Saturday, July 29, 2017

कंटाळवाणी फसवणूक - इंदू सरकार (Movie Review - Indu Sarkar)

नुकताच 'डंकर्क' बघितला. दुसरे महायुद्ध आणि त्याच्याशी संबंधित पात्रं व घटना ह्यांच्यावर आधारित कित्येक परदेशी सिनेमे बनत असतात. अगदी कृष्ण-धवल कालापासून ते आत्ताच्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाच्या काळापर्यंत ह्या एका विषयाने अनेक लोकांना प्रेरित केलं आहे. राहून राहून मला नेहमी वाटायचं की फाळणी, १९७५ साली लादली गेलेली आणीबाणी, ईशान्येकडील राज्यांचे प्रश्न, भारताचं श्रीलंकेमधलं ऑपरेशन पवन, चीन आणि पाकिस्तानसोबत झालेली अनेक युद्धं व कित्येक लहान-मोठ्या मोहिमा, इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींची हत्या, बाबरी मशीद, गोधरा वगैरे महत्वाच्या शेकडो स्वातंत्र्योत्तर घटनांना हिंदी सिनेमा कधी सशक्त परिपक्वतेने हाताळणार ? ह्या अनेक घटनांपैकी काहींना हात घालायचे काही बरे-वाईट प्रयत्न झाले आहेत. पण पुरेसं नाहीच. त्यातही १९७५ साली लादलेली आणीबाणी तर एक प्रकारचा 'टॅबू' च !
त्यामुळे 'इंदू सरकार' विषयी ऐकल्याबरोबर उत्सुकता वाटत होती. आणीबाणीविषयीचा सिनेमा फक्त आजच्या काळातच बनू शकतो. उद्या सरकार बदललं, तर हा विषय पुन्हा एकदा दाबून ठेवला जाणार. त्यामुळे सिनेमाचं उत्तम टायमिंगसुद्धा दाद घेऊन गेलं.

पण बहुतेक अपेक्षांच्या फुग्यात आपण जितका जीव फुंकावा तेव्हढा त्याचा धमाका मोठा होत असावा !
एका स्फोटक, जोरदार, वेगवान, थरारक आणि हादरवणाऱ्या सिनेमाच्या अपेक्षेने मी गेलो आणि एक मिळमिळीत, रटाळ, विस्कळीत, मरतुकडा आणि कंटाळवणारा सिनेमा पाहून आलो.

सगळ्यात मोठा आणि घोर अपेक्षाभंग म्हणजे 'इंदू सरकार' ह्या नावाशी इंदिरा गांधींचा काही एक संबंध नाही ! 'सरकार' हे त्या व्यक्तिरेखेचं आडनाव आहे, त्याचा अर्थ 'गव्हर्न्मेंट, शासन' वगैरे नाही. अर्थात, हे मला आधीच समजलेलं होतं. तरी, कुठे तरी काही तरी रिलेट होईल असं वाटलं होतं. इंदिरा गांधींनी लादलेली आणीबाणी आणि त्याचे परिणाम भोगणारे काही लोक, अशी ही कहाणी आहेच. तेव्हढा सूचक संबंध आहे. पण 'इंदिरा गांधी' ही व्यक्तिरेखा (सुप्रिया विनोद) केवळ काही सेकंदांपुरती पडद्यावर झळकते, त्यातही एक शब्दही बोलत नाही. फक्त दिसते. त्याव्यतिरिक्त संपूर्ण सिनेमात १-२ वेळा संजय गांधींचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 'चीफ'च्या (नील नितीन मुकेश) 'मम्मी' म्हणून उल्लेख होतो. बस्स् !

ही कहाणी मुख्यत्वेकरून आहे 'इंदू सरकार' (कीर्ती कुल्हारी) ची. इंदू एका अनाथालयात वाढलेली असते. एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी 'नवीन सरकार' (तोता रॉय चौधरी) तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. आणीबाणीच्या काळात एक उच्चपदस्थ अधिकारी म्हणून 'नवीन'ची जबाबदारीतून आलेली निष्ठा आणि इंदूला अनुभवातून झालेली माणुसकीची जाणीव ह्यांचा संघर्ष आणि मग त्यांचा स्वतंत्रपणे विरुद्ध मार्गांवर प्रवास हा ह्या कथानकाचा गाभा.



आणीबाणीच्या काळात विविध कारवायांच्या वरवंट्याखाली भरडल्या गेलेल्या जनतेचे हाल अत्यंत फिल्मी उथळपणे दाखवले आहेत, हा अजून एक अपेक्षाभंग. व्यथित मनांचा आणि शोषित जनांचा आकांत दाखवताना 'आक्रोश' दाखवणं आवश्यक नसतं, हे आपण का समजू शकत नाही कुणास ठाऊक ! आरडाओरडा, पळापळ, गोंधळ, कल्लोळ वगैरे अंदाधुंदी दाखवली म्हणजे ते अंगावर येतच असतं असं नक्कीच नाही. योग्य सूर वाजण्यासाठी योग्य तार छेडली जायला हवी. त्यासाठी संयम आणि ठहराव हवा, तो कधी अंगी बाणणार आहे ? पोलीस कमिशनर मिश्रा (झाकीर हुसेन) प्रसंगी भडक आणि प्रसंगी फिल्मी का असायला हवा होता ? त्याचं निर्दयीपण फक्त त्याच्या कृतींतून दिसलं असतंच की !

'चार आने की मुर्गी को बारा आने का मसाला' हे सूत्रही आपण कधी टाळणार आहोत ? आणीबाणीच्या काळातला एका स्त्रीचा संघर्ष दाखवण्यासाठी ती अनाथ असणं, तिने तोतरं असणं का आवश्यक आहे ? तिचा तोतरेपणा तर एक सपशेल मूर्खपणे जोडलेलं अनावश्यक ठिगळच आहे. ह्या असल्या फालतू पसाऱ्यामुळे मुख्य विषयापासून भरकटायला तर होतंच आणि अनावश्यक लांबी वाढते ते वेगळंच ! जेव्हा इंदू कोर्टात सरकारी वकिलाला 'जनता भी 'इनफ' कह रही हैं' असं म्हणते, तेव्हा आपणही मधुर भांडारकरला मनातल्या मनात 'इनफ' म्हणतो.

'फॅशन' नंतर आलेल्या एकेका फिल्मनिशी मधुर भांडारकरचा आलेख उतरत चालला आहे. रामू आणि भांडारकर ह्यांच्यातला हा एक दुर्दैवी समान दुवा आहे. एखाद्या दमदार विषयावर सिनेमा बनवून तो विषय वाया घालवण्याचं कर्तृत्व गेल्या काही महिन्यांत बेगम जान, मोहेंजोदडो, सरबजीत, मेरी कोम अश्या काही सिनेमांनी गाजवलं होतं. 'इंदू सरकार' ह्या सगळ्यांचा शिरोमणी आहे. उल्लेखलेले सर्व सिनेमे 'सुसह्य' ते 'चांगला' ह्या पट्ट्यात होते. 'इंदू सरकार' मात्र ह्या पट्ट्याच्या बाहेर नकारात्मक बाजूला असावा.
निर्बुद्ध पटकथा आणि दिग्दर्शकाची पकडही बऱ्यापैकी ढिली पडलेली असतानाही प्रमुख कलाकारांची कामं मात्र चांगली झाली आहेत, हा एक दिलासा ! कीर्ती कुल्हारीने 'पिंक'मध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. 'इंदू'च्या व्यक्तिरेखेचं अडखळत बोलणं अनावश्यक असल्यामुळे कंटाळा जरी आणत असलं, तरी कीर्तीचा प्रयत्न कुठेच कमी पडलेला नाही. तोता रॉय चौधरीसुद्धा छाप सोडतो. एक रुथलेस सरकारी प्रशासक आणि कधी समंजस तर कधी वर्चस्व गाजवणारा पती, असे त्याच्या व्यक्तिरेखेचे कोन आहेत, जे त्याने उत्तम प्रकारे सादर केले. अनुपम खेर, शिबा चढ्ढा, अंकुर विकल सहाय्यक भूमिका चोखपणे करतात.
'नील नितीन मुकेश' मात्र जबरदस्त प्रभाव सोडतो. त्याचा गेटअपही उत्तम जमून आला आहे. लेखकाचं बॅकिंग न मिळाल्यामुळे त्याचा 'चीफ' हा अक्षरश: वाया गेला आहे. सिनेमातील एकमेव दृश्य नकारात्मकता म्हणजे 'चीफ' आहे. तो पुरेसा व्यक्त न झाल्यामुळे सिनेमातला संघर्ष पुरेसा वाटत नाही.

हे वर्ष अनु मलिकसाठी नक्कीच चांगलं ठरत आहे.
गाण्यांना फारसा वाव नसला, तरी 'यह पल..' आणि 'यह आवाज हैं..' ही गाणी खूप सुंदर जमली आहेत. 'यह आवाज हैं..' त्याच्या ओळखीच्या चालीमुळे मनात रुंजी घालत राहतं. ज्यांनी अजीझ नाझानच्या ओरिजिनल 'चढता सूरज..' पारायणं केलीयत, त्यांना मात्र त्याचं नावं वर्जन अंमळ सपकच वाटेल. तरी, एकंदरीत संगीत आणि पार्श्वसंगीतही एक दिलास्याचाच भाग आहे.

सरतेशेवटी एक शे'र आठवतो आहे.

किस से उम्मीद करें कोई इलाज-ए-दिल की
चारागर भी तो बहुत दर्द का मारा निकला
-  लुत्फ़-उर-रहमान

मधुर भांडारकर, अगदी गेल्या काही सिनेमांतल्या सुमारपणानंतरही, एक दमदार नाव आहे आजच्या जमान्यातलं. पण त्याच्या सिनेमांमुळे पुन्हा पुन्हा होणाऱ्या अपेक्षाभंगानंतर आव्हानात्मक किंवा 'टॅबू' बनलेले विषय आपल्याकडे हाताळणार कोण ? असा प्रश्नच पडतो आहे.

रेटिंग - * *

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...