Saturday, December 10, 2016

एकशे त्रेपन्न मिनिटांची 'राख' - (Raakh (1989))

'राख' म्हणून एक सिनेमा १९८९ ला येऊन गेला. बासुदांचे (बासू भट्टाचार्य) पुत्र आदित्य भट्टाचार्य दिग्दर्शक आहेत. आमीर खानचा हा दुसराच सिनेमा. बहुतेक मर्यादित रिलीज झाला होता कारण काही दिवसांपूर्वी एका मित्राने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केला तोपर्यंत मला असा कुठला सिनेमा आहे, हेसुद्धा माहित नव्हतं !
युट्युबवर ह्याची प्रिंट आहे म्हणून आवर्जून पाहिला.

जर तंदुरी चिकनला साखरेच्या पाकात घोळवलं किंवा गुलाब जामसोबत हिरवी चटणी घेतली किंवा टीव्हीवर येणाऱ्या कुठल्याश्या सुमार जाहिरातीत दाखवतात तसं ब्लेझर, टाय वगैरेखाली लुंगी नेसली किंवा सायकलला ट्रकचं टायर लावलं किंवा... अशी अजून बरीच उदाहरणं देता येतील, तर ते किती विजोड वाटेल, तसंच काहीसं ह्या 'राख'चं झालं आहे. कथानक फुल्टू व्यावसायिक आणि बळंच त्याला समांतर सिनेमाच्या वाटेवर ओढलंय.

एकंदरीत हा सिनेमा तुकड्या तुकड्यांत हास्यास्पद, रटाळ आणि फुसका झाला आहे.
{मी अख्खी स्टोरी सांगणार आहे. काहीही न लपवता. स्पॉयलर वाटत असेल तर पुढे वाचू नका !}

तर काय असतं की, आमीरचं एकीवर प्रेम असतं. त्यांचं बहुतेक अफेअर असतंही, पण ब्रेक ऑफ होतो. सिनेमात ते दाखवलेलं नाहीय. डायरेक्ट ब्रेक ऑफ नंतर पुढे सुरु होतो सिनेमा. एका पार्टीत तिला पार्टीबाहेरचा एक जण छेडतो. न राहवून आमीर त्याला एक ठोसा मारतो. त्या गुंडासोबत त्याचे ४-५ पंटर असतात. पण तो काही करत नाही. गपगुमान निघून जातो ! (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) पार्टी संपल्यावर आमीर तिला घरी सोडायला जात असताना त्याची गाडी ते गुंड लोक रस्त्यात अडवतात, रस्त्यावरच त्याला बदडतात आणि तिचा बलात्कार करतात. ह्या प्रकारानंतर आमीर डिस्टर्ब होतो. डिप्रेस होतो. स्वत:ला अपराधी समजायला लागतो. तो पोलिसांत जातो, पण तिथे त्याला कुणी विशेष दाद देत नाही. In fact, पोलीस इन्स्पेक्टर झालेला पंकज कपूर त्या रात्री रस्त्यावर बलात्कार होत असताना तिथूनच आपल्या बाईकवर गेलेला असतो आणि आमीरने त्याला मदतीसाठी हाका मारलेल्या असतात. तो आमीरचं ऐकून घेतो आणि त्याला मदत करायचं आश्वासन वगैरे देतो. दुसरीकडे डिप्रेस्ड आमीरला त्याचा बाप झापून काढतो. मग हा थेट घर सोडून रस्त्यावर राहायला लागतो. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) एकदा पंकज कपूर त्याला झापत असताना अचानक आमीरला बोलायला सुचतं की, 'अरेच्या लबाडा... त्या रात्री तूच तर होतास बाईकवर ! मी तुला 'हेल्प.. हेल्प' बोललो, तर तू पळून गेलास की !' ही गोष्ट त्याला इतके दिवस बोलावीशी वाटत नाही. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) हा पंकज कपूर म्हणे अनेक दिवस त्या गुंडाच्या मागावर असतोच पण त्याला पुरेसा पुरावा वगैरे मिळत नसतो ! असेल बुवा.. पण एकदाच आमीर त्याला इमोशनल डोस देतो तर त्यावरून ह्याला काय सुरसुरी येते की, हा डायरेक्ट एका पार्टीत त्या गुंडावर शाब्दिक चढतो आणि बंदूकही दाखवतो, हवेत फायरही करतो ! मग काय ? सस्पेंड...!! हे सोयीचं व्हावं म्हणून कमिशनरही त्या पार्टीत असतोच. मग सस्पेंड झाल्यावर हा आमीरला हुडकून काढतो आणि त्याला बदल्यासाठी ट्रेन करतो. त्याच्याकडून व्यायाम वगैरे करवून घेतो. लैच फिल्मी. पण ह्या सगळ्याला अजिबात फिल्मी मानायचं नाही. का ? कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय ! बराच व्यायाम केल्यावरही आमीरचे स्नायू टरटरत वगैरे नाहीत. पण ट्रेनिंग पुरेसं झालेलं असतं. मग पंकज कपूर त्याला एक पिस्तुल आणून देतो. ह्या प्रसंगी आमीर जी प्रतिक्रिया देतो ती म्हणजे लेखक-दिग्दर्शकांच्या खुळचट आणि बिनडोकपणाचा कडेलोट आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद द्यायला हवी असं हास्यास्पद वर्तन, एक सूडाला पेटलेला, कठोर शारीरिक प्रशिक्षण घेत असलेला मनुष्य ते पिस्तुल पाहून करतो. पिस्तुल समोर पाहून, आमीर ते हातात घेतो आणि अक्षरश: लहान मुलाप्रमाणे ते इथे, तिथे रोखून तोंडाने 'ढिश्क्यांssव.. ढिश्क्यांssव' असे आवाज करतो.
हे दृश्य पाहून मी तत्क्षणी सिनेमा बंद केला. कारण तो एक मानसिक धक्का होता. धक्का पचवला आणि मग तमाशा पूर्ण करावा म्हटलं.
ह्यानंतर आमीर बाजारात जाऊन भाजी घेऊन यावी त्या सहजपणे वेगवेगळ्या जागी जाऊन गुंडाच्या डाव्या, उजव्या हातांना मारत सुटतो. हे मारणं, त्याचं चित्रण म्हणजे बाष्कळपणाचा अजून एक नमुना. कुठेही त्यातली तीव्रता जाणवतही नाही.
ह्या फुसकेपणामागे महत्वाचा हात पार्श्वसंगीतकार रणजित बारोटचा आहे. पडद्यावर चाललेल्या प्रसंगाशी अधिकाधिक विसंगत पार्श्वसंगीत कसं देता येईल, ह्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ते सिनेमाभर करतात. (असं खरं तर बोलायचं नसतं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) सिनेमात एकही गाणं नाही, ह्यासाठी मात्र मनापासून आभार मानायला हवे. कारण तेव्हढ्या मिनिटांनी ही रटाळ लांबी थोडीशी कमी झाली ना !

सिनेमा आमीरच्या आत्मकथनातून उलगडत जातो. त्याचा दुसराच सिनेमा आहे, त्यामुळे त्याचं ते बोलणं सराईत नाही. एकसुरी, अभिनिवेशशून्य आणि (जसं आजही त्याचं बोलणं बऱ्याचदा असतं तसंच) सपाट कथन सिनेमाभर कंटाळा समसमान राहील, ह्याची दक्षता घेतं.
सिनेमाच्या शेवटी आमीर म्हणतो, 'यह मेरी ज़िन्दगी की राख हैं'
सिनेमाच्या शेवटी आपण म्हणतो, 'यह मेरे १५३ मिनिटों की राख हैं'

युट्युबवरची प्रिंट खराब असावी कदाचित पण संपूर्ण सिनेमा अतिशय काळोखा आहे. त्याचा कंटाळा स्वतंत्रपणे येतो.
छायाचित्रक संतोष सिवन आणि संकलक ए. श्रीकर प्रसाद ह्या दोन दिग्गजांचा हा पहिला सिनेमा होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. बहुतेक सिवन व प्रसाद साहेबांनी ह्या सिनेमानंतर नवीन पाळणे घेतले असावेत.

सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता (पंकज कपूर), विशेष पुरस्कार (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट संकलन (ए. श्रीकर प्रसाद) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार ह्या सिनेमाला मिळाले आहेत. (इथे आपण कुत्सितपणे हसू शकतो.)



खरं तर सुरुवातीला येणाऱ्या नामावलीत 'Dialogue' ऐवजी 'Dialog' पाहिल्यावर मला जे आश्चर्य वाटलं होतं, त्यावरुनच हे समजायला पाहिजे होतं की सिनेमा किती काळजीपूर्वक बनवला असेल. पण आपलं पण - 'वोह नहीं सुनता उसको जल जाना होता हैं' - असंच आहे ना ! आणि थोडा डाऊट येऊनही मीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !

- रणजित पराडकर

2 comments:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...