Friday, May 29, 2009

तुझं आपलं......काहीतरीच..!!


लाडे लाडे गोंजारित
हळूच कवेत कवटाळित
तुझं आपलं......काहीतरीच..!!

मी हसतां.. फुले-मोती
म्हणे मूर्तिमंत प्रिती
अमर्याद माझी स्तुती
शब्द न् शब्द माझ्यासाठी
दीपासारखा ओवाळित

हळूच कवेत कवटाळित
तुझं आपलं......काहीतरीच..!!


मी येता येई बहर
म्हणे सौंदर्याचा कहर
सुगंधाची उठे लहर
क्षण न् क्षण माझ्यासाठी
जीवन तुझे गंधाळित

लाडे लाडे गोंजारित
हळूच कवेत कवटाळित
तुझं आपलं......काहीतरीच..!!



....रसप....
२९ मे २००९

Wednesday, May 20, 2009

..जगणं.. तुझ्याविना

चंद्र सूर्यात पाठशिवणी दिवसेंदिवस चालते
रात्र दिवसा डोळ्यांमध्ये वणव्यासारखी जळते
तांबुस झोंब-या नजरेला सारं भकास दिसते
तुझ्याविना सखे मला जगणं सज़ा वाटते

कुठून कुठे माहित नाही माझाच मला प्रवास
रखरखत्या वाटेवरती म्रुगजळाचे आभास
आठवणीन्ची लाळ गिळून तहान थोडीच भागते
तुझ्याविना सखे मला जगणं भाजून काढते

मनामध्ये प्रेमाचे मी आज थडगे बांधले
पण मानेवरती हव्यासाचे भूत बसून राहिले
पुन्हा पुन्हा झटकूनही पुन्हा पुन्हा पछाडते
तुझ्याविना सखे मला जगणं भयाण करते

भळभळणारी जखम माझी खपलीच धरत नाही
घावावरती मुतायलाही कुणी ठाकत नाही
माझी हाक मलाच साद फिरून फिरून घालते
तुझ्याविना सखे मला जगणं बधीर भासते....


....रसप....
२० मे २००९

Tuesday, May 12, 2009

फेफे


रोज वेगळी असती
जिंदगी भावली असती
एकेक नवी शिक्षा
हासून भोगली असती

पण रोज तोच घाणा
ओढून मोडा कणा
गाढव-बैल बना
ह्याला काय म्हणा?

राग कधी येतो..
तसाच निघून जातो
जाता जाता चिमट्याची
खूण सोडून जातो

चरफडतो.. जळफळतो..
तळमळतो.. कळवळतो..
ऊतू गेल्या दुधासारखा
नुसता उकळत राहातो

पृथ्वी गोल फिरते
घड्याळ पुढेच चालते
काट्यासोबत पळून पळून
रोजच फेफे उडते..


....रसप....
११ मे २००९

Monday, May 04, 2009

मी चर्चा केली नाही

एक प्रयत्न.. संदीप खरे ह्यांच्या "मी मोर्चा नेला नाही"च्या विडंबनाचा..


मी चर्चा केली नाही
मी वाद घातला नाही
विधिनिषेधसुद्धा साधा
मी मुळी ठेवला नाही

भवताली गोंधळ चाले
तो निर्ढावुन बघताना
पोटातुन ओरडताना
अन् सभात्याग करताना
निर्लज्जपणे मी हसलो बरखास्ती केली जेव्हा
कर्तव्यपूर्तीला माझ्या मी कधी जाणले नाही

मी सुस्त वडाचे झाड
पारंब्या अपरंपार
पावसात, दुष्काळात
नेमेचि राहतो गार
ह्या मस्तवाल फुगलेल्या पोटात कितीश्या ढोल्या
त्यां द्रव्य दडवले इतके, मोजाया पुरले नाही

दिसण्या हा सात्विक सदरा
कोल्ह्याची वरती मुंडी
देशाला लावत आलो
ही समाजसेवी शेंडी
मी जनतेला ना भ्यालो, मी देवाला ना भ्यालो
मी भ्रष्टाचाराखेरिज कधी धंदा केला नाही

मज जन्म मनाचा मिळता
मी पंतप्रधानच असतो
देशाचे तोडून लचके
मी तृप्त जाहलो असतो
मज निवडून द्यावे ज्यांनी अन् सत्ता द्यावी ज्यांनी
मी सर्पासम त्यांनाही दंशलो, सोडले नाही


....रसप....
०३ मे २००९
Related Posts Plugin for WordPress, Blogger...