पाकिस्तानच्या जेलमध्ये शब्दश: सडत पडलेल्या सरबजीतच्या हातावरून एक मुंगळा फिरतो आहे. तो त्याला नुसता पाहतो आहे. इतक्यात कोठडीचा बाहेरचा दरवाजा करकरतो. कुणी तरी आत येणार असतं. सरबजीत लगबगीने पाणी प्यायचा भांड्याखाली त्या मुंगळ्याला झाकून ठेवतो. 'शोले'तला गब्बर हातावर फिरणाऱ्या माशीला मारतो, तसा सरबजीत त्या मुंगळ्याला मारणार नसतोच. कारण तो स्वत:सुद्धा एका परमुलुखात चुकून घुसलेला असतो किंवा कदाचित हवा आणि उजेडही जिथे चोरट्या पावलांनी येतात अश्या त्या कोठडीत त्याला सोबत म्हणूनही तो मुंगळा काही काळ पुरणार असेल. कुणास ठाऊक नक्की काय ! दिग्दर्शक ते उलगडत बसत नाही. तो विचार आपल्याला करायचा आहे.
'सरबजीत' एकदा पाहाण्यासारखा नक्कीच आहे. दिग्दर्शक ओमंग कुमारचा पहिला सिनेमा 'मेरी कोम' ठीकच वाटला होता. प्रियांकाने तो चांगलाच उचलून धरला होता. पण इथे मात्र मुख्य भूमिकेतल्या ऐश्वर्या राय-बच्चनला दिग्दर्शकाने उचलून धरलंय. सुरुवातीला ऐश्वर्याचा अत्याभिनय (Over acting) डोक्यात गेला. नंतर नंतर ती जरा सुसह्य होत गेली. पण तरी ते चिरक्या आवाजात बोलणं काही जमलं नाहीच आणि वयस्कर स्त्री म्हणूनही तिला काही सहजपणे वावरता आलं नाही असं वाटलं. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आत्तापर्यंत तरी ऐश्वर्यासाठी सामान्यच ठरली आहे.
सरबजीत सिंग चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात गेला होता. दारूच्या नशेत त्याच्याकडून ही चूक घडली. ह्या एका चुकीमुळे त्याचं अख्खं आयुष्य बरबाद झालं. ही आपल्याला ज्ञात असलेली त्याची कहाणी. जे दिसतं तेच सत्य असतं आणि जे सत्य असतं ते कधी न कधी दिसतंच, ह्यावर माझा तरी फारसा विश्वास नसल्याने, खरं खोटं देव जाणे. पण ह्या सरबजीतला पाकिस्तानात बॉम्बस्फोट केल्याच्या आरोपावरून डांबून ठेवले गेले. त्याच्यावर अनन्वित अत्याचार तर झालेच, पण त्याचा शेवटही भयंकर होता. इथे आपण अजमल कसाब आणि अफजल गुरू ह्या दहशतवाद्यांना फाशी दिले आणि तिथे त्यांनी सरबजीतला जेलमध्येच हल्ला करून ठार मारलं. त्याचा उघडपणे खून करून बदलाच घेतला एक प्रकारे. त्याच्यावर ठेवलेले बॉम्बस्फोटाचे आरोप खोटे ठरले असतानाही, त्याला सुटका मिळाली नाही. लपलेलं सत्य जरी काही वेगळं असलं, तरी दिसणारी अमानुषता खूपच संतापजनक आहे.
सरबजीतच्या हालअपेष्टा रणदीप हुडाने फार अप्रतिम सादर केल्या आहेत. भूमिकांच्या लांबीचा विचार केला, तर सिनेमा ऐश्वर्यावर - सरबजीतच्या मोठ्या बहिणीवर - बेतला आहे. मात्र रणदीप हा एक हीरा आहे. तो लपत नाहीच. सिनेमा येण्याच्या खूपच आधी, त्याचा एक फोटो आला होता. 'सरबजीत'च्या गेटअप मधला. रस्त्यावरच्या रोगट भिकाऱ्यासारखा दिसणारा तो माणूस रणदीप हुडा आहे, हे समजायलासुद्धा वेळ लागत होता. ह्या गेट अपसाठी त्याने खूप वजनही कमी केलं. त्याची घाणीने पूर्ण भरलेली नखं, पिंजारलेले केस, किडलेले दात, अंगावर पिकलेल्या जखमा, खरुजं, गालिच्छ पारोसा अवतार, कळकट फाटके कपडे वगैरे असं आहे की जे आपल्याकडे ह्यापूर्वी कधीच कुठल्या सिनेमात दाखवलं नाही. सिनेमात दाखवलेल्या अमानवी अत्याचारांचा विचार करता, त्याचं तसं दिसणं किती आवश्यक आहे हे समजून येतं. ते सगळं पडद्यावर पाहणं भयंकर आहे.
अनेक वर्षांनंतर सरबजीतला भेटायला त्याची बहिण, बायको व दोन मुली पाकिस्तानात जेलमध्ये येणार असतात. त्याला फाशीची शिक्षा सुनावलेली असते. पंधरा दिवसांवर फाशी आलेली असताना, तो आपल्या कुटुंबाला भेटणार असतो. 'आपल्या घरचे येत आहेत' हे समजल्यावर आनंदाला पारावर न उरलेला सरबजीत आपली छोटीशी कोठडी स्वच्छ करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतो. घाणीचं भलंमोठं भांडं कांबळं टाकून झाकतो. थोडंसं पाणी असतं, अंगातले कपडे त्यात भिजवून ती घाणेरडी कोठडी पुसून काढतो. उरलेल्या पाण्यात कशी तरी अंघोळ वगैरेही करतो. चहा बनवतो ! त्याची ती सगळी धडपड व्याकुळ करणारी आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रसंग तर हृदयाला घरं पाडणारा आहे.
नंतर त्याची फाशी स्थगित होते आणि पुन्हा कोर्टात केस उभी राहते. मग पुन्हा एकदा त्याला भेटायला त्याची बहिण येते. तेव्हा ती त्याला धीर देण्यासाठी 'तू इतकी वर्षं इथे सलामत आहेस' म्हणते. तिच्या ह्या वाक्यावरचा सरबजीतचा आउटबर्स्ट जबरदस्त आहे ! 'कोणती सलामती ? ह्या काळ्या कोठडीत मला डांबून ठेवलंय. मी इथेच हागतो, इथेच मुततो, इथेच बाजूला बसून असतो, जेवतो, झोपतो.. एक जमाना झाला मला कुणी मिठी मारलेली नाही. कुणी बोलायला येत नाही' वगैरे त्याचं बोलणं अक्षरश: ऐकवत नाही ! अंगावरच येतं !
एकूणच रणदीपचं काम जीव पिळवटणारं आहे. एखाद्या व्यक्तिरेखेत शिरून तिला सादर करू शकण्याची अभिनय क्षमता आणि त्याच्या जोडीनेच उत्तम शरीरयष्टी, असा वेगळाच कॉम्बो त्याच्याकडे आहे. जो इतर कुणाकडेही नाही. 'मै और चार्ल्स' मध्ये त्याने चार्ल्स शोभराज ज्या बेमालूमपणे उभा केला होता, त्याच बारकाईने तो सरबजीत साकार करतो. त्याची हताशा, वेडगळपणा, वेदना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कळकटपणा त्याने आपलासा केला आहे. सरबजीतला न्याय मिळाला नाहीच, पण रणदीपने भूमिकेला मात्र न्याय दिलाच आहे, ह्याबाबत वादच नाही.
रिचा चड्डानेही तिला जितका वाव मिळाला आहे, तेव्हढ्यात उत्तम काम केलं आहे. 'मसान'मध्ये एकसुरी वाटलेली रिचा चड्डा इथे विविध प्रसंगात वेगवेगळ्या छटा दाखवते. पण मुळात तिची भूमिका ऐश्वर्याच्या स्टारडमपुढे गुदमरली असल्याने ती झाकोळली जातेच.
दर्शन कुमार चा रोल छोटा, पण महत्वाचा आहे. पाकिस्तानी वकिलाच्या भूमिकेत तो मस्त काम करतो. NH10 आणि मेरी कोममध्येही त्याला कमी लांबीचीच कामं मिळाली होती आणि तिथेही त्याने चांगलंच काम केलं होतं. त्या मानाने इथे त्याला काही ठिकाणी थोडी संधी मिळाली आहे आणि ती त्याने वाया जाऊ दिलेली नाही. सरबजीतच्या खऱ्या वकीलाला आपल्या कुटुंबासह पाकिस्तान सोडून परदेशात आश्रय घ्यावा लागला होता. तिथल्या कट्टरवाद्यांनी त्याला दिलेला त्रास, 'सरबजीत'मध्ये थोडासाच दिसतो. पण त्यावरून साधारण कल्पना येते.
ऐश्वर्याचे काही टाळीबाज संवादांचे सुमार प्रसंग वगळले, तर संवादलेखनही (उत्कर्षिनी वशिष्ठ) मला अत्यंत आवडलंय. अतिशय अर्थपूर्ण व नेमके संवाद आहेत.
आजकाल एकाच सिनेमाला सहा सात जण संगीत देत असल्याने चांगलं काम कुणाचं आणि वाईट कुणाचं समजत नाही ! ओव्हरऑल संगीतसुद्धा चांगलं वाटलं. मुख्य म्हणजे अनावश्यक वाटलं नाही.
ओमंग कुमार ह्यांनी हा विषय निवडल्याबद्दल त्यांचं विशेष अभिनंदन करायला हवं. सरबजीत प्रत्यक्षात कोण होता ? सामान्य माणूस की हेर किंवा अजून कुणी, हा विषय वेगळा. पण त्याने एक भारतीय असल्याची भारी किंमत मोजलीच आहे. त्याच्या यातनांना ओमंग कुमारने लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. ऐश्वर्याच्या जागी एखादी सकस अभिनय क्षमता असलेली ताकदीची अभिनेत्री असती, तर कदाचित खूप फरक पडला असता.
सरबजीत तर आता राहिला नाही. फक्त त्या नावाची एक जखम राहिलेली आहे. खपलीखाली अजून ओलावा आहे. 'ह्या निमित्ताने लोकांना बाजीराव पेशवा समजला' सारखे युक्तिवाद करणारे लोक ह्या निमित्ताने ही जखमही समजून घेतील. कदाचित असे किती तरी सरबजीत आजही खितपत पडले असतील किंवा संपूनही गेलेले असतील. त्या सगळ्यांना नाही, तर त्यांतल्या काहींना तरी जाणून घेण्याचा प्रयत्न होईल.
हेही नसे थोडके !
रेटिंग - * * *
- रणजित पराडकर
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!