नवीन अग्निपथ बाबत बोलायचं झाल्यास जुन्याला टाळून चालणार नाहीच. कारण हा नवा अग्निपथ 'त्या' अग्निपथची सही-सही नक्कल नसला, रिमेक (म्हणत असले तरी) नसला तरी त्यावर आधारित आहेच. कहाणी तीच, सादरीकरण वेगळं.. खूपच वेगळं.
मुकुल आनंद ह्यांचा जुना अग्निपथ तसं पाहता पटकथारहितच होता. तो सिनेमा केवळ अमिताभमुळे तरला(?), असं म्हटल्यास काहीच वावगं नाही. पण नव्या अग्निपथला तरायला अमिताभ 'विजय चव्हाण' (हो! तो 'चव्हाण' आहे, 'चौहान' नाही! दोन्ही सिनेमात ही एक खूप मोठी चूक आहे.) साकारणार नव्हता. त्यामुळे बळकट पटकथा, दमदार स्टारकास्टपेक्षा महत्त्वाची होती आणि ती मिळाली. इथेच नवा अग्निपथ जुन्यावर मात करून गेला.
कथा सर्वश्रुत आहेच, मी पटकथा सांगतो.
"मांडवा" गावात मिठाच्या कारखान्याच्या आड कोकेनचा धंदा करायचा "कांचा चीना" (संजय दत्त)चा डाव असतो. पण तत्त्वनिष्ठ मास्तर दीनानाथ चव्हाण हे जाणतो. सरकारकडून मिठाच्या कारखाना काढायची परवानगी आपल्याला मिळाली आहे, आपल्याला कांचाच्या भूलथापांना बळी पडायची गरज नाहीये, हे तो गावकऱ्यांना समजावतो. गावचा जमीनदार - ज्याची "कांचा चीना" अनौरस अवलाद आहे - आधीच मास्तरवर खार खाऊन असतो कारण मास्तरमुळे गावातला जमीनदाराचा मान कमी झाला असतो. मास्तरला एका लहान मुलीवर अत्याचार करायच्या आरोपात फसवून, त्याला रंगेहाथ पकडल्याचा आभास निर्माण करून कांचा चीना त्याची सर्वांसमक्ष क्रूरपणे हत्या करतो. त्याच्या कुटुंबाला - मुलगा व गरोदर बायको - रस्त्यावर आणतो. आई आणि मुलगा गाव सोडून मुंबईला येतात. इथे एका वेश्यावस्तीत रस्त्यावरच सुहासिनी (मास्तरची बायको) बाळंत होते व एका मुलीला जन्म देते.
बापाच्या खुनाला प्रत्यक्ष पाहाणाऱ्या लहानग्या विजयच्या मनात "कांचा"चा सूड घेणे आणि मांडवा परत मिळवणे, हीच एक भावना आहे. त्याला वडिलांचे शब्द आठवत आहेत - "कोई कमजोर यह नहीं कह सकता की उसने पहलवान को माफ कर दिया. पहले शक्तीवान बनो फिर माफ करना हैं या नहीं यह उस शक्तीवान पर निर्भर करता हैं. शक्ती का होना कोई बुरी बात नहीं. सवाल यह हैं की उस शक्ती का प्रयोग आप कैसे करते हो...." ई. (सदृश). मुंबईच्या ह्या भागात "रौफ लाला" (ऋषी कपूर) ह्या ड्रग्स व मुलींच्या स्मगलरचं साम्राज्य आहे. "रौफ लाला" शक्तिमान आहे. त्याला सगळे घाबरतात, हे लहानगा विजय पाहतो. मुंबईत ड्रग्स सप्लाय करण्यासाठी "कांचा चीना" 'लाला'ला भेटायला येतो. तेव्हा 'लाला' त्याला हाकलून देतो. हे विजय बघतो. 'रौफ लाला' कांचापेक्षा शक्तीमान आहे. त्याची मदत घेऊन मी कांचाचा बदला घेईन. असं तो ठरवतो आणि लहान वयातच गुन्हेगारीच्या वाटेवर चालू लागतो.
पुढे मोठा होईपर्यंत (१५ वर्षांत) विजय (हृतिक रोशन) लालाचा उजवा हातच बनतो आणि मग त्याचा खेळ सुरू होतो. मुंबईवर राज्य करायचं स्वप्न बाळगून कांचा किती तरी वर्षं मांडव्याला ठाण मांडून बसला असतो. पण एकीकडे लाला आणि दुसरीकडे पूर्वीचा इन्स्पेक्टर, आताचा ए.सी.पी. गायतोंडे (ओम पुरी) त्याला मुंबईत पाऊलही ठेवू देत नसतात. पण लालाला, त्याच्या मुलाला स्वत:च्या रस्त्यातून बाजूला करून विजय मुंबईचा ताबा घेतो आणि कांचाशी संधान बांधतो. सौदा सरळ असतो. मुंबईच्या बदल्यात मांडवा..
हा सौदा घडतो, पण रक्तरंजित हाणामारीत अर्थातच कुणी वाचत नाही. विजय, कांचा, त्यांच्यातील दुष्मनी व मांडव्यातील लोकांची गुलामगिरी सर्वाचा अंत होतो.
- अशी ही पटकथा.
जुन्या अग्निपथमध्ये दोन अक्षम्य चुका आहेत.
१. मोठा विजय चव्हाण ३६ वर्षांचा असतो आणि त्याची लहान बहिण जी मांडव्याला असतानाही बऱ्यापैकी मोठी असते ती हा ३६ वर्षांचा झाला तरी फार मोठी होतच नाही!
२. सिनेमाभर अमिताभ आपलं पूर्ण नाव सांगत फिरतो, तरी कांचा व कं.ला हा 'तो' आहे, कळत नाही!
ह्या दोन्ही चुका नव्या अग्निपथमध्ये सुधारल्या आहेत. संपूर्ण सिनेमात हृतिक फक्त एकदाच आपलं पूर्ण नाव सांगतो आणि त्याचं ते एकदा सांगणं अमिताभच्या सिनेमाभर सांगण्याइतकंच परिणामकारक ठरतं.
जुन्या अग्निपथमध्ये पटकथेइतकीच लंगडी बाजू संगीताची होती. तीही इथे सुधारली आहे. अजय-अतुल चं प्रत्येक गाणं लक्षात राहतं. खासकरून "देवा श्री गणेशा" तर अप्रतिमच जमलं आहे. गाण्यांना सलग न दाखवता दरम्यान संवाद घेतल्याने गाणी कथेला पुढे घेऊन जातात.
हृतिक रोशनने कुठेच अमिताभची नक्कल करायचा प्रयत्न केला नाही, हे खूप चांगलं झालं आहे. त्यामुळे दोनच गोष्टी होऊ शकल्या असत्या. एक तर त्यानेही काही ठिकाणी अमिताभसारखी ओव्हर ॲक्टींग केली असती किंवा तो तोकडा पडला असता. तरी अखेरच्या दृश्यात तो कमी पडलाच आहे. हे दृश्य अधिक परिणामकारक करता आलं असतं.
संजय दत्त चा कांचा चीना जबरदस्त आहे. पण त्याच्या त्या परिणामकारकतेत त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या शारीरिक बांधणी आणि वेशभूषेचं श्रेय अधिक आहे. तो इतका खतरनाक वाटतो की ह्याला हृतिक कसा मारू शकेल हा प्रश्न पडतो! त्या दृष्टीने अखेरची हाणामारी चांगली घेतली आहे. पण संजय दत्तच्या अभिनयक्षमतेची मर्यादाही अखेरच्या दृश्यात दिसून येते.
प्रियांका चोप्राने तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय. झरीना वहाबला फारसा वाव नाही. पण जो काही वाव आहे, तेव्हढ्यात ती मातेरं करतेच.. खासकरून (पुन्हा एकदा) अखेरचं दृश्य!
लहान वयातला विजय साकारणारा जो कुणी मुलगा आहे (त्याचं नाव माहित नाही!) त्याने अप्रतिम काम केलं आहे.
हा अग्निपथ का पहावा?
रिमेक कसा केलाय? ह्यासाठी? - नाही
हृतिकसाठी? - नाही
संजय दत्तसाठी - नाही
मग? - ऋषी कपूरसाठी!
हो. ऋषी कपूरचा "रौफ लाला" इतका भाव खाऊन जातो की काय सांगावं! असा ऋषी कपूर आजपर्यंत कधीच दिसला नाही. किंबहुना, हा ऋषी कपूर कधी दिसला नाही म्हणूनच "ह्या अभिनेत्याने स्वत:च्या क्षमतेशी न्याय केला नाही" असं अनेक जण म्हणत असावेत. अंतिम दृश्यात, आपले साम्राज्य संपलं आहे, हे कळल्यावर त्याने दाखवलेला विकृत रौफ लाला, जो अखेरपर्यंत झटापट करत राहतो, अतिशय अंगावर येतो. मी तर मनातल्या मनात "बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर ईन अ निगेटिव्ह रोल" चा पुरस्कार त्याला देऊनच टाकला आहे.
एकंदरीत, हा 'अग्निपथ' 'एकदा पाहण्यासारखा' नसून, 'एकदा(च) पाहावाच' असा आहे. जरा लांबला आहे. किमान अर्धा तास कमी असायला हवा होता. तसं असतं, तर नक्कीच 'अत्युक्तृष्ट' म्हटलं असतं. पण तसं नसल्याने फक्त 'उत्कृष्ट' म्हणीन.
एका चांगल्या कथेची, नसलेल्या पटकथेने आणि टुकार संगीताने पूर्वी वाट लावली असल्याने 'अग्निपथ' एक चांगली 'रिमेक संधी' होती. ती साधली गेली आहे. आधीच्या लोकांच्या चुका प्रमाण म्हणून समोर असल्याने हा पेपर तसा सोप्पा होता. पण सोप्पा असला तरी पूर्ण सोडवणं महत्त्वाचं असतंच! तो सोडवला गेलाय, हेही नसे थोडके!
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!