Sunday, October 25, 2015

शानदार झोपेची गॅरण्टी (Movie Review - Shaandaar)

नासलेल्या दुधाचा चहा होत नाही. खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवर गाडी पळत नाही. बॅलन्स नसलेल्या मोबाईलवरुन कॉल जात नाही. पैसे नसलेल्या बँक अकाऊण्टचा चेक वटत नाही. गळक्या मडक्यामध्ये पाणी राहत नाही. नसलेल्या केसांचा भांग पडत नाही.
तसंच, गाढ झोपेच्या अधीन करणाऱ्या चित्रपटाला 'शानदार' मानलं जात नाही.
'हम आपके है कौन' मुळे लग्नाची कॅसेट चित्रपट म्हणून दाखवता येते, असा एक अत्याचारी गैरसमज काही लोकांचा झाला आहे. त्यात त्यांचीही चूक नसावीच. कारण हा अत्याचार काही लोकांवरच होतो. बहुतेक लोकांना सेट्स, घरं, हॉटेलं वगैरेंची भव्यता, कपड्यांची, दागिन्यांची व एकूणच 'वॉर्डरोब'ची श्रीमंती, कौटुंबिक मेलोड्रामा इत्यादी मोठ्या पडद्यावर पाहताना मजाही येते. पण काही नतद्रष्ट आमच्यासारखे असतात, ज्यांना स्वत:च्या घरातल्या किरकोळ मेलोड्रामाचीसुद्धा अ‍ॅलर्जी असते, त्यामुळे असा सगळा फाफटपसारा सहन होत नाही.

अश्याच कुठल्याश्या 'हम-आपके-है-कौनी' लग्न कॅसेटीला, अजून काही नव्या-जुन्या सिनेमांच्या जोडीने एकत्र वाजवून त्या ग्लासातले घटक एकमेकात कधीच न मिसळणाऱ्या फालुद्यासारखं काही तरी रेकॉर्ड करून आपणच त्याला 'शानदार' म्हणायचं, की लोकही म्हणतील, असा गैरसमज विकास बहल व कंपनीचा झालेला दिसतो. लहानग्या 'आलिया' (आलिया भट) ला बिपीन अरोरा (पंकज कपूर) हा एक गडगंज श्रीमंत उद्योगपती आपल्या घरी घेऊन येतो. ती कोण आहे, कुठे सापडली वगैरे तो सगळ्यांपासून लपवून ठेवतो. त्यात लपवण्यासारखं काय असणार असतं, देव जाणे ! कारण ती त्याचीच अनौरस औलाद आहे, हे तर नियमित हिंदी चित्रपट पाहणाऱ्या कुणालाही सहज समजू शकतं. पण त्याची खाष्ट बायको व खडूस आई आणि घरातील इतर सदस्य हिंदी चित्रपट पाहत नसावेत. त्यामुळे ते तिला 'फक्त अनाथ'च समजत असतात. बिपीनची एक औरस मुलगीही असते. 'इशा' (सना कपूर). बऱ्यापैकी लठ्ठ सना कपूरच्या लग्नाची कॅसेट म्हणजे हा चित्रपट 'शानदार'. ह्यात पांचट विनोदनिर्मिती करण्याची जबाबदारी ज्याच्याशी लग्न ठरलं आहे, तो मुलगा रॉबिन (जलाफ हुनी) आणि त्याचा मोठा भाऊ हॅरी फंडवानी (संजय कपूर) ह्यांच्यावर आहे. तर 'आलिया'ची लव्ह स्टोरी पूर्ण होण्यासाठी तिचा आयडियल मॅच जगजिंदर जोगिंदर (शाहीद कपूर) ह्या लग्नाचा व्यवस्थापक अर्थात 'इव्हेंट मॅनेजर' म्हणून आहे.
इतर काही सांगण्यासारखंही नाही आणि जाणून घेण्यासारखंही नाही. तरी, सगळं काही जाणून घेण्याची 'लाल सिग्नल किंवा 'नो एन्ट्री'ची पाटी दिसत असतानाही गाडी घुसवण्यासारखी' आत्मघाती इच्छा असेलच, तर अवश्य जवळच्या चित्रपटगृहातच शानदार पाहावा. जवळचेच चित्रपटगृह निवडावे. कारण पूर्ण चित्रपट, न झोपता पाहिला गेल्यास बाहेर पडताना पराकोटीच्या मानसिक अत्याचारामुळे काही काळाकरिता आपले संतुलन बिघडू शकते. त्या बिथरलेल्या मनस्थितीत समोर येणाऱ्या कुणाही व्यक्तीशी आपला अकारण वाद किंवा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.



'शानदार' हा 'नॉनसेन्स कॉमेडी' म्हणून जे एक नवीनच चित्रपटपिल्लू जन्माला आलं आहे, त्याचा भाऊ आहे का ? तसंही वाटत नाही. कारण लहानपणापासून निद्रानाशाचा विकार जडलेल्या आपल्या मुलीला झोप लागावी म्हणून तिला रोज एक स्वप्न कागदावर चितारून देणारा एक हळवा बापही इथे दाखवला आहे. (ते स्वप्न पाहायला तरी ती झोपेल, असा विचार करणे म्हणजेसुद्धा एक पांचटपणाच. पण असो !) इथे एका लठ्ठ व्यक्तीच्या त्रस्त मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्नही अधूनमधून केला गेला आहे. त्यामुळे त्याला 'नॉनसेन्स' तर म्हणता येणार नाहीच आणि 'कॉमेडी'ही नाही. हा फक्त एक समुद्राच्या लाटांप्रमाणे अविरतपणे येतच जाणारा कंटाळा आहे. ज्यामुळे एक तर प्रेक्षक मध्यंतरालाच बाहेर पडतो किंवा न पडल्यास एखादी मस्तपैकी झोप काढतो आणि दोन्ही शक्य न झाल्यास, बिथरतो.

पंकज कपूर, शाहीद कपूर आणि आलिया भट, हे कास्टिंग खरं तर चांगलं आहे. पंकज कपूर, आजपर्यंतच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक. शाहीद कपूर, आजच्या घडीचा एक उत्तम अभिनेता ज्याने आपले कसब 'हैदर', 'जब वुई मेट', 'कमीने' सारख्या चित्रपटांतून सिद्ध केलेले आहे. तर आलिया भटकडूनही 'हाय वे' नंतर बऱ्याच अपेक्षा आहेत. तिघेही आपापल्या भूमिका 'शानदार' करतात. शाहीद-आलियाची जोडीही मस्त वाटते. दोघे खूप फ्रेशही दिसतात आणि लव्हेबलही. पण सगळं वायाच जातं.

इतर कलाकारांमध्ये संजय कपूर, इंडस्ट्रीमधून स्वत:च्या अचानक गायब होण्याला योग्य सिद्ध करत अक्षरश: वीट आणतो. गंभीर भूमिकेत विनोदी वाटणारा हा अभिनेता, विनोदी भूमिकेत हास्यास्पद वाटतो, ह्याचं नवल वाटू नये.
'इशा'च्या भूमिकेत पंकज कपूरची मुलगी आणि शाहीद कपूरची सावत्र बहिण 'सना कपूर' आश्वासक वाटते. तिचा चेहरा थेट आईसारखा (सुप्रिया पाठक) आहेच, अभिनयगुणही तसेच असावेत अशी आशा वाटते.

कथा व पटकथा खरं तर अनुल्लेखाने मारायला हव्या. पण तो शिरस्ता नाही. म्हणून फक्त उल्लेख. सुमार कथा व टुकार पटकथा विकास बहलसोबत चैताली परमार व अन्विता दत्त ह्यांनी लिहिली आहे. अन्विता दत्त ह्यांनी एका हाताने पटकथा लिहित असताना दुसऱ्या हाताने संवादही लिहिले आहेत. दोन्ही नक्कीच एकाच वेळी लिहिलं गेलं असावं कारण दोन्ही साधारण एकाच पातळी व पठडीचं आहे.

'विकास बहल' ह्या नावाखातर चित्रपट बघायला गेलेल्या माझ्यासारख्यांची प्रचंड निराशा होते. 'करायला गेलो गणपती आणि झाला मारुती' असं काही विकास बहल ह्यांचं झालं असावं. 'एक वाईट चित्रपट करू', अश्या विचाराने कुणी काम करत नसावंच. पण तरी सत्य बदलत नाहीच. चित्रपटाच्या शेवटी, एका पात्राने कुरियरने मागवलेलं काही सामान पोहोचवायला कुरियर सर्विसची गाडी येते. तिचं नाव FedUp (FedEx चं विडंबन) दाखवलं आहे. अगदी अचूक वेळेस ती गाडी येते. कारण तोपर्यंत प्रेक्षकही 'FedUp' च झालेला असतो.

अमित त्रिवेदींचं संगीत लक्षात राहण्यासारखं नसलं तरी लक्ष विचलित करणारंही नाही. म्हणजे समजा जर एका विशिष्ट समयी ब्रम्हानंदी टाळी लागून कुणी चित्रपटगृहाच्या आरामदायी खुर्चीत मागे रेलून, पाय ताणून डोळे मिटले असतील आणि तेव्हढ्यात एखादं गाणं सुरु झालं तर तंद्री मोडत नाही. अन्यथा विचित्र अवस्थेत एकदम दचकल्याने स्नायू दुखावणे वगैरे शारीरिक दुखापतही, बाकी चित्रपटामुळे होणाऱ्या मानसिक दुखापतीसोबत वागवणे भाग पडले असते. ह्यासाठी अमित त्रिवेदींचे मनापासून आभार मानायला हवे.

बिपीन आपल्या मुलीला झोप लागावी म्हणून रोज एक स्वप्न देत असतो. प्रत्यक्षात असा कुणी 'बिपीन' असेल तर त्याने आपल्या मुलीला 'शानदार' दाखवावा. तिला कंटाळून तरी झोप येईल किंवा पुन्हा पाहायला लागेल ह्या भीतीने तरी.

चित्रपट पाहून आलेल्यांसाठी सहानुभूती, तिकीट आधीच बुक केलेल्यांसाठी शांत झोपेच्या शुभेच्छा आणि हा लेख वाचल्यावर जे 'शानदार' पाहणार नाहीत किंवा एरव्हीही जे बघणार नव्हतेच, त्यांना सहानुभूतीसाठी धन्यवाद !

रेटिंग - *


- रणजित पराडकर

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज २५ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...