Tuesday, June 04, 2013

साडे अठरा हजार फूटांवरचं एक फूट....... !! (Unforgettable Ladakh)

'सुमूर' गावातली मॉनेस्ट्री पाहून आमची क्वालीस डिस्किट नदीच्या आजूबाजूच्या रेताड वाळवंटातून काढलेल्या डांबरी रस्त्याने कॅम्पकडे निघाली. आमचा रस्ता पर्वतातून उतरला होता आणि पर्वताकडेच चालला होता. ह्या मधल्या काही किलोमीटरच्या पट्ट्यात डिस्किट नदी आणि तिचं वाळवंट.

दुरून, ह्या रस्त्यावर उतरण्याआधी आम्हाला वाटत होतं की हवा ढगाळ आहे. समोरच्या पर्वतावर ढग उतरले आहेत आणि म्हणून तो अतिप्रचंड पर्वत लपला आहे. पण रस्त्यावर येताच जाणवलं की इथे वादळसदृश हवा वाहत आहे. हवेत रेती इतकी उंच उडत आहे की तिने पर्वताला स्वत:ची चादर पांघरली आहे. गाडी दमदार होती, ड्रायव्हर 'दोर्जे' तरबेज होता आणि रस्ता फार लांबचा नव्हता, त्यामुळे आम्ही कुठलाही त्रास न होता समोरच्या पर्वतावर पोहोचलो आणि उंचीवरून त्या घो-घो हवेला न्याहाळू लागलो. गंमत वाटत होती. एकीकडे उंचच उंच पर्वतरांगा. त्यांच्या डोक्यावर बर्फ आणि त्यांच्या पुढ्यात रेती ! पण लडाख असंच आहे.


संध्याकाळी ४:३० - ५:०० च्या आसपास आम्ही 'नुब्रा' व्हॅलीतल्या 'हंडर' गावातल्या आमच्या कॅम्पमध्ये पोहोचलो. आमचा कॅम्प एका डोंगराच्या पायथ्याशी होता. फार उंच डोंगर नव्हता. हजार एक फुटांचा सलग दगडच म्हणा हवा तर. पण त्याच्या बाजूला आणि मागे काही अंतर सोडून मोठे मोठे पर्वत होते. लडाखमध्ये पर्वतांच्या रांगांमागे रांगा असतात. नजर थिजते पण रांगा संपत नाहीत. कॅम्पच्या मधून एक चार-पाच फूट रुंदीचा झुळझुळ ओहोळ वाहात होता. त्या, मागल्या बाजूला असलेल्या उंच पर्वताच्या शिखरावर पोह्यांवर खोबरं भुरभुरावं तसं बर्फ होतं. हे पाणी त्या पर्वतातूनच वाहात येत ह्या कॅम्पचे दोन भाग करत होतं. पाण्याच्या दोन्ही बाजूंना, एका रांगेत वॉटरप्रुफ तंबू होते.


रात्री साधारण ८:०० वाजल्यापासून नुब्रामध्ये पावसाने हजेरी लावली. रिमझिम रिमझिम, टिपटिप टिपटिप रात्रभर सुरूच होतं. संध्याकाळच्या वादळानंतर हवा पूर्णपणे बदलली होती. पावसामुळे थंडी अधिकच बोचरी झाली होती. ४-५ अंशाच्या आसपास तापमान असावं. दात वाजवणारी थंडी होती, तरी त्या तंबूंत पांघरुणाची व्यवस्था अतिशय उबदार होती. जाडजूड पश्मीना दुलयांच्या आत शिरल्यावर बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं. पण रात्रभर तंबूवर पडणाऱ्या थेंबांनी शांतता लाभू दिली नाही आणि झोपही लागू दिली नाही.

सकाळी ७:०० वाजताच आम्ही सगळे उठून निघायची तयारी करायला लागलो. लेहकडे परतण्याच्या रस्त्याचा खर्दुंग घाटातला ३० एक कि.मी. रस्ता खूपच खराब होता. म्हणून लौकर निघावं असा आम्ही विचार केला होता. पण दोर्जे म्हणाला, 'ओ नॉर्थ पुल्लू चेक पोस्ट से आर्मी आगे जाने देगा नई. पहले ओ साईड का गाडी इधर आयेगा, एक बजे तक. फिर इधर का गाडी छोडताय ओ. हम ९:०० बजे को निकलेंगे ?' (हे शेवटचं प्रश्नचिन्ह उत्तरातदेखील असतंच. ते खरं तर विधान असतं, पण चौकशी केल्यासारखं केलं जातं. सगळे लडाखी असंच प्रश्नार्थक हिंदी बोलतात.)

कॅम्पच्या नयनमनोहर परिसरात फोटोग्राफीची हौस भागवून, बोअरिंग नाश्ता करून आम्ही बरोब्बर ९:०० वाजता 'गणपती बाप्पा........ मोरया !!' केलं आणि रस्त्याला लागलो. आदल्या दिवशीच्या कार्यक्रमातील 'डिस्किट मॉनेस्ट्री' पाहायची बाकी होती, पण रोज एक मॉनेस्ट्री पाहाण्याचा आणि सोबत गाईड नसल्याने त्यातलं काहीच न कळण्याचा कंटाळा आला होता, त्यामुळे आम्ही दोर्जेला थेट लेहकडेच चलायला सांगितलं.

समुद्रसपाटीपासून साधारण ३००० फूट उंचीकडून आम्ही ४५०० फूट उंचीकडे चाललो होतो, पण मधला रस्ता आम्हाला गाडीसह गाठता येऊ शकणार्‍या जगातल्या सर्वाधिक उंचीवर नेणार होता. 'खर्दुंग ला' - उंची १८५०० फूट आमची वाट पाहात होता.

काल दुपारी ह्या भागातून येत असताना आजूबाजूच्या बोडख्या डोंगरांतून विविध रंगी दगड लक्ष वेधून घेत होते. हिरवे, लाल, काळे, पिवळे रंगाचे दगड.... अख्खे डोंगरच्या डोंगर भरून ! पण आता मात्र सगळ्या डोंगर-पर्वतांनी बर्फाची पांढरी शुभ्र, चमचमती पश्मीना शाल पांघरली होती. काल संध्याकाळी उशीरापासून बदललेल्या हवामानामुळे इथे भरपूर बर्फवृष्टी झाली होती. प्रत्येक पर्वतात वेगवगळे आकार, चेहरे दिसत होते. कुठे पांढऱ्या पानांचा विशाल वृक्ष असल्याचा भास होत होता, तर कुठे अर्घ्य देणारी ओंजळ दिसत होती. कुठे चित्रविचित्र वाढलेल्या पांढऱ्या दाढीचा खडूस म्हातारा बारीक डोळे करून पाहात होता, तर कुठे मान खाली घालून घळाघळा अश्रू वाहाणारी दु:खी प्रेयसी लक्ष वेधून घेत होती.


प्रत्येक वळणासरशी आमची गाडी अधिकाधिक उंची गाठत होती.
'खर्दुंग ला' - जगातला सर्वाधिक उंचीचा, गाडी जाऊ शकणारा रस्ता आम्हाला पार करायचा होता.
खोऱ्यात पाऊस पडला म्हणजे शिखरावर बर्फवृष्टी झाली असणार, असं कॅम्पातून निघतानाच तिथल्या लोकांनी सांगितलं होतं. 'खर्दुंग ला' साधारण १८५०० फुटांपर्यंत नेतो. घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणावर रस्त्याच्या खाली मोकळ्या मैदानात भरपूर बर्फ होता. तिथून एक नदीही वाहत असावी, जी आता गोठली होती. आमच्या आधीच ४-५ गाड्या तिथे पोहोचल्या होत्या आणि सगळे लोक त्या शुभ्र बर्फात खेळत होते. दोर्जेला तिथेच गाडी बाजूला घ्यायला सांगून आम्ही जाकिटं, ग्लोव्ह्ज, मफलर, टोप्या ई. आयुधं चढवून गाडीतून उड्या मारल्या आणि इतर लोक खेळत होते, त्या जागेपासून थोडं अजून पुढे, अजून जास्त बर्फात जाऊन दंगा सुरु केला. आयुष्यात पहिल्यांदाच बर्फ पाहात होतो. तोही असा ताजा-ताजा, काही तासांपूर्वीच भुरभुरवलेला ! अर्धा तास मनसोक्त खेळल्यावर तिथून निघालो.


पुढे आमच्यासाठी काय वाढून ठेवलं होतं, ह्याची कल्पना नव्हती; त्यामुळे आमचा आनंद अजूनही आमच्या चेहऱ्यांवरून ओसंडत होता. तासाभरात आम्ही नॉर्थ पुल्लू (उंची १६००० फूट) आर्मी चेक पोस्टला पोहोचलो आणि लगेच आनंद आटला. ५० च्या आसपास गाड्या तिथे आधीच उभ्या होत्या. 'खर्दुंग ला' ला प्रचंड बर्फवृष्टी झाली होती व त्यामुळे जागोजाग दरडी कोसळल्या होत्या. रस्ता सकाळपासून बंदच होता. लोक तिथे ५-६ तासांपासून अडकले होते. दु. १२ चा सुमार होता. दोर्जे माहिती काढून आला.
'अभी इधरी रुकनेकाय. ओ छोड नई रहे. रस्ता बंद हैं. आराम करो !'

बर्फवृष्टी सुरूच होती. आजूबाजूच्या हिमाच्छादित पर्वतांची शिखरं मधूनच थोड्या वेळासाठी दर्शन द्यायची. आम्हाला वाटायचं, आता हवा सुधारली. पण काही मिनिटातच ती पुन्हा धुक्यात आणि ढगांत लपायची. इथेच थांबायला लागणार की काय ? ही भीती मन पोखरत होती. 'मेकमायट्रीप'च्या माणसांना पुढे काय करायचे आहे, हे माहितही नव्हतं आणि त्याची त्यांना पर्वा असल्याचंही दिसत नव्हतं आणि हे पाहून आमची बेचैनी वाढतच जात होती.  


बाजूलाच एक टपरी वजा हॉटेल होतं, वेळ आहे तर काही तरी खाऊन घेणं महत्वाचं होतं. गरमगरम 'मॅगी'शिवाय तिथे काहीच खाणेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही त्यावरच भागवलं आणि आर्मीकडून पुढील 'ऑर्डर्स'ची वाट पाहात बसलो.
पुढचे साडे तीन तास आम्ही तिथेच थांबून होतो. दमट थंड हवा छातीत बाष्प जमवत आहे की काय असं वाटत होतं. ऑक्सिजन विरळ होणे, म्हणजे नेमकं काय, हेही जाणवायला लागलं होतं. ८-१० वाक्यं बोलण्यानेही दम लागत होता.
अखेरीस साधारण सव्वा तीनच्या सुमारास तिथून गाड्यांना पुढे जाण्यासाठी हिरवा सिग्नल मिळाला. सैनिकांनी चढाई करावी, तश्या सगळ्या गाड्या त्वेषाने समोरच्या महाकाय पर्वताकडे धावत सुटल्या. दोन वळणं घेतल्यावरच सगळ्या एका रांगेत शांतपणे जायल्या लागल्या.

जिथवर नजर जाईल तिथवर बर्फ दिसत होता. पर्वतांची पांढरी शुभ्र शिखरं कुठे संपत आहेत आणि आभाळ कुठे सुरु होत आहे हे कळत नव्हतं !



ठिकठिकाणी मातीचे ढिगारे, दगड-धोंडे आणि बर्फ होते. काल इथून येताना आम्ही पाहिलं होतं की हा रस्ता इतका लहान होता की जेमतेम गाडीला गाडी पास होई. त्यात ह्या मलिद्यामुळे तो आणखीच लहान झाला होता. 'खर्दुंग ला'चा हा सगळा भाग 'रस्ता' म्हणत असले तरी 'रस्ताहिन' होता. जिथे-तिथे फूट-फूटभराचे खड्डे होते. 'इथे कोणे एके काळी रस्ता असावा' असे म्हणता येईल इतपत डांबराचे अवशेष उरलेले होते. (पण इतक्या उंचीवर, कसा का होईना रस्ता आहे, हेही नसे थोडके ! अर्थात, आर्मी असल्यामुळेच इतपत तरी शक्य झालं असावं. अन्यथा सरकार हे काम करूच शकत नाही !) अश्यात झालेल्या बर्फवृष्टीमुळे हा रस्ता निसरडा झाला होता. सतत एका बाजूला पर्वत आणि दुसऱ्या बाजूला काही हजार फूट खोल दरी, निसरडा खड्डेमय रस्ता ह्यातून दोर्जे अत्यंत शांतपणे व हळूहळू गाडी पुढे नेत होता. दर १००-२०० मी.नंतर काही मिनिटं थांबावं लागत होतं. पुढचा अंदाज घेऊन, तिथे असलेल्या हेल्परकडून सिग्नल मिळाल्यावर पुढे जाणं सुरु होतं.

आतापर्यंत आम्हाला ह्या बर्फाच्या भीषणतेची जाणीव झाली होती. बाहेरचं तापमान शून्याच्या खाली होतं. गाडीच्या चाकांपुरता रस्ता वगळता आजूबाजूला अर्धा ते एक फूट बर्फ होता. बाहेर इतकी थंड हवा वाहात होती की गाडीच्या काचा उतरवणं अशक्य होतं. दर अर्ध्या तासाने लघवीला लागत होती. त्यामुळे सोबतच्या बायकांची अवस्था अजूनच बिकट होती. दार उघडून बाहेर पडलं किंवा थोड्या वेळासाठीही काच उतरवली की त्या बोचऱ्या थंडीने डोकं भणभणायला लागे. अगदी किरकोळ सूर्यप्रकाश होता तरी चमकदार बर्फावरून तो इतका परावर्तीत व्हायचा की प्रचंड त्रास होई. जसजसं आम्ही उंच जात होतो, ऑक्सिजन अधिकाधिक विरळच होत होता. त्यामुळे दर दोन तीन श्वासानंतर तोंड उघडुन एक मोठा श्वास घ्यायला लागत होता. सगळ्यांना भुका लागल्या होत्या, पण काही खाण्याची इच्छाही होत नव्हती. कमी ऑक्सिजनचा हळूहळू आमच्यावर परिणाम होत होता. पहिलं लक्षण - जांभया येणं - सुरु झालं होतं.
पण अश्याही परिस्थितीत दोर्जे एक साधंसं जाकिट घालून, कानालाही काही न बांधता प्रत्येक वेळी गाडी थांबवायला लागल्यावर लगबगीने खाली उतरत होता. कधी रस्त्यात आलेल्या लहान मोठ्या दगडांना इतर ड्रायव्हरांच्या मदतीने बाजूला करत होता, तर कधी पुढच्या गाड्यांना धक्का देऊन पुढे जाण्यास मदत करत होता.                  


तीन-चार तासांनंतर आम्ही 'खर्दुंग ला' च्या सर्वोच्च पातळीच्या जवळ पोहोचलो. आणखी तीन वळणं पार केली की घाट उतरायला सुरु ! गाडीच्या बंद काचांच्या आत गुदमरून कासावीस झालेल्या आम्हाला दोर्जेने 'ला' च्या सर्वोच्च जागेवरचा टॉवर दुरून दाखवून 'ओ आ गया.... बस उसके बाद नीचे उतरना शुरु करेंगे. उसको जादा टाईम नहीं लगेगा' म्हटलं, तेव्हा एक वेगळीच उभारी मिळाली. पण हे पुढचं वळण आत्तापर्यंतच्या असंख्य वळणांपैकी सगळ्यात धोक्याचं होतं. ह्या वळणावर बर्फ असा काही घट्ट जमला होता की तो काढण्यासाठी खड्डाच करावा लागला असता ! त्यामुळे दोन हेल्पर ह्या वळणावरच उभे होते.
इथून गाडी पुढे नेणं म्हणजे एक जीवघेणी कसरतच होती. गाडीचे चाक बर्फावर आल्याने ते जागच्या जागीच फिरायचं आणि समोर थोडासा चढ असल्याने गाडी जागेवरच वळायची ! मग रिव्हर्स घेऊन पुन्हा, मोशन न तोडता गाडी तिथून काढता येते का पाहायचं ! एखादा गाडीवाला पहिल्याच झटक्यात निघूनही जाई. पण जवळजवळ प्रत्येक गाडी दोन-तीन प्रयत्नांनंतरच तिथून निघू शकत होती.
एका बाजूला कडा आणि दुसऱ्या बाजूला साधारण ८००० फूट खोल दरी, अश्या त्या वळणावर आमची गाडी आली. जोरात 'घ्रुम्म्म्....' असा आवाज झाला, चाकं जागेवरच फिरली आणि गाडी जराशी वळली. पहिला प्रयत्न फसला होता. आता गाडी रिव्हर्स घ्यायची ! आमच्या छातीत धडधड वाढली होती. दोर्जेने सफाईने रिव्हर्स गियर टाकून गाडी मागे घेण्यास सुरु केली. दरीच्या कडेपासून जेमतेम एक फूट अंतर ठेवून तो गाडी उलटी मागे घेत होता.....! हे आधी आम्हाला माहित नव्हतं. पण खिडकीतून बाहेर जेव्हा ती हजारो फूट दरी आ वासल्यासारखी दिसली, तेव्हा मात्र पोटात गोळा आला.. गाडीतील बायकांनी डोळे मिटून जोरात आरडाओरडा केला. आमचीही टंपरली होती, पण आम्ही आमचा आरडाओरडा मनातल्या मनात केला.
दोर्जे आणि बाहेरचे दोघे हेल्पर शांत होते.
'कुछ नई.. कुछ नई.. सब ठीक हैं. डरो मत !!'
सगळेच इतके घाबरलो होतो की 'ठीक हैं' म्हणण्याइतपतही जीवात जीव नव्हता. वरचा श्वास वर आणि खालचा श्वास खाली ! मनातल्या मनात कुणी राम-राम करत होतं, कुणी भीमरूपी म्हणत होतं.
दुसरा प्रयत्न.. दोर्जेची क्वालीस पुन्हा गोळाफेकपटू धावत येऊन गोळा फेकतो, तशी रन-अप घेतल्यासारखी त्या वळणाकडे धावत गेली आणि पुन्हा चाकं जागेवर फिरली, गाडी जराशी वळली; पण बाहेरच्या दोघा हेल्पर्सनी धक्का दिला आणि ह्यावेळी गाडी तिथून निघाली.
मृत्यूचं वळण मागे पडलं होतं.. पुढचा तासभर कुणीही कुणाशी काहीच बोलायच्याही मनस्थितीत नव्हतं. पाचावर धारण बसली होती! मृत्यू काळोखा असतो, हा गैरसमजही दूर झाला होता. कारण आम्ही पांढरा शुभ्र मृत्यू पाहिला होता, अगदी जवळून.......... एका फूटावरून !!    

लेहच्या हॉटेलमध्ये पोहोचायला रात्री ९:०० वाजले होते. पाय इतके गारठले होते की बधीर झाले होते. डोक्यात घण वाजत होते. डोळे अतिशय थकले होते. कढत पाण्याने सगळं अंग शेकून काढून, बेचव जेवणाचे दोन घास कसेबसे गिळून आम्ही आपापल्या ब्लँकेटांत व दुलयांत अंगाची मुटकुळी करून शिरलो.

डोळ्यासमोरून ती जीवघेणी दरी काही केल्या जातच नव्हती. मनात विचारांचे आवर्त उठत होते. वाटत होतं,  तेव्हढा एक फुटाचा भाग फक्त बर्फच असला असता तर..........??


....रसप....
३ जून २०१३  

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...