Saturday, January 03, 2009

माझ्यात वेगळे काय..??

दोन डोळे दोन कान
एक तोंड एक नाक
दोन हात दोन पाय
माझ्यात वेगळे काय?

कधी थंड कधी तप्त
धमन्यांमध्ये माझ्याही रक्त
हाडा-मांसाचा गोळा फक्त
अजून दुसरं काय?

मित्रांमध्ये रमतो तसा
एकट्याने दंगतो
आला दिवस जगतो
अन् स्वप्नांमध्ये रंगतो
जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय

मातीचाच बनलो तरी
रोज अंघोळ करतो
अस्ताव्यस्त आतून तरी
कपडे इस्त्री करतो
काय करतो कशास करतो
मलाच ठाऊक कुठाय?

चष्मा लावून बघतो जणू
चष्म्याविना दिसत नाही
रक्त जरी उसळलं तरी
डोळ्यांमधून पाझरत नाही
आवळलेल्या मुठी माझ्या
ठोसे मारत नाहीत
बुरसटलेले शब्द माझे
क्रांती आणतील काय??

.....जगणं माझं ओघानेच
दुधावरची साय
......हाडा-मांसाचा गोळा फक्त
माझ्यात वेगळे काय..??



....रसप....
३० डिसेंबर २००८

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...