Wednesday, March 12, 2014

इये ब्लॉगाचिये नगरी

रोज माझ्या मेलबॉक्समध्ये एक मेल न चुकता 'पडतो'. (हो पडतोच. पूर्वी पत्रपेटीमध्ये पत्रं पडायची, आजकाल मेलबॉक्समध्ये मेल पडतात !) हा मेल 'ब्लॉगिंग टीप्स' चा असतो. आपली जालनिशी, अर्थात 'ब्लॉग', आपल्या कमाईचं एक साधन कसं बनू शकतं, ह्याबाबतीत निरनिराळ्या क्लृप्त्या त्या मेलमध्ये सुचवलेल्या असतात. कधी तरी चुकून ह्या माहितीसाठी मी 'सब्स्क्राईब' केलं असावं, पण मला प्रत्यक्षात अश्या कमाईत रस नसल्याने मी रोज तो मेल न उघडताच डिलीट करतो. माझं ब्लॉगलेखन स्वान्तसुखाय असतं. रोज जगभरातून अनेक लोक माझा ब्लॉग वाचतात, त्यावर मला प्रतिक्रिया मिळतात, ह्यातच मी खूश असतो.
मीच नव्हे, असे अनेक ब्लॉगर्स आहेत. जे ह्याच विचारसरणीचे आहेत. ज्यांचे लिखाण रोज शेकडो लोक वाचतात आणि त्या लिखाणातून त्यांना मिळालेला आनंद वाचकांच्या संख्येनुसार वाढत असतो. काळ खूप बदलला आहे. आज छापील माध्यमातील लिखाणाइतकेच लिखाण इलेक्ट्रॉनिक माध्यमातही होत आहे. त्याचाही एक नियमित वाचकवर्ग आहे आणि तो थोडा थोडका नाही. लाखोंच्या संख्येत आहे. आंतरजालीय साहित्याची योग्य दखल घेणे अपरिहार्य आहे.

'ब्लॉग्स'वर कविता, लघुकथा, कथा, प्रवासवर्णनं, संशोधनपर लेख, परीक्षणं, समीक्षा, रसग्रहणं असं हर तऱ्हेचं लिखाण असतं. निरनिराळ्या भाषांत ब्लॉग्स लिहिले जातात. आपल्या आवडीच्या विषयाच्या लिखाणापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा अनेक पर्यायांतून आपल्याला हवे ते लिखाण निवडण्यासाठी 'ब्लॉग पोर्टल्स' असतात. वाचनालयात कसं, पुस्तकं वेगवेगळी दालनं करून मांडलेली असतात आणि आपण वरचेवर चाळून हवं ते पुस्तक निवडतो, तसंच ह्या पोर्टल्सवर कधी विषयवार, कधी भाषावार, तर कधी वेळेनुसार विभागणी करून त्या त्या दिवशीच्या नवीन लिखाणाला बघता येते. ब्लॉग वाचक पोर्टलवर येऊन आपल्या आवडीचे लिखाण निवडतात.
तसंच, आपल्या नियमित वाचकांपर्यंत आपले प्रत्येक नवीन लिखाण लगेच पोहोचावे, ह्यासाठी ब्लॉगमध्येच एक सुविधा उपलब्ध आहे, ज्याद्वारे नवीन लिखाणाविषयी वाचकाला मेलद्वारे सूचित केले जाते.
ह्या व्यतिरिक्त फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस ई. सोशल नेटवर्किंग साईट्सद्वारेही अधिकाधिक वाचकवर्गापर्यंत पोहोचता येऊ शकते.
आज आपल्या ब्लॉगला अमुक इतक्या लोकांनी वाचले, आजपर्यंत किती वेळा ब्लॉग पाहिला गेला आहे, ही सांख्यिकीही ब्लॉगवर उपलब्ध असते आणि ती पाहून प्रत्येक ब्लॉगलेखकाला हुरूप येत असतो. एक पुस्तक जितक्या लोकांपर्यंत पोहोचते, त्यापेक्षा कैक पटींनी अधिक लोकांपर्यंत एक ब्लॉग पोहोचत असतो आणि तोही खूप कमी वेळात. अर्थात, त्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत.
१. वर उल्लेखल्याप्रमाणे ब्लॉग पोर्टल्सवर आपल्या ब्लॉगला जोडणे.
२. आपल्या लिखाणात नियमितपणा असणे.
नियमितपणा म्हणजे रोज काही न काही लिहिणे नाही. 'भाराभर आणि भराभर', हे नेहमीच घातक असतं. पण महिन्यातून एकदा लिहिला जाणारा ब्लॉग, आंतरजालाच्या गतिमान जगात टिकाव धरेल, अशी अपेक्षा करणेही चूकच ना ?
३. लिखाणात वैविध्य हवे.
आंतरजालावर येणारा वाचकवर्ग हा नेहमी नव्याच्या शोधात असतो. एकाच प्रकारचे लिखाण असेल, तर वाचकवर्ग बदलत राहील. पण वाचकसंख्येच्या वाढीचा दर जर वाढता असावा, असे वाटत असेल तर जुन्या वाचकाला धरून ठेवायला हवे आणि त्यासाठी लिखाणात वैविध्य हवे.

ह्या व्यतिरिक्त रंगसंगती हादेखील एक महत्वाचा भाग असतो. अति भडक किंवा अगदीच फिकट रंगसंगती असलेले ब्लॉगपेज अनाकर्षक वाटू शकते. आंतरजाल, हे एक दृश्य माध्यम आहे, त्याने नजरेला सुखवायला हवेच.

ब्लॉग हे आजच्या पिढीचं आवडतं माध्यम आहे. पूर्वी लोक डायरी लिहायचे, आजही लिहितात. पण अनेक जण डायरी म्हणून ब्लॉग लिहितात. व्यक्त होणे, आपली अभिव्यक्ती अनेकांपर्यंत पोहोचवणे इतकं सोपं व सुलभ कधीच नव्हतं. दुसऱ्याच्या अभिव्यक्तीपर्यंत पोहोचणं इतकं सोपं व सुलभ कधीच नव्हतं. "The best things in the world are free" असं म्हणतात. तसंच ब्लॉगच्या माध्यमातून उपलब्ध असलेलं, वैविध्यपूर्ण साहित्यही विनामूल्य उपलब्ध आहे. ह्या प्रचंड भावविश्वाचा मीही एक छोटासा भाग आहे, ह्याचा मला मनापासून आनंद आहे !

....रसप....

1 comment:

  1. खूप छान पोस्ट आहे.

    माझ्या ब्लॉग ला भेट द्यायची असल्यास- http://shabdjhep.blogspot.in/

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...