Saturday, July 23, 2016

दर्जेदार मनोरंजनाचा हंगामी पुरवठा - मदारी (Movie Review - Madaari)

मांजर, हे तसं पाहायला गेलं तर भित्रं. हूल दिली तरी पळून जाणारं. पण मांजराला जर एका खोलीत, एखाद्या कोपऱ्यात लोटलं तर ते काय करतं ? त्याला जर पळायला वाव राहिला नाही, तर ते शरणागती पत्करत नाही, हार मानत नाही. अश्या वेळी तो छोटासा प्राणी अतिशय आक्रमक होतो आणि प्रतिहल्ला चढवतो. धारदार व अणकुचीदार नखं आणि दात त्याच्याकडे असतातच. म्हणूनच म्हणतात की, 'पहले हाथ से बिल्ली मारना !' कारण जर 'पहले हाथ से' - पहिल्या प्रयत्नात - ते घडलं नाही, तर दुसरा प्रयत्न मांजर करू देत नाही.
हलाखीतून वर आलेला, संघर्ष करून टिकून राहिलेला एखादा सामान्य माणूस 'बाय चॉईस' एक मांजर बनलेला असतो. तो मत देतो आणि आलेलं सरकार स्वीकारतो. तो सिस्टीम जसं सांगेल, तसंच वागतो. त्याच्या भोवती चाललेले गैरव्यवहार त्याला जाणवत असतात, पण आपल्यापुरतं शांततापूर्ण आयुष्य जगण्याकडेच त्याचा कल असतो. कारण आजचं सुरक्षित आयुष्य त्याने एका होलपटीनंतर मिळवलेलं असतं, ते त्याला सॅक्रिफाईस करायचं नसतं. आपलं घर, कुटुंब, मित्रमंडळी ह्यांतच त्याला स्वारस्य असतं. देशाभिमान, धर्माभिमान, भाषाभिमान वगैरे बाणेदार मुद्दे राजकारणाच्या पटावरील प्यादयांच्या चाली असतात. त्याला ना त्या खेळात रस असतो, ना चालींत. तो ह्या पटाकडे लक्षही देत नाही. त्याचा भातुकलीचा खेळ स्वतंत्रपणे चाललेला असतो. पण ह्या पटावरच्या खेळातला एखादा उन्मत्त हत्ती किंवा सत्तांध वजीर आपला पट सोडून, भातुकलीत थैमान घालून डाव उधळून लावतो, तेव्हा मात्र ह्या सामान्य माणसातलं भित्रं मांजर कोपऱ्यात लोटलं जातं आणि प्रतिहल्ला केला जातो. तो जीवाचा विचार करत नाही, अस्तित्वाची फिकीर करत नाही. कारण ते असंही संपल्यातच जमा असतं. 'सर पे कफन' बांधून तो धिप्पाड शत्रूला बेजार करतो.

ही कहाणी आपण अनेकदा पाहिलेली आहे. मसाला कमी-जास्त केला गेला, बदलला गेला असेल; पण मूळ ऐवज तोच. 'मदारी'चं वेगळंपण हेच की इथल्या निर्मल कुमार (इरफान खान) मधलं भित्रं मांजर जेव्हा एक दिवस आक्रमक होतं, तेव्हा तो त्याचा प्रतिहल्ला नियोजनबद्धपणे करतो. तो कुठल्याही अचाट हाणामाऱ्या वगैरे करत नाही. इथे उत्कंठा ताणणारे पाठलाग नाहीत, धुंवाधार गोळीबार नाही. जुळवाजुळव, योगायोग आहेत, पण जितपत 'सिनेमॅटिक लिबर्टी' सहज दिली जाईल, तितपतच.


"बाज़ चूज़े पर झपटा, उठा ले गया. कहानी सच्ची लगती है, अच्छी नहीं लगती. बाज़ पर पलटवार हुआ. कहानी सच्ची नहीं लगती, लेकिन खुदा कसम बहुत अच्छी लगती है"
- अशी ही कहाणी पडद्यावरील प्रत्येक कलाकाराच्या दमदार अभिनयाने जिवंत केली आहे.

काही अभिनेत्यांची शैली त्यांनी निभावलेल्या व्यक्तिरेखेवर भारी काही वेळेस पडत असते. इरफान खान त्यांपैकी एक आहे, असं माझं (टीकात्मक) मत आहे. ह्याचा अर्थ असा नाही की कुठेही तो जराही कमी पडतो. खरं तर काही ठिकाणी तो भावनिकही करतो. त्याने साकारलेला निर्मल कुमार अख्खा सिनेमाभर कुणाशीही ना मारामारी करत नाही की कुणाला भिडत नाही. फक्त एकदाच तो एकच कानाखाली लगावतो आणि तेव्हढंच पुरून उरतं. ह्यावरुन 'इंटेन्सिटी' लक्षात यावी.
ही कमाल जितकी स्वत इरफानची तितकीच लेखक-दिग्दर्शकाच्या स्टोरी टेलिंगचीही आहेच.
दिग्दर्शक निशिकांत कामतनी आजपर्यंत बनवलेले सर्व सिनेमे एक तर रिमेक्स तरी आहेत किंवा 'आधारित' तरी. 'मदारी'ही अपवाद नाहीच. अश्या सूडकथा शेकडो सिनेमांतून आलेल्या आहेत. त्यामुळे आणि मध्ये आलेल्या आचरट 'लै भारी'मुळे कामतांकडून तश्या सीमित अपेक्षाच असतील. त्यामुळे 'मदारी' जरी पुनर्कथनात्मक वाटला, तरी हरकत नसावी !
'जिमी शेरगिल' पुन्हा एकदा सहाय्यक भूमिकेत दिसतो. प्रत्येक वेळी त्याचा सिनेमा पाहताना त्याच्या भूमिकेला काही तरी वजन, महत्व असेल असं वाटतं आणि प्रत्येक वेळी निराशाच वाट्याला येते. त्याने साकारलेला सीबीआय ऑफिसर चांगला झाला आहे. पण त्या व्यक्तिरेखेला विशेष असा वावच नाहीय. इतर सहाय्यक कलाकार -तुषार दळवी, उदय टिकेकर, इ. - पेक्षा जास्त लांबीची भूमिका, इतकाच दिलासा.
अगदी छोट्याश्या भूमिकेत जयंत सावरकर आहेत. एकच प्रसंग त्यांना वाव देणारा आहे, पण तेव्हढ्यातही म्हातारा काळीज पिळवटतो !

दोनच गाणी आहेत. 'मासूम सा..' हे गाणं खूप छान आहे. आजकालच्या ट्रेंडनुसार वरच्या पट्टीत असलेलं हे गाणं मनात, ओठांवर रेंगाळत राहतं. दुसरं गाणं 'डमा डमा डम..' असं काहीसं आहे. त्या आचरट धिंगाण्याला खरं तर 'गाणं' म्हणणंच चूक आहे. अतिशय संतापजनक थर्ड क्लास काम आहे ते. जर ते विशाल भारद्वाजचं असेल तर लाजिरवाणं आहे. आणि जर 'सनी-इंदर बावरा' नामक बैलजोडीचं असेल, तर अनेक भिकार संगीतकारांच्या पंक्तीत अजून दोघे भिकारी बसले आहेत, असं समजू. हे गाणं अविस्मरणीय छळवाद मांडतं. इतका की 'मदारी' मला तरी ह्या अत्याचारासाठी लक्षात राहील. मला कधी कधी कळत नाही की एक सिनेमा बनवण्यासाठी इतकी मेहनत हे लोक घेतात. मग एखादा भाग इतका सुमार असल्याचं त्यांना मान्य कसं होतं ? की सरसकट, एकजात कुणालाही संगीताची सामान्य जाणही राहिलेली नाही ? एका उंचीवर सगळं नाट्य पोहोचलेलं असताना हा कर्णकर्कश्य, फाटक्या गळ्याचा असह्य धांगडधिंगा सुरु होतो आणि अक्षरश: विचका करतो. (ह्या गाण्यामुळे प्रेक्षकाच्या मनातलं भित्रं मांजर चवताळून उठतं आणि सिनेमावर प्रतिहल्ला चढवतं !)

कहाणीत काही अर्धवट सुटलेले धागे आहेत, काही 'लूपहोल्स'ही आहेत. त्या सगळ्यासकट 'मदारी' हा एकदा पाहाण्यासारखा निश्चितच आहे. आजच्या जमान्यातल्या सिनेमांचा 'युएसपी' असलेला भडकपणा इथे नाही. वास्तव जरी रंजकतेने सादर केलं असलं, तरी वास्तवदर्शनाच्या अट्टाहासापोटी हिंसा, वासना वगैरेतली कुठलीही नग्नता इथे नाही. हा थरार तुम्हाला बेचैनही करणार नाही. पण जर दर्जेदार मनोरंजनाची एक तीव्र निकड असेल तर 'हंगामी मदत' म्हणून 'मदारी' पुरेसा आहे !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

3 comments:

  1. Thanks for your review.It always helps me to decide whether to see a film or not. At my age of 55 years, the enthusiasm of seeing every movie wanes; so your reviews are useful.You have a nice style of writing.Keep posting !

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...