Sunday, June 28, 2015

'जाने भी दो यारो' च्या स्मृती ! (Movie Review - Miss Tanakpur haazir Ho)

आलिशान स्टार हॉटेलमधला चहा आणि त्याच हॉटेलबाहेर असलेल्या रस्त्यावरच्या एखाद्या टपरीवरचा चहा, ह्यात फरक आहे. जो सच्चा चहाप्रेमी असेल, त्याला वेगवेगळ्या किटलीतलं गरम पाणी, गरम दूध, पिशवीतली चहा पावडर आणि साखरेला 'शुगर क्यूब' म्हणणं झेपतच नाही. त्याला तो एकाच भांड्यात उकळलेला, आलं घातलेला वाफाळता कडक काढासदृश चहा काचेच्या जुनाट छोट्या कपातून प्यायल्याशिवाय समाधान मिळतच नाही. तो घरात असताना स्वत:चा चहासुद्धा असाच बनवतो. गाळल्यानंतर भांड्याला आतल्या बाजूने चहाने सिग्नेचर सोडली पाहिजे, असा त्याचा होरा असतो.
मोठमोठे स्टार्स असलेले बिग बॅनर 'पिच्चर' आणि कुणीच 'स्टार' नसलेले स्मॉल बजेट 'चित्रपट' ह्यांच्यातही असाच फरक असावा. हे स्मॉल बजेट चित्रपट बऱ्याचदा मनातल्या मनात त्या चहावाल्याच्या थर चढलेल्या भांड्यात उकळणाऱ्या चहासारखे उसळत राहतात आणि चित्रपट संपून चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर सच्च्या चित्रपटप्रेमीच्या मनाच्या आतल्या बाजूने एक वलयाकार सिग्नेचर सोडतात. जशी 'मिस तनकपूर हाजिर हो' सोडतो.

हरयाणातल्या एका छोट्याश्या 'तनकपूर' गावात एक जमीनदार असतो. 'सुवालाल' (अन्नू कपूर). गडगंज जमीनदाराला असावा, तसा माज असलेला आणि कानूनपेक्षा 'लंबे हाथ' असलेला. बुढ्ढ्या सुवालालची तरुण पत्नी 'माया' (हृषिता भट), पिअक्कड नवऱ्यापासून शारीरिक व भावनिक सुखाला वंचित असते. गावात विजेची डागडुजी, उपकरणांची दुरुस्ती वगैरे वरकामं करणारा तरुण 'अर्जुन' (राहुल बग्गा) मायाला भावनिक आधार देतो आणि दोघांत जवळीक निर्माण होते. सुवालालला पत्नीवर संशय असतोच. त्याला हे प्रकरण समजतं आणि सुरु होते अर्जुनची ससेहोलपट आणि त्याच्या कुटुंबाची फरफट. स्वत:ला 'टेन प्लस टू' म्हणून गावात सगळ्यात शहाणा समजणारा सुवालाल पोलीस, वकील, खाप पंचायत सगळं काही 'मॅनेज' करून अर्जुनला आयुष्यातून उठवायचा चंग बांधतो आणि तसं करतोसुद्धा.

विश्वासघात, बदला वगैरेच्या अनेक कहाण्या आपण पाहिलेल्या आहेत. पण 'मिस तनकपूर' पूर्णपणे वेगळा ठरतो हाताळणीमुळे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ह्यात एक उपरोधिक विनोदी वातावरण जपलेलं आहे. जागोजाग उत्तम परिस्थितीजन्य आणि सूचक संवादांतून खुसखुशीत विनोदनिर्मिती केलेली आहे. सिस्टमचा वरवंटा जेव्हा धनदांडगे हातात घेतात, तेव्हा त्या वरवंट्याखाली सामान्य माणूस कसा भरडला जातो, हे दाखवत असताना तिरकस विनोद करून हे सत्य अधिकच बोचरं केलं आहे. शोकांतिकेला विनोदी ढंगात सादर केल्यामुळे आपण 'जाने भी दो यारो' च्या स्मृतींनाही उजाळा देतो, हे ह्या चित्रपटाचे सगळ्यात मोठे यश. ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत कुणीही नाही. असेलच तर 'सिस्टम' आहे. इथला हीरो लाचार आहे. तो स्वत:वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कधीच पेटून उठत नाही. इथले बहुतेक जण खलपुरुष आहेत. पण ते अत्याचारी असले, भ्रष्ट असले तरी राक्षसी नाहीत. इथे दाखवलेली सिस्टम नालायक आहे, पण भडक निर्लज्ज नग्न नाही.
अन्नू कपूरना एका पूर्ण लांबीच्या चांगल्या भूमिकेत बघताना खूप आनंद होतो. त्यांचा हरयाणवी सुवालाल योग्य प्रमाणात कपटी, मस्तवाल, हरामखोर, मूर्ख वगैरे आहे. ह्यातल्या कशाचंही प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त ते होऊ देत नाहीत.

सुवालालच्या जोडीला त्याचा उजवा हात म्हणून 'भीमा' (रवी किशन) आणि 'पंडित' (संजय मिश्रा) आहेत. रवी किशन भोजपुरी सिनेमातला सुपरस्टार. त्याने हिंदीत तेरे नाम, आन, वेल डन अब्बा, ४०८४ वगैरेसारख्या सिनेमांत चांगल्या भूमिका केल्यायत. इथेही सांगकाम्या बिनडोक 'भीमा'च्या भूमिकेत तो धमाल करतो.

संजय मिश्रा हे आजच्या घडीच्या अनेक उत्तम अभिनेत्यांपैकी एक आहेत. 'आँखों देखी' सारख्या समांतर चित्रपटांतून त्यांनी स्वत:चे नैपुण्य दाखवून दिलं असलं तरी मुख्य प्रवाहात काही त्यांना अजूनही म्हणावी तशी संधी मिळालेली नाही. नेहमी एका विनोदवीराची जागा ते भरून काढत असतात. इथला त्यांचा भोंदू पंडितही ह्यापेक्षा काही फार वेगळं करत नाही.

अभिनयाच्या चालत्या-फिरत्या विद्यापीठांपैकी एक ओम पुरी भ्रष्ट पोलीस अधिकारी मातंगसिंगच्या भूमिकेत आहेत. प्रत्येक प्रसंगात मातंगसिंग हास्यतुषार उडवतो. पाण्यात बसलेल्या म्हशींतून नेमकी हवी ती म्हैस ओळखण्याचा प्रसंग तर जबरदस्तच वठला आहे !

हृषिता भटला विशेष काम नाही. जे आहे ते ती व्यवस्थित करते.
राहुल बग्गा आश्वासक, लक्षवेधी वगैरे नाही. बस पडद्यावर एक व्यक्ती आहे, ह्यापेक्षा जास्त त्याचा वावर जाणवत नाही.

'इन कुत्तो के सामने नाच बंसती नाच..' हे एकमेव गाणं चांगलं जमलं आहे. संगीत कहाणीच्या मध्येमध्ये लुडबुड करत नाही. पार्श्वसंगीत पडद्यावरील नाट्याचा गळा आवळत नाही.

हा चित्रपट खऱ्या अर्थाने मूळ पत्रकार असलेल्या लेखक-दिग्दर्शक विनोद काप्रींचा आहे. 'मला ह्या चित्रपटातून काय सांगायचं आहे आणि कसं', हे काप्रींना अगदी व्यवस्थित माहित होतं आणि एकाही प्रसंगात ते त्यांच्या विचारापासून दूर जात नाहीत. ही कहाणी काही सत्यघटनांवर आधारित आहे. काप्रींनी एक पत्रकार म्हणून ह्या घटनांना जवळून पाहिलं असल्याची शक्यता आहे, कदाचित म्हणूनही काही वेगळेच तरंग त्यांच्या मनात उठले असावेत, जे ह्या चित्रपटाद्वारे सर्वदूर पोहोचतील. किंबहुना पोहोचायला हवे, पण पोहोचतील की नाही हे मला माहित नाही. कारण हा चित्रपट सामान्यांच्या गळी उतरेल असा नाही, हे मला चित्रपटगृहात असलेल्या मोजक्याच लोकांना पाहिल्यावर जाणवलं.

न्यायाधिशाच्या पिकनिकचं पांचट रटाळ चित्रण आणि झोपमोड केली म्हणून त्याने एका वात्रट पोराच्या श्रीमुखात भडकावणं, असा सगळा तद्दन भोंगळ व पोरकट कार्यक्रम सिस्टमवर 'सूचक' भाष्य करण्यासाठी करण्यापेक्षा एक मुक्तपणे धावत सुटलेली म्हैस दाखवणं कैक पटींनी कल्पक वाटतं.

'जाने भी दो यारो' मध्ये अखेरच्या दृश्यात दोन निष्पाप तरुण स्वत:च्या गळ्यावरून बोट फिरवून माना खाली टाकतात. तसंच इथे चित्रपटाच्या सगळ्यात अखेरच्या दृश्यात 'मुक्तपणे धावत सुटलेली म्हैस' हे सिस्टमवर सूचक भाष्य आहे.

असे फार कमी चित्रपट असतात की ते पाहत असताना संपूच नयेत, असं वाटतं. 'मिस तनकपूर..' असाच एक आहे. सच्चा चहाप्रेमी टपरी शोधून काढतो, तसंच सच्चा चित्रपटरसिकही ह्या चित्रपटापर्यंत पोहोचावा, अशीच एक प्रामाणिक इच्छा आहे.

रेटिंग - * * * *

हे परीक्षण दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२८ जून २०१५) रोजी प्रकाशित झाले आहे -


Monday, June 22, 2015

वृत्तवैभव काव्यस्पर्धा

वृत्तात लिहिणे ही एक कला आहे. एक साधना आहे. ती श्रद्धेने करत राहावी लागते. काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षं. मग कधी तरी एक वेळ अशी येते की वृत्त वृत्तीत उतरतं. पावसाचं पाणी जमिनीत झिरपून खोलवर कुठे तरी त्याचा अज्ञात, अथांग साठा बनतो, तसं काही तरी होतं. खोलवर मनात ती शिस्त झिरपते. भावनेच्या आंदोलनांना एक लय मिळते. पण ह्यासाठी वेळ द्यावा लागतो.
वृत्तात लिहिणारे दोन प्रकारांत मोडतात. एक ज्यांची साधना चालू आहे आणि दुसरे ज्यांच्या अंतरंगात वृत्त झिरपलं आहे.
छंद, वृत्ताला नाकं मुरडणारे लोक एक तर ह्या पहिल्या प्रकारात असतात किंवा त्यातही नसतात.
वृत्तात लिहिणं आत्मसात करायची गोष्ट आहे. मेहनतीची गोष्ट आहे. त्यासाठी श्रद्धा हवी, संयम हवा. हे क्वचितच कुणात असतं. त्यामुळे सोपा रस्ता निवडला जातो. वृत्तबद्धतेला कृत्रिम, नकली वगैरे मानायचं.
पण मित्रांनो,
नियम नाकारण्याचा, तोडण्याचा अधिकार मिळवण्यासाठी आधी नियम पाळायची कुवत आत्मसात करायला हवी. केवळ बहुसंख्य लोकांच्या आळसामुळे कविता आपल्या सौंदर्यस्थळांना मुकणार असेल तर ते आपण तरी होऊ देणार नाही.
ह्याच भावनेतून एक वेगळी काव्यस्पर्धा आयोजित केली गेली आहे -

~ ~ 'वृत्तवैभव काव्यस्पर्धा' ~ ~

ही स्पर्धा केवळ वृत्तबद्ध कवितांची स्पर्धा आहे.

स्पर्धेचे नियम :-

१. एका कवी/ कवयित्रीने एकच स्वलिखित कविता पाठवावी.
२. कविता अप्रकाशित असावी.
३. कविता mkspardha@gmail.com ह्या मेल आयडीवर पाठवावी. इतर कुणालाही मेल करून किंवा मेसेज करून किंवा प्रिंट अथवा हस्तलिखित देऊन चालणार नाही. तसेच मेल पाठवताना विषय (subject) म्हणून 'मकस आयोजित वृत्तबद्ध काव्यस्पर्धा - १ - सहभाग' हा असावा.
४. कविता 'टेक्स्ट' रुपात आणि देवनागरी लिपीत टंकलेखन करून व 'युनिकोड' फॉण्टमध्ये पाठवावी. फोटो, पीडीएफ इ. स्वरूपातील सहभाग ग्राह्य धरला जाणार नाही.
५. वृत्तबद्ध कवितांची स्पर्धा असल्याने, वृत्तभंग असलेली कविता प्राथमिक चाचपणीतच बाद केली जाईल. ऱ्हस्व-दीर्घ व शुद्धलेखनाच्या इतर चुकांना समजून घेतले जाईलच असे नाही. टंकलेखनातील उणीवा दूर करून पूर्णपणे शुद्ध कविताच मेल करावी.
६. मुसलसल गझल चालू शकेल. गैर-मुसलसल गझल पाठवू नये.
७. मात्रा वृत्त किंवा अक्षरगणवृत्तातली रचनाच पाठवावी.
८. कवितेसोबत वृत्ताचे नाव आणि गण व मात्रा द्यावेत.
९. अनुवादित कविता चालणार नाही.
१०. कवितेसह कवी/ कवयित्रीने स्वत:चे पूर्ण नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक राहील.
११. परीक्षक व आयोजकांचा निर्णय अंतिम राहील. कुठल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यास कुणीही बांधील नसेल.
१२. कविता पाठवण्याची मुदत दिनांक ९ जुलै २०१५ पर्यंत राहील.
१३. स्पर्धेचा निकाल 'मराठी कविता समूहा'च्या २ ऑगस्ट २०१५ रोजीच्या पुणे इथल्या मेळाव्यात आणि नंतर फेसबुकवर Marathi Kavita - मराठी कविता समूह ह्या समूहाच्या पानावर व Marathi Kavita ह्या प्रोफाईलच्या भिंतीवर जाहीर केला जाईल.
१४. यशस्वी कवितांना मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येईल.
१५. ह्या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क नाही.
१६. स्पर्धेच्या नियमांत व आयोजनात काही बदल झाल्यास ते कळवले जाईल आणि असा कुठलाही बदल करण्याचा हक्क आयोजकांना राहील.
सर्वांनी सहभाग घ्यावा, तसेच ही पोस्टसुद्धा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावी.

धन्यवाद !

Sunday, June 21, 2015

ह्या नाचाला नंबर नाय ! (Movie Review - Any Body Can Dance - 2)

'Life is all about a second chance.'
- असं एका प्रसंगात 'विष्णू' म्हणतो. ते थोडंसं पटतं, थोडं नाही. कारण आपण असंही वाचलेलं असतं की, 'Opportunity never knocks the door twice.' पण आपण अशी अनेक विरुद्धार्थी विधानं वाचत/ ऐकत असतो आणि 'सेकंड चान्स'बाबत म्हणायचं झालं तर 'चान्स' म्हणजे नक्की कशाला म्हणायचं, हेच व्यक्तीसापेक्ष असल्याने तो काही लोकांना मिळतही असावा. तसा तो मिळाला होता मुंबईलगत असलेल्या नालासोपाऱ्यातील एका 'डान्स ग्रुप' ला. त्यांच्या त्या पहिल्या चान्सपासून, दुसऱ्या चान्सपर्यंतच्या प्रवासावर 'एनी बडी कॅन डान्स - २' बेतलेला आहे.

'मुंबई स्टनर्स' हा एक डान्स ग्रुप, देशभरात अतिशय लोकप्रिय असलेल्या एका टीव्ही रियालिटी डान्स शोच्या अंतिम फेरीत पोहोचतो. अख्ख्या देशाचं लक्ष ज्या कार्यक्रमाकडे लागलेलं असतं, त्या कार्यक्रमाच्या अंतिम फेरीत 'मुंबई स्टनर्स' बदनाम होतात. कारण त्यांचा डान्स होतो अतिशय उत्तम, मात्र तो 'फीलिपाइन्स' मधल्या एका प्रसिद्ध ग्रुपच्या एका डान्सवरून पूर्णपणे चोरलेला असतो. अगदी स्टेप-टू-स्टेप. ही चोरी चाणाक्ष परीक्षक ताबडतोब पकडतात आणि कॅमेऱ्यासमोर, लाखो लोकांच्या साक्षीने 'मुंबई स्टनर्स' ला स्पर्धेतून बाहेर तर करतातच, पण कठोर शब्दात त्यांची निर्भत्सनाही करतात. संच बाहेर पडतो. फुटतो, तुटतो, कोलमडतो. प्रत्येक सहभागी नर्तकाची त्याच्या घरी, कामाच्या ठिकाणी, लोकांमध्ये 'छी: थू' होते. 'स्टनर्स' चा मुख्य नर्तक व नृत्य दिग्दर्शक असलेल्या 'सुरु' (वरुण धवन) साठी तर एक स्वाभिमान व अस्तित्व परत मिळवण्याची लढाईच सुरु होते. ह्या बदनामीच्या बट्ट्याला पुसण्यासाठी काही तरी खूप मोठं करून दाखवायचं असतं. सेकंड चान्स असतो 'लास वेगास हिप हॉप' ह्या जागतिक खुल्या नृत्य स्पर्धेचा. विखुरलेल्या संघाला उभारण्यासाठी, नव्या बांधणीसाठी, तयारीसाठी एका चांगल्या नृत्य दिग्दर्शकाची गरज असते आणि त्यांना देवासारखा भेटतो, 'विष्णू' (प्रभूदेवा)



पुढे जे काही होतं, ते होतं. पण ते जसं कसं होतं, ते आपण 'य' वेळा आणि 'य' चित्रपटांतून पाहिलेलं आहे. त्यामुळे मध्यंतरानंतरचा चित्रपट शांतपणे झोप काढण्यासाठी आहे. 'मुंबई स्टनर्स' सेकंड चान्ससाठी खूप मेहनत करतात. पण चित्रपटकर्त्यांनी सेकंड हाफसाठी काही मेहनत केलेली नाही. इथला मालमसाला ते 'जो जीता वोही सिकंदर' पासून 'हॅप्पी न्यू इयर'पर्यंत विविध चित्रपटांतून उचलतात. मध्यंतराच्या आधी खूपच आश्वासक वाटलेली ही ABCD नंतर पुढची मुळाक्षरं गिरवतच नाही आणि सपशेल भ्रमनिरास होतो.
ह्याच्या जोडीला अतिशय फुसके संवाद आहेत. जे काही दमदार प्रसंगातलीसुद्धा हवा काढून घेतात. खच्ची झालेल्या संघाचं, सहकाऱ्यांचं मनोबल उंचावणारी कित्येक भाषणं, संभाषणं आपण आजपर्यंत पडद्यावर व प्रत्यक्ष जीवनातही ऐकली, पाहिली असतील. त्या सगळ्यांतलं सगळ्यांत फुसकं भाषण वरुण धवनच्या तोंडी ह्या चित्रपटात आहे. (ज्याची सार्थ खिल्ली नंतरच्या काही मिनिटांत त्याचाच संघसहकारी उडवतोसुद्धा !) द व्हेरी फेमस ' We dont dance to impress, we dance to express', सुद्धा काही मजा आणत नाही. मुळात हे वाक्य तद्दन फसवं वाक्य आहे. हे लोक एका स्पर्धेत भाग घेत आहेत. ती स्पर्धा जिंकण्यासाठी ते डान्स करत आहेत. अश्या वेळी ते 'इम्प्रेस' करण्यासाठीच तर डान्सत आहेत ! एक्स्प्रेस करण्याचा डान्स वरुण धवन, कॅमेऱ्यासमोर इज्जत गेल्यानंतर घरी आल्यावर करतो, तोच असतो. त्याव्यतिरिक्त सगळे डान्स हे 'इम्प्रेस' करण्यासाठीच आहेत. ही अशी टाळीबाज गोंडस वाक्यं टाकली म्हणजे काही तरी महान कलाकृती केली किंवा थोर धडा दिला, असं काही वाटत असावं बहुतेक, त्यामुळे त्यांच्या सत्यासत्यतेचा पडताळा करून पाहायची गरज लक्षातच येत नसावी.

दुसरं असं की 'असे चित्रपट नृत्याला उंच पातळीवर नेऊन ठेवतात, ते कलेला वाहिलेले आहेत', वगैरे खोटे आव आणून पाहिले व दाखवले जातात. 'एनी बडी कॅन डान्स' असं शीर्षकात कलेचं नाव घातलं की चित्रपट कलेला वाहिला जात नाही. त्यासाठी कलेच्या साध्यापेक्षा साधनेवर लक्ष केंद्रित व्हायला हवं. कुठलीही कला 'शिकली' जात नाही. ती आत्मसात करायला जन्म निघून जातो. मात्र आज, चार-दोन धडे गिरवले की कुठल्या न कुठल्या टीव्ही शोमध्ये किंवा कुठल्या न कुठल्या स्पर्धेत झळकण्याची घाई लागलेली दिसते. किंबहुना, कलेचं तेच अंतिम ध्येय आहे, असाच समज पसरत चाललेला आहे. असंच काहीसं इथे दिसतं. एका स्पर्धेत नाक कापलं गेल्यावर दुसऱ्या स्पर्धेत भाग घेऊन 'खोई इज्जत वापस लाना' हा खूपच थिल्लर विचार वाटतो. स्पर्धेत जिंकण्यासाठी जर चोरी करावीशी वाटते, तिथेच कला हरते. त्यानंतर तिला पुन्हा राजी करण्यासाठी तुम्हाला स्वत:ची सृजनशीलता वाढवायला हवी. पण आजचं राजकारण आश्वासनांच्या पुढे जात नाही आणि आजची कलोपासना स्पर्धांच्या पुढे !

वरुण धवन आणि श्रद्धा कपूर त्यांच्या मर्यादित अभिनयकौशल्याला प्रामाणिक मेहनतीची जोड देतात आणि 'सुरु' व 'विनी' चांगले साकारतात. पण त्या व्यक्तिरेखांचं लेखनच कमकुवत आहे. त्यांच्या भावनांना वाट करून देण्यासाठी त्यांना स्पर्धेच्या 'रिहर्सल्स'मधून दिग्दर्शक-लेखक डोकंच वर काढू देत नाहीत ! शाळेत बिनडोक खरडपट्टी व घोकंपट्टीचा गृहपाठच इतका द्यावा की विद्यार्थ्यांना स्वत:चं डोकं वापरायला वेळही मिळू नये अन् इच्छाही वाटू नये
आणि ते 'विद्यार्थी' न राहता 'परीक्षार्थी' बनावेत, तसंच हे लोक 'कलाकार' न बनता 'स्पर्धक'च बनतात.
नृत्याबाबत बोलायचं झाल्यास वरुण धवन खूपच सहज वाटतो. त्याने दाद देण्यालायक सादरीकरण केलं आहे. मात्र श्रद्धा कपूर विशेष 'इम्प्रेस' करत नाही. उत्तरार्धात काही काळ तिला दुखापतीमुळे नृत्य करता येत नाही असं दाखवलेलं आहे. हे पांचट नाट्यनिर्मितीसाठी असलं, तरी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तिला अश्या एका विश्रांतीची गरजही असावी.
प्रभूदेवाचा 'विष्णू' दाक्षिणात्य दाखवून त्याच्या असह्य हिंदी उच्चारांवर एक परस्पर उपचार केला गेला आहे. त्याला जो काही अभिनययत्न करायचा असेल, तो करायला त्याला १-२ प्रसंग दिले आहेत, त्या व्यतिरिक्त तो काही करत नाही. एकदा मस्तपैकी नाचतो. त्याच्याकडून त्यापेक्षा जास्त आपली अपेक्षाही नसतेच !

'हिप हॉप'वरचा चित्रपट आहे, त्यामुळे संगीत अत्याचारी असण्याची शक्यता मी गृहीत धरली होती. मात्र, सुखद आश्चर्याचा धक्का असा की संगीत बऱ्यापैकी जमून आलेलं आहे. 'हॅप्पी अवर', 'वंदे मातरम' आणि 'गणराया' ही गाणी बरी आहेत.

सर्वच नृत्यं सफाईदार आहेत. मला त्यांत भावनिकता औषधापुरतीच दिसली. भले त्यांनी एक्स्प्रेस-इम्प्रेसच्या कितीही बाता मारल्या तरी. वरुणचा सोलो डान्स - जो टीव्हीवर इज्जत गेल्यानंतर तो घरी आल्यावर करतो - तो थोडासा एक्स्प्रेसिव्ह वाटला. पण तरी त्यात भावनिक उद्रेक न दिसता शारीरिक उचंबळच जास्त जाणवला. ही जागा खरं तर त्याची अपराधीपणाची भावना कल्पकपणे दाखवण्यासाठी उत्तम होती, तिचा सुयोग्य वापर झाला असं वाटलं नाही.

संपूर्ण चित्रपटाचा विचार केल्यास डान्सशिवाय दुसरं काही नाही आणि तो डान्ससुद्धा 'कसरती व चित्रविचित्र अंगविक्षेप बीट-टू-बीट करणे' ह्या पठडीतला आहे. नृत्यात भावनाविष्कार किंवा चित्रपटात भावनाप्रधानता बघणारे रसिक प्रेक्षक ह्या चित्रपटाकडे जाणार नाहीतच. गेलेच, तर ते ह्या नाचाला नक्कीच 'नंबर' देणार नाहीत !

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२१ जून २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-



Thursday, June 18, 2015

'अ‍ॅक्टिंग'चा कीडा

काल संध्याकाळी धो-धो पाऊस पडत असताना मला इस्त्रीला दिलेले कपडे आणायला दुकानात जावं लागलं, तेव्हा अचानकच त्याची आठवण आली.

'तो' रोज संध्याकाळी सहा ते आठच्या दरम्यान यायचा. कॉलनीतल्या आसपासच्या पन्नास एक बिल्डींग्सपैकी किमान पंचवीस बिल्डींग्समध्ये तरी तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन इस्त्रीचे कपडे घ्यायचा किंवा परत द्यायचा. सोबत एक सायकल तिला एक कपड्यांचं मोठं बोचकं. येताना एकच असायचं. जाताना ते बोचकं जितकं कमी होईल तितकंच एक अजून तयार होत असे. घेउन आलेलं बोचकं अर्थातच इस्त्री केलेल्या कपड्यांचं आणि वाढलेलं, नव्याने इस्त्रीसाठी घेतलेल्या कपड्यांचं. आज नेलेले कपडे उद्या परत, घरपोच.

साधारण विशीच्या आसपास असेल तो. आमच्यापेक्षा ४-५ वर्षं मोठाच. पण आम्ही खूप खेचायचो त्याची.
त्याला 'अ‍ॅक्टिंग'चा जाम कीडा होता. तो कपडे घेउन येताना दिसला की आमचा प्लान शिजायचा. मग कधी त्याच्या हेअरकटची, कधी कपड्यांची, कधी 'स्टाईल'ची तारीफ करायची, कधी त्याला अजून काही तरी किल्ली मारायची की तो लगेच एखादा अमिताभ, शाहरुख, संजय दत्त, अनिल कपूर दाखवायचा. पंधरा-वीस मिनिटं, अर्धा तास आमच्यात वेळ घालवल्यावर त्याला धंद्याची आठवण व्हायची, की तो लगबगीने समोरच्या बिल्डींगमध्ये जायचा. लॉबीतल्या खिडकीतून आमच्याकडे बघून तिथूनही केसांतून हात फिरवून, हवेत हातवारे करून अदाकारी दाखवायचा. तो मनापासून करत असलेल्या सादरीकरणाची तितक्याच मनापासून खिल्ली उडवण्याइतपत नालायकपणा आमच्यात होताच, पण तो त्याला समजूही न देण्याचा लबाडपणाही आम्ही अंगी बाणवला होता.

नितीश भारद्वाजसारखा दिसायचा जरासा. चेहऱ्यावर तसंच 'कृष्णा'सारखं स्मितही हसायचं. फरक एकच होता. नितीश भारद्वाजच्या कृष्णाच्या चेहऱ्यावरचं स्मित सर्वज्ञाची झळाळी दाखवायचं, तर ह्याच्या चेहऱ्यावरचं स्मित अज्ञानातील आनंदाची. त्याची खेचुन झाल्यावर आम्ही त्याला 'बिचारा' म्हणायचो, पण त्या अपराधी भावनेचा फोलपणा आमच्या तेव्हा लक्षात येत नव्हताच. एकट्या अभ्याला येत असावा बहुतेक. कारण तो कधीच त्याची मस्करी करायचा नाही. अभ्या स्वत:सुद्धा चांगला नक्कलाकार असल्याने असेल कदाचित. कित्येकदा तो त्याला आमच्यातून ओढून बाहेरही काढायचा आणि त्याच्या कामावर जायला लावायचा.

अभ्याला त्याने त्याची कहाणीसुद्धा सांगितली होती.
उत्तर प्रदेशातून आला होता तो. घरची परिस्थिती विशेष काही नव्हती. घरची परिस्थिती चांगली नसलेले उत्तर प्रदेशातील बहुतांश लोक जे करतात, तेच त्याच्या आई-वडिलांनी केलं. त्याला शहरात पाठवायचं ठरवलं. 'कानपूर, अलाहाबाद, लखनऊ, दिल्ली, कोलकाता कुठेही जाणार नाही, गेलो तर मुंबलाच जाईन', असं त्याने ठणकावून सांगितलं. कारण ? 'अ‍ॅक्टिंग'चा चसका ! 'मुंबईला आलो की पिक्चरमध्ये गेलोच' ह्या फिल्मी विचाराने पछाडलेला तो कुठल्या तरी दूरच्या नातेवाईकाकडे मुंबईला आला आणि त्या नातेवाईकाने त्याला स्वत:च्या कामावर जुंपला.
सुरुवातीला तो अभ्याला विचारायचा, जुहूला कसं जायचं ? बॅण्ड स्टॅण्डला कसं जायचं ? पाली हील कुठे आहे ? ताज महाल, ओबरॉय हॉटेलला जाता येतं का ? (त्याला मुंबईत येतानाच 'ताज महाल हॉटेल' हे नाव माहित होतं आणि तिथे झाडून सगळे फिल्म स्टार्स रोज रात्री येत असतात, असंही वाटत होतं. पण कुठून तरी त्याला असं कळलं होतं की त्याच्या आसपासच्या भागात जाण्यासाठी 'स्पेशल पोलीस परमिशन' घ्यायला लागते !) एकदा अभ्या त्याला 'प्रतीक्षा'ला घेऊन गेला. तिथे गेल्यावर हा पठ्ठ्या परत यायला तयारच होईना ! अमिताभला बघितल्याशिवाय जायचंच नाही म्हणे. कसंबसं परत आल्यावर मात्र अभ्याने कानाला खडा लावला, पुन्हा कुठे घेउन जाणार नाही. फार तर सांगीन कसं जायचं ते, बस् !
मग हळूहळू कामाच्या रगाड्यात आणि बहुतेक नातेवाईकाने टाकलेल्या प्रेशरमुळे त्याची हौस कमी कमी होत संपून गेली. 'अ‍ॅक्टिंग'चा कीडा आम्ही फरमायीश करण्याची वाट पाहत वळवळत असायचा. तो आणि त्याचा कीडा दोघेही बिचारेच होते.

त्याच्या घरोघर जाऊन कपडे घेण्या-पोहोचवण्यामुळे कॉलनीतल्या आळशी पिअक्कड इस्त्रीवाल्याचा धंदा मात्र बसला.
एक दिवस संध्याकाळी धो-धो पाऊस पडत असताना, दाराची बेल वाजली. मी दार उघडलं. 'तो' होता.
रडवेल्या सुरात तो म्हणाला, 'रणजित भाय, ज़रा देखो ना.. यह मुझे परेशान कर रहें हैं. बोलते हैं इधर वापस आना नहीं. मैं अभिजित भाय के घर पे गया, ताला हैं. मेरी मदद करो. इनको बोलो ना ज़रा..!!'
मी. वय १५-१६. उंची जेमतेम ५ फुट. पडवळासारखे दंड. आणि तो माझ्याकडे मदत मागत होता.
तरी मी बाहेर येऊन पाहिलं. कॉलनीतला इस्त्रीवाला तारवटलेल्या डोळ्यांनी माझ्यावर धावून आला. इतक्यात त्याच्याबरोबरच्या एकाने त्याला थांबवलं. मला खूण केली की 'मी पाहून घेतो.' आणि त्याला गळ्यात हात टाकून घेउन गेला.
पाऊसही पडत होता. मी काही करूही शकत नव्हतोच. मी त्याला टिपिकल मध्यमवर्गीय डरपोक सल्ला दिला.
'अभी वोह गया हैं. तुम्हारा कुछ और काम हो, तो रहने दो उसे. पहले यहाँ से निकलो और अपने मामाजी को जा के बता दो.'
बुडत्याला काडीचा आधार वाटतो. त्याला माझ्या पुचाट सल्ल्यातून आधार मिळाला आणि तो मला हात जोडून thank you म्हणून निघून गेला.
त्या रात्रीच मामाजी आणि ४-५ जण कॉलनीतल्या इस्त्रीवाल्याची 'भेट' घेउन गेले. चार दिवसांनी 'तो' परत आला. पुन्हा आधीसारखा धंदा सुरु झाला होता. पण नंतर आम्ही घर बदललं. गव्हर्न्मेंट क्वार्टर होतं ते. मोठं क्वार्टर अलॉट झालंच होतं. आणखी काही दिवसांनी पुन्हा घर बदललं आणि नंतर शहरच बदललं.
अभ्यानेही खरं तर कॉलनी सोडली. पण त्याला बरीच 'खबरबात' असते म्हणून मध्यंतरी एकदा त्याला विचारलं होतं की, 'तो' काय करतो ?
फिल्म सिटीत कुठल्या तरी स्टुडीओत हेल्परचं काम करतो म्हणाला.
आधी वाईट वाटलं. पण मी 'तो' जितका ओळखला, त्यावरून तरी हे चांगलंच झालं होतं. कधी तरी अमिताभ त्याला नक्की दिसेल किंवा आत्तापर्यंत दिसलाही असेल !

त्याचं नाव ? काय करायचंय नाव ?
त्याच्यासारखे किती तरी जण ह्या मुंबईने ओढून घेतले आहेत. कोळ्याच्या जाळ्यात कीडा अडकतो, तसे हे 'अ‍ॅक्टिंग'चे कीडे मुंबईत अडकतात. कोळी कीडा गिळतो, मुंबई असे अनेक 'तो'.

इस्त्रीच्या दुकानात पोहोचलो. कपडे घेईपर्यंत पाऊस थांबला होता. थांबणारच ! तो मुंबईचा थोडीच होता ?

- रणजित पराडकर

प्रसिद्धी - मासिक 'श्री. व सौ.' 

Sunday, June 14, 2015

रडीयल अ'सुरी' कहानी (Movie Review - Hamari Adhuri Kahani)

चित्रपट सुरु. एक बस कुठल्याश्या नयनरम्य रस्त्यावरून जाते आहे. आजूबाजूला सुंदर अशी उंच उंच झाडं आहेत. बसमध्ये एका खिडकीशी विद्या बालन बसली आहे. (तिचे केस रंगवून तिला म्हातारी दाखवायचा एक केविलवाणा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे, असा संदर्भ आपल्याला वीसेक मिनीटांनंतरच्या एका दृश्यात लागणार असतो.) तिचे डोळे आसवांनी भरलेले आहेत. चेहऱ्यावर बारा वाजलेले आहेत. बस थांबते. विद्या एकटीच त्या निर्जन रस्त्यावर उतरते. दिग्दर्शक खूपच हुशार आहे. त्याला माहित असतं की हा भूभाग भारतातला आहे, असं कुणाला वाटणं केवळ अशक्य आहे. म्हणून त्या बसवर बटबटीत अक्षरांत 'छत्तीसगड' असं लिहिलेलं असतं, जे जाता जाता ती बस व्यवस्थित दिसेलसं दाखवून जाते. ही पहिली पाचेक मिनिटं खरं तर एक 'हिंट' म्हणून आहेत. ह्यावरून आपल्याला समजुन येऊ शकतं की पुढील दोनेक तास डबडबलेले डोळे, ओघळणारे अश्रू, ओढलेले चेहरे वगैरेच्या जोडीला अविश्वसनीय, अशक्यप्राय संदर्भ असा सगळा एक अतिप्रचंड रडीयल मेलो-ड्रामा आपल्या माथी येणार आहे. सिगरेटच्या पाकिटावर असणाऱ्या 'वैधानिक चेतावनी' प्रमाणे ही एक हिंट आहे, जेणेकरून ह्या अपायकारक चित्रपटाला सुज्ञ प्रेक्षक वेळीच सोडून देईल. पण सुज्ञ असला, तरी काय झालं ? पैसे देऊन तिकीट घेतलेलं असतं, त्यात बाहेर बिन-पावसाचा ओलाचिक उकाडा ! म्हणून प्रेक्षक 'रडीयल तर रडीयल ही कहानी बघूच' असा विचार करून एअरकंडीशन्ड चित्रपटगृहात बसून राहतो.

तर होतं काय की, (दाखवलेल्या घटनाक्रमानुसार अंदाजे) १९९४-९५ च्या आसपास मुंबईत एका पुरातन विचारांच्या कुटुंबातल्या 'वसुधा'चं (विद्या बालन), तितक्याच पुरातन विचारांच्या 'हरी'शी (राजकुमार राव) तिच्या आवडीविरुद्ध लग्न होतं. हरीची प्रेम व्यक्त करण्याची, दाखवण्याची पद्धत असुरीच असते. तो वारंवार तिला तिच्या स्त्री व स्वत:च्या पुरुष असण्याची जाणीव करून देत असतो, तिच्या हातावर जबरदस्तीने स्वत:चं नाव गोंदवतो, (इथे 'हरी'चा 'हरि' केला आहे. पण आजकाल शाळेतही शुद्धलेखनाचे मार्क कापत नाहीत, त्यामुळे हे चालवून घेऊ.), बंधनं घालतो वगैरे. मेलो-ड्रामा ! (अग्निसाक्षी आठवला का ?) पण हे सगळं एकच वर्ष. एक दिवस तो कामानिमित्त ओरिसात जातो, तो गायबच होतो. वसुधाच्या कडेवर एक महिन्याचा मुलगा 'सांझ' (हे मुलाचं नाव आहे, हे नव्यानेच समजलं) सोडून. ज्याप्रमाणे पृथ्वीसाठी एकच आभाळ असतं, त्याचप्रमाणे 'वसुधा'साठी एकच 'हरी' असतो. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे तिच्या प्राणाहून मौल्यवान असतं. तिच्यासाठी तिचा पती हाच परमेश्वर, सर्वस्व वगैरे असतो. त्यामुळे ती त्याची वाट पाहत ५ वर्षं काढते. 'अडली वसुधा हरीचे पाय धरी' असा न्याय, ठार-मेलो-ड्रामा ! मग एके दिवशी तिच्या आयुष्यात 'आरव' (अनेक चित्रपटांत परस्त्रीस नादी लावणाऱ्या नरपुंगवाची भूमिका साकारण्याचा तगडा अनुभव असलेल्या 'इम्रान हाश्मी'ने साकारलेला) येतो. त्याचीही एक वेगळी इमोशनल कहानी असते ! त्याच्या आईची कहानी आणि वसुधाची कहानी एकसारखीच असते ! तिलासुद्धा तिच्या नवऱ्याने टाकलेलं असतं आणि लहानग्या आरवसाठी ती कॅब्रे गायिका बनते. तिथला मालक तिचे अनेकदा अपमान करत असतो. एकदा जेव्हा ती तिला आणि आरवला आधार देणाऱ्या 'जीवन' अंकलसाठी दारू चोरते, तेव्हा तो तिला धक्के मारून हाकलून देतो. तेव्हाच पोरगेला आरव शपथ घेतो, दुनिया मुठ्ठी मे करण्याची ! तत्क्षणी-मेलो-ड्रामा, रेस्ट इज हिस्टरी ! (दीवार आठवला का ?)

पाच वर्षं गायब असलेला हरी 'योग्य वेळी' परतणार असतो, परततोच ! ही पाच वर्षं तो कुठे असतो ? परत आल्यावर, आपल्या सुविद्य पत्नीच्या नव्या नात्याबद्दल कळल्यावर तो काय करतो ? क्या बीतती है उस पर ? वगैरे बाबी किरकोळीत उरकून घेतल्या आहेत. बहुतांश वेळ वसुधा-आरवची इमोशनल तत्वज्ञानी डायलॉगबाजी चालते, अधूनमधून कुणी ना कुणी मुळूमुळू किंवा ओक्साबोक्षी किंवा हमसाहमसी, मनातल्या मनात किंवा गाडीतल्या गाडीत किंवा दाढीतल्या दाढीत अश्रूदान करत राहतं. सगळ्याच्या अखेरीस ही अधुरी कहानी एकदाची 'सुफळ संपूर्ण' झाल्यावर 'समोरचा पडदासुद्धा निथळत असावा की काय', असा भास झाल्यावाचून राहत नाही.


'बॉबी जासूस' मध्ये भरभक्कम देहयष्टीची विद्या बालन आपण चालवून घेतली होती, कारण त्या व्यक्तिरेखेला नाजूक दिसण्याची गरज नव्हतीच. पण इथे मात्र विद्याचं 'पडदा व्यापून उरणं' डोळ्यांना खुपतं. बरं, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जागोजाग टिपं गाळण्याव्यतिरिक्त काहीच न करणाऱ्या ह्या तद्दन फुसक्या भूमिकेला स्वीकारून विद्यासारख्या ताकदीच्या अभिनेत्रीने काय साध्य केलं असावं, कुणास ठाऊक? सरतेशेवटी 'ए मुहब्बत तेरे आंसुओ पे अब हंसी उनको आने लगी हैं' अशी कथा होऊन ती रडायला लागली की प्रेक्षक हसायला लागतात !

'इम्रान हाशमी' हा माझ्या मते एक बरा अभिनेता आहे, पण त्याला स्वत:ला आव्हान देणं आवडत नसावं की काय, असं वाटतं. त्याचा 'आरव' त्याच्या बहुतेक चित्रपटांत, नशीब चांगलं नसेल तर, आपण पाहिलेला आहे. तोच चेहरा, तेच भाव, तीच देहबोली, तीच संवादफेक, अरे बाबा, तुझा तुलाच कंटाळा कसा येत नाही ? त्यातल्या त्यात एकच वेगळी गोष्ट म्हणजे, परंपरेला जागून इथे त्याने कुठला बेडसीन तापवलेला नाही ! ही वेगळी गोष्ट उलटूसुद्धा शकते कारण लोकांना इम्रानला पाहण्यापेक्षा त्याची विशिष्ट दृश्यं पाहण्यात जास्त रस असावा !

'राजकुमार राव' च्या 'हरीदर्शना'साठी प्रेक्षक आसुसलेला असतो आणि शेवटपर्यंत तहानलेलाच राहतो. माथेफिरू, वेडगळ, मानसिक रोगी 'हरी' त्याने ताकदीने उभा केला आहे. पण फुटकळ रडारडीत रमलेले लेखक-दिग्दर्शक ह्या हरीला एखाद्या आधीच विलंबाने धावणाऱ्या ट्रेनला सायडिंगला टाकावं, तसं सायडिंगला टाकून ठेवतात. तरी त्याला जेव्हा जेव्हा 'सिग्नल' मिळतो, तेव्हा तेव्हा बिचारा जीव तोडून पळतो. पण सगळं मुसळ केरातच ! चित्रपटाची कथा 'हरी'च्या डायरीत बंदिस्त आहे. ही डायरी 'वसुधा-हरी'चा लग्न झालेला मुलगा 'सांझ' वाचतो आहे आणि त्यांत सगळ्यात कमी कुणाविषयी लिहिलं आहे ? दस्तूरखुद्द !

ट्रेनच्या सायडिंगला टाकण्यावरून आठवलं, शीर्षक गीत चांगलं आहे; पण 'हमारी अधुरी कहानी' हे पालुपद आणि ध्रुवपदाचा उर्वरित भाग ह्याचा संबंध म्हणजे पुलंच्या भाषेत 'बिपीशायला जायपीचा डबा' लावल्यासारखा आहे. राहत फतेह अली खानने गायलेलं 'जरुरी था' सुद्धा चांगलं वाटलं. ही दोन गाणी त्यातल्या त्यात दिलासा देतात. कारण इतर गाणी टिपिकल उच्चरवात केलेला भावनिक उत्सर्ग वाटतात. 'अरिजित सिंग'चा नाक चोंदल्यासारखा आवाज सध्या लोकप्रिय आहे. त्याचा इथे पुरेपूर उपयोग करून घेतलेला आहे.

लेखक-दिग्दर्शकांनी आपापली अक्कल गहाण टाकलेली असावी की काय, असा संशय वारंवार येतो. ९४-९५ सालच्या कथेत पडद्यावरील पात्रं मोबाईल वापरताना दिसतात, नुसते मोबाईल नाही, तर स्मार्ट फोन्स, आय-फोन्स ! त्यावर ते फोटो काढतात, एकमेकांना पाठवतात ! एका दृश्यात जंगलातील दुर्गम भागात बसलेला हीरो आपल्या 'मॅक'वरून एक व्हिडीओ फाईल अक्षरश: १-२ सेकंदांत पाठवतो, तेव्हा क्षणभर असा विचार मनात येतो की, 'कुठे आहे हे जंगल? मला तिथे जाऊन राहायचंय ! २० वर्षांनंतर आजही, शहरात राहूनसुद्धा व्हिडीओचं 'बफरींग' सहनशक्तीचा अंत पाहतं आणि तिथे त्या काळात असा भुर्रकन व्हिडीओ जातोय ?' रस्त्यांवर दिसणाऱ्या गाड्या वगैरे दुय्यम गोष्टी, केशभूषा, वेशभूषा इ. तिय्यम बाबी तर त्यांच्या गावीही नसाव्यात. त्यांच्या मते ९४-९५ नंतर आजपर्यंत भारतीय किंवा एकंदरीतच जागतिक जीवनशैलीत (असंही काही असू शकतं, बरं का?) काही बदल झालाच नसावा. छत्तीसगडच्या जंगलात 'लिली'चं शेत पाहून तर ह्या अद्वितीय कल्पनाशक्तीला मी मनापासून हात जोडले.

हे सगळं पुरेसं नसावं म्हणून की काय, पांचट शब्दांचे मळकट संवाद नकली नाट्य निर्माण करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करत राहतात. 'इसी काम से मेरे घर का चूल्हा जलता है..', 'सीता तो तू जनम से है, राधा कब बनेगी..' वगैरे पन्नास वर्षांपासून रगडून रगडून बुळबुळीत झालेली वाक्य ठराविक काळानंतर प्रेक्षकाच्या तोंडावर फेकली जातात.

सहनशक्तीचा कडेलोट झाल्यावर उमगलेला सारांश हाच की लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण वगैरे सर्व आघाड्यांवर सपशेल गंडलेली ही मोहित 'सुरी'ची रडीयल कहानी उणीपुरी एकशे तीस मिनिटं प्रेक्षकावर 'असुरी' अत्याचार करते आणि पिंजऱ्यात कोंडलेला पक्षी दार उघडल्याबरोबर झटक्यात बाहेर पडून मोकळा श्वास घेईल, तसा 'एक्झिट' चं दार किलकिलं झाल्याबरोबरच सुज्ञ प्रेक्षक तडकाफडकी बाहेर पडून मोकळा श्वास घेतो.
एकशे तीस मिनिटं आणि काही शे रुपडे अक्कलखाती जमा करतो.

रेटिंग - *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१४ जून २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-



Sunday, June 07, 2015

धडकने का बहाना - (Movie Review - Dil Dhadakne Do)


आयुष्याशी नक्की काय देवाणघेवाण करायची आहे, हा व्यवहार न समजलेल्या तीन मित्रांची कहाणी झोया अख्तरने 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये दाखवली होती.
'जो अपनी आंखों में हैरानियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम
दिलों में तुम अपनी बेताबियाँ ले के चल रहें हो, तो जिंदा हो तुम'
ह्या जावेद अख्तर साहेबांच्या ओळींपर्यंत येऊन ती कहाणी थांबली होती. 'दिल धडकने दो'सुद्धा इथेच, ह्या ओळींच्या आसपासच आणून सोडतो.

१९७८ च्या 'गमन' मधील गझलेत 'शहरयार'नी म्हटलं होतं, 'दिल है तो धड़कने का बहाना कोई ढूंढें!' बरोबर आहे. 'धडकना' हा तर दिलाचा स्थायी भाव. मात्र आजकाल स्वप्नं, अपेक्षा, जबाबदाऱ्या वगैरेंच्या रेट्यामुळे आपण आपल्याच 'दिला'ला आपल्याच छातीतल्या कुठल्याश्या कोपऱ्यात इतके लोटतो की त्याला धडकण्यासाठी 'अ‍ॅण्टी अँग्झायटी' औषधी गोळ्यांची उधारीची ताकद द्यायला लागते, 'कमल मेहरा'प्रमाणे.

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' ही तीन मित्रांची कहाणी होती आणि 'दिल धडकने दो' मध्ये आहेत तीन जोड्या. कमल मेहरा (अनिल कपूर) आणि नीलम (शेफाली शाह), कमल-नीलमची मुलगी 'आयेशा मेहरा' (प्रियांका चोप्रा) आणि तिचा नवरा 'मानव' (राहुल बोस) आणि कमल-नीलमचा मुलगा कबीर (रणवीर सिंग) आणि त्याचं प्रेम 'फराह अली' (अनुष्का शर्मा). कमल एक श्रीमंत उद्योगपती आहे. स्वत:च्या लग्नाचा ३० वा वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने डबघाईला आलेल्या धंद्याला नवसंजीवनी देण्यासाठी काही व्यावसायिक मित्रांना एकत्र आणून, कुटुंब व जवळचे नातेवाईक ह्यांना घेऊन युरोपात क्रुझ ट्रीपचा प्लान तो बनवतो. ह्या 'फॅमिली-ट्रीप-मेड-पब्लिक' मध्ये मेहरा कुटुंबातले काही छुपे आणि काही खुली गुपितं असलेले प्रॉब्लेम्स समोर येतात आणि त्यापासून दूर पळणंही शक्य होत नाही. ते त्यांचा सामना करतात आणि ही क्रुझ ट्रीप त्यांना एका आनंदी शेवटाकडे पोहोचवते.

ती तशी पोहोचवणार आहे, हे आपल्याला माहित असतं का ? नक्कीच असतं. पण तरी पूर्ण पावणे तीन तास दिल 'मनापासून' धडकत राहतं !
'दिल धडकने दो' ची कहाणी खरं तर चोप्रा आणि बडजात्यांच्या पठडीची आहे. त्यांना 'जी ले अपनी जिंदगी' किंवा 'बचा ले अपने प्यार को' वगैरेसारखे डायलॉग इथे यथेच्छ झोडता आले असते. पण कौटुंबिक नाट्य असलं तरी त्याला संयतपणे हाताळलं असल्याने 'झोया अख्तर' टच वेगळा ठरतो. तगडी स्टारकास्ट असल्यावर चित्रपट भरकटत जातो, असा अनेक वेळचा अनुभव आहे. पण तसं होत नाही. बिनधास्त तरुणाईच्या विचारशक्तीच्या सक्षमतेवरचा नितांत विश्वास झोयाच्या सर्वच चित्रपटांत दिसून आलेला आहे. तो इथेही दिसतो, त्यामुळे मनाने तरुण असलेल्या प्रत्येकाला 'दिल धडकने दो' आवडला नाही, तरच नवल !

उद्योगपतींच्या मुलांकडून, त्यांच्या व्यवसायाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची अपेक्षा खूप सुरुवातीपासून केली जाते. हा दबाव असा असतो की बहुतेक वेळी त्या मुलाला काही दुसरं करायचं असेल, तरी आपल्या इच्छांना मुरड घालावी लागते. 'कबीर'कडे एक मोठा व्यवसाय सांभाळायची कुवत आणि ते करायची इच्छाही नसते, ह्याची त्याला पदोपदी जाणीव होत असतानाही तो काही करू शकत नसतो. 'रणवीर सिंग' हा माझ्या मते एक साधारण क्षमतेचा, सामान्य चेहऱ्याचा कामचलाऊ नट आहे. पण 'कबीर'चं स्वत:शीच चाललेलं हे द्वंद्व त्याने चांगलं साकारलं आहे.

कबीरचा सगळ्यात जवळचा मित्र त्याचा लाडका कुत्रा 'प्लुटो'सुद्धा अनेक ठिकाणी सुंदर हावभाव दाखवतो ! त्याला आमिर खानने आवाज दिला आहे. जावेद अख्तर साहेबांच्या शब्दांना आमिरने उत्तम न्याय दिला आहे.

'अनुष्का शर्मा'ने, 'NH10', 'बॉम्बे वेलवेट' नंतर अजून एक दमदार सादरीकरण केलं आहे. स्वतंत्र विचारांची व ओतप्रोत आत्मविश्वास असणारी 'फराह' उभी करताना, उथळपणा व अतिआत्मविश्वास दिसण्याचा धोका होता. मात्र ह्यातली सीमारेषा व्यवस्थित ओळखून, कुठेही तिचं उल्लंघन न करता तिने आपली छाप सोडली आहे.

प्रियांकाची 'आयेशा'सुद्धा एक स्वयंपूर्ण स्त्री आहे. लग्न झाल्यावर, कुणाच्याही आधाराशिवाय संपूर्णपणे स्वत:च्या हिंमतीच्या व मेहनतीच्या जोरावर तिने तिचं स्वत:चं व्यवसायविश्व निर्माण केलेलं असतं. एक कर्तबगार स्त्री असूनही, केवळ एक 'स्त्री' असल्यामुळे तिच्यासोबत सासू, पती व आई-वडिलांकडून होणारा दुजाभाव आणि तो सहन करून प्रत्येक नात्याला पूर्ण न्याय देण्याचा तिचा प्रामाणिक प्रयत्न, त्यातून येणारं नैराश्य, त्यावर मात करून पुन्हा पुन्हा उभी राहणारी तिच्यातली मुलगी, पत्नी, सून, मैत्रीण तिने सुंदर साकारली आहे.

राहुल बोस आणि फरहान अख्तरला विशेष काम नाही. त्यातही राहुल बोसच्या भूमिकेला जराशी लांबी आहे. पण का कुणास ठाऊक तो सगळ्यांमध्ये मिसफिटच वाटत राहतो. कदाचित कहाणीचीही हीच मागणी आहे, त्यामुळे ह्या मिसफिट असण्या व दिसण्याबद्दल आपण त्याला दाद देऊ शकतो !

'शेफाली शाह'ची 'नीलम' प्रत्येक फ्रेमच्या एका कोपऱ्यात स्वत:ची स्वाक्षरी करून जाते ! तिचा वावर इतका सहज आहे की तिने स्वत:लाच साकार केलं असावं की काय असं वाटतं. मानसिक दबाव वाढल्यावर बकाबका केकचे तुकडे तोंडात कोंबतानाचा तिचा एक छोटासा प्रसंग आहे. त्या काही सेकंदांत तिने दाखवलेली चलबिचल अवस्था केवळ लाजवाब !

'अनिल कपूर' मेहरा कुटुंबाचा प्रमुख दाखवला आहे. तो ह्या स्टारकास्टचाही प्रमुख ठरतो. त्याच्या कमल मेहरासाठी पुरेसे स्तुतीचे शब्द माझ्याकडे नाहीत. मी फक्त मनातल्या मनात त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या ! एका प्रसंगात आयेशाशी बोलताना आक्रमकपणे आवाज चढवून तो थयथयाट करतो. सहसा, असा तमाशा करताना कुणी उभं राहील, इथे-तिथे फेऱ्या मारेल, अंगावर धावून जाईल. पण हा माणूस खुर्चीत बसून आरडाओरडा करतो ! दुसऱ्या एका प्रसंगात मोबाईलवर बोलता बोलता त्याची नजर नको तिथे पडते आणि मग त्या व्यक्तींपासून लपण्यासाठी तो झाडामागे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. ती दोन-पाच क्षणांची धावपळ त्याने जबरदस्त केली आहे.

फरहान अख्तर आणि जावेद अख्तरलिखित संवाद चुरचुरीत आहेत. अनेक जागी वनलायनर्स, पंचेस आणि शब्दखेळ करून तसेच काही ठिकाणी वजनदारपणा देऊन हे संवाद जान आणतात.

अनेक चित्रपटांनंतर चित्रपटातलं 'संगीत' चांगलं जमून आलेलं आहे. 'गर्ल्स लाईक टू स्विंग' आणि 'धक धक धक धक धडके ये दिल' ही गाणी तर छानच ! 'धक धक धक धक धडके ये दिल' हे अख्खं गाणं एका सलग 'शॉट'मध्ये चित्रित करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. ते निव्वळ अफलातून वाटलं !

शेवट थोडा अतिरंजित झाला असला, तरी एरव्ही 'दिल धडकने दो' वास्तवाची कास सोडत नाही.
ह्या आधीच्या चित्रपटांमुळे झोया अख्तरवर 'उच्चभ्रूंच्या मनोरंजनासाठी चित्रपट बनवणारी' असा शिक्का बसलेला असावा, 'दिल धडकने दो' हा शिक्का अजून गडद करेल. पण हेसुद्धा एक आयुष्य आहे आणि ते नक्कीच बघण्यासारखं आहेच. कारण कोपऱ्यात लोटल्या गेलेल्या दिलाला इथे एक 'धड़कने का बहाना' नक्कीच मिळतो.

रेटिंग - * * * *



हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (०७ जून २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

Related Posts Plugin for WordPress, Blogger...