आजचं जग, आजचा काळ खूप वेगवान आहे. इंटरनेटमुळे माध्यमं सहज उपलब्ध आहेत. व्यक्त होणंही अतिशय सोपं झालेलं आहे. आज खूप सहजपणे आपणच आपली एखादी विचारधारा ठरवून मोकळे होतो. 'मी अमुक-एक-वादी आहे', असं फार लौकर मानतच नाही, तर तसा काळात नकळत प्रचारही करत सुटतो. पण कुठल्याही प्रकारचा 'वाद', म्हणजेच तत्वज्ञान, विचारपद्धती स्वीकारणं, अंगिकारणं म्हणजे 'पूर्ण सत्या'चा पुरस्कार, अंगिकार करण्यासारखं असतं. मात्र आपण मात्र नेहमीच सोयीस्कर सत्य स्वीकारत असतो. कारण पूर्ण सत्य हे 'अॅब्सोल्यूट अल्कोहोल'सारखं असतं. पचवायला कठीण किंवा अशक्य तर सोडाच, गिळायलाच असह्य. कुठलाही 'इझम'ही असाच. मग तो जात, धर्म, भाषा, प्रांत विषयक असो की लिंगविषयक. जितकं आपल्याला सोयीचं असतं, तितकंच आपण पाळत असतो. जर एखाद्याने फक्त पूर्ण सत्यच स्वीकारायचं ठरवलं, तर ते किती कठीण आहे, हे लक्षात येण्यासाठी 'सत्यकाम' पाहावा.
१९६९ साली आलेला 'सत्यकाम' म्हणजे हृषीकेश मुखर्जींचा एक मास्टरपीस. हा सिनेमा 'सत्यप्रिय आचार्य' (धर्मेंद्र) ह्या तरुण इंजिनियरची कहाणी सांगतो. स्वातंत्र्याचे पडघम वाजत असतानाच्या दिवसांत शिक्षण संपवून बाहेर पडलेल्या, एका नवीन देशाला घडवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी खांद्यावर असलेल्या पिढीचा 'सत्यप्रिय', त्याच्या पिढीच्या इतर मुलांसारखा कधीच नसतो. त्याचं पालनपोषण त्याच्या आजोबांनी - सत्यशरण आचार्य (अशोक कुमार) ह्यांनी - केलेलं असतं. लहानपणापासून त्याला नावाप्रमाणेच 'सत्यप्रिय' घडवलेलं असतं. हे संपूर्ण घराणंच सत्यशोधाच्या कार्यास वाहिलेलं असतं, म्हणूनच त्यांच्यापैकी सर्वांची नावं 'सत्य' पासूनच सुरु होत असतात. इंजिनियर झालेल्या 'सत्यप्रिय'ला त्याची पहिली नोकरी मुंबईच्या एका कंपनीत मिळते आणि पहिल्याच दिवशी त्याला कामानिमित्त 'भवानीगढ'ला पाठवण्यात येतं. 'भवानीगढ' हे भारतातल्या शेकडो संस्थानांपैकी एक. स्वतंत्र भारताच्या नवोदयाच्या वेळी संस्थानं खालसा होऊन अस्त पावत होती. अश्या एका नाजूक काळात, एका संशयास्पद मोहिमेसाठी 'भवानीगढ'ला आलेला सत्यप्रिय तिथल्या राजाच्या शोषणातून 'रंजना' (शर्मिला टागोर) ला मुक्त करून सोबत घेऊन येतो. एका वेश्येची मुलगी, जिला राजापासून एक मूलही होणार असतं, तिला तो स्वीकारतो. आपल्या घरी ह्याचा स्वीकार होणार नाही, हे माहित असतानाही तो काहीही लपवत नाही आणि घराशी संबंधही तुटतात.
इथून पुढे सुरु होतो एका संघर्षमय आयुष्याचा अविश्रांत प्रवास. ह्या प्रवासात 'सत्यप्रिय'सोबत त्याची पत्नी आणि मुलाचीही परवड होते. हे सगळं कथानक आपण 'नरेन शर्मा' (संजीव कुमार) ह्या 'सत्यप्रिय'च्या जिवलग मित्राकडूनच ऐकत असतो. एकाच वेळी इंजिनियर झालेले हे दोघे मित्र आपापल्या 'जुळवून घेण्या/ न घेण्याच्या' क्षमते व इच्छेमुळे अर्थातच परस्परविरुद्ध आयुष्य जगत असतात. 'सत्यप्रिय'ची स्वत:च्या तत्वनिष्ठतेपायी होणारी फरफट नरेन पाहत असतो, जाणत असतो. पण कुठल्याही परिस्थितीत स्वत:च्या सत्यनिष्ठतेशी आणि तत्वनिष्ठतेशी जराशीसुद्धा तडजोड न करू शकणारा सत्यप्रिय आपला हट्ट सोडणाऱ्यांतलाही नसतो.
सततच्या संघर्ष, अस्थैर्य आणि ताणतणावामुळे 'सत्यप्रिय'ची आर्थिक आणि शारीरिक अवस्था दिवसेंदिवस बिकट होत जाते.
त्याचा हा संघर्ष, त्याची तत्वनिष्ठता त्याला कुठेपर्यंत नेतात ? ह्या सगळ्या त्याच्या प्रवासात त्याची पत्नी आणि मुलाची भूमिका कशी असते ? त्याचे आजोबा आणि मित्र नरेन त्याला कशी साथ देतात ? ठिकठिकाणच्या नोकऱ्या करताना त्याने नाराज केलेले अनेक लोक कोण असतात ? नरेनशिवाय कुणीच त्याला समजून घेत नाही का ? अशी अनेक उत्तरं इथे देता येऊ शकतील. ती देण्या किंवा न देण्यामागे काही कारणही नाही. पण सिनेमाची शिकवण ह्या सगळ्यापेक्षा वेगळी आहे.
'सच्चाई एक अंगारे की तरह हैं, जिसे हाथ पर रखो और हाथ न जले ऐसा नहीं हो सकता' हे म्हणणारा 'सत्यप्रिय' हेच सांगत असतो की, सत्य नग्न, उष्ण, धारदार वगैरे असतं. त्यावर घट्ट पकड ठेवण्यासाठी प्रचंड वेदना, यातना सहन कराव्या लागतात.
'नारायण सन्याल' ह्यांचं हे कथानक आहे, तर 'साजेन्द्र सिंग बेदी' ह्यांचे संवाद. खूप सहजपणे खूप मोठं तत्वज्ञान हे दोघे आपल्यासमोर मांडतात. ह्यातले संवाद टाळ्या घेणारे नाहीत, दाद घेणारे आहेत. ही कहाणी बॉक्स ऑफिसवर गल्ला भरणारीही नाही, पण डोळे भरून आणणारी आहे. हृषिदांच्या सिनेमांची ही एक खासियतही आहेच की कळसाध्याय गाठताना काळीज पिळवटलं जातं. 'आनंद' असो वा 'बावर्ची', शेवटी रडवतोच. 'सत्यकाम' त्याला अपवाद नाहीच. स्वत: हृषिदांचा आवडता असलेला हा सिनेमा धर्मेंद्रकडून त्याच्या आयुष्यातलं सर्वोत्कृष्ट काम करवून घेतो. 'धर्मेंद्रला अभिनय येत नाही' अश्या सर्वमान्य समजाला स्वत: धर्मेंद्र ह्या सिनेमात उभा छेद देतो. 'शर्मिला टागोर' व्यावसायिक पातळीवर जरी खूप नावाजली असली, तरी एक अभिनेत्री म्हणून माझ्या मते जरा दुर्लक्षित राहिली आहे. अनेक सिनेमांतून तिने स्वत:ची कुवत दाखवून दिली आहे. 'रंजना'ची ओढाताण, घुसमट तिने जबरदस्त सादर केली आहे. 'संजीव कुमार' तर सर्वोत्कृष्ट भारतीय अभिनेत्यांपैकी एक असावा. सहाय्यक असला, तरी छाप सोडतोच. अशोक कुमारची दाढी आणि केस अंमळ विनोदी वाटत असले, तरी he carries them with grace. शेवटच्या एका प्रसंगात हा माणूस स्वत:ची महानता सिद्ध करतो.
लक्ष्मी-प्यारेंचं संगीत आणि पार्श्वसंगीत अर्थातच सुमधुर आहे. गाणी फारशी गाजली नाहीत, सिनेमाही व्यावसायिक पातळीवर अपयशीच होता.
सुरुवातीचा बराचसा भाग जरा अनावश्यक आणि रेंगाळलेला आहे. पण त्या काळातल्या सिनेमांचा विचार करता ते साहजिकही आहेच. 'बिमल रॉय' स्कूलमधून हृषिदा पुढे आले आहेत. स्वत: बिमलदांचे मास्टरपीसही धीमे आणि पसरट होतेच. मात्र हा अनावश्यक व रेंगाळलेला भागही अगदीच निरर्थकही नाहीय.
'सत्यकाम' एक असा सिनेमा आहे, जो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहायलाच हवा. दुनियेत फक्त चांगलं आणि वाईट अश्या दोनच गोष्टी नसतात. आयुष्य हे काही कुठलं नाणं नाहीय ज्याचा एक तर छापाच पडेल किंवा काटाच. त्याला अनेक बाजू आहेत पैलू आहेत. काळा आणि पांढरा ह्या दोघांच्या दरम्यान अगणित रंगछटा असतात. पूर्ण सत्य, सत्य, सोयीस्कर सत्य, सोयीस्कर खोटं, खोटं आणि पूर्ण खोटं अश्याही अनेक पायऱ्या असू शकतात. आपण ह्यांपैकी कुठल्या पायरीवर आहोत, आपला रंग कोणता आहे हे एखादा सिनेमा चुटकीसरशी आपल्याला जाणवून देणार नाहीच. मात्र त्याचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त करायला असा एखादा सिनेमा निमित्त ठरू शकतो.
सत्यास शोधले होते, सत्यास मांडलेसुद्धा
पण सत्य नग्न असते हे आवडणे बाकी आहे
- रणजित पराडकर
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!