Friday, November 18, 2016

थरार (वजा) तर्क (बरोबर) फोर्स-२ (Movie Review - Force -2)

'तो येतो, एकेकाला बदडतो किंवा ठोकतो आणि जिंकतो', हे एकमेव सूत्र 'फोर्स-२' पहिल्यापासून शेवटपर्यंत पाळतो. मग तो त्याच्या एन्ट्रीचा टिपिकल फिल्मी प्रसंग असो की सिनेमाच्या शेवटची एक नॉन-फिल्मी नोट असो. अर्थात तो हे सगळं करू शकतो, ह्याविषयी बघणाऱ्याला तिळमात्र शंका वाटत नाही. घायल, घातक वगैरे राजकुमार संतोषीच्या सिनेमांत सनी देओल जेव्हा एका हाताने ६-७ आणि दुसऱ्या हाताने ६-७ लोकांना एकटाच झुलवताना दिसतो, तेव्हाही ते आपल्याला पटतं. कारण त्याचा आवेश आणि आवाज ! इथे हे सगळं एरव्ही अशक्यप्राय वाटणारं पटतं कारण जॉन अब्राहमची एकंदरच पर्सनालिटी. त्याचे टरटरलेले स्नायू कुठल्याही कपड्यात मावत नाहीत. जे काही दणकट शरीर त्याने कमावलं आहे, ते अगदी 'नैनं छिन्दन्ति शस्त्राणि..' च वाटतं ! असं घट्ट, बळकट शरीर कमवूनही त्याची हालचाल आखडलेली नसते. त्याचं चालणं, धावणं, उठणं, बसणं सगळं काही गतिमान आहे, हे विशेष. त्याच्या अभिनयाला असलेल्या मर्यादांवर त्याने आपल्या 'अंग'मेहनतीच्या जोरावर मात केली आहे, हे मान्य करावं लागेल.

'फोर्स-१' मध्ये भारतीय माफियाविरुद्धचा संघर्ष दाखवला होता. इथे एसीपी यशवर्धन (जॉन) आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. 'रॉ'च्या चीनमधील एजंट्सना एक-एक करून मारलं जात आहे. यशचा जिगरी मित्र ह्या षडयंत्राचा एक बळी ठरतो. मरण्यापूर्वी तो यशला ह्या सगळ्या षडयंत्राबद्दल कळवतो आणि एक स्पेशल केस म्हणून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 'रॉ'तर्फे यशला बुडापेस्टला पाठवण्यात येतं. मात्र हे ऑपरेशन लीड करण्यासाठी रॉ एजंट केके (सोनाक्षी सिन्हा) ला सोबत पाठवलं जातं. दोघं अर्थातच केस सोडवतात. तोपर्यंत अजून काही नुकसान होतं, पण पुढचं बरंचसं नुकसान वाचतं.



हा सगळा प्लॉट मुळातच खूप थरारक आहे आणि पडद्यावरही हा थरार बऱ्यापैकी उतरला आहे. मात्र काही गोष्टी खटकत राहतातच.
'अतिशय बालिश संवाद', ही पहिली बाब. 'रॉ'च्या एजंट्सना ठार करण्याचं कारस्थान केलं जात आहे, हे जेव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजतं, तेव्हा ते एक बैठक बोलावतात. ह्या बैठकीत 'यह हमारे रॉ को कमजोर करने की साजीश हैं' वगैरे अगदीच बेसिक लेव्हलचे बाष्कळ संवाद जबरदस्त आव आणलेल्या त्या ऐटबाज व्यक्तिरेखांच्या तोंडी विडी असल्यासारखे विजोड वाटतात. गद्दार एजंटला पकडल्यावर त्याची जी बडबड आहे, तीसुद्धा ह्याच पठडीतली आहे. इथे दुसरी खटकणारी गोष्ट अशी की, गद्दाराला पकडल्यानंतर त्याची कसून चौकशी करून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याऐवजी त्याला भारतात घेऊन येण्याचा प्लान करणं ! हा बालिशपणा तर फक्त थराराला जागा करून देण्यासाठीचं कहाणीतलं मोठं भगदाडच आहे. तिसरी अतिशय न पटणारी गोष्ट म्हणजे 'केके' ही व्यक्तिरेखा. ही व्यक्ती एक गुप्तहेर आहे. तिला भावनिक कसं दाखवता तुम्ही ? 'We lost him' वालं एक्स्प्रेशन देताना ती रडवेली कशी होऊ शकते ? आजूबाजूला गोळीबार चालू असताना ती जखमी व्यक्तीच्या बाजूला मठ्ठपणे बसून राहूच कशी शकते ? ह्याशिवाय हिरोला आपले ५७२ पॅक्स दाखवता यावेत म्हणून कपडे काढता येतील अश्या सोयी पाहणं, गोळ्यांची बरसात होत असताना एकही गोळी हिरोला वगैरे न लागणं, जिथून पुढे कहाणी जाऊ शकत नाहीय तिथे बळंच एखादं पात्र घुसडणं आणि काम झालं की त्याला दुधातल्या माशीसारखं बाजूला टाकणं वगैरे बाष्कळपणा आहेच. मात्र तरीही हा थरार पाहावासा आहे कारण प्रत्येक व्यक्तिरेखेचा आवेशपूर्ण वावर आणि कथानकाची जराही कमी न होणारी गती.

ज्याप्रमाणे हृतिकचा 'क्रिश' इंडियन सुपरहिरो आहे, तसाच हा जॉन इंडियन जेम्स बॉण्ड आहे. 'धूम' असो की 'मद्रास कॅफे', 'रॉकी हॅण्डसम' असो की 'ढिशुम' अ‍ॅक्शनपॅक्ड भूमिकांत तो चांगलाच शोभतो. इथे त्याच्याकडून अभिनयाच्या फारश्या अपेक्षा नसतात, हेही एक कारण असेल. पण त्याने स्वत:ला ओळखून खूप सेन्सिबली भूमिका निवडायला सुरुवात नक्कीच केलेली आहे.
सोनाक्षी सिन्हासुद्धा खरं तर अ‍ॅक्शन भूमिकांतच शोभते. ती 'अकीरा'त बरी वाटली होती आणि इथेही वाटते. कारण तेच ! अभिनयाच्या फारश्या अपेक्षा नाहीत. ह्या भूमिकेचीही वाट लावायची कुवत तिच्या न-अभिनयात आहे, मात्र ती तसं करत नाही, हेही नसे थोडके !
'ताहीर राज भसीन' ची भूमिका 'मर्दानी'तल्या त्याच्या भूमिकेसारखीच नकारात्मक आहे. अत्यंत ताकदीने तो ती साकारतो. सगळ्यांमध्ये तो खूपच उजवा ठरतो. मात्र वर उल्लेखलेली वायफळ बडबड वगैरे त्याच्या वाट्याला दिल्यामुळे कंटाळा येतो. दर थोड्या वेळाने त्याच्यावर यशने धावून जाणं आणि केकेने त्याला थांबवणं, ह्या सगळ्या प्रकारात त्याची इंटेन्सिटी दुर्लक्षित होत राहते.

संवाद लेखन खरं तर अनुल्लेखनीय आहे, पण 'अनुल्लेखनीय आहे' हे उल्लेख तरी करावा कारण शेवटी थोडी तरी मेहनत घेतलेली असणारच ना !
पार्श्वसंगीत दणदणाटी नाहीय, ही किती मोठी निश्वासाची बाब आहे ! व्हिलनलाच माउथ ऑर्गनची आवड असलेलं दाखवलं असल्याने पार्श्वसंगीतासाठी माउथ ऑर्गन बराच वापरला आहे. हे नाजूक वाद्य स्वत:च हळुवार असल्याने संगीत दणदणाटी होऊ शकलं नाहीय. त्याव्यतिरिक्तचं संगीत मात्र आजच्या काळाला साजेसं टाकाऊ आहे. 'कांटे नहीं कटते..' ची यथेच्छ माती केलेली आहे.

जबरदस्त छायाचित्रण हीसुद्धा एक जमेची बाजू. बुडापेस्ट, शांघाय, ग्वांगझाउ, बीजिंग वगैरेचं चित्रण मस्त जमून आलं आहे. पण मला विशेष आवडलं ते अखेरच्या हाणामारीतलं कॅमेरावर्क. इथला कॅमेराचा कोन व्हिडीओगेमसारखा आहे. म्हणजे स्वत: त्या व्यक्तिरेखेचा व्ह्यू दाखवणारा. हा प्रयोग मी तरी ह्याआधी पाहिलेला नाही. ह्या प्रयोगासाठी विशेष दाद द्यायला हवी !

२४ चा सीजन-२ आम्ही पूर्ण पाहिला होता. त्यामुळे दिग्दर्शक अभिनय देवकडून आम्हाला प्रचंड अपेक्षा होत्या. एरव्ही 'फोर्स-२' हा चांगला थरारपट म्हणता येईलही, मात्र 'अभिनय देव' हे नाव मध्ये येतं आणि मग थोडं निराशच व्हायला होतं. छोट्या छोट्या बाबतींत भारतीय दिग्दर्शकांनी (किमान अभिनय देव वगैरे लोकांनी तरी ! बडजात्या, चोप्रा, वगैरे तर ओवाळून टाकलेले आहेत) सजग राहायला हवं आहे. नक्कीच गेल्या काही वर्षांत हिंदी सिनेमाने खूप चांगली मजल मारलेली आहे, पण अजूनही लहानलहान बाबतींत टाळाटाळ केलेली जाणवत राहते. फुसके संवाद आणि अनावश्यक पात्रं व योगायोग ह्यावर आधारलेलं कथानक अधिक सफाई न केल्याचं द्योतक नाही का ? शेवटी सारं काही दिग्दर्शकाचं आहे आणि तो त्या बाबतींत पुरेसा आग्रही नाही आपल्याकडे, हेच दु:ख आहे.

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...