Saturday, April 12, 2014

तमाम उम्र का तनहा सफ़र - उमराव जान

रात्रीच्या मंद थंड हवेत तरळणारा रातराणीचा सुवास ज्याला भुलवत नाही असा माणूस विरळाच. दिवसभराचा थकवा, मरगळ दूर करणारा हा सुगंध. खिडकीत डोकावणारी रातराणीची फांदी आणि त्या फांदीच्या आडून चोरून पाहणारा चंद्र ही तर रोमान्सची परिसीमा असावी. सौंदर्याचा कडेलोट असावा.
पण प्रत्येक दैवी सौंदर्याला काही न काही शापच असतो.
कदाचित ज्याप्रमाणे अनेक घाव सोसून पैलू पाडले गेल्यावर हीरा तयार होतो, आगीतून पोळून निघाल्यावर सोन्याची परीक्षा होते तसंच नशीबाचे भोग भोगणारेच चेहरे सौंदर्याची व्याख्या ठरत असावेत.
रातराणीला शाप आहे, झाडापासून वेगळे झाल्याबरोबर सुगंधास मुकण्याचा, चंद्राला शाप आहे डागांचा आणि फक्त रात्रीच्या अंधारातच दृष्टीस लुभावण्याचा.
अन् 'अमीरन'ला शाप आहे 'उमराव जान' असण्याचा....

कब मिली थी कहाँ बिछड़ी थी हमें याद नहीं
ज़िंदगी तुझको तो बस ख़्वाब में देखा हमने

'अमीरन'ची व्यथा शहरयार साहेबांनी ह्या शेरात, चिमटीत फुलपाखरू पकडावं इतक्या अचूक व नाजूकपणे मांडली आहे.
वडिलांच्या दुश्मनीची किंमत बालवयातील अमीरनला मोजावी लागते, ते स्वत:चं अख्खं आयुष्यच गहाण टाकून. पोरवयात अपहरण करून कोठ्यांवर विकल्या जाणाऱ्या अनेक मुलींपैकी एक फैझाबादची अमीरन लखनौला येते आणि 'उमराव जान' (रेखा) बनते.
जवारीदार आवाज, आरस्पानी सौंदर्य आणि तरलपणे हृदयास भिडणारी शायरी ह्यांमुळे 'उमराव जान अदा' लखनौच्या अनेक नवाबजाद्यांना जिंकते. तिच्या मनाला जिंकणारा नवाब मात्र तिला 'सुलतान' (फ़ारूक़ शेख) मध्येच दिसतो. प्रेम फुलतं. पण कसं ?

तुझको रुसवा न किया खुद भी पशेमाँ न हुये
इश्क़ की रस्म को इस तरह निभाया हमने

जे हवं, ते न मिळण्याची; सर्वात आवडत्या गोष्टींना त्यागण्याची उमरावला तिच्या जिंदगानीने सवयच लावलेली असते. पण आयुष्याशी ही पाठशिवणी किती खेळायची ? हा प्रश्न उमरावला पडणार असतोच. पडतोच.
ती ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा प्रयत्न करते. पण चेहऱ्यावर गोंदवलेलं सत्य आरसा बदलल्याने जात नसतं.

तमाम उम्र का हिसाब मांगती है ज़िन्दगी
यह मेरा दिल कहे तो क्या, यह खुद से शर्मसार है

हे कडवट सत्य उमगलेली उमराव, जेव्हा उध्वस्त झालेल्या आपल्या जुन्या कोठ्यावर परत येते, तेव्हा समोर असलेल्या जुन्या आरश्यात स्वत:चं उध्वस्त झालेलं आयुष्यच पाहते. तीच नव्हे, तिला बघणारे आपणही तेच बघत असतो. इथेच उमराव हरते.
पण सिनेमा जिंकतो.
आणि आपल्याला प्रश्न पडतो की एक अप्रतिम सिनेमा पाहिल्याचा आनंद मनात जपावा की एक अभेद्य शून्य आमरण जगणाऱ्या अनेक 'अमीरनां'चं प्रतीक म्हणून दिसलेल्या 'उमराव जान'च्या व्यथेने व्याकुळ व्हावं ?



एक संवेदनशील मन काही वेळ हळहळतं. मग मनाच्या कुठल्याश्या कोपऱ्यात, सरकारी कचेरीत धूळ खात पडणाऱ्या फायलींच्या गठ्ठ्याप्रमाणे जपलेल्या अनेक 'पीड पराईं'च्या ढिगाऱ्यात अजून एक निस्तेज रातराणी पडते.

यह किस मुकाम पर हयात, मुझको लेके आ गई
न बस खुशी पे कहां, न ग़म पे इख्तियार है

ही उदासीनता उमरावला येणं स्वाभाविक पण आपल्याला का यावी ?
खरंच आली आहे का ?
हे प्रश्न पडणे म्हणजेच उदासीनता आलेली नाही असे नाही का ? आपली हताशा आपणच आपल्यापासून लपवण्यासाठी हे उदासीनतेचं नाटक करतो आहे का ?

'मिर्झा हादी रुसवा' ह्यांच्या 'उमराव जान अदा' ह्या कादंबरीवर आधारलेला 'मुझफ्फर अली' ह्यांचा 'उमराव जान' त्या कहाणीसोबत, पात्रांसोबत न्याय करतो. पण प्रेक्षकांसोबत नाही. त्यांना तो फार त्रास देतो. बेचैन करतो. आपल्याच प्रतिबिंबावरून हात फिरवून जेव्हा उमराव ते न बदललेलं प्रतिबिंब स्वीकारते, तेव्हा समाजाने नाकारलेल्या तिने आपलं संपूर्ण मन व्यापलेलं असतं. काही क्षण तर इतकं व्यापलेलं असतं की एक विलक्षण घुसमट जाणवते.

हा त्रास मुझफ्फर अलींसह तीन व्यक्ती देतात.

रेखा - तिच्याशिवाय उमराव कुणी साकारू शकलं असतं का ? अवघडच होतं ! रेखा ही चालती-बोलती शायरी दिसते. तिच्या डोळ्यांतून दु:ख, व्यथेचा सुगंधित पाझर सतत होत असावा असं वाटतं. पण असं असतानाही ती 'पाकिजा'सारखी सदैव रडीयल दिसत नाही. आपण कुणी नवाब-बिवाब नसलो, तरी नकळत तिच्यावर किंचित का होईना भाळतोच.

शहरयार -
इस अंजुमन में आपको आना है बार बार
दीवार-ओ-दर को गौर से पहचान लीजिये
कहिये तो आसमान को ज़मीन पर उतार लाएं
मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिये

हर मुलाक़ात का अंजाम जुदाई क्यूँ है
अब तो हर वक़्त यही बात सताती है हमें

ऐ 'अदा' और सुनाये भी तो क्या हाल अपना
उम्र का लम्बा सफ़र तय किया तनहा हमने

अश्या अशआरांतून शहरयार ती-ती भावना ज्या नजाकतीने मांडतात त्याला तोड नाही. 'तमाम उमर का हिसाब मांगती है जिंदगी' किंवा 'जिंदगी तुझको तो बस ख्वाब में देखा हमने' असे त्यांचे शब्द तर काळजात रुततात.

खय्याम - खय्याम साहेबांनी प्रत्येक गाणं म्हणजे एकेक अध्याय केला आहे. सारंगीचा इतका अप्रतिम वापर फार क्वचितच आढळतो. उमरावची व्यथा व शहरयारच्या शब्दांतल्या आर्ततेला साजेसा आवाज आशा बाईंचाच आहे, हे त्यांच्या चाणाक्षतेने अचूक ताडलं आणि प्रत्येक गाणं म्हणजे २४ कॅरेट सोनं बनलं आहे.

'उमराव जान' इतक्यात तरी पुन्हा पाहायची हिंमत माझ्यात नाही. अजून काही दिवसांनी/ महिन्यांनी जेव्हा ती हिंमत परत येईल तेव्हा मी कदाचित अजून काही लिहू शकीन.
तूर्तास इतकेच.

रेटिंग - __/\__

5 comments:

  1. उमराव जान, शहरयार, खय्याम साहब, रेखा, मिर्ज़ा हादी रुसवा, मुज़फ़्फ़र अली... आणि तुझा लेख... केवळ अप्रतिम!

    ReplyDelete
  2. He vachatana sudhha man halhaltay...baghitla tevha tr pani thamblach navhat dolyatal...chaan lihilays

    ReplyDelete
  3. काही लोकांची आयुष्य म्हणजे न संपणारा इंतजार असतो. उमराव जान हा एक असाच इंतजार आहे.
    हद-ए-निगाह तक जहाँ, गुबार ही गुबार है.
    खय्याम, शहरयार, आशाताई, रेखा ह्या सर्वांनी त्या एकाकीपणाला मूर्तरूप दिलंय.
    उमराव जान पाहताना आतमधे कुठेतरी सारंगीचे करूणरम्य सूर वाजत असतात, अनाहत!
    ते सूर तुमच्या या लेखातसुद्धा मला ऐकू आले. Good.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...