Saturday, November 07, 2009

आरसा मला हसला....

आरसा मला हसला तेव्हा
माझी मला लाज वाटली
माझ्याच गुलामासमोर मी
माझी मान खाली घातली

"तोच तुझा रे अहंकार
तुला तळाला घेऊन आलाय
मागे-पुढे पाहा जरा
तुझा रस्ता ओस पडलाय

दिशाहीन भटकंती
आता तुझी सुरु झालीय
आजूबाजूस घोडे धावातायत
तुझी फक्त फरफट चाललीय

कसा होतास टेचामध्ये
ताड्ताड चालायचास
छाती पुढे काढून कसा
रूबाबात राहायाचास

तेव्हा नाही माझ्याकडे
ह्या तळमळीने पाहिलंस
मला सोड, तू तेव्हा
प्रत्येकाला झिडकारलंस

आता काळ पुरता बदललाय
नेहमीच बदलत असतो
त्याची ज्याला कदर नाही
त्यालाच आपटत असतो

अजूनही वेळ आहे
जमिनीवर राहा
खोल घट्ट पाय रोवून
स्थिर होऊन पाहा

पहा तुझ्या डोळ्यांमध्ये
पुन्हा आकाश भरेल
भरकटलेलं तारू तुझं
तुफानांतून तरेल

कितीही उंच उडी घे
शेवटी खालीच येते
म्हणून आपली उंचीच वाढव
सारं मुठीत येते"

आरसा माझ्याशी बोलला तेव्हा
माझी मला शुद्ध आली
जणू काळी रात्र सरून
नवी पहाट झाली..


....रसप....
६ नोव्हेंबर २००९

1 comment:

  1. "आरसा मला हसला तेव्हा
    माझी मला लाज वाटली
    माझ्याच गुलामासमोर मी
    माझी मान खाली घातली"

    That was great!!

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...