Saturday, November 05, 2016

डोक्यावर थयथय नाचे भारतियत्व

'उद्याचा मराठवाडा' च्या दिवाळी २०१६ अंकात प्रकाशित कविता :-

विस्तीर्ण कधी होता हा रस्तासुद्धा
केव्हढी तत्वनिष्ठांची गर्दी झाली
जायचे पुढे वेगाने प्रत्येकाला
जो पडला त्याला तुडवा पायांखाली

आसमंत जयजयकारांनी दुमदुमतो
आरोळ्या, हाळ्यांचाही गोंधळ चाले
उन्मत्त प्रदर्शन झेंड्यांचे, शक्तींचे
तलवारी हातांच्या, नजरांचे भाले

ही जमीन, अंबर, पाणी सगळे तुमचे
माझ्यासाठी ना येथे जागा उरली
मज माझी भाषा समजेना आताशा
शांततेत माझ्या किती वादळे विरली

मी सजीव आहे, नंतर माणुस आहे
माणुसकीनंतर माझे नागरिकत्व
अनुक्रमात झाला कसा बदल आता की -
डोक्यावर थयथय नाचे भारतियत्व

हो, उगाच आलो होतो तुमच्यामध्ये
पण परत जायचाही रस्ता गजबजला
बस् एक कोपरा धरून निपचित पडणे
इतकाच तोडगा आहे आता उरला

....रसप....
९ जुलै २०१६

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...