लावुनी सारे पणाला जिंकण्याचे वेड मजला
पूर्ण झोकूनी जिवाला खेळण्याचे वेड मजला
सामना माझा कुणाशी पाहिले ना मी कधीही
क्रुद्ध डोळ्यांतून ज्वाला माळण्याचे वेड मजला
शब्द माझे फेकता मी पत्थरांना छेद गेले
धार लावूनी जिभेला बोलण्याचे वेड मजला
मी कुठेही लाथ मारावी तिथे पाणी निघावे
आवडीच्या प्राक्तनाला कोरण्याचे वेड मजला
प्रेम द्या प्रेमास घ्या वा दुष्ट नजरेला नजर घ्या
व्याज जोडुन मुद्दलाला फेडण्याचे वेड मजला
मान घ्या कापून माझी वाकणे ठाऊक नाही
लादलेल्या बंधनाला तोडण्याचे वेड मजला
....रसप....
१८ जानेवारी २०१२
सांडती इथे प्याले तुमच्याच भावनांचे
ReplyDeleteपिउनी तृप्त होण्याचे वेड मजला ...
यशवंत