Tuesday, January 31, 2012

जाता जाता..


क्षितिजापाशी वळून पाहिन जाता जाता
तुझ्याचसाठी क्षणभर थांबिन जाता जाता

ओघळणाऱ्या पहाटवेळी तुला जागविन
मूकपणे डोळ्यांतुन वाहिन जाता जाता

वाटेवरती अनंत काटे सदाच होते
आता मी अग्नीतुन चालिन जाता जाता

नास्तिक नव्हतो तरी कधी मी नाम न जपले
"निर्भिड होता" म्हणवुन घेइन जाता जाता

स्वर्ग असे ऐषारामी हे कपोलकल्पित
माझा अनुभव लिहून ठेविन जाता जाता

तुझ्या मैफलीमधे जाहलो स्वराधीन मी
तुझ्या बंदिशी मीही गाइन जाता जाता

पहाट करते रंगसंगती किती अनोख्या
मी रंगांचे सुगंध उधळिन जाता जाता

ह्या जगण्याला आकाशाचे प्रेम दिले मी
मरणालाही पहा हासविन जाता जाता

"माझ्या अधुऱ्या कवितेला तू पूर्ण करावे"
अंधुक नजरा भिजवुन सांगिन जाता जाता


....रसप....
३१ जानेवारी २०१२

Monday, January 30, 2012

माझी अधुरी कविता


मी जपली जीवनभर जी
वसने सारी ती विरली
ओसाड शून्य नजरेच्या
स्वप्नांची चौकट झिजली

भुरभुर कापूस धुक्याचा
चौफेर पसरला आता
रस्ताही संपुन गेला
ह्या वळणावरती येता

काजळल्या क्षितिजापाशी
नि:शब्द गुंतली किरणे
श्वासांना अवजड झाले
श्वासांचे ओझे बनणे

माझ्यामागे शब्दांचे
उद्विग्न उसासे काही
त्या शेवटच्या पानावर
गवसेल सांडली शाई

तू नकोस माझ्यासाठी
थेंबातुन वाहुन जाऊ
माझ्या अधुऱ्या कवितेने
तू नकोस भारुन जाऊ


....रसप....
३० जानेवारी २०१२

Sunday, January 29, 2012

प्रेम माझे


होते तुझ्याचसाठी आधार प्रेम माझे
आता तुलाच करते बेजार प्रेम माझे!

का खंगले अशी मी? थकले उपाय सारे
कळले जरा उशीरा, आजार प्रेम माझे

मी लोचनात माझ्या रत्ने भरून आले
तुज वाटले तनाचा बाजार प्रेम माझे

म्हटले, विकून व्हावी सरणास सोय माझ्या
बाजारभाव म्हणतो, भंगार प्रेम माझे

अश्रू पिऊन हसणे शिकले हळूहळू मी
दु:खात वेदनेचा शृंगार प्रेम माझे

ना पेट घेत होती जेव्हा चिताच माझी
झाले अखेर 'जीतू' अंगार प्रेम माझे

....रसप....
२९ जानेवारी २०१२

Saturday, January 28, 2012

पूर्ण सोडवलेला सोप्पा पेपर (अग्निपथ - चित्रपट परीक्षण)


नवीन अग्निपथ बाबत बोलायचं झाल्यास जुन्याला टाळून चालणार नाहीच. कारण हा नवा अग्निपथ 'त्या' अग्निपथची सही-सही नक्कल नसला, रिमेक (म्हणत असले तरी) नसला तरी त्यावर आधारित आहेच. कहाणी तीच, सादरीकरण वेगळं.. खूपच वेगळं.

मुकुल आनंद ह्यांचा जुना अग्निपथ तसं पाहता पटकथारहितच होता. तो सिनेमा केवळ अमिताभमुळे तरला(?), असं म्हटल्यास काहीच वावगं नाही. पण नव्या अग्निपथला तरायला अमिताभ 'विजय चव्हाण' (हो! तो 'चव्हाण' आहे, 'चौहान' नाही! दोन्ही सिनेमात ही एक खूप मोठी चूक आहे.) साकारणार नव्हता. त्यामुळे बळकट पटकथा, दमदार स्टारकास्टपेक्षा महत्त्वाची होती आणि ती मिळाली. इथेच नवा अग्निपथ जुन्यावर मात करून गेला.

कथा सर्वश्रुत आहेच, मी पटकथा सांगतो.

"मांडवा" गावात मिठाच्या कारखान्याच्या आड कोकेनचा धंदा करायचा "कांचा चीना" (संजय दत्त)चा डाव असतो. पण तत्त्वनिष्ठ मास्तर दीनानाथ चव्हाण हे जाणतो. सरकारकडून मिठाच्या कारखाना काढायची परवानगी आपल्याला मिळाली आहे, आपल्याला कांचाच्या भूलथापांना बळी पडायची गरज नाहीये, हे तो गावकऱ्यांना समजावतो. गावचा जमीनदार - ज्याची "कांचा चीना" अनौरस अवलाद आहे - आधीच मास्तरवर खार खाऊन असतो कारण मास्तरमुळे गावातला जमीनदाराचा मान कमी झाला असतो. मास्तरला एका लहान मुलीवर अत्याचार करायच्या आरोपात फसवून, त्याला रंगेहाथ पकडल्याचा आभास निर्माण करून कांचा चीना त्याची सर्वांसमक्ष क्रूरपणे हत्या करतो. त्याच्या कुटुंबाला - मुलगा व गरोदर बायको - रस्त्यावर आणतो. आई आणि मुलगा गाव सोडून मुंबईला येतात. इथे एका वेश्यावस्तीत रस्त्यावरच सुहासिनी (मास्तरची बायको) बाळंत होते व एका मुलीला जन्म देते.
बापाच्या खुनाला प्रत्यक्ष पाहाणाऱ्या लहानग्या विजयच्या मनात "कांचा"चा सूड घेणे आणि मांडवा परत मिळवणे, हीच एक भावना आहे. त्याला वडिलांचे शब्द आठवत आहेत - "कोई कमजोर यह नहीं कह सकता की उसने पहलवान को माफ कर दिया. पहले शक्तीवान बनो फिर माफ करना हैं या नहीं यह उस शक्तीवान पर निर्भर करता हैं. शक्ती का होना कोई बुरी बात नहीं. सवाल यह हैं की उस शक्ती का प्रयोग आप कैसे करते हो...." ई. (सदृश). मुंबईच्या ह्या भागात "रौफ लाला" (ऋषी कपूर) ह्या ड्रग्स व मुलींच्या स्मगलरचं साम्राज्य आहे. "रौफ लाला" शक्तिमान आहे. त्याला सगळे घाबरतात, हे लहानगा विजय पाहतो. मुंबईत ड्रग्स सप्लाय करण्यासाठी "कांचा चीना" 'लाला'ला भेटायला येतो. तेव्हा 'लाला' त्याला हाकलून देतो. हे विजय बघतो. 'रौफ लाला' कांचापेक्षा शक्तीमान आहे. त्याची मदत घेऊन मी कांचाचा बदला घेईन. असं तो ठरवतो आणि लहान वयातच गुन्हेगारीच्या वाटेवर चालू लागतो.
पुढे मोठा होईपर्यंत (१५ वर्षांत) विजय (हृतिक रोशन) लालाचा उजवा हातच बनतो आणि मग त्याचा खेळ सुरू होतो. मुंबईवर राज्य करायचं स्वप्न बाळगून कांचा किती तरी वर्षं मांडव्याला ठाण मांडून बसला असतो. पण एकीकडे लाला आणि दुसरीकडे पूर्वीचा इन्स्पेक्टर, आताचा ए.सी.पी. गायतोंडे (ओम पुरी) त्याला मुंबईत पाऊलही ठेवू देत नसतात. पण लालाला, त्याच्या मुलाला स्वत:च्या रस्त्यातून बाजूला करून विजय मुंबईचा ताबा घेतो आणि कांचाशी संधान बांधतो. सौदा सरळ असतो. मुंबईच्या बदल्यात मांडवा..
हा सौदा घडतो, पण रक्तरंजित हाणामारीत अर्थातच कुणी वाचत नाही. विजय, कांचा, त्यांच्यातील दुष्मनी व मांडव्यातील लोकांची गुलामगिरी सर्वाचा अंत होतो.

- अशी ही पटकथा.

जुन्या अग्निपथमध्ये दोन अक्षम्य चुका आहेत.
१. मोठा विजय चव्हाण ३६ वर्षांचा असतो आणि त्याची लहान बहिण जी मांडव्याला असतानाही बऱ्यापैकी मोठी असते ती हा ३६ वर्षांचा झाला तरी फार मोठी होतच नाही!
२. सिनेमाभर अमिताभ आपलं पूर्ण नाव सांगत फिरतो, तरी कांचा व कं.ला हा 'तो' आहे, कळत नाही!
ह्या दोन्ही चुका नव्या अग्निपथमध्ये सुधारल्या आहेत. संपूर्ण सिनेमात हृतिक फक्त एकदाच आपलं पूर्ण नाव सांगतो आणि त्याचं ते एकदा सांगणं अमिताभच्या सिनेमाभर सांगण्याइतकंच    परिणामकारक ठरतं.

जुन्या अग्निपथमध्ये पटकथेइतकीच लंगडी बाजू संगीताची होती. तीही इथे सुधारली आहे. अजय-अतुल चं प्रत्येक गाणं लक्षात राहतं. खासकरून "देवा श्री गणेशा" तर अप्रतिमच जमलं आहे. गाण्यांना सलग न दाखवता दरम्यान संवाद घेतल्याने गाणी कथेला पुढे घेऊन जातात.

हृतिक रोशनने कुठेच अमिताभची नक्कल करायचा प्रयत्न केला नाही, हे खूप चांगलं झालं आहे. त्यामुळे दोनच गोष्टी होऊ शकल्या असत्या. एक तर त्यानेही काही ठिकाणी अमिताभसारखी ओव्हर ॲक्टींग केली असती किंवा तो तोकडा पडला असता. तरी अखेरच्या दृश्यात तो कमी पडलाच आहे. हे दृश्य अधिक परिणामकारक करता आलं असतं.

संजय दत्त चा कांचा चीना जबरदस्त आहे. पण त्याच्या त्या परिणामकारकतेत त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या शारीरिक बांधणी आणि वेशभूषेचं श्रेय अधिक आहे. तो इतका खतरनाक वाटतो की ह्याला हृतिक कसा मारू शकेल हा प्रश्न पडतो! त्या दृष्टीने अखेरची हाणामारी चांगली घेतली आहे. पण संजय दत्तच्या अभिनयक्षमतेची मर्यादाही अखेरच्या दृश्यात दिसून येते.

प्रियांका चोप्राने तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिलाय. झरीना वहाबला फारसा वाव नाही. पण जो काही वाव आहे, तेव्हढ्यात ती मातेरं करतेच.. खासकरून (पुन्हा एकदा) अखेरचं दृश्य!

लहान वयातला विजय साकारणारा जो कुणी मुलगा आहे (त्याचं नाव माहित नाही!) त्याने अप्रतिम काम केलं आहे.

हा अग्निपथ का पहावा?
रिमेक कसा केलाय? ह्यासाठी? - नाही
हृतिकसाठी? - नाही
संजय दत्तसाठी - नाही
मग? - ऋषी कपूरसाठी!
हो. ऋषी कपूरचा "रौफ लाला" इतका भाव खाऊन जातो की काय सांगावं! असा ऋषी कपूर आजपर्यंत कधीच दिसला नाही. किंबहुना, हा ऋषी कपूर कधी दिसला नाही म्हणूनच "ह्या अभिनेत्याने स्वत:च्या क्षमतेशी न्याय केला नाही" असं अनेक जण म्हणत असावेत. अंतिम दृश्यात, आपले साम्राज्य संपलं आहे, हे कळल्यावर त्याने दाखवलेला विकृत रौफ लाला, जो अखेरपर्यंत झटापट करत राहतो, अतिशय अंगावर येतो. मी तर मनातल्या मनात "बेस्ट सपोर्टिंग ॲक्टर ईन अ निगेटिव्ह रोल" चा पुरस्कार त्याला देऊनच टाकला आहे.

एकंदरीत, हा 'अग्निपथ' 'एकदा पाहण्यासारखा' नसून, 'एकदा(च) पाहावाच' असा आहे. जरा लांबला आहे. किमान अर्धा तास कमी असायला हवा होता. तसं असतं, तर नक्कीच 'अत्युक्तृष्ट' म्हटलं असतं. पण तसं नसल्याने फक्त 'उत्कृष्ट' म्हणीन.

एका चांगल्या कथेची, नसलेल्या पटकथेने आणि टुकार संगीताने पूर्वी वाट लावली असल्याने 'अग्निपथ' एक चांगली 'रिमेक संधी' होती. ती साधली गेली आहे. आधीच्या लोकांच्या चुका प्रमाण म्हणून समोर असल्याने हा पेपर तसा सोप्पा होता. पण सोप्पा असला तरी पूर्ण सोडवणं महत्त्वाचं असतंच! तो सोडवला गेलाय, हेही नसे थोडके!

Wednesday, January 25, 2012

तू माझी कविता....


तू माझी कविता, शब्द तुझा मी, कसे वेगळे व्हावे?
तू नदी प्रवाही, तीर तुझा मी, कुणी कुणाचे व्हावे ?

तू व्याकुळ नजरा, तुलाच मी पापणीत जपले होते
तू कातरवेळी पाझरताना सुगंध उरले होते

तू लोचनातला पारा तुजला कुणा दावले नव्हते
तू अथांग सागर मनातला पण तरंग उठले नव्हते

तू देवळातली देवी जी व्यापून दिशांना उरली
जी सुभाषितांचे तेज लेउनी आकाशाला स्फुरली

तू स्पंदन माझे, तू श्वासांचा ताल बांधला होता
तू प्राणाच्या ज्योतीस अनोखा उजेड दिधला होता

तू सुरात माझ्या तुझ्याविना मी गीत कोणते गावे ?
तू हळवी फुंकर वेणूमधली तुझ्यात हरवुन जावे..


....रसप....
२५ जानेवारी २०१२

Monday, January 23, 2012

MH 04 CA 4084 (चालीस चौरासी - परीक्षण)


एक पोलीस व्हॅन.. रात्रीच्या वेळी चालली आहे.. व्हॅनमध्ये चार जण.. दोन पुढे दोन मागे.. चारही वाईच वाईच "लावलेले".. (म्हणजे थोडी-थोडी प्यायलेले). आपापल्या गप्पांत रमत कुठल्याश्या मोहिमेवर चाललेत. वाटेत लागलेल्या एका डान्स बारमध्ये जाऊन मजा करतात. खातात, (अजून) पितात, गातात, नाचतात.. आणि परत पुढचा प्रवास सुरू.
इतक्यात मागून एक बुलेटस्वार लाईट मारत येतो. व्हॅन थांबते, कारण हा मागून येणारा 'खरा' पोलीस असतो! मग हे चौघं कोण?
सर - नसीरुद्दीन शाह. कधीकाळचा इंग्रजीचा प्राध्यापक. दारूच्या नशेत बायकोशी भांडण होऊन त्याच्या हातून तिचा खून होतो आणि सर १० वर्षं तुरुंगात जातो. ह्या दहा वर्षांत गुन्हेगारी जगताशी जवळून संबधित होतो.
बॉबी - अतुल कुलकर्णी. मुंबईत येतो गायक बनायला. एका बारमध्ये गाता-गाता त्याचा ट्रॅक पारच बदलतो.. हा मुलींचा सप्लायर बनतो. "दलाल"! भ** का काही तरी म्हणतात ना!
शक्ती - रवीकिशन. एक ड्रग्स विक्रेता. पण चिरकुट. हा धंदा वाईट आहे, माहीत आहे. पण पोटासाठी करतो..! (म्हणे)
अल्बर्ट पिंटो - के के मेनन. सफाईदार वाहनचोर. डुक्कर फियाट वर एकदम "क-क-क-क-क-किरण"वालं प्रेम. माझ्याकडे म्हणजे माझ्याचकडे असणार, अख्ख्या जगात इतर कुणाकडे नसणार!
असे हे चार वाममार्गी.
'कल्याण' गावातल्या एका नकली नोटांच्या 'टेम्पररी' अड्ड्याला लुटून एकच मोठ्ठा हात मारायचा प्लान करतात. त्यासाठी एक पोलीस व्हॅन चोरतात आणि मोहिमेवर निघतात. पण वाटेत भेटलेला असली पोलीस इन्स्पेक्टर 'महेश नायक' त्यांना त्याच्याच - 'द्वारका हॉटेल' मध्ये लपलेल्या गँगस्टर 'टोनी बिसलेरी'चा खातमा करायच्या - मोहिमेवर घेऊन जातो.. आणि मग वेगळंच गंमतीशीर थरारनाट्य घडतं!
खरे पोलीस आणि खऱ्या गँगस्टरांच्या तावडीतून हे चौघे सुटतात का?
किमान पाच-पाच करोड तरी मिळतील असा प्लान असताना प्रत्यक्षात काय मिळतं?
कोण वाचतं?
कोण मरतं?
हे सगळं जाणण्यासाठी "चालीस चौरासी" नक्की बघा.. आणि ताबडतोब बघा! कारण असे सिनेमे फार दिवस झळकत नाहीत!
अगदी पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत खुसखुशीतपणा न सोडणारा..
हलका-फुलका असला तरी उत्कंठा ताणून ठेवणारा...
एकही व्यक्तिरेखा १००% सभ्य न दाखवणारा..
प्रत्येक गाण्यावर ठेका धरायला लावणारा..
"चालीस चौरासी" न आवडला तरच नवल! नसीर-अतुल-केके-रवी चौघंही आपापल्या नावाला जागतात आणि सिनेमा प्रेक्षकाच्या खिश्याला जागतो. माझे तर पैसे वसूल झाले.. तुम्ही पण करा. थेटरात मिळाला नाही तर सीडी विकत घ्या!


Sunday, January 22, 2012

तू नसताना..


तू नसताना मी ऑफिसलाही उगाच दांडी देतो
अंमळ उठतो उशीराच अन् पिक्चर, क्रिकेट बघतो !

तू नसताना मज भूक लागते, दाबुन-चापुन खातो
फिरवून हात मी पोटावरती ढेकर-तृप्ती देतो !

तू नसताना मी ताणून देतो, गाढ शांत झोपतो
अन् स्वप्नपऱ्यांना मिठीत घेउन कुशीत मलमल भरतो !

तू नसताना मी खुशीत असतो मित्रांना बोलवतो
ते जुने सुखाचे दिवस आठवुन नॉस्टॅल्जियात रमतो

तू नसताना मी शिवारातला बैल मोकळा बनतो
ये उधाण आनंदाला अन् मी मस्तवाल बागडतो !

....रसप....
२२ जानेवारी २०१२

Friday, January 20, 2012

मी अजून तसाच आहे (उधारीचं हसू आणून....)

घड्याळातला काटा पुढेच फिरतोय
दिवसामागून दिवस.. सूर्य बुडतोय
ऋतू बदलले
हवा बदलली
फुले कोमेजली..
पुन्हा उमलली
सांडलेला पाचोळा उडून गेला
पुन्हा नवा पसरून झाला
भिंतींचे रंग विटले
खिडक्यांना गंज चढले
तरी मी अजून तसाच आहे
तिथेच आहे..

पण आज मी येणार आहे, तुला बघायला
सुखी-समाधानी आयुष्याच्या शुभेच्छा द्यायला
पण तुला दिसणार नाही.. दूरच उभा राहीन
तुझी पाठ वळली की हात उंचावीन
लोकांच्या नजरा चुकवून आवंढे गिळीन
खुशीत असल्याचं भासवून देईन
.....उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ जानेवारी २०१२

उधारीचं हसू आणून...

Thursday, January 19, 2012

वेड मजला

लावुनी सारे पणाला जिंकण्याचे वेड मजला
पूर्ण झोकूनी जिवाला खेळण्याचे वेड मजला 

सामना माझा कुणाशी पाहिले ना मी कधीही  
क्रुद्ध डोळ्यांतून ज्वाला माळण्याचे वेड मजला

शब्द माझे फेकता मी पत्थरांना छेद गेले 
धार लावूनी जिभेला बोलण्याचे वेड मजला

मी कुठेही लाथ मारावी तिथे पाणी निघावे
आवडीच्या प्राक्तनाला कोरण्याचे वेड मजला

प्रेम द्या प्रेमास घ्या वा दुष्ट नजरेला नजर घ्या  
व्याज जोडुन मुद्दलाला फेडण्याचे वेड मजला 

मान घ्या कापून माझी वाकणे ठाऊक नाही
लादलेल्या बंधनाला तोडण्याचे वेड मजला 

....रसप....
१८ जानेवारी २०१२ 

Wednesday, January 18, 2012

तुलाच ठाउक नाही..!


मी तुझ्याचसाठी कविता लिहितो, तुलाच ठाउक नाही
मी तुला पाहण्या डोळे मिटतो, तुलाच ठाउक नाही  

तो बागेमधला गुलाब हसता, तुझाच दरवळ भासे
तू गुलाब अन् मी काटा बनतो, तुलाच ठाउक नाही

तव कानाच्या पाळीवर झुलते हलके चांदण झुंबर
मी मनात त्याचा चंद्रच बनतो, तुलाच ठाउक नाही

डोळ्यांच्या गहिऱ्या मेघांमधुनी जेव्हा श्रावण झरतो
मी तहानलेला चातक भिजतो, तुलाच ठाउक नाही

ज्या वाटा जाती तुझ्या घरी मी रोज तिथूनच जातो
पाहून तुला मग ठोका चुकतो, तुलाच ठाउक नाही

माझ्यावर हसते दुनिया सारी, मजला राग न येई
मी तुला आठवुन मश्गुल असतो, तुलाच ठाउक नाही

तू संध्येचे ते रंग ओढुनी रजनी बनून यावे
मी अश्याच आशेवरती जगतो, तुलाच ठाउक नाही

आहेस जरी तू झुळझुळ निर्झर, तू अवखळशी सरिता
पण मीच तुझा अंतिम सागर तो, तुलाच ठाउक नाही


....रसप...
१५ जानेवारी २०१२

Saturday, January 14, 2012

पिंपळाचं पान (उधारीचं हसू आणून....)


कवितांच्या जुन्या वहीतलं
'ते' पिंपळाचं पान
- मला आठवतंय, मी जेव्हा ठेवलं होतं
तेव्हा फक्त वाळलेलं होतं -
आज जाळीदार झालंय..

पानातून आरपार माझी कविता दिसतेय
अस्पष्टच.. नीट वाचता येत नाहीये..
पण ती 'तेव्हा'ही नीट वाचली गेली नव्हतीच !
तुला फक्त शब्दच दिसले होते..
भावना उमगली नव्हतीच !
माझी कविता तू हसण्यावारी नेलीस
आणि अजून लिहिण्यासाठी शुभेच्छा देऊन गेलीस

मीही लिहिल्या..
पाणीदार, जाळीदार कविता
प्रत्येक कवितेला 'तुझ्यासाठीच' म्हणून
आणि तू सगळ्या वाचल्यास -
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१४ जानेवारी २०१२

उधारीचं हसू आणून...
Related Posts Plugin for WordPress, Blogger...