Sunday, April 19, 2015

बाष्कळ एक्साएक्सी (Movie Review - Mr. X)

चित्रपटाचं पहिलंच दृश्य - एका लक्झरी बसमधील प्रवाश्यांना ओलीस धरून एक दहशतवादी 'माझ्या मागण्या पूर्ण करा, नाही तर एकेकाला ठार मारतो' असं म्हणतो आहे. त्याच्या एका सहकाऱ्याला आधीच ठार केले गेले आहे. त्याच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न पोलिस व 'अँटी टेररिस्ट डिपार्टमेन्ट' च्या अधिकाऱ्यांकडून केला जातो आहे. मात्र अखेरीस त्याच्या डोक्यात गोळी घालून एका झटक्यात सगळ्यांना सोडवलं जातं. दहशतवादी मरण्याच्या आधी एक बॉम्ब सुरु करून जातो. तो जर मरणारच असतो, तर बॉम्ब सुरु करताना तब्बल ३ मिनिटांचा टायमर का लावतो ? झटक्यात उडवूनच का टाकत नाही ? त्याच्या डोक्यात गोळी घालूनच प्रॉब्लेम सोडवायचा होता, तर आधीच का नाही घातली ? असले आगाऊ प्रश्न आपल्या मनात डोकं वर काढतच असतात आणि इतक्यात चित्रपटाचा हीरो हीरोगिरी दाखवण्यासाठी बॉम्बस्फोटासाठी ४५ सेकंद उरलेले असताना बसमध्ये अडकलेल्या एका जखमी व्यक्तीला आणण्यासाठी आत जातो. जाता जाता त्याच्या सहकारी महिला ऑफिसरला 'बॉम्ब डिफ्युज कर' असं सरळ न सांगता, 'माझ्यावर प्रेम करतेस ना ? मग तो बॉम्ब डिफ्युज कर !' असं सांगतो. हे ऐकल्यावर आपण समजून चुकतो की पुढचे सव्वा दोन तास काय बाष्कळपणा चालणार आहे आणि डोकं वर काढणारे सगळे आगाऊ प्रश्न दाबून टाकतो. 'यू कॅन कॉल मी एक्स' ह्या शीर्षक गीतापासून 'मिस्टर एक्स' ची सुरुवात होते आणि केवळ पाच मिनिटांतच आपण 'अजिबात हाक मारणार नाही तुला' असं उत्तरही देऊन टाकतो.

रघुराम राठोड (इम्रान हाश्मी) आणि सिया वर्मा (अमायरा दस्तूर) हे दोघे 'अँटी टेररिस्ट डिपार्टमेन्ट' (ATD) चे धडाडीचे ऑफिसर्स असतात. भारद्वाज (अरुणोदय सिंग) हा त्या डिपार्टमेन्टचा प्रमुख असतो. भ्रष्ट अधिकारी व गलिच्छ राजकारणाच्या अत्याचाराखाली रघुराम भरडला जातो. रघु आणि सिया लग्न करणार असतानाच परिस्थिती असं एक वळण घेते की सगळं दृश्यच बदलून जातं. 'रघु'चा अदृश्य 'मिस्टर एक्स' होतो आणि त्याच्यावर झालेल्या अन्याय व त्याच्या विश्वासघाताचा तो बदला घ्यायला सुरु करतो. ह्या व्यतिरिक्त चित्रपटाच्या कहाणीत सांगण्यासारखं काही एक नाही.

मात्र, ह्या कहाणीच्या सादरीकरणाबाबत बरंच काही सांगता येऊ शकेल. कारण सूडाची कथा इतकी रटाळ करण्यासाठी अनेकांनी विशेष मेहनत घेतलेली आहे.
ह्या मेहनतीचं सार्थक झाल्याबद्दल सगळ्यात जास्त अभिनंदन विक्रम भट ह्यांचं करायला हवं. विक्रम भट आणि भारताचा तेज गोलंदाज इशांत शर्मा मला खूप सारखे वाटतात. ह्याची दोन कारणं आहेत.
१. दोघांचे केस फार वेगळे आहेत.
२. दोघांकडे भरपूर अनुभव असूनही उपयोग शून्य आहे.
चित्रपट बनेपर्यंत संपूर्ण वेळ स्वत: दिग्दर्शक विक्रम भटसुद्धा 'मिस्टर एक्स' झालेले असावेत, असा संशय घेण्यास जागा आहे. कारण दिग्दर्शकाचं अस्तित्व असून नसल्यासारखंच आहे. एक लेखक म्हणून तर इतक्या ठिकाणी 'रिकाम्या जागा भरा' आहे की हा चित्रपट आहे की घटक चाचणीचा पेपर असं वाटावं. रघुला जर मारायचं असतं, तर गोळी घालून संपवत का नाहीत ? त्यासाठी एक अख्खा कारखाना का उडवतात ? भाजलेल्या रघुला किरकोळ ढिगाऱ्याखालून शोधलं कसं जात नाही ? आणि सगळ्यात कहर म्हणजे 'रेडियेशनवरील उपचार म्हणून दिलेल्या औषधामुळे तो गायब होतो, म्हणजे नेमकं काय होतं' हे जर नीट सांगायचंच नव्हतं, तर सरळ चमत्कार होतो किंवा भूत बनून परत येतो वगैरे दाखवून मोकळं व्हायचं की ! असंही हा 'भूत' विषय विक्रम भट दर वर्षी एकदा तरी मांडतातच ! मला कळत नाही लोकांनी आपलं डोकं वापरूच नये असं जर वाटत असेल, तर चित्रपटाच्या सुरुवातीला ज्या विविध सूचना दाखवतात, त्यातच एक ओळ हीसुद्धा टाकावी ना की, 'कृपया आपले डोके बरोबर आणले असल्यास बाजूला काढून ठेवावे.'

भटांच्या भट्टीतल्या नट्या मात्र अगदी टिपिकल असतात. ह्या नट्यांचा मुख्य कार्यक्रम एककलमी असतो तो म्हणजे 'अंगप्रदर्शन'. त्यानंतर बिनडोक असणे व दिसणे आणि अभिनयाच्या नावाने बोंब असणे ह्या दोन गोष्टी. अमायरा 'दस्तूर' ह्या तिन्ही जबाबदाऱ्या इमाने इतबारे निभावते. तिच्या हातात बंदूक पाहताना 'हे वजन उचलल्यामुळे तिचा खांदा दुखावला गेला असेल का?' असं दर वेळेस आपल्याला माणुसकीच्या नात्याने वाटतं; इतकी ती एक 'स्पेशल एजंट' म्हणून शोभत नाही.

'इम्रान हाश्मी' स्वत:च्या ख्यातीला जागतो आणि गायब होऊनसुद्धा मुके घेण्याचं सोडत नाही. इम्रानचं तोंड न शिवशिवलेला चित्रपट ह्या जन्मी बघण्यास मिळेल, अशी आशा आता वाटत नाही आणि हीच खात्री त्याच्या चाहत्यांना असते व तो त्यांना निराश करत नाही. एरव्ही दिग्दर्शकाने केलेली किरकोळ अभिनयाची साधीशी अपेक्षा तो पूर्णही करतो.

भटभट्टीचं अजून एक लक्षण म्हणजे एकसुरी संगीत. त्याचा पुरवठा राजू सिंग व जीत गांगुलीकडून मुबलक प्रमाणात होतो. प्रत्येक गाणं एक तर दुसऱ्या कुठल्या तरी एकसुरी गाण्याची आठवण करून देतं किंवा कंटाळा आणतं. सगळीच्या सगळी गाणी ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देऊन विसरून जाण्याच्या योग्यतेचीच आहेत. विसरून जाण्यावरून आठवलं, 'संवाद लेखन' हे एक कल्पक काम आहे, हे लेखक शगुफ्ता रफ़ीक़ विसरल्या असाव्यात.

कहाणीला एक दैवी, चमत्कृतीपूर्ण, अमानवी, अकल्पित वगैरे कोन असणं, हे चित्रपटाचं मनोरंजन मूल्य वाढवतं, असा जर कुणाचा गैरसमज असेल तर त्यांनी अवश्य 'मिस्टर एक्स' पाहावा. तो नक्की दूर होईल. ह्या एकाच लक्षणासाठी ह्या चित्रपटाला एखादा स्टार देता येईल. कारण सव्वा दोन तासांनंतर काहीही हाती लागू नये किंवा लक्षातही राहू नये इतकी ही 'एक्साएक्सी' निरर्थक व बाष्कळ आहे.

रेटिंग - *

हे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (१९ एप्रिल २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-



No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...