बेजार करतो.

ही कहाणी आपण अनेकदा पाहिलेली आहे. मसाला कमी-जास्त केला गेला, बदलला गेला असेल; पण मूळ ऐवज तोच. 'मदारी'चं वेगळंपण हेच की इथल्या निर्मल कुमार (इरफान खान) मधलं भित्रं मांजर जेव्हा एक दिवस आक्रमक होतं, तेव्हा तो त्याचा प्रतिहल्ला नियोजनबद्धपणे करतो. तो कुठल्याही अचाट हाणामाऱ्या वगैरे करत नाही. इथे उत्कंठा ताणणारे पाठलाग नाहीत, धुंवाधार गोळीबार नाही. जुळवाजुळव, योगायोग आहेत, पण जितपत 'सिनेमॅटिक लिबर्टी' सहज दिली जाईल, तितपतच.


"बाज़ चूज़े पर झपटा, उठा ले गया. कहानी सच्ची लगती है, अच्छी नहीं लगती. बाज़ पर पलटवार हुआ. कहानी सच्ची नहीं लगती, लेकिन खुदा कसम बहुत अच्छी लगती है"
- अशी ही कहाणी पडद्यावरील प्रत्येक कलाकाराच्या दमदार अभिनयाने जिवंत केली आहे.

काही अभिनेत्यांची शैली त्यांनी निभावलेल्या व्यक्तिरेखेवर भारी काही वेळेस पडत असते. इरफान खान त्यांपैकी एक आहे, असं माझं (टीकात्मक) मत आहे. ह्याचा अर्थ असा नाही की कुठेही तो जराही कमी पडतो. खरं तर काही ठिकाणी तो भावनिकही करतो. त्याने साकारलेला निर्मल कुमार अख्खा सिनेमाभर कुणाशीही ना मारामारी करत नाही की कुणाला भिडत नाही. फक्त एकदाच तो एकच कानाखाली लगावतो आणि तेव्हढंच पुरून उरतं. ह्यावरुन 'इंटेन्सिटी' लक्षात यावी.
ही कमाल जितकी स्वत इरफानची तितकीच लेखक-दिग्दर्शकाच्या स्टोरी टेलिंगचीही आहेच.
दिग्दर्शक निशिकांत कामतनी आजपर्यंत बनवलेले सर्व सिनेमे एक तर रिमेक्स तरी आहेत किंवा 'आधारित' तरी. 'मदारी'ही अपवाद नाहीच. अश्या सूडकथा शेकडो सिनेमांतून आलेल्या आहेत. त्यामुळे आणि मध्ये आलेल्या आचरट 'लै भारी'मुळे कामतांकडून तश्या सीमित अपेक्षाच असतील. त्यामुळे 'मदारी' जरी पुनर्कथनात्मक वाटला, तरी हरकत नसावी !
'जिमी शेरगिल' पुन्हा एकदा सहाय्यक भूमिकेत दिसतो. प्रत्येक वेळी त्याचा सिनेमा पाहताना त्याच्या भूमिकेला काही तरी वजन, महत्व असेल असं वाटतं आणि प्रत्येक वेळी निराशाच वाट्याला येते. त्याने साकारलेला सीबीआय ऑफिसर चांगला झाला आहे. पण त्या व्यक्तिरेखेला विशेष असा वावच नाहीय. इतर सहाय्यक कलाकार -तुषार दळवी, उदय टिकेकर, इ. - पेक्षा जास्त लांबीची भूमिका, इतकाच दिलासा.
अगदी छोट्याश्या भूमिकेत जयंत सावरकर आहेत. एकच प्रसंग त्यांना वाव देणारा आहे, पण तेव्हढ्यातही म्हातारा काळीज पिळवटतो !

दोनच गाणी आहेत. 'मासूम सा..' हे गाणं खूप छान आहे. आजकालच्या ट्रेंडनुसार वरच्या पट्टीत असलेलं हे गाणं मनात, ओठांवर रेंगाळत राहतं. दुसरं गाणं 'डमा डमा डम..' असं काहीसं आहे. त्या आचरट धिंगाण्याला खरं तर 'गाणं' म्हणणंच चूक आहे. अतिशय संतापजनक थर्ड क्लास काम आहे ते. जर ते विशाल भारद्वाजचं असेल तर लाजिरवाणं आहे. आणि जर 'सनी-इंदर बावरा' नामक बैलजोडीचं असेल, तर अनेक भिकार संगीतकारांच्या पंक्तीत अजून दोघे भिकारी बसले आहेत, असं समजू. हे गाणं अविस्मरणीय छळवाद मांडतं. इतका की 'मदारी' मला तरी ह्या अत्याचारासाठी लक्षात राहील. मला कधी कधी कळत नाही की एक सिनेमा बनवण्यासाठी इतकी मेहनत हे लोक घेतात. मग एखादा भाग इतका सुमार असल्याचं त्यांना मान्य कसं होतं ? की सरसकट, एकजात कुणालाही संगीताची सामान्य जाणही राहिलेली नाही ? एका उंचीवर सगळं नाट्य पोहोचलेलं असताना हा कर्णकर्कश्य, फाटक्या गळ्याचा असह्य धांगडधिंगा सुरु होतो आणि अक्षरश: विचका करतो. (ह्या गाण्यामुळे प्रेक्षकाच्या मनातलं भित्रं मांजर चवताळून उठतं आणि सिनेमावर प्रतिहल्ला चढवतं !)

कहाणीत काही अर्धवट सुटलेले धागे आहेत, काही 'लूपहोल्स'ही आहेत. त्या सगळ्यासकट 'मदारी' हा एकदा पाहाण्यासारखा निश्चितच आहे. आजच्या जमान्यातल्या सिनेमांचा 'युएसपी' असलेला भडकपणा इथे नाही. वास्तव जरी रंजकतेने सादर केलं असलं, तरी वास्तवदर्शनाच्या अट्टाहासापोटी हिंसा, वासना वगैरेतली कुठलीही नग्नता इथे नाही. हा थरार तुम्हाला बेचैनही करणार नाही. पण जर दर्जेदार मनोरंजनाची एक तीव्र निकड असेल तर 'हंगामी मदत' म्हणून 'मदारी' पुरेसा आहे !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Friday, July 08, 2016

संक्षिप्त 'सुलतान' (Sultaan - Not a Movie Review)

रिव्ह्यू वगैरे लिहायचा मूडही नाहीय आणि वेळही नाहीय. म्हणून जरासं संक्षिप्त. 

आवर्जून सांगावं असं 'सुलतान'बद्दल काही असेल तर हे -

१. सलमान इतका थकेल, निस्तेज, निरुत्साही वगैरे कधी दिसला नाही. त्याच्या अभिनयाला मर्यादा आहेत आणि तो त्याचं लोडही घेत नाही. आपल्या मर्यादेत राहूनच एक्स्प्रेस करत असतो. पण 'एनर्जी' आणि त्या एनर्जीमुळे असणारा जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्स हा सलमान, शाहरुख, अक्षय कुमार व अजून काही १-२ लोकांचा प्लस पॉईण्ट आहे. का कुणास ठाऊक 'सुलतान' झालेला सलमान दबंग, वॉण्टेड, टायगर वगैरेसमोर अगदीच पडेल वाटला. फुग्यातली हवा कमी व्हायला लागली की तो जसा वाटतो, तसा वाटला सलमान. दया आली त्याची. तो चक्क आजारी वाटला. बहुतेक आता 'वय' आड यायला लागलं आहे. ह्या फुसकेपणामुळे सलमानपट पाहूनही पाहिल्यासारखं वाटलं नाही.

२. Anushka Sharma certainly has better jobs to do. असला तोकडा रोल तिने का केला आहे कुणास ठाऊक ! अर्थात, जितका आहे तितका तिने केला चांगलाच आहे. पण कशाला ? सोनाक्षी-फिनाक्षी, जॅकलीन-फॅकलीन ठोकळे आहेत की असले किरकोळ सहाय्यक रोल्स करायला ! दीपिका, अनुष्का, प्रियांकाने अश्या कामांत आपला वेळ, कसब वाया घालवू नये असं वाटतं. प्रियांकाने मध्यंतरी पाठोपाठ महारद्दड सिनेमे टाकायला सुरु केलं होतं. जंजीर, लव्ह स्टोरी २०५० वगैरे. बरं झालं, वेळीच सावरली. अनुष्कानेही सावरावं. सुलतान-फिलतान करण्यापेक्षा बरी कामं आहेत नक्कीच तिच्याकडे.

३. सलमान-अनुष्का ही जोडी काही केल्या पचत आणि पटतच नाही ! एक तर कॅमेऱ्याने दोघांची उंची जुळवायचा प्रयत्नही केलेला नाही आणि त्यात त्यांच्यात काही केमिस्ट्री, फिजिक्स काहीही वाटत नाही. पेनाचं टोपण पेन्सिलला लावल्यासारखं विजोड आहे हे. कुणाच्या सुपीक डोक्यातून असं अचाट कास्टिंग आलं असेल काय माहित ! 

४. बहुतेक गाणी बरी जमून आलेली आहेत. विशाल-शेखरना त्यासाठी धन्यवाद द्यावेत म्हणतो ! कारण आजकाल सिनेमातली गाणी सहन होणं म्हणजे हवामानखात्याने सांगितलेल्या अंदाजाने बरोबर ठरण्यासारखं आहे. 

५. I dont know if something is wrong with me. पण आजकाल मला दोन - सव्वा दोन तासाच्या वर सिनेमा जाणं हे आवडेनासंच झालं आहे ! तब्बल पावणे तीन तास ? काहीही गरज नव्हती इतकी. अर्धा तास कमी चालला असता आणि त्यामुळे मजाही आली असती. पण असो !
६. अब्बास अली जफरचा 'गुंडे' एक अशक्य आचरट चित्रपट होता. त्या मानाने 'सुलतान' खूपच चांगला म्हणावा लागेल. 

७. रणदीप हुडाला जरा अजून काम हवं होतं. गेल्या काही सिनेमांमुळे मला हा अभिनेता खूपच आवडायला लागला आहे. त्याच्या भूमिकेला खूप कमी जीव, लांबी आहे. ती पुरेशी वाटत नाही. I know हे unreasonable आहे. तरी जरा त्याच्या भूमिकेची लांबी वाढवली असती, तर बरं झालं असतं.

८. शेवटचा अर्धा तास 'ब्रदर्स'ची आठवण येते. खुद्द 'ब्रदर्स'सुद्धा रिमेकच होता, हा भाग वेगळा ! 

९. सलमानच्या कुस्त्या, फाईट्स चांगल्या केल्या आहेत. पण अनुष्काच्या एक नंबर बोगस. दुसरं म्हणजे ती 'लेडी पैलवान' न वाटता 'काडी पैलवान' वाटते.

१०. सर्वच जणांनी हरयाणवी भाषेचा लहेजा चांगला जपला आहे. सलमानला Flat 50% डिस्काउंट असतो ह्या सगळ्या बाबतीत. त्यामुळे 'सर्वच' मध्ये तो अर्धाच पकडावा !  

११. कहाणी अगदी थोडक्यात सांगायची तर, तो तिला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडतो. ती कुस्तीगीर असते म्हणून हाही कुस्तीगीर बनतो. नंतर काही कौटुंबिक ड्रामा होतो आणि रिंगपासून दूर गेलेला तो पुन्हा रिंगमध्ये येतो 'खोयी हुई इज्जत फिरसे पाने के लिये' असा सगळा मसाला आहे.

१२. आता तर 'दंगल' अजूनच बोअर होणार आहे.

१३. रेटिंग - * * १/२

- रणजित पराडकर


Related Posts Plugin for WordPress, Blogger...