Sunday, July 31, 2016

Second Takes (Sairat & Sultan)

थोडंसं पुढे जाऊन मागे वळून पाहिलं की दिसणारं चित्र नेहमीच जरा वेगळं असतं आणि दृष्टीची व्याप्तीही वाढलेली असते. म्हणूनच आठवणींना उजाळा देताना, त्या कडवट असोत वा मधुर, गंमतच वाटत असते. भूतकाळात रमणे न रमणे हा ज्याचा त्याचा स्वभाव आहे. पण गेलेल्या प्रत्येकच क्षणाला आयुष्याच्या पाटीवरून स्वच्छ पुसून टाकणारा माणूस मला तरी आजपर्यंत दिसला नाहीय. 

चित्रपटाबद्दल लिहिताना, जे लिहिलं जातं ते सहसा चटकन मनात आलेलं असतं. नंतर काही काळाने पुन्हा एकदा विचार केला की मत जरा बदलतंही, असा माझा अनुभव आहे. ही पोस्ट म्हणजे मी मागे वळून जेव्हा दोन सिनेमांकडे पाहिलं, तेव्हा मला काय वाटलं हे सांगण्यासाठी आहे.

-------------------------------------------

सैराट

गेल्या गुरुवारी, म्हणजे माझ्या वीकांताला अजून एकदा 'सैराट' पाहिला.

१. फारच विस्कळीत वाटला. 'सिनेमा काही 'ग्रीप'च घेत नाही आहे', अशी बरोबरच्या पाहुण्यांची सतत तक्रार चालू होती.
२. लांबण संपता संपेना वाटली. अगदी सुरुवातीच्या क्रिकेट सामन्यापासून तिची सुरुवात होते. ते क्रिकेट चित्रणही गंडलंय. म्हणजे कॅमेरावर्क वगैरे नाही. मंग्याने डॉट बॉल्स खेळत राहणं, नंतर परश्याला प्रदीपने 'एक फॉर तरी मार. झिकतोय आपन' म्हणणं, मग त्याने टोल्यांवर टोले हाणत सुटणं वगैरे फुल्टू टिपिकल फिल्मी मसाला. 
३. उत्तरार्धात ते अचानकच एकमेकांशी भांडायला लागतात असं वाटलं. त्यांच्यातले मतभेद किंवा त्यांच्या द्विधा मनस्थिती काही नीटश्या establish झाल्याच नाहीत.
४. तो बहुचर्चित शेवट तर अगदी ओढून ताणून आणलेला वाटला. हा शेवट आधी ठरवून मग बाकीचं लिहिलं असणार नक्कीच. 
५. 'आता गं बया..' हे गाणं जामच आवडलं. 'झिंगाट' छानच. पण 'याड लागलं' आणि  'सैराट झालं जी' एकमेकांचे पार्ट-१, पार्ट-२ वाटले.
६. रिंकू राजगुरूचं काम ठीकठाकच आहे. राष्ट्रीय पुरस्कार देण्याच्या लायकीचं तर अजिबातच नाही.
७. एकूणच सगळ्यांची संवादफेक अभिनयशून्य वाटली. उदा. - हैद्राबादच्या रस्त्यावर आर्चीच्या मागे जाणारा परश्या तिला हाक मारत असतो की, 'आर्चे.... आर्चे थांब.. मला तुज्याशी बोलायचंय.' ते त्याचं बोलणं तर इतकं सपाट आणि एकसुरी आहे की सीडी अडकल्यासारखं वाटतं.
८. मावशी खूपच बोअर आहे ! एकदम 'आवरा' कॅटेगरी !
९. सगळ्यात मस्त काम आहे ते लंगड्या प्रदीपचं. सुपर्ब टायमिंग आणि एकदम इंटेन्स्ड. 'सल्या'सुद्धा एक्सलंट. ह्या दोघांपैकी कुणी तरी लीड रोलमध्ये हवा होता. पण त्यांच्याकडे चिकना चेहरा नाही ना ! :(
१०. मी माझ्या 'सैराट'वरच्या लेखात खूपच मिळमिळीत टीका केलीय की !
११. 'एका 'मराठी' सिनेमाने कोट्यावधी कमावले', वगैरे फुटकळ अस्मिता मी बाळगत नाही. 'एका चांगल्या कलाकाराने चांगले पैसे कमावले', हा आणि इतकाच आनंद मला पुरेसा आहे. त्यामुळे 'सैराट'ने जमवलेला गल्ला आणि त्यामुळे नागराज मंजुळे ह्या गुणी दिग्दर्शक व इतर अनेक कलाकारांचा झालेला फायदा ह्याबद्दल भरपूर कौतुक व आनंद वाटतो. ह्या पैश्यामुळे ते भविष्यात काही चांगले सिनेमेही करू शकतील. त्या सिनेमांना कदाचित 'सैराट'इतकं यश नाही मिळणार, पण बऱ्यापैकी फायदा होईल व रसिक, जाणकारांची पसंतीही मिळेल, ही सदिच्छा ! दोन-तीन 'फॅण्ड्री' येण्यासाठी जर एखादा 'सैराट' येणं जर कमर्शियली आवश्यक असेल, तर आन्देव ! 

बाकी आर्ची-परश्याच्या फडतूस लव्हस्टोरीत स्वत:ची कहाणी दिसणाऱ्या लोकांबद्दल तीव्र सहानुभूती आहे. त्यांनी 'क़यामत से क़यामत तक़'सुद्धा पाहावा. त्यातली सगळी गाणी एकमेकांपेक्षा वेगळी वाटतात आणि सुंदर तर ती गाणीही आहेत व तो सिनेमाही. 

धन्यवाद !

- रणजित 

टीप - ह्या पोस्टमुळे मला जातीयवादी ठरवायचा प्रयत्न करू नये. कारण ते सर्टिफिकेट तर मला कधीचंच मिळालं आहे. मरे हुए को अब और क्या मारोगे ? त्यामुळे मला दुसरं काही तरी ठरवा ! 

२७ जून २०१६

-------------------------------------------

सुलतान 

औघडाय !

एक कुणी तरी गुड फॉर नथिंग सांड अचानक एक दिवस एका नजरेत एका पोरीच्या प्रेमात इतका पडतो की वयाची तिशी गाठलेली असतानाही कुस्ती शिकायचं ठरवतो. 
ठीक आहे, अनेक बेसुरे टीव्हीवरचे थिल्लर 'टॅलेण्ट' शो पाहून संगीत शिकायची सूरसुरी येऊन जवळच्या एखाद्या किंचित गायकाकडे शिकायला जातातच की ! पण काही दिवसांसाठीच असतं. 
इथे हा उनाडटप्पू कुस्ती शिकायला सुरु करतो. आखाड्यात महिनोन्महिने तालीम घेणाऱ्या पहेलवानांना धूळ चारतो. ह्याहीपुढे जाऊन काही महिन्यांतच इतका तयार होतो की राष्ट्रीय पातळीला निवडला जातो. हे कमी की काय, म्हणून मग तो ऑलिम्पिकही जिंकतो आणि हे अगदीच फुटकळ असावं म्हणून की काय लगेच नंतर 'वर्ल्ड चॅम्पियनशिप' सुद्धा जिंकतो. 
हे म्हणजे अठ्ठाविसाव्या वर्षी आर्मीत भरती होऊन, मेजर होऊन शूरवीर बनणाऱ्या शारक्याच्या 'जब तक है जान' पेक्षा वरताण की ! 

पण इतक्या थापा ठोकूनही पोट भरत नाही.
मग तो चाळीशी उलटून गेल्यावर, मध्ये काही वर्षं तालीमीशी काहीही संबंध ठेवला नसताना, 'मिक्स्ड मार्शल आर्ट्स' वाल्या तुफान मारामारीत उडी घेतो आणि तिथल्या भल्या भल्या 'सूरमां'नाही लोळवतो ! 

च्या मायला ! 
आचरटपणाला काही लिमिट ? टेपा लावत सुटायचं म्हणजे किती ?

इची भन !
म्हणजे कोवळ्या वयापासून झीज झीज झिजणारे, मेहनत करून करून राप रापलेले दुनियाभरचे लोक वायझेड आहेत आणि हा वळू सगळ्यात शाना होय ? काही महिने घासली की ऑलिम्पिक मिळवता येतं, चॅम्पियन बनता येतं ? 

म्या बी इचार करतुय की औंदा पावसाळा संपला की क्रिकेट कोचिंग लावाचं. काय नाय तं दोन-तीन म्हैन्यांत एकांदं आयपीएल क्वॉन्ट्रॅक्टं तरी गावंलच. आपल्याला काय देशासाठी म्येडल-फिडल नकुय. (क्रिकेट नसतंयच म्हनी आलिम्पिकात !) पर म्हैना २-५ कोट जुगाड जरी झाला तरी अजुक काय पायजेल आविश्यात ?  

उपर अल्लाह, नीचे धरती, 
बीच में मेरा सुकून 
मै सुलतान !

अरे तिच्यायला मी पन सुलतान रे !

इची भन!

- रणजित 'फिलिंग_रेप्ड' खान

१३ जुलै २०१६

-------------------------------------------

'सैराट' आणि 'सुलतान' ह्या दोन सुपर हिट्स बाबत दोन स्वतंत्र पोस्ट्स फेसबुकवर टाकल्या होत्या. त्यांचं संकलन.

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...