Sunday, June 07, 2015

धडकने का बहाना - (Movie Review - Dil Dhadakne Do)


आयुष्याशी नक्की काय देवाणघेवाण करायची आहे, हा व्यवहार न समजलेल्या तीन मित्रांची कहाणी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये दाखवली होती.
'जो अपनी आंखों में हैरानियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम'
ह्या जावेद अख्तर साहेबांच्या ओळींपर्यंत येऊन ती कहाणी थांबली होती. 'दिल धडकने दो'सुद्धा इथेच, ह्या ओळींच्या आसपासच आणून सोडतो.

१९७८ च्या 'गमन' मधील गझलेत 'शहरयार'नी म्हटलं होतं, 'दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढें!' बरोबर आहे. 'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अ‍ॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ही तीन मित्रांची कहाणी होती आणि 'दिल धडकने दो' मध्ये आहेत तीन जोड्या. कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली शाह), कमल-नीलमची मुलगी 'आयेशा मेहरा' (प्रियांका चोप्रा) आणि तिचा नवरा 'मानव' (राहुल बोस) आणि कमल-नीलमचा मुलगा कबीर (रणवीर सिंग) आणि त्याचं प्रेम 'फराह अली' (अनुष्का शर्मा). कमल एक श्रीमंत उद्योगपती आहे. स्वत:च्या लग्नाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने डबघाईला आलेल्या धंद्याला नवसंजीवनी देण्यासाठी काही व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून, कुटुंब व जवळचे नातेवाईक ह्यांना घेऊन युरोपात क्रुझ ट्रीपचा प्लान तो बनवतो. ह्या 'फॅमिली-ट्रीप-मेड-पब्लिक' मध्ये मेहरा कुटुंबातले काही छुपे आणि काही खुली गुपितं असलेले प्रॉब्लेम्स समोर येतात आणि त्यापासून दूर पळणंही शक्य होत नाही. ते त्यांचा सामना करतात आणि ही क्रुझ ट्रीप त्यांना एका आनंदी शेवटाकडे पोहोचवते.

ती तशी पोहोचवणार आहे, हे आपल्याला माहित असतं का ? नक्कीच असतं. पण तरी पूर्ण पावणे तीन तास दिल 'मनापासून' धडकत राहतं !
'दिल धडकने दो' ची कहाणी खरं तर चोप्रा आणि बडजात्यांच्या पठडीची आहे. त्यांना 'जी ले अपनी जिंदगी' किंवा 'बचा ले अपने प्यार को' वगैरेसारखे डायलॉग इथे यथेच्छ झोडता आले असते. पण कौटुंबिक नाट्य असलं तरी त्याला संयतपणे हाताळलं असल्याने 'झोया अख्तर' टच वेगळा ठरतो. तगडी स्टारकास्ट असल्यावर चित्रपट भरकटत जातो, असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण तसं होत नाही. बिनधास्त तरुणाईच्या विचारशक्तीच्या सक्षमतेवरचा नितांत विश्वास झोयाच्या सर्वच चित्रपटांत दिसून आलेला आहे. तो इथेही दिसतो, त्यामुळे मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाला 'दिल धडकने दो' आवडला नाही, तरच नवल !

उद्योगपतींच्या मुलांकडून, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची अपेक्षा खूप सुरुवातीपासून केली जाते. हा दबाव असा असतो की बहुतेक वेळी त्या मुलाला काही दुसरं करायचं असेल, तरी आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. 'कबीर'कडे एक मोठा व्यवसाय सांभाळायची कुवत आणि ते करायची इच्छाही नसते, ह्याची त्याला पदोपदी जाणीव होत असतानाही तो काही करू शकत नसतो. 'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. पण 'कबीर'चं स्वत:शीच चाललेलं हे द्वंद्व त्याने चांगलं साकारलं आहे.

कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे. जावेद अख्तर साहेबांच्या शब्दांना आमिरने उत्तम न्याय दिला आहे.

'अनुष्का शर्मा'ने, 'NH10', 'बॉम्बे वेलवेट' नंतर अजून एक दमदार सादरीकरण केलं आहे. स्वतंत्र विचारांची व ओतप्रोत आत्मविश्वास असणारी 'फराह' उभी करताना, उथळपणा व अतिआत्मविश्वास दिसण्याचा धोका होता. मात्र ह्यातली सीमारेषा व्यवस्थित ओळखून, कुठेही तिचं उल्लंघन न करता तिने आपली छाप सोडली आहे.

प्रियांकाची 'आयेशा'सुद्धा एक स्वयंपूर्ण स्त्री आहे. लग्न झाल्यावर, कुणाच्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीच्या व मेहनतीच्या जोरावर तिने तिचं स्वत:चं व्यवसायविश्व निर्माण केलेलं असतं. एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न, त्यातून येणारं नैराश्य, त्यावर मात करून पुन्हा पुन्हा उभी राहणारी तिच्यातली मुलगी, पत्नी, सून, मैत्रीण तिने सुंदर साकारली आहे.

राहुल बोस आणि फरहान अख्तरला विशेष काम नाही. त्यातही राहुल बोसच्या भूमिकेला जराशी लांबी आहे. पण का कुणास ठाऊक तो सगळ्यांमध्ये मिसफिटच वाटत राहतो. कदाचित कहाणीचीही हीच मागणी आहे, त्यामुळे ह्या मिसफिट असण्या व दिसण्याबद्दल आपण त्याला दाद देऊ शकतो !

'शेफाली शाह'ची 'नीलम' प्रत्येक फ्रेमच्या एका कोपऱ्यात स्वत:ची स्वाक्षरी करून जाते ! तिचा वावर इतका सहज आहे की तिने स्वत:लाच साकार केलं असावं की काय असं वाटतं. मानसिक दबाव वाढल्यावर बकाबका केकचे तुकडे तोंडात कोंबतानाचा तिचा एक छोटासा प्रसंग आहे. त्या काही सेकंदांत तिने दाखवलेली चलबिचल अवस्था केवळ लाजवाब !

'अनिल कपूर' मेहरा कुटुंबाचा प्रमुख दाखवला आहे. तो ह्या स्टारकास्टचाही प्रमुख ठरतो. त्याच्या कमल मेहरासाठी पुरेसे स्तुतीचे शब्द माझ्याकडे नाहीत. मी फक्त मनातल्या मनात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या ! एका प्रसंगात आयेशाशी बोलताना आक्रमकपणे आवाज चढवून तो थयथयाट करतो. सहसा, असा तमाशा करताना कुणी उभं राहील, इथे-तिथे फेऱ्या मारेल, अंगावर धावून जाईल. पण हा माणूस खुर्चीत बसून आरडाओरडा करतो ! दुसऱ्या एका प्रसंगात मोबाईलवर बोलता बोलता त्याची नजर नको तिथे पडते आणि मग त्या व्यक्तींपासून लपण्यासाठी तो झाडामागे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. ती दोन-पाच क्षणांची धावपळ त्याने जबरदस्त केली आहे.

फरहान अख्तर आणि जावेद अख्तरलिखित संवाद चुरचुरीत आहेत. अनेक जागी वनलायनर्स, पंचेस आणि शब्दखेळ करून तसेच काही ठिकाणी वजनदारपणा देऊन हे संवाद जान आणतात.

अनेक चित्रपटांनंतर चित्रपटातलं 'संगीत' चांगलं जमून आलेलं आहे. 'गर्ल्स लाईक टू स्विंग' आणि 'धक धक धक धक धडके ये दिल' ही गाणी तर छानच ! 'धक धक धक धक धडके ये दिल' हे अख्खं गाणं एका सलग 'शॉट'मध्ये चित्रित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. ते निव्वळ अफलातून वाटलं !

शेवट थोडा अतिरंजित झाला असला, तरी एरव्ही 'दिल धडकने दो' वास्तवाची कास सोडत नाही.
ह्या आधीच्या चित्रपटांमुळे झोया अख्तरवर 'उच्चभ्रूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवणारी' असा शिक्का बसलेला असावा, 'दिल धडकने दो' हा शिक्का अजून गडद करेल. पण हेसुद्धा एक आयुष्य आहे आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहेच. कारण कोपऱ्यात लोटल्या गेलेल्या दिलाला इथे एक 'धड़कने का बहाना' नक्कीच मिळतो.

रेटिंग - * * * *



हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०७ जून २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...