रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकुम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली
क्षितिजावर लुकलुकणारी
फुलवात कुणाची आहे... ही बाग कुणाची आहे ?
ह्या प्रश्नाचं उत्तर मला केशवसुतांच्या कवितेत सापडतं. 'देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया!'
ही बाग कवीची आहे ! ह्या कवितेत
कवी संतोष वाटपाडे प्रत्येक कडव्यात दिवसाचे विविध प्रहर रंगवत नेतात आणि सगळ्यात शेवटी -
दररोज तरी धरतीला
का ओढ तमाची आहे....
ही बाग कुणाची आहे ?
- असा व्याकुळ करणारा प्रश्न करतात.
फार क्वचित असा अनुभव येतो की एखादी कविता वाचल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटतं, गहिवरून आल्यासारखं वाटतं, दोन चार ठोके चुकल्यासारखं वाटतं.
पहाटेच्याही जरासं आधी अचानक जाग यावी. झोप पूर्ण झालेली असावी. घराबाहेर एकाच वेळी स्वच्छ चांदणं सांडलेलं असावं आणि पूर्वेकडे रंगांच्या पखरणीला अजून सुरुवात झालेली नसली तरी तशी तयारी कुणी तरी करत असल्याची एक अव्यक्तापलिकडची चाहूल असावी. विविध फुलांचा एकत्र सुवास दरवळत असावा आणि सर्वदूर पसरलेली नीरव शांतता देवघरात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या हसतमुख स्थितप्रज्ञतेसारखी भासावी.
वेळ काही क्षण थांबली आहे, असंच वाटावं. बहुतेक ती थांबतही असावी.
कारण हे असं नेहमीच वाटत नाही.
हा असा चलचित्रपट डोळ्यांसमोरून झरझर सरत तेव्हा जातो, जेव्हा एखादी उत्कट कविता मनाच्या आतपर्यंत झिरपत जाते. संतोष भाऊंच्या अनेक कविता अश्याच आत झिरपत जातात. कधी, प्रचंड चलबिचल चालू असलेल्या अंतरंगात त्यांची एखादी कविता मंद शांतपणे तेवते. तर कधी आपण आपल्याच विश्वात मश्गुल असताना एखादी कविता म्हणते -
जाळ पेटला उंच उसळला
पोटामाजी विझली आग
डोक्याखाली हात ठेवला
डोईवरती काळा नाग...
अश्या त्यांच्या ओळी खडबडून जागं करतात आणि आपल्याला एका अटळ शून्याची खोली चाचपडायला लावतात.
कधी एखादी मूक व्यथा ते बोलकी करतात. इतरांना दिसणारा दगड-मातीचा साज त्यांच्याकरवी आपली भावना सांगतो की -
अंगणी उंबरा आला आहे सरकुन
चौकटी किड्यांनी पोकळ केल्या आतुन
ह्या भग्न घरी वावर कोणाचा आहे
जे पाय धुळीवर नकळत गेले टाकुन...
कविमनाला हीच तर मोठी देणगी असते. ते कुणालाही बोलकं करू शकतं. मग ते एखादं भकास पडलेलं घर असो वा ओसाड पडलेला माळ. एखादी सुंदर डवरलेली वेल असो की वठलेलं झाड. कुणाच्याही लक्षात न येता गालावरच वाळून गेलेला एखादा अश्रू असो की दिलखुलास हास्यामागे जाणीवपूर्वक लपवलेली वेदना आणि विरहाचं दु:ख असो वा प्रियेची आराधना !
सुगंधीत फाया नशा केवड्याची
कळी मोगर्याची असावीस तू
नवी कोवळी पालवी पिंपळाची
जणू हंसिणीचे मऊ पीस तू
खुले देवघर दरवळावे पहाटे
निखारा धुमारे खडी धूप तू
कपाळी टिळा लावुनी चंदनाचा
उभे विठ्ठलाचे दिसे रूप तू
संतोष भाऊंची कविता जितक्या प्रभावीपणे व्यथांची मांडणी करते तितक्याच हळुवारपणे ती कोमल, नाजूक भावनांनाही उलगडते. ते प्रियेला केवड्याचा, मोगऱ्याचा सुगंध म्हणतात, कोवळी हसरी पालवीही म्हणतात आणि हंसिणीचे पीसही ! त्यांच्या बऱ्याच कवितांमध्ये नेहमी एक धागा ईश्वराशी जोडायचा प्रामाणिक प्रयत्न करतोच. ज्या प्रियेला ते विविध अलंकृत उपमा देतात, तिलाच ते 'विठ्ठलाचे रूप'ही म्हणतात !
जेव्हा त्यांची ही स्तुती संभोग शृंगार रसाला लेऊन येते, तेव्हाही ते अगदी थेटपणे म्हणतात -
रात्रभर चांदण्याचा जसा तू सडा
पौर्णिमेच्या दुधी चांदव्यासारखी
चुंबनांच्या खुणा तू मिठी तू नशा
तू उरी झोंबत्या गारव्यासारखी..
जाळतो स्पर्श ओठास जेव्हा तुझा
वाटते तू मला विस्तवासारखी
चिंब ओलावले वस्त्र तू भास तू
श्रावणातील तू पावसासारखी..
सुमंदारमाला ह्या वृत्ताची अंगभूत नशा त्यांनी ह्या कवितेत बेमालूमपणे वापरली आहे.
प्रेमाचं हळुवार नातं अलगदपणे उलगडताना एका साधेसेच स्वप्न ते भुजंगप्रयातात कसे मांडतात पहा -
परसबाग छोटी घरे पाखरांची
उघडताच ताटी फ़ुले कर्दळीची
कधी झोपलो जर तुझ्या पायथ्याशी
मला छत मिळावे तुझ्या ओढणीचे ...
नको चांदण्याचे नको सागराचे
नको उंच माडी सुशोभित घराचे
प्रिये स्वप्न पाहू तुझ्या आवडीचे
नदीकाठच्या एकट्या झोपडीचे
एक अंदाज म्हणा किंवा निरीक्षण म्हणा, पण मला त्यांच्या कविता वाचत असतेवेळी नेहमी जाणवत आलं आहे की, सहसा कविता हातावेगळी करत असताना त्यांना स्वत:लाही निश्चित माहित नसतं की ते नक्की काय लिहिणार आहेत आणि कुठून कुठे जाणार आहेत. लयबद्ध कविता लिहिणाऱ्या बहुतेक कवीमनांचं असंच होत असावं, असाही माझा कयास आहे. कारण असा अनुभव मला अजूनही काही कवी व कवयित्रींच्या कविता वाचत असताना येतो. प्रत्येक वृत्ताची एक ताकद असते. त्या त्या वृत्ताचा ताल एकदा हृदयाच्या ठोक्यांनी पकडला की शब्द स्वत:च सम पकडण्यासाठी आतुर होऊन समोर येत राहतात. ती एक अशी तंद्री असते जेव्हा कविता स्वत:च स्वत:ला कवीच्या हातून लिहून घेत असते. मात्र ही स्थिती नेहमीच येते असं नाही. कधी त्या मागे कुठलीशी अनाम शक्ती असते, जिला आपण 'ईश्वरी'ही म्हणतो, तर कधी छंद-वृत्ताचा अभ्यास आणि त्यांवरचं निरलस प्रेम ! 'वृत्ता'वरचं हे प्रेम इतकं फुलतं की 'वृत्ती' बनून अंतरंगात उतरतं आणि मग जेव्हा जेव्हा एखादा तरंग ह्या डोहात उमटतो, तेव्हा तेव्हा उत्स्फूर्तपणे भावना स्वत:च आपली लय शोधून कवीला खुणावते. तो एक क्षण असतो, जेव्हा कवी तिला वाट करून देतो आणि त्यापुढचा प्रवास आपोआप घडतो.
ही उत्स्फूर्तता संतोष भाऊंच्या अनेक कवितांत जाणवते.
त्यांचा आजपर्यंतचा काव्यप्रवास तब्बल दोन तपांचा आहे ! ह्या काळात त्यांनी हजारांहून अधिक कविता व गझला लिहिल्या आहेत. पण ही सांख्यिकी त्यांना माझा एक आवडता कवी बनवत नाही. तर वर उल्लेख केलेली उत्स्फूर्तता मला त्यांच्यात दिसून येते आणि तीच त्यांना माझा एक आवडता कवी बनवते. ते जितक्या सहजपणे अक्षरछंदांचा वापर करतात, तितक्याच सहजतेने गणवृत्तही हाताळतात. मात्रा वृत्ताचं वजनही ते पेलतात. 'सुमंदारमाला' आणि 'मंदारमाला' ह्यांबाबत माझा असा अनुभव आहे की दोन्हींपैकी एकात कवी अधिक रमतो. मग दुसरं वृत्त हाताळताना नकळतपणेच लय बदललीही जाते. दोन्ही वृत्तांची चाल खूपच एकसारखी असल्याने असेल. पण हे सगळे विकार शिकाऊंचे असावेत. संतोषभाऊ लीलया ह्या दोन्हींना हाताळतात.
मंदारमालेतल्या त्यांच्या जरा वेगळ्या मूडच्या ह्या ओळी पहा -
मी राबतो रोज मातीत माझ्या हरीनाम श्वासात आहे तरी,
डोक्यावरी भार सार्या घराचा कधी जाणवू ना दिले मी घरी
गेल्या पिढ्या कैक कष्टात राया तुझा दास व्याकूळ दारावरी,
सांगून झाली व्यथा सर्व माझी अता न्याय द्यावा मला श्रीहरी
निसर्गाच्या अवकृपेने हताश झालेला मनुष्य श्रीहरीला शरण जातो आहे. आपले कष्ट त्याने घराला जाणवू दिलेले नाहीत, असं त्याला वाटतंय पण त्याचाच तान्हुला अगदी लहान वयातही ही परिस्थिती बहुतेक समजून घेतो आहे की काय ? हा अक्षरछंद तरी तेच सांगतो -
जाड साबराला माझी झुले लुगड्याची झोळी
दिसे दुरुन आईची मला फ़ाटलेली चोळी
माझे रडणे ऐकून नाही येणार कुणीही
आलो घेऊन कपाळी देवा गरीबीचा शाप..
नांगराचा बैल मुका त्याला लागलेली धाप
घाम डोळ्यात भरुन ढेकळात उभा बाप..
असे शब्द वाचत असताना आपल्याच नकळत आपणच आपल्याला दोषी ठरवतो. हे असे दु:ख ह्या जगात अस्तित्वात आहे, ह्यासाठी आपण स्वत:ला जबाबदार समजतो. कारण हे दु:ख आपल्याला एखाद्या देणेकऱ्यासारखा जाब विचारते, प्रश्न करते. उत्तर आपल्याकडे नसतं आणि आपण आरोप मान्य करतो.
'लवंगलता' वृत्तातल्या एका कवितेत, पुन्हा एकदा अश्याच एका रंजल्या गांजल्या बापाबद्दल ते लिहितात -
मिचमिच डोळे ओठ कोरडे बोलत होता काही
यंदासुद्धा शेताची का झाली लाही लाही
गुरे लेकरे घरच्या बाया करती रोजंदारी
विहिरीमध्ये घागर भरण्याइतके पाणी नाही
परसामध्ये उरला सुरला कांदा वाळत होता
उदास झाडांखाली सारा शिवार लोळत होता
सोसाट्याचे वादळ मनात रिचवत माझा बाबा
खांद्यावरच्या पागोट्याने वारा घालत होता
त्यांची कविता आपल्याला गावच्या मातीत नेते. मातीतली कविता म्हणजे ती ओल्या मातीतलीही आणि कोरड्याही. ओल्या मातीतली कविता कोरड्या मनाला भिजवते, तर कोरड्या मातीतली कविता वाचताना डोळ्यांच्या कडा ओलावतात. मनात सोसाट्याचं वादळ रिचवणारा हा बाबा वाचताना असह्य होऊन स्वत:पासूनच पाठ फिरवावीशी वाटते.
ही एक व्यथा ते अनेक कवितांमधून वेगवेगळ्या रंगांत दाखवतात. सगळ्यांना एक राखाडी रंगाची चौकट मात्र असतेच. 'भवानी' वृत्त हे सहसा लोकगीतांसाठी (लावणी, पोवाडा, इ.) वापरले जात असावे. पण त्याचा सुरेख वापर करून ते म्हणतात -
हंबरे वासरू गाय, करावे काय ,कळेना काही
ठेवले जरी राखून, गवत झाकून, द्यायचे नाही
टोचते घशाला भूक, जाळते थूक, जिभेची ग्वाही
थांबले थेंब डोळ्यात, कधी घामात, प्यायचे नाही...
एक सुन्न करणारी अस्वस्थता मनाला व्यापते. पळ काढावासा वाटतो ह्या वास्तवापासून पण..
पण कवी हा कधी कधी निर्दयी असतो, क्रूर असतो. तो वाचकाला इतक्या सहजासहजी पाठ फिरवू देत नाही. तो पुन्हा पुन्हा आदळत राहतो, एखाद्या सागराप्रमाणे.
निष्पर्ण तरूच्या खाली विस्कटली विधवा रडते
एकेक पान सुकलेले ओघळते पायी पडते
जे जमले होते गेले, डोळे ना पुसले त्यांनी
खरवडले भाळावरचे हिरवे कुंकू हातांनी
आकाशी हुंगत आहे घारीचा व्याकूळ डोळा
पदराखाली फुललेल्या नवतरुणीचे वय सोळा
बेवारस आभाळाच्या ठिकर्या पायात विखुरल्या
विझताना चांदणवाती डोळे मिटण्यास विसरल्या
संतोष भाऊंच्या कविता जश्या डोळ्यांत जळजळीत वास्तवाचं अंजन घालतात तश्याच त्या उद्ध्वस्त स्वप्नांच्या ठिकऱ्यासुद्धा डोळ्यांत रुतवतात. जखमा होतात. त्या भळाभळा वाहतात. विस्कटलेली विधवा अंतरंग उसवते, विषण्ण करते !
एक अबल आणि अबोल व्यथा ते पुढील ओळींत अशी मांडतात की एक बलात्कार संवेदनेवरही होईल आणि मनावर ओरखडे उमटतील !
मानेखाली हात.. बांगडी सोबत उरली नाही
डोळ्यांतिल स्वप्नांची पणती अजून विझली नाही
झाकावा डोळा तर विस्तव डोळ्यातुन घळघळतो
भेदरलेली रात्र त्यामुळे निवांत निजली नाही...
कूस बदलल्यावरती रडते मूल उपाशी आहे
ओठांच्या दगडात राहिली ओल जराशी आहे
आक्रोशाच्या ठिणग्या दिसती चुलीमधे पुरलेल्या
पोटाच्या खड्ड्यात पेटला जाळ अधाशी आहे...
अश्या अंगावर येणाऱ्या अनेक कविता संतोष भाऊ लिहितात. प्रभावित होऊन एखाद दोनदा लिहिले जाऊ शकते. मात्र वारंवार लिहित राहण्यासाठी एक त्रयस्थ संवेदनशीलता असावी लागते. जळजळीत वास्तवाचं एक बीभत्स दर्शन करताना त्या रबरबाटात किती उतरायचं, ह्याचं भान असायला लागतं. ते राहिलं नाही, तर बीभत्स रसात व्यक्त होत असताना विकृतीचा भास होऊ शकतो. ही एक अतिशय कठीण कसरत असते, पण पुढील ओळी ती पार पाडतात -
अवलाद कलीची हासत फिरते रानी
आताच कापुनी नाळ
त्या तेजोमय गोलाच्या ठिकर्या झाल्या
पेटला कधीचा जाळ
सांगाडे कवट्या माळावरती पडल्या
देतात कुणाला हाक
वार्यावर उडते भिरभिर वावटळागत
का हतबलतेची राख
कविता लयबद्ध असली की ती गेय असतेच असं नाही. त्यासाठी कठोर, रांगडे शब्द मारक ठरतात. रांगड्या शैलीत जळजळीत लिहिणारे संतोष भाऊ गेयता सांभाळतानाही विखारी व्यथा मांडतात !
भुकेल्या घराला सहारा मिळाला
चुलीची व्यथा जाणली ना कुणी
रिकाम्या घराची खुली सर्व दारे
झुरावी तुळस रोज का अंगणी
मला लेकरू ना दिले सोबतीला कसे गीत मी बोबडे गायचे
निवारा नसे ज्या मुक्या पाखरांना अशा पाखरांनी कुठे जायचे
कपाळावरीच्या व्यथा सोसवेना तुझे नाव देवा किती घ्यायचे
ह्या त्यांच्या कवितेचे गीतही झाले आहे. त्यांच्या अनेक कविता संगीतबद्ध झालेल्या आहेत.
संगीतबद्ध झालेली त्यांची अशीच अजून एक अंगावर कविता म्हणजे -
सारी भेगाडली भूई अंघुळीला वारा नाई,
प्वाट खपाटीला गेलं कुरणात चारा नाई ॥
माझी उपाशी लेकरं
तरी देत्यात ढेकरं
ढेकळात लोळताना
गेली घासून ढोपरं
उन्हामंधी तापलेली सारी जिमीन वांझुटी,
माजा नागडा संसार आडुशाला काई नाई
इथले शब्द खूप रांगडे आहेत. पण आशयाशी समरूप होऊन असल्याने त्यांची चालही तशीच रांगडी आहे.
मी ह्या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या अगदी सुरुवातीच्या काळातल्याही काही कविता वाचल्या. सुरुवात करणाऱ्या कुणाही कवीप्रमाणे त्यांच्या ह्या काळातल्या कविता गुंताविरहित व मुक्त आहेत. मात्र -
खेळण्यास मी आलो होतो हिरव्या गवता येथ भुलुनी
मान पकडली या लोकांनी हिरवा पाला मज दावुनी
आण कुणा मज सोडविण्या ओरड्तोय मी फ़ार फ़ार गं
बुभुक्षित हे मानव जमले करण्या मजला ठार गं
आई गं...आई गं......बछड्यासाठी धाव गं
----------------------
संपले आकाश जेथे त्या ठिकाणी राहतो हा,
जे असूनी ना दिसे ते रुप आहे देव माझा
---------------------
चालताना हात हाती रोज घ्यावा साजणे,
थांबतांना मी तूझे थोडे बघावे लाजणे
रोज व्हावे भेटणे अन रोज व्हावे बोलणे,
तूच स्वप्नातील माझा चंद्र व्हावे साजणे
- अश्या त्यांच्या ओळी वाचत असताना त्यांतली उत्कटता समजून येते. अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे लयीची ओढ. कविता मुक्त असली तरी तिच्यात एक प्रकारची लय ही असतेच. मुक्ततेच्या नावाखाली पसरट लिहित जाणं आजची 'Fashion' आहे, पण जेव्हा ही 'Fashion' सुरु होत होती, त्या काळातही संतोष भाऊंच्या कवितेत एक अंगभूत लय आपसूकच येत होती.
आजचं त्यांचं कवीपण मला वेगळं वाटायचं अजून एक कारण म्हणजे वृत्ताची जाण व लयीवर पकड असूनही आजच्या 'Fashion' प्रमाणे ते गझलच्या प्रभावाखाली दबले गेलेले नाहीत. ते गझल व कविता, दोन्हींत रमतात. मात्र ठळकपणे त्यांची ओढ कवितेकडे अधिक असल्याचं माझं निरीक्षण आहे. हा त्यांच्या अभिव्यक्तीचा प्रामाणिकपणा आहे हे नक्कीच.
हा प्रामाणिकपणा असल्यामुळेच त्यांची कविता वाचकाच्या संवेदनशीलतेच्या चंचल लोलकाला अस्थिर करून जाते.
लयीवर असलेली पकड आणि वृत्ताची जाण संतोष भाऊंना एक प्रयोगशील कवी बनवते. ते लयीसोबत, यमकरचनेसोबतही निरनिराळे प्रयोग करताना दिसतात.
चोळीत तंग चोरून अंग नाहून सावली ओली
कस्तुरीगंध पसरून मंद पावले उन्हाची आली
हा पदर खुला नाजूक झुला वेलींचा फांदीवरुनी
पाहून पवन झाकून नयन थरथरते अल्लड तरुणी
पालवी खुले पळसास फुले केशरी सांडला रंग
कोवळे तुरे गवतात हिरे पाखरू वेचते दंग
इथली त्यांनी केलेली यमकपेरणी ठेका धरायला भाग पाडणारी आहे.
वर मी 'भवानी' वृत्तातल्या एका कवितेचा उल्लेख केला आहे. ह्या वृत्तात त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत. मात्र एक कविता उल्लेखिल्याशिवाय त्यांची ओळखच पूर्ण होत नाही. 'वासुदेव' ! 'वासुदेव' ही कविता इतकी अस्सल आणि चपखल आहे की पारंपारिकच वाटावी !
छम्माक वाजला टाळ धावले बाळ अंगणी आले
घरधनी उचलुनी फाळ तुडवण्या गाळ पहाटे गेले
वासरे लाडकी घेत पहा रांगेत निघाल्या गाई
वासुदेव आला घरी भाज भाकरी तव्यावर आई !
शेतात उभी बाजरी कडाला तुरी टप्पुरं दानं
झोपडीमधी अंधार तरी भरणार उद्याला सोनं
संसार तुझा पंढरी इठोबा घरी तूच रखुमाई
वासुदेव आला घरी एक भाकरी वाढ ना आई
भारूड म्हणत नाचला थकुन थांबला जायचा न्हाई !
हे वाचत असताना साक्षात एक वासुदेव आपल्या समोरच येऊन उभा ठाकतो ! And why not ? जीवनाचं तत्वज्ञान सांगणारा, वास्तवाचं भान देणारा, सुखाची ओळख करून देणारा, दु:खाची जाणीव जागी करणारा, आपलाच चेहरा आपल्याला दाखवणारा 'संतोष वाटपाडे' हा कवीही एक वासुदेवच की ! तो आपल्यासमोर येतो आणि धुंद, बेभान होऊन त्याची कला सादर करतो. आपल्याला तल्लीन करवतो ! हे त्याचे सादरीकरण पराकोटीचं उत्कट आणि प्रामाणिक असतं म्हणूनच स्वत:च्या कवितेचं वर्णनही ते अप्रतिम सुंदर प्रकारे करतात -
तू वनराईचे नाजुक हळवे हसणे
निद्रिस्त खगांची आभाळाची स्वप्ने
तू नभातल्या लखलखत्या चांदणवाती
तू चंद्राची थरथर रजगंध झिरपणे
तू क्षितिजाच्या थरथरत्या केशरमाळा
नवतरुणीच्या पदराचा चंचल चाळा
तू आरशातले रूप स्वतःचे फसवे
तू चुकलेल्या हुरहुरत्या कातरवेळा
तू हिरव्या फांदीवरचा मनमथ रावा
तू गोकुळातला खट्याळ मंजुळ पावा
तू किर्तन अभंगवाणी आर्त भुपाळी
तू मंदिरात भक्तांचे आर्जव.. धावा...!
'संतोष वाटपाडे' हे माझ्या मते आजच्या कविता विश्वातील एक अत्यंत महत्वाचे नाव आहे. वृत्तबद्ध कवितेसाठी त्यांच्यात एक तळमळ आहे आणि त्या कवितेलाही त्यांच्यासाठी तितकीच तळमळ आहे !
मराठी कवितेचा सामान्य माणसाला दिसणारा चेहरा हा नीरस, बेचव व नकोसा वाटणारा आहे, हे कडवट सत्य आहे. भरकटत चाललेला मुक्तपणा, ज्यामुळे बहुतेकदा काव्येतरच वाटणारं लिखाणसुद्धा कविता म्हणून माथी मारलं जातं, हे वास्तव मराठी कवितेचा चेहरा असा होण्यामागे आहे. कविता तिच्या सौंदर्यस्थळांना मुकत असताना संतोष वाटपाडेंसारखा एक अनुभवसिद्ध कवी परखड, जळजळीत, कठोर, हळुवार, कोमल असे विविध भावाविष्कार एकापेक्षा एक प्रभावीपणे वृत्तबद्ध लिखाणाद्वारे मांडतो, हे दृश्य दिलासादायी आहे. त्यांच्या जोडीने काही मोजकीच नावं घेता येतील, जे असाच दिलासा देतात.
संतोष भाऊंचा गेल्या काही वर्षांचा काव्यप्रवास मी पाहू शकलो आहे. माझ्यासाठी हा एक ऐतिहासिक ठेवा आहे. ह्या लेखात मी त्यांच्या अनेक कविता घेऊ शकलेलो नाही. जे काही इथे दिसलं आहे, ती केवळ एक झलकच ! त्यांच्या विविधांगी कवितांमध्ये मला काही काव्यप्रकार मात्र दिसलेले नाहीत किंवा अभावानेच दिसले. ते म्हणजे सुनीत आणि ओवी छंद (अभंग). पारंपारिक वृत्तं आणि त्यातही श्रावणाभरण, पृथ्वी सारखी विस्मृतीत जात असलेली वृत्तं त्यांच्यासारखे प्रतिभावान कवी पुन्हा एकदा लोकांसमोर आणू शकतात. त्यांच्या इथून पुढच्या कवितांतून मला ह्या काही अविष्कारांची अपेक्षा आहे. तसेच, मराठी कवितेशी सामान्य माणसाची नाळ जोडली राहण्यासाठी सध्याचा जो एक महत्वपूर्ण दुवा आहे, तो म्हणजे गझल. त्यांनी अनेक उत्तम गझला लिहिलेल्या आहेत. (मी जाणीवपूर्वक ह्या लेखात त्यांच्या गझलांचा उल्लेख टाळला आहे कारण तो जरा वेगळ्या दृष्टीने पाहायचा विषय आहे, असं मला वाटतं.) ह्या 'गझल' प्रकारातही त्यांनी विपुल लेखन करावे.
त्यांनी हर तऱ्हेच्या कवितेस आपले म्हणावे, असेच मला वाटते.
त्यांची कविता मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे. इथून पुढेही देत राहीलच, ही खात्री आहे ! त्यांच्या काव्यप्रवासासाठी मनापासून शुभेच्छा !
....रसप....