सीमाभागापासून शेकडो मैलांवर राहणारे आणि स्वातंत्र्यानंतरच्या अनेक दशकांत श्वास घेणारे आपण, ह्या स्वातंत्र्याची किंमत काही लोकांसाठी किती भयंकर होती, हे समजू शकत नाही.
गुलजार साहेबांच्या 'माचीस'मध्ये (बहुतेक) एक संवाद आहे. ज्यात (पुन्हा बहुतेक) ओम पुरी म्हणतो की, "लहानपणी शाळेत एक प्रश विचारला गेला की 'स्वातंत्र्य कसं मिळालं ?' कुणी म्हणालं, अहिंसेने. कुणी म्हणालं, गांधींजींमुळे. मी म्हटलं, 'खूनखराबेसे.. खूनखराबेसे मिली आजादी !'"
फाळणीमुळे देशोधडीला लागलेल्या असंख्य कुटुंबांची हीच व्यथा आहे. त्यांची कहाणी आपल्याकडे अनेक सिनेमांत आली. हिटलर आणि त्याच्या 'हॉलोकास्ट'वर आधारलेले जितके प्रभावी परदेशी सिनेमे झाले, तितके 'फाळणी'वरचे आपल्याकडे नाही झाले. बहुतेक वेळी 'फाळणी' हे एक जोडकथानकच राहिलं. जोडकथानक असलं, तरी हरकत नाही. पण त्याचा प्रभाव म्हणावा तसा पडला नाही. खरं तर 'फाळणी' ही एक प्रचंड मोठी आणि हादरवून सोडणारी घडामोड होती, जी आपल्या इतिहासाने 'जस्ट अनदर थिंग' करून ठेवलीय. किंबहुना, स्वातंत्र्याच्या अतिरंजित आनंदसोहळ्यासमोर हे एक रक्तरंजित वास्तव सर्वशक्तिमान देवाच्या मंदिराच्या पायरीवर बसलेल्या एखाद्या महत्पीडीत व्यक्तीसारखं राहिलं आहे, जिच्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं केलं जातं किंवा अगदीच कुणी हळहळलं, तर चिल्लर किंवा तत्सम काही तरी देऊन लाचार माणुसकीची फसवणूक केली जाते. आपल्या सिनेमानेही ह्यापासून सुरक्षित अंतरच राखलं आहे. जेव्हा जेव्हा 'फाळणी'चा विषय सिनेमात आला, तेव्हा तेव्हा तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याने इतिहासावरची पुटं झटकणे किंवा चेहऱ्यांवरचे मुखवटे फाडण्याचा प्रयत्न न करता व्यावसायिक गणितांना सोडवून बचावात्मक पवित्राच घेतला आहे, हातचं राखूनच ठेवलं आहे
'बेगम जान'च्या कथानकाचा प्राणही 'फाळणी'तच आहे, पण पूर्वसुरींच्या पाउलावर पाउल टाकत, हाही सिनेमा त्याकडे गांभीर्याने लक्ष न देता, बाकीच्या फापटपसाऱ्यातच अधिक रमतो.
स्वातंत्र्याचं वारं वाहत असताना पंजाब भागातील सुजाण सामान्य जनतेत एक प्रकारची असुरक्षितता वाढत चालली आहे. मुस्लीम लीगला पाकिस्तान आणि काँग्रेसला हिंदुस्थान दिला जाणार, देशाची फाळणी होणार, ह्याचे संकेत मिळत आहेत. हिंदू-मुसलमान दंगेही देशाच्या विविध भागांत सुरु झाले आहेत. पण कुठे तरी एक आशा सर्वांच्या मनात आहे की आपले राष्ट्रीय नेतृत्व असं काही होऊ देणार नाहीच. ह्यावर तोडगा निघेल. दुर्दैवाने, तसं काही होत नाही आणि 'रॅडक्लिफ लाईन' आखून देशाची फाळणी होते. लोकांच्या भूतकाळ आणि भविष्याच्या मधून एक रेष काढली जाते. त्या रेषेला 'वर्तमानकाळ' म्हटलं जातं आणि उभ्या आयुष्याचा तोल त्या रेषेवर साधता साधता कित्येक लोक बरबाद होतात.
वाटले आयुष्य होते रुंद रस्त्यासारखे
आज कळले चालणे आहे जणू धाग्यावरी
अशी काहीशी त्यांची स्थिती होते.
ही 'रॅडक्लिफ लाईन' गावांना छेदते, जिल्ह्यांना विभागते, माणसांना तोडते आणि घरांना तुडवतेसुद्धा. 'बेगम जान' (विद्या बालन) चा कोठा 'रॅडक्लिफ लाईन'च्या वाटेत येतो. कोठयाच्या मधूनच ही सीमारेषा जाणार असते. तिथे बॉर्डर चेक पोस्ट बनवायचा प्लान असतो. इथल्या आसपासच्या भागात 'रॅडक्लिफ लाईन' नुसार विभाजन करण्याची, सीमारेषा आखण्याची जबाबदारी सोपवली जाते होऊ घातलेल्या दोन देशांच्या दोन अधिकाऱ्यांवर. भारताकडून हर्षवर्धन श्रीवास्तव (आशिष विद्यार्थी) आणि पाकिस्तानसाठी इल्यास खान (रजत कपूर). बेगम जान, तिच्याकडच्या मुली व कोठ्यात राहणारी इतर मंडळी विरुद्ध हर्षवर्धन, इल्यास व संपूर्ण व्यवस्था असा हा संघर्ष आहे. बंगाली सिनेमा 'राजकहिनी' चा रिमेक असलेला 'बेगम जान' हा संघर्ष पोहोचवण्यात खूपच कमी पडतो. किंबहुना, हा संघर्ष दाखवण्यापेक्षा वेश्या, त्यांचा व्यवसाय, त्यांचं भावविश्व आणि त्या अनुषंगाने येणारी काही 'वरिष्ठ प्रमाणपत्र' पात्र दृश्यं दाखवण्यातच जास्त धन्यता मानली जाते. उदाहरणार्थ - कोठ्यातली एक वेश्या आणि तिचाच दलाल ह्यांच्यात प्रेमप्रकरण आणि त्यांच्यातल्या संवादावेळी तिने त्याचा हात स्वत:च्या छातीवर ठेवून 'यह क्या हैं', दोन पायांच्या मध्ये ठेवून 'यह क्या हैं' वगैरे म्हणण्याचे, कथानकाशी काही एक संबंध नसलेले प्रसंग केवळ 'आता बघा हं, आम्ही कसं धाडसी चित्रण करतो' हा पवित्रा दाखवणारे आहेत.
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे संस्थानांचे खालसा होणे, हीसुद्धा एक महत्वाची घडामोड नीट हाताळता आलेली नाही. जोड-जोडकथानक म्हणूनच ही घडामोड हृषीकेश मुखर्जींच्या 'सत्यकाम'मध्ये आली आहे. त्यात थोड्याश्याच वेळात ते अतिशय प्रभावीपणे दाखवलं आहे. इथे पुन्हा एकदा सिनेमा खूप कमी पडला आहे. एकूणच एका अतिशय वजनदार कथानकाला ढिसाळ, पसरट आणि दिशाहीन पटकथेमुळे विस्कळीत करून त्याचं सगळं वजन वाया घालवलं आहे.
वर म्हटल्यासारखाच एक पवित्रा सर्व स्त्री कलाकारांच्या अभिनयातही जाणवतो. बिनधास्तपणा आणि उच्छृंखलपणा दाखवला की कोठ्यावरची बाई, वेश्या व्यवस्थित पोहोचेल असा काहीसा समज असावा. सगळ्यांचंच मोठमोठ्याने बोलणं आणि भडक भावदर्शन सगळ्याच नाट्याला खूप वरवरचं करून ठेवतं. सिनेमा जरी बंगाली सिनेमाचा त्याच लेखक-दिग्दर्शकाने केलेला हिंदी रिमेक असला, तरी कथानकामुळे मंडी,
उमराव जान अश्या काही सिनेमांची आठवण येत राहते. छाप वगैरे काही जाणवत नाही. ती जाणवायला हवी होती. १९४७ सालचा कुंटणखाना आणि २०१७ सालचा कुंटणखाना ह्यातला फरक समजून घ्यायला हवा होता. तो कुठल्याही स्त्री कलाकाराने समजून घेतल्यासारखं अजिबात वाटत नाही.
'विद्या बालन' माझी आजच्या काळातली सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे. कुठल्याच भूमिकेत 'ती अभिनय करते आहे', असं कधी जाणवलं नाही. इथे मात्र 'आता मी तुम्हाला कोठेवाली सादर करून दाखवते' असं आव्हान स्वीकारूनच ती कॅमेऱ्यासमोर गेली आहे. तिने साकारलेल्या 'बेगम जान'बद्दल कदाचित तिच्यावर खूप स्तुतीसुमनं उधळली जातील, तिला पुरस्कारही मिळतील. 'काही तरी वेगळं केलं', हे आणि इतकंच आजकाल स्तुतीपर होण्यासाठी पुरेसं असतं. तिच्या जोडीने अजूनही कुणाला शाबासक्या मिळतील. पण विद्याचा एक चाहता म्हणून माझी तरी सपशेल निराशा झाली. सिनेमाचं कथानक आधीपासूनच माहित होतं आणि रिमेक असल्यामुळे मूळ सिनेमातल्या उणीवा भरून काढल्या जाऊन एक जबरदस्त सिनेमा आणि जबरदस्त परफॉर्मन्सेस पाहायला मिळतील, अशी जवळजवळ खात्रीच घेऊन मी कदाचित सिनेमा पाहिला असेल म्हणूनच हा अपेक्षाभंग झाला असेल.
सर्व स्त्री कलाकारांच्या अति-अभिनयासमोर चार पुरुष कलाकारांचे अभिनय मात्र भाव खाऊन जातात. (एका स्त्रीवादी सिनेमाची अशीही एक शोकांतिका असू शकते !)
आशिष विद्यार्थी आणि रजत कपूरचे सगळेच प्रसंग जुगलबंदीचेच झाले आहेत. त्यांच्या संवादांच्या वेळी त्यांचे अर्धेच चेहरे दाखवले जाणे, हे जरा वेगळ्या प्रकारचं पण सूचक कॅमेरावर्कही आवडलं. एका प्रसंगात तंबूत बसून एकमेकांशी ते बोलत असताना कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दोघांच्या मधून तंबूचा खांब येतो. तो खांब त्याच्या पार्श्वभूमीवर असलेल्या बेगम जानच्या कोठ्यालाही दोन भागात विभागत असतो, हेही उत्कृष्ट कॅमेरावर्क नजर टिपते. पण ह्या सगळ्यावर दोघांचा अभिनय मात करून उरतो. सूचक, अर्थपूर्ण संवाद आणि त्यांची जबरदस्त फेक. ह्या दोन्ही अनुभवी आणि ताकदवान अभिनेत्यांनी आपापल्या शैलीत आपापल्या व्यक्तिरेखा समर्थपणे साकारल्या आहेत.
चंकी पांडेला बहुतेक तरी प्रथमच एक पूर्णपणे नकारात्मक आणि वेगळी भूमिका मिळाली आहे. हा गुणी अभिनेता क्रूरकर्मा 'कबीर' साकारताना कुठेही कमी पडत नाही. दमदार अभिनय करणारा चौथा पुरुष कलाकार म्हणजे राजेश शर्मा. पोलीस ऑफिसर शाम ह्या व्यक्तिरेखेला फार काही वाव नाहीय, पण जे १-२ आव्हानात्मक प्रसंग त्याच्या वाट्याला आले आहेत, त्यांचं त्याने चीज केलं आहे.
विवेक मुश्रन आणि नसीरुद्दीन शाहसुद्धा आपापली कामं व्यवस्थित करतात. त्यांच्याबाबत आवर्जून सांगावं असं काही नाही.
आवर्जून बोलायला हवं अशी एक गोष्ट आहे, जी आजकाल क्वचितच लाभते किंवा कधी लाभतच नाही, असंही म्हणता येईल.
'संगीत' !
'अनु मलिक' नी दिलेली गाणी खूप गोड चालीची आहेत. कौसर मुनीर ह्यांचे शब्दही अर्थपूर्ण आहेत.
आह निकली हैं यहाँ, आह निकली हैं वहाँ
वाह री वाह यह आज़ादियाँ
गाणं ऐकताना खूप व्याकुळ करतं. खासकरून कोरसमध्ये गायलं जाणारं 'आज़ादियाँ' अंगावर येणारं आहे. तसंच अंगावर येतं 'ओ रे कहारों'. आसामी लोकगीतगायिका कल्पना पटोवारीच्या पहाडी आवाजातले -
झुमके झूमर नाक की कीलें, एक एक करके उतरेंगे गहने
देती हूँ तुझको जो नज़रें चुराके, चुनरी दुआओं की ये रखना तू पहने
सो जा, सो जा गुडिया सो जा
अंखियों से तू ओझल हो जा
ओ रे कहारों डोली उठाओ, पल भर भी ठहरो अब नहीं
ना है बलाएं ना है दुआएं, देने को है अब कुछ नहीं
- हे शब्द हेलावून टाकतात. गाण्याचं चित्रण आणि त्याची जागाही जबरदस्त आहे. हे गाणं सिनेमाचा एक जमून आलेला भाग आहे.
अरिजित सिंगचा आवाज आता अजीर्ण होत चालला असला, तरी त्याच्या आवाजातलं 'मुर्शिदा' गाणं दमदार आहे. इथे जरा मलिक साहेबांचा १९४७ शी संबंध तुटून ते २०१७ त आल्यासारखे वाटतात. कदाचित ते अरिजितच्या आवाजामुळेही असेल, दुसरा एखादा आवाज वापरून पाहायला हवा होता. पण इथेही -
सूखे फूल हैं हाथों में प्यार का मौसम चाहा था
उसने ज़ख्म दिए हमको जिस से मरहम चाहा था
अबके ओस की बूंदों ने दिल में आग लगायी है
दिल पे किसने दस्तक दी, तुम हो या तन्हाई है
- असे अर्थपूर्ण शब्द लक्षात राहता.
'प्रेम मी तोहरे..' तर ह्या अल्बमचा 'युएसपी'च ठरेल. 'वैष्णव जन तो तेने कहिये जे..', 'मी मज हरपून..' ची आणि इतर काही भजनांची ट्रेडिशनल चाल अशीच आहे. पण खूप आवडलंय हे कम्पोजिशन. 'सोलफुल' आहे. बऱ्याच काळानंतर असं गाणं आलंय, जे सिनेमा पाहून बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवशीही मनात वाजत राहिलं. ह्या गाण्याचं एक वर्जन आशा भोसलेंनी आणि एक कविता सेठनी गायलं आहे. आशाबाईंचा आवाज थकलेला वाटतो तर कविता सेठचा आवाज भसाडा. मला स्वत:ला तरी थकलेल्या आवाजातलं असलं, तरी आशाबाईंचंच जास्त भावपूर्ण वाटलंय.
आता है छुप के तू मेरे दर पर घायल दिल और धड़कन बंजर
हल्दी मली जो घाव पे तोहरे हर ज़ख्म मेरा हरा हो गया
ये क्या हो गया
प्रेम में तोहरे ऐसी पड़ी मैं
पुराना ज़माना नया हो गया
ये क्या हो गया..
हे ज्या नजाकतीने त्यांनी गायलं आहे, त्याला तोडच नाहीय.
'आज़ादियाँ' गाण्यात पुन्हा पुन्हा येणारी 'हिंद पे था नाज जिनको वो हैं कहां..' ही ओळ आणि 'वह सुबह हमीं से आयेगी' हे 'फिर सुबह होगी' मधलं 'खय्याम' साहेबांनी संगीतबद्ध केलेलं गीत, ह्या सिनेमाने साहीर लुधियानवींना दिलेल्या मानवंदना आहेत. ही कल्पनासुद्धा खूप आवडली.
लेख बराच लांबला आहे. पण सगळ्यात शेवटी सांगायचं झाल्यास, एक सिनेमा म्हणून 'बेगम जान' खूपच बेजान झाला असला, तरी संवाद (राहत इंदौरी), गीतं (कौसर मुनीर) आणि संगीत (अनु मलिक) हे सिनेमाचे तीन आधारस्तंभ आहेत. ज्यांच्या जोरावर तो स्थिरपणे उभा तरी राहू शकतो आहे. ह्या संगीताला ह्या वर्षी काही महत्वाचे पुरस्कार नक्कीच मिळतील, असंही वाटतंय.
रेटिंग - * * *
- रणजित पराडकर