Sunday, May 17, 2015

रणबीरचा फसलेला अमिताभ (Movie Review - Bombay Velvet)

प्रत्येक प्रसिद्ध नावाच्या भोवती त्या प्रसिद्धीच्या वलयाच्या आत अजून एक वलय असतं. अपेक्षांचं वलय. ते नाव डोळ्यांसमोर आलं की काय अपेक्षा करायची, हे आपल्याला समजत असतं. उदा. 'प्रीतम चक्रवर्ती' म्हटलं की 'ढापलेलं सुमधुर संगीत' किंवा 'सूरज बडजात्या' म्हटलं की 'अतिरंजित कौटुंबिक कंटाळा' किंवा 'आशुतोष गोवारीकर' म्हटलं की 'किमान सव्वा तीन तास' किंवा 'रोहित शेट्टी' म्हटलं की 'तडातड उडणाऱ्या गाड्या आणि माणसं' वगैरे. तद्वतच 'अनुराग कश्यप' म्हटलं की मी अपेक्षा करतो 'विस्कळीत तरी ऐटबाज, अंधारी पण वास्तववादी आणि अतिरंजित मात्र भेदक अशी मांडणी.' 'बॉम्बे वेलवेट' ह्या अपेक्षांच्या समीकरणाचा फक्त पहिला भाग पूर्ण करतो. 'विस्कळीत, अंधारी आणि अतिरंजित' मांडणी. अपेक्षाभंगाची निराशा सगळ्यात मोठी निराशा असते. हा अपेक्षाभंग, माझ्यासाठी तरी, ह्या वर्षातली आत्तापर्यंतची तरी सगळ्यात मोठी निराशा घेऊन आला. दिलासा इतकाच की अगदी सुरुवातीपासूनच आपल्या मनाची तयारी होत जाते की अखेरीस आपल्या खिश्यातून गेलेल्या पैश्यांची जागा निराशा घेणार आहे.

ह्या मानसिक तयारीची सुरुवात श्रेयनामावलीत होते. 'Introducing Karan Johar' असं आपण वाचतो आणि क्षणार्धात आपल्याला 'अरे ! मग 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मध्ये शाहरुख खानसोबत बागडणारा त्याचा टोपीवाला मित्र कोण होता ?' हा प्रश्न पडतो. अनुरागरावांचा अर्धा गुण ह्या अशुद्धलेखनासाठी आपण तडकाफडकी कापतो. (फराह खानने 'ओम शांती ओम' मध्ये शाहरुखसाठी 'Re-introducing' लिहिलं होतं, तसं तरी लिहायचं होतं ना !)

मग कहाणी सुरु होते.
१९४९ साली एका मुलाला घेऊन मुंबईत आलेली एक निराधार स्त्री. कामासाठी वणवण भटकते आहे. (लगेच आपल्या मनात १९७५ सालच्या 'दीवार'च्या आठवणी ताज्या होतात.) त्या स्त्रीला देहविक्रयाच्या धंद्यात जबरदस्ती ओढलं जातं. (कट - 'प्रहार' आठवतो.) तो मुलगा - बलराज - एका बिघडलेल्या मुलाच्या - चिमन - नादाला लागून चोऱ्यामाऱ्या करायला लागतो. (गेल्या ६० वर्षांतले अनेक चित्रपट).

मग मोठे होतात. बलराज (रणबीर कपूर) आणि चिमन (सत्यदीप मिश्रा) दोघे जिगरी यार पार्टनरशिपमध्ये डल्ले मारायला लागलेले असतात आणि साईड बाय साईड गोव्याहून मुंबईला आलेली एक जाझ गायिका व सुंदरी सोझी नोरोन्हा (अनुष्का शर्मा) बलराजला आवडायला लागलेली असते. आता इथून पुढे एक कुणी तरी बडी असामी ह्या दोघांना पंखांखाली घेऊन, त्यांच्याकडून काम करवून घेऊन आपला फायदा करून घेणार, हे चित्रपटलिखित जसंच्या तसं घडतं ! इन कम्स 'कैझाद खंबाटा' (कारण जोहर). सुज्ञ प्रेक्षकाला पुढील कहाणी सांगायची आवश्यकताच नाही.

ह्या चौघांव्यतिरिक्त एका वृत्तपत्राच्या संपादकाच्या (जिमी मिस्त्री) भूमिकेत मनीष चौधरी, बॉम्बेच्या महापौराच्या (रोमी मेहता) भूमिकेत सिद्धार्थ बसू आणि पोलीस इन्स्पेक्टर कुलकर्णीच्या भूमिकेत के के मेनन झळकतात. अनुराग कश्यप तर दगडाकडूनही काम करवून घेऊ शकतो, हे तर मुरलेले, तगडे लोक ! त्यातही मनीष चौधरीचा संपादक मात्र भाव खाऊन जातो. जबरदस्त ऐटबाज मिस्त्री त्याने सुंदर उभा केला आहे. सिद्धार्थ बसू बेरकी राजकारणी मस्तच वठवतात. आणि दुर्दैवाने 'बेबी'नंतर पुन्हा एका चित्रपटात के के मेनन वाया गेला आहे. त्याच्या भूमिकेची लांबी आणि व्याप्ती खूपच सीमित आहे आणि तेव्हढ्यातही तो आपली छाप सोडत असला, तरी ते पुरेसं वाटत नाही.
करण जोहर मुख्य खलनायकाच्या भूमिकेला बऱ्यापैकी न्याय देतो. खंबाटा भयावह वाटत नाही, पण प्रभावी नक्कीच वाटतो. त्याच्यातल्या दिग्दर्शकाच्या सावलीत लपलेला त्याच्यातला अभिनेता अनुराग कश्यपने बाहेर काढला आहे.
सत्यदीप मिश्राने 'चिमन'च्या भूमिकेत जान ओतली आहे. हतबुद्ध, निराश, चिडलेला, सच्चा, सांभाळून घेणारा अशी एका मित्राची अनेक रूपं त्याने दाखवली आहेत. 'चिमन'शिवाय 'जॉनी बलराज' मध्ये मजा आली नसती आणि 'सत्यदीप'शिवाय 'रणबीर'सुद्धा कंटाळवाणा वाटला असता.
रणबीर कपूर 'रॉकस्टार'च्या पुढे जात नाही, हे खेदाने नमूद करावं लागतं. काय कमी किंवा काय जास्त झालं, हे सांगण्यापेक्षा 'त्याचा अमिताभ बनायचा प्रयत्न फसला आहे', ह्या सरळसाध्या शब्दांत नेमका सारांश सांगता येईल. बलराजच्या व्यक्तिरेखेच्या नाण्याच्या एक तडफदार प्रेमी आणि एक अँग्री यंग मॅन ह्या दोन बाजू आहेत. रणबीर ह्या दोन्हींपैकी कुठलीच चकचकीत करू शकला नाही.
रोझीच्या भूमिकेत अनुष्का शर्मा अतिशय सफाईदार वाटली. दिसलीही सुरेख आहे. सगळ्या मोठमोठ्या नावांत अनपेक्षितपणे ती सगळ्यांत जास्त उठून दिसते. NH10 नंतर पुन्हा एकदा तिने दमदार काम केलं आहे. गाण्यांवर ओठ हलवताना ती सूर समजून घेऊन काम करत आहे, हे चाणाक्ष प्रेक्षकाच्या नजरेतून सुटत नाही.

संवादलेखनात 'काहीच लक्षात न राहू शकणे' हीच एक लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. अमिताभचा अँग्री यंग मॅन यशस्वी होण्यामागे सलीम-जावेद जोडीचे दमदार संवाद खूप महत्वाचे होते. ती मदत इथे रणबीरला न मिळाल्याने त्याचा अमिताभ होऊ शकण्यात महत्वाचा अडसर आला आहे.

अमित त्रिवेदीचं संगीत कर्णमधुर आहे. सगळीच गाणी श्रवणीय झालेली आहेत. 'चित्रपटात श्रवणीय संगीत असू शकते', हा समज मागे सोडणाऱ्या जमान्यात अमित त्रिवेदी, शंतनू मोईत्रा ह्यांच्यासारखी काही नावं माझ्यासारख्या चित्रपटसंगीतप्रेम्याला दिलासा देतात.

अखेरीस, एखाद्या दिवशीच्या मळभाने सूर्य लपत नसतो, तसंच एखाद्या अपयशाने कुणी गुणी कलावंत खचतही नसतो. एका चित्रपटात रणबीर अमिताभ बनू शकला नाही आणि अनुराग कश्यप प्रकाश मेहरा बनू शकला नाही. पण त्यांच्या पुढील कामांतून 'बॉम्बे वेलवेट'ची पुटं नक्कीच झटकली जातील. तोपर्यत चाहते ह्या आधीचे चित्रपट बघू शकतील.

रेटिंग - * *


हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१७ मे २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...