Thursday, August 28, 2014

आनंद - कभी तो हसाएँ, कभी यह रुलाएँ

कविता करणं सोपंय. 'कवी' असणं अवघड. गाणं सोपंय, 'गायक' बनणं अवघड. चित्र काढणं सोपंय, 'चित्रकार' होणं अवघड.
ऑन अ लार्जर कॅनव्हास, जर 'जगणं' म्हणजे 'जिवंत राहणं'च असेल, तर 'जगणं' खूप सोपंय, हृषिदांचा, गुलजारचा, राजेश खन्नाचा, सलील चौधरीचा 'आनंद' जगणं............?


खरं सांगायचं तर 'आनंद'बद्दल सविस्तर लिहिण्याचा हा माझा पहिला प्रयत्न नाही. ह्या लेखाची अनेकदा सुरुवात झाली आहे. पण लिहिता लिहिताच एक विचित्र दडपण येऊन मी प्रत्येक वेळी लिखाण अर्धवट सोडून दिलं आहे. लिहिलेलं खोडून टाकलं आहे. कारण माझ्या मते ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर माझं तरी उत्तर 'आनंद' हेच असेल. इतक्या अप्रतिम कलाकृतीबद्दल लिहिताना, मी तिच्यासोबत न्याय करू शकेन असं मला वाटत नाही. त्यामुळे लेख पूर्ण करण्याची हिंमत अनेकदा झालीच नाही. आजही हे लिहितो आहे ते जरी पूर्ण करू शकलो, तरी ते 'पुरेसं' नसेलच. 'आनंद'बद्दल पुरेसं लिहिणं कुणाच्याही आवाक्यातील गोष्ट नसावीच. माझ्या तर नाहीच नाही.

आजवर अगणित वेळा 'आनंद' बघून झाला असेल. ही कहाणी जरी 'आनंद सेहगल'ची असली, तरी तिला 'डॉ. भास्कर बॅनर्जी'च्याच नजरेतून पाहणे अतिशय आवश्यक आहे असं मला वाटतं. खरं तर ही ह्या दोघांची कहाणी आहे.

कविमनाचा पण नैराश्याच्या गर्तेत रुतत चाललेला एक डॉक्टर. डॉ. भास्कर बॅनर्जी. नावाजलेला कर्करोग तज्ञ. लहानपणापासूनच तसा एकालकोंडा असलेल्या भास्करचे डॉ. प्रकाश कुलकर्णीशिवाय फार कुणी मित्र नाहीत. त्याच्या सगळ्यात जवळ आहे त्याची डायरी आणि त्याची कविता. कॉलेजच्या गुलाबी दिवसांतसुद्धा भास्कर -

मौत तू एक कविता है,
मुझसे एक कविता का वादा है, मिलेगी मुझको

- अश्या तत्ववेत्त्याच्या ओळी लिहितो, ह्यावरून त्याचा अंतर्मुख स्वभाव समजून येतो. त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे त्याचा नास्तिकतेकडे झुकणारा मनुष्याच्या कुवतीवरचा, विज्ञानावरचा विश्वास. परंतु, भोवताली पसरलेल्या रोगराई, गरिबीच्या बीभत्स ओंगळवाण्या वास्तवात गुदमरलेले हताश मानव्य त्याच्या ह्या विश्वासाला रोजच्या रोज हादरवत असतं.
'कॉलेज से डिग्री लेते वक़्त ज़िन्दगी को बचाने की कसम खायी थी, अब ऐसा लग रहा हैं की जैसे कदम कदम पर मौत को ज़िंदा रख रहा हूँ......'
असं म्हणणारा सधन, बुद्धिमान, संवेदनशील व अंतर्मुख भास्कर वास्तविकत: मानसिकदृष्ट्या अगदी व्हल्नरेबल असतो. अळवाच्या पानावरच्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे हळवा. आणि अश्या मनस्थितीत असताना त्याच्या आयुष्यात एक वादळ येतं. 'आनंद सेहगल'. एक जिवंत वादळ. किंबहुना, रोज थोडं थोडं मरत असलेलं एक जिवंत वादळ. असाध्य कर्करोगाने अक्षरश: पोखरलेला आनंद मुंबईत येतो, ते आयुष्याचे शेवटचे ३-४ महिनेच मुठीत घेऊन. ह्या शेवटच्या मोजक्या दिवसांत भास्करवर त्याचा होणारा परिणाम, त्याच्या व्यक्तिमत्वात घडणारा बदल म्हणजे हे कथानक.
आनंद मरतो आहे, तो मरणार आहे, हे आपल्याला आधीपासूनच माहित असतं. पण तराजूचं एक पारडं खाली जाताना दुसरं जसं अपरिहार्यपणे वर येत राहतं, तसं आनंदचं एकेका दिवसाने कमी होत जाणारं आयुष्य भास्करला नैराश्याच्या गर्तेतून वर खेचत आयुष्याशी गळाभेट घडवण्यापर्यंत नेत असतं.

कहीं तो ये, दिल कभी, मिल नहीं पाते
कहीं से निकल आए, जनमों के नाते

अश्याप्रकारचं एक वेगळंच नातं, ह्या दोघांत निर्माण होऊन दृढ होत असतं. 'मृत्यू'ला कविता संबोधणाऱ्या बाबू मोशाय भास्करला जगण्याला कविता मानणारा आनंद एक वेगळाच प्रवास घडवतो. स्वत:पासून स्वत:पर्यंतचा. ह्या प्रवासात त्याचे काही सहप्रवासी असतात. त्याचा जिवलग मित्र डॉ. प्रकाश व त्याची पत्नी सुमन, मेट्रन डिसा, रघू काका, ईसाभाई सुरतवाला आणि रेणू.

पहिल्याच भेटीत शाब्दिक कोट्या व शब्दांच्या फिरवाफिरवीतून आनंद त्याच्या आयुष्याविषयीच्या तत्वज्ञानाचा एक ठसा भास्करच्या व पर्यायाने आपल्याही मनावर उमटवतो.
ज़िन्दगी बड़ी होनी चाहिए, लम्बी नहीं.
मौत के डर से अगर जीना छोड़ दिया तो फिर मौत किसे कहतें हैं ?
जब तक जिंदा हूँ, मरा नहीं; जब मर गया तो साला मैं ही नहीं !
हम आनेवाले गम को खिंच तानकर आज की ख़ुशी में ले आते हैं और उसमे ज़हर घोल देतें हैं !
असे संवाद अधून मधून पेरले जात असतातच आणि हा ठसा अधिकाधिक ठळक होत जातो.

आनंद मोजक्या काही दिवसांच्या सहवासातच प्रत्येकाशी एकेक नाते जोडतो आणि आपला स्वत:चा एक छोटासा परिवार बनवतो. भास्कर - भाऊ, रेणू - वहिनी, सुमन - बहिण, मेट्रन - मम्मी, ईसाभाई - गुरु आणि दोस्त तर सगळेच. अनोळखी व्यक्तीलाही 'मुरारीलाल' म्हणून मित्र बनवण्याचा छंद!

किनारा पार करणे अशक्य असतानाही सागराच्या लाटा जश्या अविरत उसळत असतात, तसंच स्वत:च्या निश्चित अंताच्या अनिश्चिततेचं सावट सतत डोक्यावर असतानाही 'आनंद' अविरतपणे उत्साह व हास्यविनोदाच्या लहरींवर स्वार होऊन पुन्हा पुन्हा जीवनाच्या निश्चल किनाऱ्यावर जणू धडका देत -
'मौत तो इक पल हैं, आनेवाले दिनों में जो लाखो पल मैं जीनेवाला हूँ उनका क्या ?'
- असा एक रोखीचा सवाल शेवटपर्यंत करत राहतो.
'अगले जनम में मैं तुम्हारा बेटा बन के आ जाऊँगा' - ह्या मेट्रन डीसा (ललिता पवार) ला दिलेल्या त्याच्या आश्वासनपर शब्दांच्या मागे, हा जन्म संपत चालल्याची खंत म्हणूनच जाणवत नाही.
'फिर मिलेंगे' म्हणणाऱ्या 'इसाभाई'ला (जॉनी वॉकर) म्हणूनच तो श्वास अडकला असतानाही दिलखुलास हसून 'कहाँ ?' असा प्रश्न करू शकतो. ह्या दोन दृश्यांत कधीच न दिसलेले ललिता पवार व जॉनी वॉकर आपल्याला भेटतात. खडूस मेट्रन डीसाच्या डोळ्यांतील अश्रू आपल्या मनात जशी कालवाकालव करतात, तसंच बेरक्या इसाभाईचं हमसून हमसून रडणं काळीज पिळवटून जातं.

एक प्रकारची 'उदासी' कहाणीतील प्रत्येक पात्रासह आपलेही मन व्यापत असताना त्याच क्षणी आपल्याला 'आनंद'ने 'भास्कर'ला केलेला एक पारिजातकासारखा सुगंधी प्रश्न आठवतो - 'उदासी खूबसूरत नहीं होती, बाबू मोशाय?'


The woods are lovely dark and deep
But I have promises to keep
And miles to go before I sleep
And miles to go before I sleep

शाळेत असताना 'रॉबर्ट फ्रॉस्ट'च्या ह्या ओळी मोरपिसाच्या हळवेपणाने मनावर अलगद लिहिल्या गेल्या होत्या. अनेक कविता अश्याच हळवेपणाने मनात उतरल्या, झिरपल्या आहेत. प्रत्येकीची एक वेगळी जागा आहे. ह्या अनेक कवितांमध्ये एक जागा 'आनंद'चीही आहे. 'आनंद'ची बलस्थानं, प्रत्येक कलाकाराचं अप्रतिम काम, संगीत, संवाद, गीतं, लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक बाजू वगैरेवर मी बोलणं टाळतोच. कारण माझ्या मते ही कलाकृती 'चित्रपट'पणाच्या पुढे गेली आहे. ती फक्त चित्रपट किंवा एक कहाणी नसून एक 'कविता' आहे. जिचं एकेक कडवं एकेकाने लिहिलं. हृषीकेश मुखर्जी, गुलजार, सलील चौधरी ह्यांनी पडद्यामागे आणि लहान-मोठ्या व्यक्तिरेखा साकारलेल्या राजेश खन्ना, अमिताभ, रमेश देव, जॉनी वॉकर, ललिता पवार, सीमा देव अश्या प्रत्येकाने ती कविता पडद्यावर पूर्ण केली. माझ्यासारख्या लाखोंनी ती पुन्हा पुन्हा ऐकली, वाचली अन् पाहिली आणि कदाचित जगाच्या अथांग पसाऱ्यात अनेकांनी अनुभवलीही असावी व अनुभवतही असावेत, कारण -

"आनंद मरा नहीं, आनंद मरतें नहीं."

....रसप....

2 comments:

  1. म्रुत्युला जवळून पाहाण्यार्यांपेक्षा, म्रुत्यू जवळ आहे ह्याची जाणीव झालेले, जीवनाचा खरा आस्वाद घेतात.

    ReplyDelete
  2. म्रुत्युला जवळून पाहाण्यार्यांपेक्षा, म्रुत्यू जवळ आहे ह्याची जाणीव झालेले, जीवनाचा खरा आस्वाद घेतात.- निशांत

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...