संपूर्ण दिवस धावपळीत जातो, मग ट्रेनमधल्या गर्दीमुळे किंवा मोठ्ठ्या ट्राफिक जाममुळे उरला-सुरला संयमसुद्धा कापरासारखा उडून जातो. पोटात कावळे कोकलत आणि डोक्यात रातकिडे किरकिरत असताना घरी आल्यावर गरमागरम वरणभात समोर यावा आणि टीव्ही किंवा रेडीओवर आपल्या अत्यंत आवडत्या गायक/गायिकेचं आवडतं जुनं गाणं लागावं की कसं वाटतं ? रणरणत्या उन्हात अचानक एखादी थंड हवेची झुळूक आल्यासारखं वाटतं. त्या थोड्याश्याच वेळात आपण अजून एक दिवस लढवायची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे निजतो.
तसंच काहीसं, एकामागोमाग एक रद्दड चित्रपट डोक्यावर आदळत असताना, त्याच त्या बातम्या आणि त्याच त्या सिरियल्स उरल्या-सुरल्या संयमाचाही कापूर करत असताना, एखादा असा चित्रपट - जो थोड्या गुदगुल्या करतो, थोडं हळवं करतो आणि बराचसा आपलाच वाटतो - आल्यावर वाटतं. त्या दोन-अडीच तासांत आपण (म्हणजे, मी तरी) अजून काही रोहित शेट्टी, प्रभुदेवा वगैरे सहन करू शकण्याची हिंमत गोळा करतो आणि शांतपणे चित्रपटगृहातून बाहेर पडतो.
'पिकू' हे नाव जितकं छोटंसं आहे, तितकीच चित्रपटाची कहाणीसुद्धा. ही कहाणी आहे एक बाप आणि एका मुलीची आणि ह्या दोघांची कहाणी बदलणाऱ्या एका तिऱ्हाईताची.
'पिकू' (दीपिका पदुकोण) एक स्वतंत्र विचारांची तरुण व्यावसायिक. बोलण्यात इतकी फटकळ की तिला कस्टमर्ससमोर नेताना तिच्या पार्टनरला भीती वाटते की ही कुणाला काय सुनावेल ! आणि वागण्यात इतकी खडूस की टॅक्सी ड्रायव्हर तिचं भाडं आल्यावर टाळाटाळ करतात. भास्कर बॅनर्जी (अमिताभ बच्चन), तिचे वडील म्हणजे तिचा हर तऱ्हेने 'बाप'. स्वत:शी सोडून इतर कुणाशीही सरळ न बोलणारा आणि आजारी पडण्याची प्रचंड इच्छा असणारा. असे हे एकापेक्षा एक विक्षिप्त बाप-लेक दिल्लीत एकमेकांवर व कक्षेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर डाफरत एक आयुष्य जगत आहेत.
आणि दुसरीकडे राणा चौधरी (इरफान खान) हा एक टॅक्सी एजन्सीचा मालक, व्यावसायिक अपयशाशी झुंजत आणि विक्षिप्त आई व बहिणीमुळे वैतागलेला, स्वत:चं एक आयुष्य जगत आहे.
हे तिघे वैतागलेले एकत्र येतात, जेव्हा भास्कर बॅनर्जी आपल्या माथेफिरू स्वभावानुरूप दिल्लीहून कोलकात्याला टॅक्सीने जायचं ठरवतो. हा तीस-चाळीस तासांचा प्रवास तिघांसाठी गेल्या तीसेक वर्षांचे संस्कार बदलणारा ठरतो. चित्रपटाचा शेवट अनेक उत्तरं, प्रश्न न विचारता देतो.
एक रोड ट्रीप 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' मध्ये होती, जी तीन मित्रांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलते.
एक रोड ट्रीप 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये होती, जी कुणाला कुणापर्यंत घेऊन गेली नाही, पण तरी खूप काही दाखवणारी होती.
आणि एक रोड ट्रीप 'पिकू' ची आहे, जी फक्त दिल्ली ते कोलकाता जात नाही, तर 'पिकू'पासून 'पिकू'पर्यंत 'भास्कर'पासून 'भास्कर'पर्यंत आणि 'राणा'पासून 'राणा'पर्यंत जाते.
'जिंनामिदो' आणि 'फाफॅ' काहींना खूप आवडले होते, तर काहींना ते सपशेल कंटाळवाणेही वाटले होते. 'पिकू'चं नक्कीच तसं नाही आहे कारण इथली 'रोड ट्रीप' हा सगळ्यात महत्वाचा भाग असला तरी त्याला खूप जास्त वेळ दिलेला नाही आणि दीपिका-अमिताभमधली धुसफूस आपण रोज पाहत, अनुभवत असतो, त्यामुळे एक तार जुळतेच.
'पिकू' असं नाव का आहे, मूळ नाव नक्कीच वेगळं असणार, पण ते सांगणं किंवा ह्या विक्षिप्तांच्या विक्षिप्तपणाची कुठलीही स्पष्ट कारणमीमांसा देत बसणं आणि अश्याच काही कमी किंवा बिन महत्वाच्या गोष्टी पूर्णपणे टाळून, त्यांना समजून घेता येईल इतपत पार्श्वभूमी, तीही ओघातच, मांडणं दिग्दर्शक शूजीत सरकारांनी खुबीने केलं आहे. भास्कर बॅनर्जीचं अपचन व बद्धकोष्ठाने त्रस्त असणं आणि सतत त्याचाच विचार करत राहणं, हा त्याच्या व्यक्तित्वाचा पैलू एकंदर मांडणीला थिल्लर किंवा चावट बनवण्याकडे नेऊ शकला असता. मात्र, ते होण्या न होण्यामधली छोटीशी सीमारेषाही सरकारांनी अचूक हेरली आणि पाळली आहे, हे विशेष. हा चित्रपट कुठल्याही व्यक्तिरेखेचं उदात्तीकरण किंवा खच्चीकरणही करण्याच्या फंदात पडत नाही. खरं तर अशी पात्रं इथे आहेत. जसं की बॅनर्जीचा डॉक्टर मित्र श्रीवास्तव (रघुवीर यादव), जो त्याला त्याच्या अवास्तव आजाराग्रहाबद्दल कधी बोलत नाही आणि ३-४ लग्नं करणारी पिकूची बिनधास्त मावशी (मौशुमी चटर्जी).
दीपिका आणि 'पिकू' इतक्या एकरूप झाल्या आहेत की कुठेही पुसटसासुद्धा उल्लेख न येताही 'पिकू' हा 'दीपिका'चाच शॉर्ट फॉर्म असणार हे आपण नकळतच ठरवून टाकतो. वडिलांच्या विचित्र वागण्याला अतिशय कंटाळलेली, त्यांच्याशी भांडणारी आणि तरीही कुठल्याही मुलीसारखीच आपल्या बापासाठी प्रचंड हळवीही असणारी, 'माझ्याशी लग्न करणाऱ्याला माझ्या ह्या सत्तर वर्षाच्या बाळाचीही जबाबदारी घ्यावी लागेल' असं म्हणणारी 'पिकू' तिने सुंदर साकारली आहे. बिना मेकअपची दीपिकाचं 'गर्ल नेक्स्ट डोअर' दिसणं, हे वेगळंच !
अमिताभने आयुष्यात दुसऱ्यांदा 'भास्कर बॅनर्जी' नावाचं पात्र साकारलं आहे. १९७१ साली आलेल्या, भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक 'आनंद' मधला त्याचा भास्कर बॅनर्जी, एक बुजरा, थोडासा निराश डॉक्टर त्याने ज्या सहजतेने उभा केला होता, त्याच सहजतेने ४४ वर्षानंतर हा दुसरा विक्षिप्त भास्कर बॅनर्जी त्याने उभा केला आहे. बोलण्यातली बंगाली ढब त्याने अशी काही राखली आहे की एखादा अस्सल 'बाबू मोशाय'च वाटावा. अमिताभ आता एक चालतं-फिरतं अभिनयाचं गुरुकुल झाला आहे, ह्याबद्दल वादच नाही. त्याच्या सहजतेने बॅनर्जीच्या अत्यंत त्रासदायक विक्षिप्तपणावरही माया करावीशी वाटते.
ही कहाणी, हा चित्रपट पिकू आणि बॅनर्जीचा असला तरी जिथे जिथे इरफान खान पडद्यावर येतो, तिथे तिथे पडदा त्याच्यासाठीच आहे, असं वाटतं. केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर चांगले दिसणारे मोजके अभिनेते आहेत, त्यांत इरफान खान नक्कीच येतो. एरव्ही हे बटबटीत डोळे व ओबडधोबड सुजलेला चेहरा आपण कधीच पाहणार नाही. पण ह्या चेहऱ्यामागे दडलेला एक कलंदर अभिनेता जेव्हा समोर येतो, तेव्हा हाच चेहरा जगातला सगळ्यात सुंदर चेहरा बनत असावा. हे मी अगदी विचारपूर्वक सांगतो की अमिताभसमोरही इरफान आपलं नाणं खणखणीत वाजवतो.
ह्या चित्रपटाला नितांत आवश्यकता होती आणि तशी संधीही होती, श्रवणीय, गोड चालीच्या संगीताची. ती काही म्हणावी तशी पूर्ण झाली नाही. एक तर असलेली गाणी तुकड्या-तुकड्यांत आहेत आणि ती विशेष लक्षातही राहत नाही. 'पिकू'ला २-३ 'सवार लूँ'ची जोड मिळाली असती, तर गालबोट लावायलाही जागा उरली नसती. तरी, माझ्यातल्या चित्रपटत्रस्तासाठी एक अत्यावश्यक 'पिकूटॉनिक' मला नक्कीच मिळालं आहे.
रेटिंग - * * * १/२
हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१० मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-
No comments:
Post a Comment
Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!