Sunday, October 11, 2015

दोन दशकं उशीराचा 'जज़बा' (Movie Review - Jazbaa)

हताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम म्हणून एका प्रसंगात मातीत जोरजोराने हात आपटून धूळ उडवून झाल्यावर तिथेच जवळजवळ साष्टांग लोटांगण घेऊन ऐश्वर्या बाई बच्चन हमसाहमशी रडतात. गर्द काळे कपडे. बारीक लालसर माती. (संजय गुप्ताचे आवडते रंग!)

लगेच पुढच्याच प्रसंगात रडण्याचा सिक्वल ऐ.बा.ब. स्वत:च्या गाडीत ड्रायव्हिंग सीटवर बसून सुरु करतात. तेव्हा कपड्यांवर धूळ, मातीचा लवलेशही दिसत नाही. इतक्यात अचानक अवतरलेला इरफान खान बाजूच्या सीटवर येऊन बसतो आणि त्यांचा सिक्वल अपूर्णावस्थेत थांबवतो. मग दोघे गाडीबाहेर येऊन 'सत्य' समजून घेतात. ते ऐकून इरफानसुद्धा हताशा आणि संताप ह्यांचा संमिश्र परिणाम अनुभवतो. आजूबाजूला असलेल्या जुन्या लोखंडी मोठमोठ्या पिंपांना लाथा मारतो, उचलून फेकतो, पुन्हा लाथा मारतो, पुन्हा फेकतो ! ऐ.बा.ब. चं एक वेळ ठीक आहे, पण नेहमी संयत असणाऱ्या इरफान खानला अचानक काय झालं काही कळत नाही !
विशेष काही नाही. त्याला संजय गुप्ता भेटलेला असतो.

अजून एका प्रसंगात शाळेत एक धावण्याची शर्यत असते. ही एक अशी अभिनव शर्यत आहे, की तमाम 'ब्रॅण्डेड' आंतरराष्ट्रीय शाळांना, सॉरी 'स्कूल्स'ना, न्यूनगंड यावा. ह्यात प्रत्येक मुलीबरोबर तिच्या आईनेही भाग घ्यायचा असतो. सुरुवातीला मुलगी धावणार आणि नंतर 'बॅटन' आईकडे सोपवणार. मग आईने धावून शर्यत पूर्ण करायची ! ह्या शर्यतीसाठी समस्त माउलींनी त्यांचा नेहमीचाच पेहराव करणे, बंधनकारक होते की नाही, हे माहित नाही. पण आपल्या 'ऐ.बा.ब.' त्यांच्या रोजच्या 'काळा सूट आणि काळी पॅण्ट' ह्या गणवेशातच उतरतात. कुणाचीही आई साडी नेसत नसावी कारण इतर सर्व स्पर्धक माउल्या पंजाबी ड्रेसमध्ये असतात.

ही विचित्र शर्यत संपूर्ण चित्रपटाचं प्रतीकात्मक सार आहे. अशीच एक विचित्र शर्यत नंतर वकीलीण अनुराधा वर्मा (ऐ.बा.ब.) धावते. आपल्या मुलीचं - 'सनाया'चं - पालनपोषण एकटीनेच करणारी अनुराधा शहरातल्या सर्वोत्तम वकीलांपैकी एक असते. आजपर्यंत आपल्या कारकिर्दीतील एकूण एक केसेस जिंकलेल्या अनुराधाच्या एकुलत्या एक मुलीचं अपहरण केलं जातं आणि तिच्या सुटकेच्या बदल्यात अट ठेवली जाते ती बलात्कार व खूनाचा आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या 'नियाझ' नामक एका गुन्हेगाराचा खटला हाय कोर्टात लढवून त्याला सोडवण्याची. मुलीच्या विरहाने कानठळ्या फोडणारा आरडाओरडा करणारी अनुराधा ह्या विचित्र द्विधेत अडकल्यावर जरासुद्धा मेलोड्रामा न करता ताबडतोब कामाला लागते. ह्या कामात तिला मदत करतो, शाळेपासून तिचा मित्र असलेला निलंबित पोलीस निरीक्षक 'योहान' (इरफान खान). तो अनुराधावरील आपल्या एकतर्फी प्रेमाला कोंदणातल्या हिऱ्याप्रमाणे मनात जपून असतो. दोघे मिळून ह्या प्रकरणाला कसं फिरवता येईल आणि 'सनाया'ला कसं वाचवता येईल, ह्यासाठी झटतात.

सरकारी वकिलाच्या भूमिकेत अतुल कुलकर्णीला अगदीच थोडंसं काम आहे, तर एका राजकीय नेत्याची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जॅकी श्रॉफला त्याहूनही कमी !
शबाना आझमींनी रंगवलेली व्यक्तिरेखा आहे 'गरिमा चौधरी'. ज्या मुलीवर पाशवी बलात्कार करून तिचा खून केल्याच्या आरोपाखाली 'नियाझ'ला फाशीची शिक्षा झालेली असते, तिची आई. ऐश्वर्या बच्चन आणि शबाना आझमी जेव्हा जेव्हा एकमेकांसमोर येतात, तेव्हा तेव्हा एका आईची घुसमट कशी असते, हे शबाना आझमी ऐ.बा.ब. ना प्रत्यक्ष दाखवतात. पण सुनबाई काही केल्या बोध घेत नाहीत. त्या फक्त थयथयाट, आकांडतांडव, आरडाओरडा वगैरे धसमुसळेपणा करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे जितकी 'गरिमा चौधरी' आश्वासक वाटते, तितकीच 'अनुराधा वर्मा' भंपक.

कमलेश पांडे ह्यांनी लिहिलेले संवाद खुसखुशीत आहेत. मात्र त्या खुसखुशीत पणातला ९०% भाग इरफान खानसाठी राखीव आहे. Needless to say, त्याने त्याचं सोनंही केलंच आहे !
'इरफान'चा जबरदस्तीने 'इरफानिताभ' करण्याचा प्रयत्न स्वत: इरफाननेच हाणून पाडला आहे. त्याला स्टाईल मारायला लावलेली आहे. खुसखुशीत डायलॉग्ज दिले आहेत. तो हे सगळं करतो, पण तरी स्वत:चं वेगळेपण जपतोच. 'तलवार'नंतर पुन्हा एकदा तो साधारण तश्याच भूमिकेत दिसला आहे. मात्र 'तलवार'मधला त्याचा 'अश्विन कुमार' किती तरी पटींनी इथल्या 'योहान'पेक्षा जास्त परिणामकारक आहे, ह्याबद्दल शंकाच नसावी.

संजय गुप्ता हे दिग्दर्शकांमधले 'प्रीतम चक्रवर्ती' असावेत. चित्रपट जिथे जिथे चांगला वाटतो, तिथे तिथे त्यांचं अभिनंदन करताना उगाच 'नक्की ह्यांचंच अभिनंदन करायला हवं ना ?' असा विचार छळतो. सगळ्या मेलोड्रामा व उचक्या, ठेचांनंतरही 'जज़बा' सुमार नक्कीच नाही. ऐ.बा.ब.च्या अतिअभिनयाला इरफान खान आणि शबाना आझमी सांभाळून घेतात आणि चित्रपट 'बघणेबल' बनतो. तर कधी नव्हेतो संगीतही छळवाद मांडत नाही. 'जाने तेरे शहर का क्या इरादा है..' हे गाणं तर मनात घरही करतं. त्यासाठी 'अर्को' ह्या नाव न वाटणाऱ्या नावाने संगीत देणाऱ्या व्यक्तीचे आभार !

२००७ साली नामवंत दिग्दर्शक सुधीर मिश्रा ह्यांचा 'खोया खोया चांद' म्हणून एक चित्रपट येऊन, आपटून गेला. तो चित्रपट ज्यांनी पाहिला, त्यांना तो कळलाच नाही, त्यामुळे आवडला की नावडला, हे ठरवताच आलं नाही. मात्र त्यात अप्रतिम अशी एक कव्वाली होती. 'क्यूँ खोए खोए चाँद की फ़िराक में तलाश में उदास हैं दिल..' जर चार दशकांपूर्वी एखाद्या चित्रपटात ती कव्वाली असती, तर केवळ तिच्या जोरावर तो चित्रपट भरपूर चालला असता. 'खोया खोया चांद' चार दशकं उशीरा आला होता. असे अनेक चित्रपट काही दशकं उशीरा आलेले असावेत. 'जज़बा'सुद्धा साधारणपणे दोन दशकं उशीरा आलेला चित्रपट आहे. हा चित्रपट अश्या काळात आला आहे, जेव्हा चित्रपटाची गणितं बदलली आहेत. आताशा, इतर कथानकांमध्ये एक वेळ चालून जाईल, पण 'थ्रिलर'मध्ये 'थिल्लर'पणा चालत नाही. 'जज़बा'तला अनावश्यक मेलोड्रामा आणि काही अक्षम्य पोरकटपणा व चित्रीकरणातील ठसठशीत उणीवा, त्याच्या नाट्यनिर्मिती व उत्कंठावर्धकतेला मारक ठरतात. वीस वर्षांपूर्वी ह्या उणीवांसहही 'जज़बा' कदाचित, 'Edge of the seat' ड्रामा म्हणवला जाऊ शकला असता. पण गुप्ताजी, तुम्ही किमान वीस वर्षं उशीर केलात !

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये ११ ऑक्टोबर २०१५ रोजी प्रकाशित झाले आहे :-


No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...