Tuesday, August 26, 2014

नॉक आउट पंच - मर्दानी (Movie Review - Mardaani)

खरं तर ही कहाणी आजपर्यंत अनेक सिनेमांत मूळ कथानक किंवा उपकथानक म्हणून येऊन गेली आहे. टीव्हीवर, गुन्हेगारी सत्यघटनांवरील डॉक्युमेंटरी सिरियल्समध्येही अश्या प्रकरणांना पाहून झाले आहे. पण तरी डोळ्यांचं पातं लवू न देता पाहावंसं वाटतं, इथेच 'मर्दानी' जिंकतो.

सेन्सॉर सर्टिफिकेट दाखवणाऱ्या फ्रेमपासून, ते अगदी शेवटच्या दृश्यापर्यंत 'मर्दानी'त लेखक-दिग्दर्शकाने एक सूत्र १००% पाळलं आहे. 'नो नॉनसेन्स'. अनावश्यक दृश्यं, संवाद, गाणी, पात्रं, कॅमेरावर्क काही म्हणता काही नाही. फक्त तेच जे कथानकाला पुढे नेणार आहे, हातभार लावणार आहे. म्हणून साहजिकच चित्रपट दोन तासांपेक्षाही कमी लांबीचा आहे.

शिवानी रॉय (राणी मुखर्जी) निरीक्षक, मुंबई क्राईम ब्रांच. पती डॉ. बिक्रम रॉय व लहानग्या भाचीसह राहत असते. अनाथालयात राहणाऱ्या व फुलं विकणाऱ्या कुमारवयीन 'प्यारी'वर तिचा फार जीव असतो. मुलीसारखीच असते. इतकं कथानक पाहून झाल्यावरच पुढे काय घडणार आहे, ह्याची पुसटशी कल्पना आपल्याला येते.
एके दिवशी अचानक 'प्यारी' गायब होते आणि तिचा शोध घेताना शिवानीला अल्पवयीन मुलींची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचाच शोध लागतो. एका मोठ्या रॅकेटला उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यास ज्या किंमती मोजायला लागतात, त्या ती मोजते. धक्के पचवते, पुन्हा उभारी घेते, लढते, भिडते, हार मानत नाही.


रोहित शेट्टी, साजिद खानसारख्यांच्या अक्कलशून्य चित्रपटांमुळे बॉलीवूडला बौद्धिक दिवाळखोरीचं चालतं-बोलतं उदाहरण समजलं जात असताना 'प्रदीप सरकार'सारखा दिग्दर्शक समोर येतो. ज्या ताकदीने तो 'परिणीता'ची हळवी कहाणी सादर करतो, त्याच ताकदीने तो 'मर्दानी'ची लढत साकार करतो आणि मग शुजीत सरकार, विशाल भारद्वाज, नीरज पांडे, राजकुमार हिरानी, अभिषेक कपूर, झोया अख्तर सारखी काही गुणी नावं आठवून अवस्था इतकीही सुमार नसल्याची हमी मिळते. प्रत्येक छोट्या व्यक्तिरेखेकडूनही उत्कृष्ट कामगिरी करवून घेण्यात प्रदीप सरकार पूर्ण यशस्वी ठरले आहेत.

राणी मुखर्जीने दाखवलेली उर्जा 'मर्दानी'ची जान आहे. खरं तर ह्या भूमिकेला साकार करताना तिची देहयष्टी आड येऊ शकली असती, पण केवळ जबरदस्त उर्जेच्या जोरावर तिने ही उणीव भरून काढली आहे. आक्रमक देहबोली व अचूक संवादफेक, जोडीला खमकी नजर व जबरदस्त आत्मविश्वास अशी ही 'मर्दानी' राणीची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका नक्कीच आहे.


राणीइतकंच लक्षात राहण्यासारखं काम केलंय नवोदित 'ताहीर भसीन'ने. सेक्स रॅकेटच्या मास्टर माइंडच्या भूमिकेतला भसीन अत्यंत संयतपणे अंगावर येणारा खलनायक साकार करतो. त्याच्या जवळजवळ प्रत्येक दृश्यात तो छाप सोडतो. इतक्या शांतपणे क्वचितच कुणी थरकाप उडवला असेल किंवा संताप आणला असेल.

आजच्या हिंदी चित्रपटावर आसूड ओढण्याच्या अहमहमिकेत उत्साहाने सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाने 'मर्दानी'सारखे चित्रपटसुद्धा पाहायला पाहिजेत. असे काही चित्रपट बघितले की हिंदी चित्रपटांचे काही अक्षम्य गुन्हे माफ करावेसे वाटतात.

रेटिंग - * * * * 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...