Sunday, June 28, 2015

'जाने भी दो यारो' च्या स्मृती ! (Movie Review - Miss Tanakpur haazir Ho)

आलिशान स्टार हॉटेलमधला चहा आणि त्याच हॉटेलबाहेर असलेल्या रस्त्यावरच्या एखाद्या टपरीवरचा चहा, ह्यात फरक आहे. जो सच्चा चहाप्रेमी असेल, त्याला वेगवेगळ्या किटलीतलं गरम पाणी, गरम दूध, पिशवीतली चहा पावडर आणि साखरेला 'शुगर क्यूब' म्हणणं झेपतच नाही. त्याला तो एकाच भांड्यात उकळलेला, आलं घातलेला वाफाळता कडक काढासदृश चहा काचेच्या जुनाट छोट्या कपातून प्यायल्याशिवाय समाधान मिळतच नाही. तो घरात असताना स्वत:चा चहासुद्धा असाच बनवतो. गाळल्यानंतर भांड्याला आतल्या बाजूने चहाने सिग्नेचर सोडली पाहिजे, असा त्याचा होरा असतो.
मोठमोठे स्टार्स असलेले बिग बॅनर 'पिच्चर' आणि कुणीच 'स्टार' नसलेले स्मॉल बजेट 'चित्रपट' ह्यांच्यातही असाच फरक असावा. हे स्मॉल बजेट चित्रपट बऱ्याचदा मनातल्या मनात त्या चहावाल्याच्या थर चढलेल्या भांड्यात उकळणाऱ्या चहासारखे उसळत राहतात आणि चित्रपट संपून चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर सच्च्या चित्रपटप्रेमीच्या मनाच्या आतल्या बाजूने एक वलयाकार सिग्नेचर सोडतात. जशी 'मिस तनकपूर हाजिर हो' सोडतो.

हरयाणातल्या एका छोट्याश्या 'तनकपूर' गावात एक जमीनदार असतो. 'सुवालाल' (अन्नू कपूर). गडगंज जमीनदाराला असावा, तसा माज असलेला आणि कानूनपेक्षा 'लंबे हाथ' असलेला. बुढ्ढ्या सुवालालची तरुण पत्नी 'माया' (हृषिता भट), पिअक्कड नवऱ्यापासून शारीरिक व भावनिक सुखाला वंचित असते. गावात विजेची डागडुजी, उपकरणांची दुरुस्ती वगैरे वरकामं करणारा तरुण 'अर्जुन' (राहुल बग्गा) मायाला भावनिक आधार देतो आणि दोघांत जवळीक निर्माण होते. सुवालालला पत्नीवर संशय असतोच. त्याला हे प्रकरण समजतं आणि सुरु होते अर्जुनची ससेहोलपट आणि त्याच्या कुटुंबाची फरफट. स्वत:ला 'टेन प्लस टू' म्हणून गावात सगळ्यात शहाणा समजणारा सुवालाल पोलीस, वकील, खाप पंचायत सगळं काही 'मॅनेज' करून अर्जुनला आयुष्यातून उठवायचा चंग बांधतो आणि तसं करतोसुद्धा.

विश्वासघात, बदला वगैरेच्या अनेक कहाण्या आपण पाहिलेल्या आहेत. पण 'मिस तनकपूर' पूर्णपणे वेगळा ठरतो हाताळणीमुळे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्यात एक उपरोधिक विनोदी वातावरण जपलेलं आहे. जागोजाग उत्तम परिस्थितीजन्य आणि सूचक संवादांतून खुसखुशीत विनोदनिर्मिती केलेली आहे. सिस्टमचा वरवंटा जेव्हा धनदांडगे हातात घेतात, तेव्हा त्या वरवंट्याखाली सामान्य माणूस कसा भरडला जातो, हे दाखवत असताना तिरकस विनोद करून हे सत्य अधिकच बोचरं केलं आहे. शोकांतिकेला विनोदी ढंगात सादर केल्यामुळे आपण 'जाने भी दो यारो' च्या स्मृतींनाही उजाळा देतो, हे ह्या चित्रपटाचे सगळ्यात मोठे यश. ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत कुणीही नाही. असेलच तर 'सिस्टम' आहे. इथला हीरो लाचार आहे. तो स्वत:वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कधीच पेटून उठत नाही. इथले बहुतेक जण खलपुरुष आहेत. पण ते अत्याचारी असले, भ्रष्ट असले तरी राक्षसी नाहीत. इथे दाखवलेली सिस्टम नालायक आहे, पण भडक निर्लज्ज नग्न नाही.
अन्नू कपूरना एका पूर्ण लांबीच्या चांगल्या भूमिकेत बघताना खूप आनंद होतो. त्यांचा हरयाणवी सुवालाल योग्य प्रमाणात कपटी, मस्तवाल, हरामखोर, मूर्ख वगैरे आहे. ह्यातल्या कशाचंही प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त ते होऊ देत नाहीत.

सुवालालच्या जोडीला त्याचा उजवा हात म्हणून 'भीमा' (रवी किशन) आणि 'पंडित' (संजय मिश्रा) आहेत. रवी किशन भोजपुरी सिनेमातला सुपरस्टार. त्याने हिंदीत तेरे नाम, आन, वेल डन अब्बा, ४०८४ वगैरेसारख्या सिनेमांत चांगल्या भूमिका केल्यायत. इथेही सांगकाम्या बिनडोक 'भीमा'च्या भूमिकेत तो धमाल करतो.

संजय मिश्रा हे आजच्या घडीच्या अनेक उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. 'आँखों देखी' सारख्या समांतर चित्रपटांतून त्यांनी स्वत:चे नैपुण्य दाखवून दिलं असलं तरी मुख्य प्रवाहात काही त्यांना अजूनही म्हणावी तशी संधी मिळालेली नाही. नेहमी एका विनोदवीराची जागा ते भरून काढत असतात. इथला त्यांचा भोंदू पंडितही ह्यापेक्षा काही फार वेगळं करत नाही.

अभिनयाच्या चालत्या-फिरत्या विद्यापीठांपैकी एक ओम पुरी भ्रष्ट पोलीस अधिकारी मातंगसिंगच्या भूमिकेत आहेत. प्रत्येक प्रसंगात मातंगसिंग हास्यतुषार उडवतो. पाण्यात बसलेल्या म्हशींतून नेमकी हवी ती म्हैस ओळखण्याचा प्रसंग तर जबरदस्तच वठला आहे !

हृषिता भटला विशेष काम नाही. जे आहे ते ती व्यवस्थित करते.
राहुल बग्गा आश्वासक, लक्षवेधी वगैरे नाही. बस पडद्यावर एक व्यक्ती आहे, ह्यापेक्षा जास्त त्याचा वावर जाणवत नाही.

'इन कुत्तो के सामने नाच बंसती नाच..' हे एकमेव गाणं चांगलं जमलं आहे. संगीत कहाणीच्या मध्येमध्ये लुडबुड करत नाही. पार्श्वसंगीत पडद्यावरील नाट्याचा गळा आवळत नाही.

हा चित्रपट खऱ्या अर्थाने मूळ पत्रकार असलेल्या लेखक-दिग्दर्शक विनोद काप्रींचा आहे. 'मला ह्या चित्रपटातून काय सांगायचं आहे आणि कसं', हे काप्रींना अगदी व्यवस्थित माहित होतं आणि एकाही प्रसंगात ते त्यांच्या विचारापासून दूर जात नाहीत. ही कहाणी काही सत्यघटनांवर आधारित आहे. काप्रींनी एक पत्रकार म्हणून ह्या घटनांना जवळून पाहिलं असल्याची शक्यता आहे, कदाचित म्हणूनही काही वेगळेच तरंग त्यांच्या मनात उठले असावेत, जे ह्या चित्रपटाद्वारे सर्वदूर पोहोचतील. किंबहुना पोहोचायला हवे, पण पोहोचतील की नाही हे मला माहित नाही. कारण हा चित्रपट सामान्यांच्या गळी उतरेल असा नाही, हे मला चित्रपटगृहात असलेल्या मोजक्याच लोकांना पाहिल्यावर जाणवलं.

न्यायाधिशाच्या पिकनिकचं पांचट रटाळ चित्रण आणि झोपमोड केली म्हणून त्याने एका वात्रट पोराच्या श्रीमुखात भडकावणं, असा सगळा तद्दन भोंगळ व पोरकट कार्यक्रम सिस्टमवर 'सूचक' भाष्य करण्यासाठी करण्यापेक्षा एक मुक्तपणे धावत सुटलेली म्हैस दाखवणं कैक पटींनी कल्पक वाटतं.

'जाने भी दो यारो' मध्ये अखेरच्या दृश्यात दोन निष्पाप तरुण स्वत:च्या गळ्यावरून बोट फिरवून माना खाली टाकतात. तसंच इथे चित्रपटाच्या सगळ्यात अखेरच्या दृश्यात 'मुक्तपणे धावत सुटलेली म्हैस' हे सिस्टमवर सूचक भाष्य आहे.

असे फार कमी चित्रपट असतात की ते पाहत असताना संपूच नयेत, असं वाटतं. 'मिस तनकपूर..' असाच एक आहे. सच्चा चहाप्रेमी टपरी शोधून काढतो, तसंच सच्चा चित्रपटरसिकही ह्या चित्रपटापर्यंत पोहोचावा, अशीच एक प्रामाणिक इच्छा आहे.

रेटिंग - * * * *

हे परीक्षण दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२८ जून २०१५) रोजी प्रकाशित झाले आहे -


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...