Friday, February 08, 2013

नक्कीच 'स्पेशल' - स्पेशल छब्बीस - (Movie Review - Special 26)


Truth is stranger than fiction, but it is because Fiction is obliged to stick to possibilities; Truth isn't.
- Mark Twain

अश्या खरोखर अनेक गोष्टी असतील, ज्या आपल्याला माहित तर नाहीतच, पण आपण 'असं काही असू शकेल' असाही विचार केलेला नसेल. जसं पाण्याच्या वर दिसणारं हिमनगाचं टोक, छोटंच असलं, तरी ते पाण्याखाली किती असेल, हे आपल्याला कळत नाही, तसंच सत्याचं दर्शनी रूप असावं. 'अ वेनस्डे' मध्ये 'नीरज पांडे' नी अशीच एक कथा मांडली होती, जिच्या सत्यतेचा पुरावा कुठेच नाही. ती कहाणी, कल्पनाविष्कार असेल पण, तसे खरोखरही कशावरून घडले नसेल ? त्याचप्रमाणे 'स्पेशल छब्बीस' मधूनही पांडे अशीच एक कथा मांडतात, जी कदाचित खरीही असू शकते. किंबहुना, चित्रपटाच्या सुरुवातीस 'Base on true incidents' असे दाखविलेही जाते. पण, असे नुसते सांगणे, श्रेय नामावलीच्या वेळेस वृत्तपत्रांतील बातम्या दाखवणे ई. दिखाव्यांतून कुठलीही कहाणी 'खरी' वाटत नसते, ते प्रेक्षकापर्यंत 'पोहोचवायला' लागते. ती पोहोचली तर, अतर्क्यसुद्धा खरे वाटते आणि नाही पोहोचवता आल्यास एखादी साधी सरळ प्रेमकहाणीही भंकस वाटते. पांडे 'स्पेशल छब्बीस'ची कहाणी 'पोहोचवतात', ती खरी वाटते आणि इथेच चित्रपट यशस्वी ठरतो.

चित्रपटाच्या जाहिरातींतून, त्याची कहाणी बहुतांशी कळलेलीच आहे. म्हणजे, मला तरी ती आधी माहीतच होती, पण औपचारिकता म्हणून थोडासा आढावा..

१९८७ चा काळ. अजय (अक्षय कुमार), शर्माजी (अनुपम खेर), इक़्बाल (किशोर कदम) आणि जोगिंदर (राजेश शर्मा) ही चौकडी नकली सी.बी. आय./ इन्कम टॅक्स ऑफिसर्स बनून, नकली धाडी घालून लोकांना लुटत असते. ह्यांचे टार्गेट्स असतात राजकीय नेते, मोठे उद्योजक, दलाल आणि इतर काळा पैसावाले. अश्या अनेक जणांचा काळा पैसा लुटूनही त्यांच्या विरोधात पोलिसात एकही तक्रार नसते कारण लुटलेला पैसा बेकायदेशीर असतो आणि ह्याचाच फायदा घेऊन ही टोळी देशातील अनेक लहान-मोठ्या शहरांत आपली कांडं करत असते. दिल्लीतील एका राजकीय नेत्याच्या घरावरील धाडीत हे चौघे जण इन्स्पेक्टर रणवीर सिंग (जिमी शेरगिल) व त्याची सहकारी शांती (दिव्या दत्ता) ह्यांना समाविष्ट करतात, अर्थातच 'सी.बी.आय. ची रेड आहे, तुमची मदत हवी आहे' अशी खोटी बतावणी करून. आपण आपले कर्तव्य बजावत आहोत, ह्या गैरसमजात राहून रणवीर सिंग त्यांना मदत करतो आणि सर्व माल लुटून, ते त्याच्या डोळ्यांदेखत पसारही होतात. ह्यानंतर मात्र खरी सी. बी. आय. ह्या प्रकरणाची दखल घेते आणि वसीम खान (मनोज वाजपेयी) रणवीर सिंगच्या मदतीने छाननीस सुरुवात करतो. ह्यानंतर काय आणि कसं होतं त्यासाठी चित्रपटच पाहायला हवा. तेव्हाच 'स्पेशल छब्बीस' म्हणजे काय हेही समजून येईल.

अमुक कहाणी अमुक काळातच का घडावी, असे प्रश्न मुद्दाम विशिष्ट कालखंड दाखवल्यावर पडतातच. ही कहाणी ८० च्या दशकात का घडावी ? कारण सरळ आहे. आजच्या, 'मोबाईल' जमान्यात, इतक्या राजरोसपणे टोप्या घालणं पटलंच नसतं. तसेच, लुटलेला पैसा काळा होता हे उघड होईल म्हणून आजचे धनदांडगे मूग गिळून गप्प बसणे शक्य वाटत नाही. करोडोंचे घोटाळे उघड करूनही उजळ माथ्याने फिरण्याचे धार्ष्ट्य असलेल्या निर्ढावलेल्या लोकांचा व त्यांना फिरू देणाऱ्या व्यवस्थेचा हा काळ आहे. म्हणून ८० चे दशक योजले असावे.



'नीरज पांडे' हे नाव वाचल्यावर 'अ वेनस्डे' आठवणारच आणि त्याच्या प्रत्येक चित्रपटाची वेनस्डेशी तुलना होणारच. तशी इथेही होईलच. वेनस्डे खूप जलद चित्रपट होता. स्पेशल छब्बीस तसा नाही. अर्थात, दोन्हीच्या कहाणीत फरक असल्याने अशीच गती अपेक्षितही होती. पण तरी, काही भाग अनावश्यक वाटले. अजयची प्रेमिका 'प्रिया' (काजल अगरवाल) हे पात्र कहाणीस काहीही हातभार लावत नाही. पण काजल अगरवालच्या चेहऱ्यात तजेला व गोडवा असल्याने आणि ती संयतपणे वावरल्याने तिचा त्रास अजिबातच होत नाही. एम. एम. करीम कडून अजून मधुर संगीत आपण ऐकलेलं असल्याने, जरा निराशाच पदरी येते. हिमेश रेशमियाचं गीत हा ह्या चित्रपटातील एकमेव अत्याचार आहे, पण तोही 'एकमेव'च असल्याने आपण तितपत सूट देऊ शकतोच ! (Having said this, 'धर पकड' ही गाणं छान आहे, पण ते सिनेमा संपल्यावर आहे.)

स्टार कास्ट उत्तम आहे. प्रत्येक भूमिकेसाठी केलेली निवड एकदम चपखल वाटते. अक्षय कुमार चौकडीचा मास्टर माइण्ड शोभतो आणि निडर, धूर्त 'अजय' तो व्यवस्थित साकारतो. शर्माजीच्या भूमिकेत अनुपम खेर फिट्ट. प्रत्येक मोहीम संपल्यानंतरचा घाबराघुबरा शर्मा 'खोसला'ची आठवण करून देतो. एकदम परफेक्ट. राजेश शर्मा आणि दिव्या दत्ता ह्यांना मर्यादित वाव आहे पण तेही आपापल्या भूमिकेस न्याय देतात. किशोर कदमला अश्या महत्वाच्या भूमिकेत पाहून माझा मराठी उर अभिमानाने फुलला. त्याला अजून 'मोठ्या' भूमिका मिळतील, अशी आशा वाटते. जिमी शेरगिल मला नेहमीच एक 'अंडर रेटेड' अभिनेता वाटला आहे. त्याच्यातला अभिनेता फक्त सपोर्टिंग रोलकरण्यापेक्षा जास्त ताकदीचा आहे, हे त्याचा प्रत्येक सपोर्टिंग रोल बघितल्यावर जाणवतं, इथेही जाणवलं. मनोज वाजपेयी परत एकदा त्याची 'उंची' दाखवून देतो. एक उत्कृष्ट कलाकार, मेहनतीच्या व त्याच्या गुणांच्या जोरावर तरू शकतो, त्यासाठी चिकना चेहरा, दणकट देहयष्टी आवश्यक नसते. हे त्याचा, सडपातळ सी.बी.आय. ऑफिसर जाणवून देतो.

चित्रपटात, कच्चा दुवा विशेष जाणवत नाही. वर लिहिल्याप्रमाणे काही अनावश्यक भाग, पात्रं आणि संगीत नको होतं, पण सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय, चांगली पटकथा व सूचक दिग्दर्शन ह्या कच्च्या दुव्यास झाकतं.

जरासे(च) प्रेडिक्टेबल कथानक असले तरीही, 'स्पेशल छब्बीस' नक्कीच 'स्पेशल' आहे आणि त्यामुळे त्यासाठी स्पेशली वेळ काढावा व पैसा खर्च करावा. दोन्हीही वसूल होईलच, माझे तरी झाले !

रेटिंग - ४.०

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...