Sunday, September 30, 2012

जेव्हा 'देव' 'जमिनी'वर येतो.. (Oh My God - Movie Review)


विचार करण्याची क्षमता असणे, बुद्धीचा अधिक परिणामकारक उपयोग करणे, ह्या वैशिष्ट्यांमुळे मानव हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ समजला जातो. जे बरोबरही आहे. पण ह्या मानावाच्याही हातात अनेक गोष्टी नाहीत. अनेक ठिकाणी हा हतबल होतो, लाचार होतो. तेव्हा 'हे देवाच्या हातात आहे', असं म्हणून तो स्वत:ची लाचारी मान्य करतो व ते मान्य करत असतानाही इतर प्रन्यांहून श्रेष्ठत्व सांभाळतोच. इतपत ठीक आहे. पण आजच्या घडीस देव-धर्माने दांभिक रूप घेऊन गावोगावी धंदा मांडला आहे, २१ व्या शतकात पाउल ठेवलेलं असतानाही अनेक अंधश्रद्धांच्या जोरावर (भीतीवर) सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांनाही फसवलं जात आहे किंवा असं म्हणू की सुजाण लोकही त्याच्या आहारी गेले आहेत... (अशिक्षितांचं तर सोडाच..!) त्याचं काय ? देवाला नवस बोलून, सोन्या-चांदी-पैश्यांची एक प्रकारे लाच देऊन आपली श्रद्धा दाखवणं योग्य आहे  ? तो तर जागोजागी आहे ना ? मग मंदिरं का ? बरं, मंदिरं असावीत... प्रार्थनेच्या, साधनेच्या जागेसाठी म्हणून पण मग अमुक देव जागृत वगैरे काय आहे ?
- असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. पण आपण ते स्वत:च नाकारतो किंवा क्वचितच हे प्रश्न विचारण्याची हिंमत करतो. आणि जो माणूस हे प्रश्न वारंवार विचारतो, त्याला - जरी आपल्यालाही ते प्रश्न पडत असले तरी त्यांच्यापासून स्वत:च पळून - त्याला 'नास्तिक' म्हणवतो/ म्हणतो. 'ओह माय गॉड' हेच प्रश्न पडद्यावर विचारतो, बिनधास्त !


कानजी मेहता (परेश रावल) मुंबईत राहाणारा एक गुजराती व्यापारी असतो. त्याचं देवाच्या मूर्ती, फोटो विकण्याचं चांगलंसं दुकान असतं. धंदा जोरदार असतो. देवाच्या मूर्ती विकत असला, तरी कानजी स्वत: देवाला मानत नसतो. टिपिकल धंदेवाईक बुद्धीने तो लोकांना फसवतही असतो. त्यांच्या भाबड्या श्रद्धांचा गैरफायदा घेऊन लुबाडतही असतो. कानजीचा लहान मुलगा दहीहंडी उत्सवात गोविंदा बनतो. तो हंडी फोडणार इतक्यात कानजी 'श्रीकृष्ण दही खातो आहे' अशी खोटी वावडी पसरवून लोकांना पांगवतो आणि हंडी न फोडताच मुलाला खाली उतरवतो. तत्क्षणी हलकासा भूकंपाचा धक्का बसून मुंबई हादरते. काहीही नुकसान होत नाही पण संपूर्ण मुंबईत फक्त एक दुकान जमीनदोस्त होतं, ते असतं कानजीचं. लाखो रुपयांचं नुकसान होतं. घर गहाण ठेवून दुकानासाठी कर्ज काढलेलं असतं.. आणि विमा कंपनी कुठलीही भरपाई देण्यास नकार देते कारण विम्याच्या अटींत 'Act of God' ला संरक्षण नसतं. अर्थात, ज्या दुर्घटनांवर मनुष्याचा जोर नाही अश्या त्सुनामी, भूकंप, ई. घटना. जमीनदोस्त झालेल्या दुकानाची जमीनही कुणी अपशकुनी जमीन असल्याच्या समजुतीपायी विकत घेण्यास तयार होत नाही. आता काय करायचं ? ह्या विवंचनेत असलेल्या कानजीला एक वेगळीच कल्पना सुचते. 'माझं नुकसान देवाने केलं आहे ना? ठीक आहे. मग देवाने मला भरपाई द्यावी!' असा दावा घेऊन तो न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो. कुठलाही वकील त्याची केस घेण्यास तयार होत नसतो म्हणून स्वत:च स्वत:ची केस मांडून चतुर युक्तिवाद करतो व खटला दाखल करून घेण्यास भाग पाडतो. प्रतिवादी म्हणून विविध खंडापीठांचे गुरू, मशिदींचे इमाम व चर्चेसचे फादर आणि विमा कंपनी ह्यांना नोटीसा बजावल्या जातात आणि सुरू होतो एक अभूतपूर्व न्यायालयीन लढा - मानव वि. देव !!
खटल्याची बातमी देशभर पसरते आणि देशाच्या कोपऱ्या-कोपऱ्यातून लोक आपापल्या फिर्यादी घेऊन येतात व 'आम्हालाही भरपाई हवी आहे' अशी मागणी ठेवतात. कानजी व इतर सर्व फिर्यादींची मिळून भरपाई रक्कम ४०० कोटींच्या घरात पोहोचते आणि विमा कंपनी व धर्मगुरू बेचैन होतात.
खटला दाखल झाल्यावर कानजीला जीवे मारायचा प्रयत्न होतो तेव्हा त्याच्या मदतीला साक्षात भगवान श्रीकृष्ण मनुष्यरुपात (अक्षय कुमार) धावून येतात आणि नंतर खटला चालू असतानाही त्याची मदत करत राहातात.

पुढे काय होतं ? कानजी खटला जिंकतो का ? देवावर त्याचा विश्वास बसतो का ? धर्माचे दांभिक स्वरूप लोकांना समजते का ? असे अनेक प्रश्न सिनेमा पाहिल्यावर सुटतील. किंबहुना, ते तसे सुटण्याचे अनुभवण्यातच खरी मजा आहे. तेव्हा सिनेमा अवश्य पाहाच !

सिनेमात, इतर धर्मांपेक्षा हिंदू धर्मावर अधिक टीकात्मक भाष्य केले आहे. कारण सरळ आहे - स्वत: 'कानजी' हिंदू आहे ! पण असं होत असताना त्याच्या सोबतीला स्वत: देवानेच उभे राहाणे, ही कल्पना धर्माचा अपमानही होऊ देत नाही. किंबहुना, मनुष्यासाठी त्याचा धर्म किती महत्त्वाचा आहे हे सिद्ध करते. एक फार सुंदर वाक्य ह्या सिनेमात आहे. 'लोगों से उनका धरम मत छिनना, वरना वोह तुम्हे अपना धरम बना लेंगे !' ह्या व्यतिरिक्त असे अनेक दमदार संवाद तितक्याच दमदार फेकीने दाद घेऊन जातात. जसं की - 'These are not Loving people, these are fearing people' असं जेव्हा धर्मगुरू (मिथुन चक्रवर्ती) कानजीला सांगतो तेव्हा खरोखर पटतं की खरंच देवाला मानण्यात, त्याची प्रार्थना करण्यात आपली श्रद्धा नसते तर भीती असते.

संगीताला फार वाव नाही पण जे आहे ते श्रवणीय आहे. अक्षय कुमार, महेश मांजरेकर, मिथुन चक्रवर्ती, गोविंद नामदेव सगळे आपापली कामं चोख निभावतात. पण सिनेमा खिश्यात घालतो अर्थातच 'कानजी भाई' परेश रावल. अगदी सहजसुंदर अभिनयाने परेश रावल कानजीचे विचार आपल्याला आपल्याच नकळत पटवून देतो. आणि मनोमन आपण हाच विचार करतो की देव हरावा व कानजी जिंकावा.

हा सिनेमा एका गुजराती नाटकाचे सिनेरुपांतर आहे. मूळ नाटक सिनेमाचे दिग्दर्शक 'उमेश शुक्ला' ह्यांचेच आहे. विषयाला धरून, थोडीशी 'फिल्मी लिबर्टी' (न्यायालयीन कामकाजाबाबत) घेऊन मार्मिक भाष्य करणारा, विनाकारण फाफट पसारा न मांडता व्यक्त होणारा हा सिनेमा निश्चितच पाहण्याजोगा वाटला.

रेटिंग  - * * *

Saturday, September 29, 2012

मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर..


मनात येते हेच मला तू दिसल्यानंतर
तुझ्याचसाठी शब्द जन्मला 'नितांतसुंदर'!

क्षितीज म्हणजे भास असावा, मला न वाटे
तुला पाहण्यासाठी झुकते खाली अंबर

प्रचंड दुखते हृदयामध्ये तुला पाहता
पण आवडतो उरामधे शिरलेला खंजर !

सारी दुनिया त्याची जिंकुन झाली होती
तुला भेटला नव्हता कारण कधी सिकंदर

तुझ्यात हरवुन 'जीतू' लिहितो कविता - गझला
वेडी दुनिया म्हणते त्याला 'मस्त कलंदर' !

....रसप....
२८ सप्टेंबर २०१२

Saturday, September 22, 2012

हलकट जवानी - बोरिंग कहाणी - (Heroine Movie Review)

आजची तुमची जी स्वाक्षरी आहे, ती पूर्वी कशी होती ? आठवतं ? माझ्या बाबतीत सांगतो. माझ्या स्वाक्षरीत माझ्या नावाचं संक्षिप्त स्वरूप होतंच, पण ते प्रत्येक अक्षर अगदी सुस्पष्ट नाही, तरी हलक्यानेच पण असायचं. नंतर, रोज रोज तीच स्वाक्षरी करता करता काही अक्षरं आपोआपच पुसट-पुसट होत जाऊन, आज तर त्यांची जागा सरळ रेषेनेही घेतली आहे !
एखादा पार्श्वगायक, त्याचं एखादं अत्यंत गाजलेलं गाणं त्याच्या प्रत्येक कार्यक्रमात गात असतो. वारंवार तेच ते गाणं गाता गाता त्या गाण्यातील काही जागा तो जरा 'हलक्यानेच' गायला लागतो. हे तुम्हाला कधी जाणवलं आहे का ?
थोडक्यात काय... तर एकच कृती तुम्ही वारंवार करत असाल तर त्या कृतीत एक सफाई येते आणि सफाईदारपणे तीच कृती वारंवार करता करता त्यात शॉर्ट-कट्स येतात.. परिपूर्णता ओलांडल्यानंतर परिपूर्णतेचा आभास येऊ लागतो.
'हिरोईन' पाहिल्यावर दिग्दर्शक मधुर भांडारकर ह्याच आभासापर्यंत पोहोचला आहे, असं जाणवलं. पेज थ्री, कॉर्पोरेट, सत्ता, चांदनी बार, फॅशन सारख्या सिनेमांतून त्या-त्या आयुष्याची, समाजाची गडद बाजू(च) रंगवणारा हा दिग्दर्शक 'हिरोईन'मध्येही चंदेरी दुनियेची गडद बाजू(च) रंगवायचा एक प्रयत्न करतो, जो सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याच्याच आधीच्या काही सिनेमांची प्रेरणा आणि 'डर्टी पिक्चर'चा प्रभाव दाखवत राहतो.  

'माही अरोरा' (करीना) एक प्रस्थापित 'हिरोईन' - अभिनेत्री नव्हे, 'हिरोईन'च. चेन स्मोकर, दारुडी आणि मानसिकरीत्या अस्थिर. माहीच्या सिनेक्षेत्रातील कारकीर्दीमधील उच्चपदापासून उतरणीच्या काळाला चित्रित करणारा हा सिनेमा. अगदी अपेक्षित घटनाक्रमांच्या कमजोर कुबड्यांचा आधार घेत हा प्रवास आपल्यासमोर मांडला जातो. विवाहित, पण घटस्फोट होऊ घातलेल्या एका सुपरस्टारसोबत (आर्यन - अर्जुन रामपाल) प्रेमप्रकरण, त्यांचे शारीरिक संबंध, मग पार्टीतील विक्षिप्त वर्तणूक, नशेतील तमाशे, मग 'ब्रेक-ऑफ', मग आघाडीच्या क्रिकेटपटूशी लफडं, नंतर त्याच्याशी ब्रेक ऑफ, कारकीर्दीची घसरण, इतर सहकलाकारांशी रस्सीखेच आणि एकमेकांवर कुघोडी करण्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत खाली उतरणं असं सगळं होत होत अखेरीस हा सिनेमा एका अत्यंत अस्वीकारार्ह शेवटाला पोहोचतो, तेव्हा प्रेक्षकाला पावणे तीन तास वाया गेल्याची पक्की पावती मिळते.

सलीम- सुलेमान ह्यापेक्षा वाईट संगीत देऊ शकतील, असं मला तरी वाटत नाही. शीर्षक गीत तर इतकं बंडल आहे की सुरुवातीलाच डोकं फिरावं ! 'धूम'च्या चोरलेल्या धूनवर बेतलेल्या धूनचं बहुचर्चित 'हलकट जवानी' सुद्धा अगदीच पिचकवणी. 'सांईया रे..' हे एकच गाणं त्यातल्या त्यात सुसह्य वाटलं आणि कानांवर अत्याचार झाला नाही.

'दिल तो बच्चा हैं..' डब्ब्यात गेल्यावर कदाचित मुद्दाम आपल्या 'होम पीच'वर येण्याचा मधुर भांडारकरचा हा प्रयत्न त्याच्या दरज्याला अनुरूप वाटतच नाही.

राहता राहिला प्रश्न खुद्द 'हिरोईन'चा. तिच्यावर सारी मदार येते. ह्या व्यक्तिरेखेत मूलभूत असलेल्या हळवेपणामुळे ती बऱ्यापैकी छाप सोडते. पण अधिक विचार केल्यास, करीनाच्या अभिनयात तिच्या धूम्रपान आणि मद्यपानाचा महत्त्वाचा 'रोल' आहे. ते वगळल्यास ती काही विशेष चमक दाखवत नाही. जो काही परिणाम साधला जातो, तो त्या व्यक्तिरेखेमुळे व गेट-अपमुळे, असं मला वाटलं.

कधी कधी अतिविचार केल्यानेसुद्धा काम फिसकटतं, अति-प्रयत्न केल्यानेही नेमका उलट परिणाम साधला जातो, कदाचित तसं काहीसं ह्या 'हिरोईन' चं झालं असावं. ह्यात कुठलाही Casual दृष्टीकोन नसावा असं म्हणून मी माझ्या मनाची समजूत घालून मधुर भांडारकरला क्षमा करतो आणि लौकरात लौकर सावरण्याची शुभेच्छा देतो. 

रेटिंग  - *१/२ 


Friday, September 21, 2012

जिंदगी ना मिलेगी दोबारा.. (Zindagi Na Milegi Dobara)

'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हे नाव सिनेमाचं सार स्वत:च सांगतं.

रोजच्या धावपळीने आपल्यातील काही जण जगण्यापुरती 'सोय' करू शकतात, काही 'आज'सोबत 'उद्या'साठीही तजवीज करतात तर काही आज-उद्या-परवा सगळ्याची सोय लागलेली असतानाही अजून सुखकर व सुरक्षित आयुष्यासाठी - ज्याला काहीच निश्चित मर्यादा नाही - झिजत राहातात. (काही असेही असतात जे काहीच करत नाहीत, ते जिवंत आहेत ह्यावर माझा विश्वास नाही) ह्या धकाधकीत खरोखरच मला, स्वत:ला नक्की काय हवं आहे? माझ्यासाठी एक मनस्वी आनंद मिळण्याची/ मिळवण्याची गोष्ट काय आहे ? आज मी जे काही करतोय, तेच मला हवं होतं का ? हवं आहे का ? उद्या मी जे काही करणार आहे, त्याचा 'आज' हा पाया असेल तर तो माझ्या मनात भक्कम आहे का ? असे अनेक प्रश्न हा सिनेमा कुठलंही अतिरंजन न करता एका चंचल मनात निर्माण करतो आणि अखेरच्या दृष्यात निर्भेळपणे हसणाऱ्या तीन तरुणांच्या डोळ्यांत 'आता मी जगणार आहे..' ह्या भावनेने जी चमक दिसून येते, तिचा हेवा वाटतो !

इम्रान (फरहान अख्तर), कबीर (अभय देओल) आणि अर्जुन (हृतिक रोशन) ह्या तीन मित्रांची ही कहाणी. तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहाणारे हे तिघे मित्र, कबीरचं लग्न ठरलं असल्याने Bachelor's Trip च्या निमित्ताने स्पेनला भेटतात. ट्रीप ही असते की तिघांनी आपापल्या मर्जीचे तीन वेगवेगळे Adventure Sports निवडायचे आणि तिघांनी एकत्र ते करायचे. बाकी कहाणी सांगण्याची, सिनेमा जुना असल्याने व बहुतेक जणांनी पाहिला असायची शक्यता असल्याने आवश्यकता वाटत नाही. पण ह्या सहलीत टप्प्याटप्प्यावर येणाऱ्या अनुभवांतून, भेटणाऱ्या व्यक्तींकडून हे तिघं मित्र स्वत:च स्वत:ला हळूहळू ओळखू लागतात आणि सहलीच्या शेवटापर्यंत त्यांच्यात आमुलाग्र बदल घडतो.


आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारे 'आनंद - बावर्ची - मिली' पासून 'आशायें - बर्फी' पर्यंत अनेक सिनेमे झाले. त्यातील बहुतेक सिनेमे असे होते की कुठल्याही पिढीच्या व्यक्तीला 'पटतील'. 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' तसा नाही. कदाचित माझ्या वडिलांची पिढी ह्या सिनेमाशी नातं नाही जोडू शकणार. कारण ह्यातील बहुतेक संज्ञा (Concepts) आजच्या पिढीच्या आहेत. सिनेमातील पात्रांचे विचार, संवाद कुठेच कुठलं कालजयी तत्वज्ञान सांगत नाहीत. संपूर्ण 'फोकस' 'आज'वर आहे.

अभय देओल, फरहान अख्तर आणि ह्रितिक रोशन - तिघांनीही आपापल्या भूमिका जीव ओतून वठवल्या आहेत. मला हे तिघेही आजच्या पिढीतले 'विचारी कलाकार' वाटतात. आजच्या घडीला सृजनातून मिळणाऱ्या अतुलनीय आनंदाची जागा, निर्मितीला मिळणाऱ्या पैश्यातील किमतीने घेतली असल्याने वर्षानुवर्षं त्याच त्याच भूमिका करून आपले स्थान भक्कम करून झाल्यावरही बहुतेक सुपरस्टार प्रयोगशीलतेला फाटा देतात. पण खरा कलाकार नाविन्याचा भुकेला असतो. प्रयोगशीलतेची कास धरणारा असतो. फार थोड्याच अवधीत हे तिघेही नट 'कलाकार' बनू पाहत आहेत, ह्यासाठी मनापासून दाद.

अगदी छोट्या भूमिकेत नसिरुद्दीन शाह आपला 'क्लास' दाखवून देतो.
'सच.. होता क्या हैं ? हर एक का अपना अपना Version हैं सच का !' - इतक्या सहजतेने बोलतो की पटवून देण्या-घेण्याची आवश्यकताच नाही ! हा अभिनेता तुमचे दोन्ही हात पकडून तुमच्याकडून टाळी वसूल करतो, 'वसूल' !

'शंकर-एहसान-लॉय'चं संगीत हलकं फुलकं आहे. उडे खुले आसमानों में, देर लगी लेकिन आणि सेनोरिटा ही गाणी मस्त जमून आली आहेत.  

जावेद अख्तर ह्यांच्या कविता ह्या सिनेमात खूप महत्वाचं स्थान घेतात.

हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो,
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो,
हर एक लम्हे से तुम मिलो खोले अपनी बाहें,
हर एक पल, एक नया समां देखें ये निगाहें..

अश्या शब्दांतून जावेद साहेब आजच्या पिढीशी थेट संवाद साधतात. मी वर उल्लेख केलेली Generation Gap जावेद साहेबांना लागू होत नाही, तेव्हा समजतं की 'जे न देखे रवी..' का म्हटलं जातं.

'कार्लोस कॅटलन' ची छायाचित्रण सुंदर आहे. सगळीच दृश्यं अगदी नेत्रसुखद आहेत.
त्याव्यतिरिक्त स्काय डायव्हिंग व समुद्रातील दृश्यं अप्रतिम सुंदर चित्रित केली गेली आहेत.

छोट्या छोट्या प्रसंगांतून, कृतींतून व्यक्तिरेखा उलगडत जातात. ट्रीपसाठी निघतानाचं इम्रान व अर्जुनचं सामान घेणं, Bag भरणं आलटून पालटून दाखवताना दोघांमधला फरक लगेच दिसून येतो. दिग्दर्शक झोया अख्तरने प्रत्येक फ्रेमकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवल्याचं समजून येतं.
एक चित्रकार त्याच्या कॅनव्हासवर व्यक्त होतो, एक गायक त्याच्या मैफलीत व्यक्त होतो आणि एक कवी त्याच्या शब्दांतून.. प्रत्येक कलाकार त्याच्या सृजनातून व्यक्त होत असतो. तसाच एक दिग्दर्शक त्याच्या सिनेमातून व्यक्त होतो. सिनेमा संपल्यावर जेव्हा एक चित्र - एक मैफल - काव्य पूर्ण झाल्याची अनुभूती येते, तेव्हा तो सिनेमा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला असं मी मानतो.

'जिंदगी'ला 'जिंदगी'ने दिलेली 'जिंदगी'ची भेट अनुभवायची असेल तर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' अवश्य पाहावा. आजची पिढी नक्की काय आहे ? हे समजण्यासाठी 'ज़िंदगी ना मिलेगी दोबारा' पाहावा.

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहें हो तो ज़िन्दा हो तुम,
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो तो ज़िन्दा हो तुम..

....रसप....

Thursday, September 20, 2012

तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला (तरही गझल)


अशक्य शक्य मानण्यात मस्त वाटते मला
(तुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला)

'मला नसे फरक' असे म्हणून तोडलेस तू
तुझी नजर तरी विचारग्रस्त वाटते मला

असेल उंच बंगला तुझ्यासमोर बांधला
तुला गमावले म्हणून ध्वस्त वाटते मला

सरे अशीच रात रोज पाहतो छतास मी
पहाटवेळ रोजचीच अस्त वाटते मला

सुखे कुलूप लावुनी 'उघड कवाड' सांगती
विचित्र मस्करीमुळेच त्रस्त वाटते मला

तुझ्या सजावटीत तू स्वत:च लुप्त ईश्वरा
विनायका, तुझी कृपाच स्वस्त वाटते मला

उदंड आठवांत एकटाच रंगतो 'जितू'
रितेपणात आजकाल व्यस्त वाटते मला

....रसप....
१९ सप्टेंबर २०१२

Wednesday, September 19, 2012

धुक्याच्या वाटेवर.....


अर्धवट मिटल्या डोळ्यांनी
सगळं धूसर धूसर दिसतंय..
त्यातही स्पष्ट दिसतोय
तुझा शांत चेहरा..
मी हात पुढे केला,
पण तू धरला नाहीस !
मी अजून पुढे झालो..
तशी तू मागे सरलीस..
खोलवर आतून अगदी आतड्यापासून
जोर काढून मी तुला बोलावलं..
पण माझी हाक
माझ्यातल्याच निर्वात पोकळीत विरली..
पराकोटीच्या हताशेने ग्रासलेले
अर्धवट मिटलेले डोळे
अजून थोडे मिटले..
अजून थोडे... अजून थोडे..
धूसरपणा वाढत वाढत गेला..
आणि कधीच न अनुभवलेला
एक मिट्ट काळोख पसरला..
पण निमिषार्धापुरताच..
नंतर स्वच्छ उजेड !!
आणि तू समोर..
हात पुढे करून....!
मीसुद्धा मघाशी तुझ्या मागे सरण्याला विसरून
हातात हात दिला....
आणि सुरू झाला एक नवीनच प्रवास..
धुक्याच्या वाटेवर.....

....रसप....
१९ सप्टेंबर २०१२

Tuesday, September 18, 2012

साधा सोपा 'फंडा' !

एकदाच मरणे मंजुर की रोजच थोडे थोडे ?
असले काही असले-तसले मला न पडते कोडे
हसून माझ्या दु:खावर मी दु:खाला हासवतो
माझ्याशी मित्रत्वाचे मग दु:खच नाते जोडे !

लादुन घ्यावे स्वत: स्वत:वर बळजबरीने काही
हेच नेमके कधीच माझे मलाच जमले नाही
कुणी कुणी तर जीवनभरही मनास मारुन जगतो
आपलेच ना झेपत असते पण दुसऱ्याचे वाही !

नकोस तूही उगाच कुठल्या भोगाला कुरवाळू..
झाले-गेले पुन्हा आठवुन नकोस अश्रू ढाळू
हा क्षण जग जो समोर आहे तुझ्याच हातावरती
क्षणैक आनंदासाठी तू नकोस वेड्या भाळू

माझा तर जगण्याचा आहे साधा सोपा 'फंडा' !
मिळेल तेव्हा जसा जमावा तसा करावा 'कंडा' !
उद्या न असतो, परवा नसतो, 'आज' खरा मानावा
भरून वाहू दे भोगांचा भरेल तेव्हा हंडा !

चूकच असेल माझे पण मी म्हणुनच सुखात जगतो
क्षणाक्षणाचे क्षणाक्षणाला ऋण मी फेडत असतो
रंगछटा ना मला समजती, रंग तेव्हढा कळतो
मी रंगांनी रंगुन घेउन फक्त सोहळा करतो..
........................... मी रंगांनी रंगुन घेउन फक्त सोहळा करतो.. !

....रसप....
१७ सप्टेंबर २०१२

Monday, September 17, 2012

शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !


तुझ्या रंगात मैफल रंगवावी
मला माझ्या मनातुन दाद यावी

असे दे दु:ख देवा तू नशीले
सुखाची वासना माझी सुटावी !

कुणी थांबत कुणासाठीच नसते
तुला का वाटले की साद द्यावी ?

नभावर मालकी नाही कुणाची
जमीनीवर तरी रेषा असावी

मला म्हण मूर्ख वा वेडाखुळाही
शिवी चालेल, पण ती तूच द्यावी !

असावा बंगला मोठा तिचाही
'जितू'च्या पातळीची ती दिसावी !

....रसप....
१६ सप्टेंबर २०१२

Sunday, September 16, 2012

माझ्या वाटेवर माझे नाव होते उमटले..


'मराठी कविता समूहा'च्या 'लिहा ओळीवर कविता' ह्या उपक्रमाच्या शतकोत्सवी भागात माझा एक सहभाग -

मागे पाहता वळून
मला बरेच दिसले
काही राती रेंगाळल्या
काही दिवस थांबले

एका एका क्षणावर
होते काही कोरलेले
आता कळेना दुरून
होते मीच लिहिलेले

आठवते एव्हढे की
ढसाढसा रडलो मी
आणि कधी मोकळ्याने
खदाखदा हसलो मी

कमावले खूप काही
काही आणले खेचून
उपभोगले थोडेसे
बाकी राहिले पडून

किती जोडली माणसं
ऋण ठेवून, फेडून
काही सोबत चालली
काही सावलीमागून

कधी ठेचकाळलो मी
कधी भरकटलोही
कधी तोल सावरला
कधी धडपडलोही

आज प्रवास हा माझा
इथे येऊन संपला
क्षण हिशेबात एक
नकळतच गुंतला

जसे घडायचे होते
सारे तसेच घडले
हीच होती माझी वाट
आज कळून चुकले

मागे पाहता वळून
मला बरेच दिसले
माझ्या वाटेवर माझे
नाव होते उमटले

....रसप....
१५ सप्टेंबर २०१२

Saturday, September 15, 2012

चविष्ट 'बर्फी' (Barfi - Review)


एक सरदारजीचा विनोद ऐकला होता.
युद्धात सरदारजीच्या युनिटला शत्रू चहूबाजूंनी घेरतो. हे समजल्यावर सरदारजी म्हणतो.. 'मस्तच की! आता आपण कुठल्याही दिशेने हल्ला करू शकतो!'
खरं तर हा मला कधीच विनोद वाटला नव्हता. प्रतिकूल परिस्थितीतही आपली विनोदबुद्धी जागृत ठेवणे, काही तरी सकारात्मक शोधणे/ बोलणे; हे ज्याला जमलं तो खरा जिंकला, असंच मला नेहमी वाटत आलं आहे. आणि अश्या हारकर जितनेवाले को बाजीगर-फिजीगर म्हणत नसतात, त्याला 'बर्फी' म्हणत असतात..!

'बर्फी' चं कथानक साधारणत: तीन कालखंडात विभागलेलं आहे. १९७२, १९७८ व आसपासचा काही काळ आणि मग थेट आज.
१९७२. 'श्रुती घोष' (इलिएना डि'क्रुझ), तीन महिन्यांवर लग्न ठरलेलं असताना दार्जीलिंगला येते आणि इथे तिची ओळख होते 'बर्फी' (रणबीर कपूर) शी. नेहमीच हसतमुख असणारा चुलबुला बर्फी मूक-बधीर असतो. ह्या मैत्रीचं रुपांतर नकळतच प्रेमात होतं. श्रुतीचं ठरलेलं लग्नही 'प्रेमविवाह'च असतो पण तरीही 'बर्फी'कडे आकर्षित होण्यापासून ती स्वत:ला रोखू शकत नाही. दार्जिलिंगमधील एक प्रतिष्ठित श्रीमंत चटर्जी (आशिष विद्यार्थी) ह्यांच्या वाहनचालकाचा एकुलता मुलगा बर्फी अर्थातच आर्थिकदृष्ट्या हलाखीत असतो. श्रुती आणि स्वत:मधील हा जमीन-अस्मानाचा फरक ओळखून तो स्वत:च तिला तिचं ठरलेलं लग्न करून सुखी राहाण्याचे पटवतो आणि तिच्या आयुष्यातून दूर जातो.
दुसरीकडे, चटर्जीची ऑटिस्टिक मुलगी झिलमिल (प्रियांका चोप्रा) - जिला तिच्या घरजावई वडील व व्यसनाधीन आईच्या जाचापासून दूर एका रेस्टहोममध्ये तिच्यावर भरपूर माया करणाऱ्या तिच्या गर्भश्रीमंत आजोबांनी ठेवलेलं असतं - परत दार्जिलिंगला येते कारण आजोबा शेवटच्या घटका मोजत असतात. झिलमिल आणि बर्फी लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा बर्फी झिलमिललाही बाकी दुनियेपेक्षा जास्त 'विश्वासू' वाटत असतो. आजोबा मरण्यापूर्वी सर्व मालमत्ता झिलमिलच्या नावाने एका ट्रस्टमध्ये ठेवून, झिलमिलच्या वडिलांना पगारदार नोकर म्हणून नियुक्त करतात. चवताळून उठलेला चटर्जी सासऱ्याच्या मृत्यूनंतर सर्व नोकरांना हाकलून देतो. बर्फीच्या वडिलांचीही नोकरी जाते आणि परिस्थिती अजूनच हलाखीची होते. दुष्काळात तेरावा महिना यावा तसं ते गंभीर आजारी पडतात आणि उपचारासाठी बऱ्याच पैश्यांची ताबडतोब गरज निर्माण होते.
ह्यानंतर बर्फी जे काही करतो, त्यामुळे तो एका विचित्र कोंडीत फसतो. एकीकडे कायदा आणि दुसरीकडे एक भावनिक बंध.. अश्या द्विधेत तो असताना परत एकदा श्रुतीशी त्याची भेट होते. पुढे काय होतं, कसं होतं हे 'बरंच काही' आहे. त्यासाठी सिनेमाच पाहायला हवा.

ही कथा मांडताना अनेक आव्हानं होती, असं मला जाणवलं -
१. गुंतागुंतीचं कथानक.
२. बऱ्याच मोठ्या कालखंडातील घटनाक्रम
आणि सगळ्यात महत्त्वाचं -
३. दोन्ही प्रमुख व्यक्तिरेखा संवादरहित.
पैकी आठवणींतून उलगडत जाणाऱ्या (Flashback) मांडणीमुळे पहिल्या दोन आव्हानांना दिग्दर्शक अनुराग बसूने आणि अप्रतिम अभिनयाच्या जोरावर तिसरं आव्हान अनुराग, रणबीर आणि प्रियांकाने मिळून व्यवस्थित पेललं.
ऑटिस्टिक व्यक्तीचं काम म्हणजे फक्त चेहरा मख्ख ठेवून, कबुतरासारखी मान हलवून आणि लाकडासारखं कडक होऊन चालून वावरणं नाही हे प्रियांकाचा अभिनय पाहिल्यावर शाहरुखला कळावं. (संदर्भ - माय नेम इज खान)
आत्तापर्यंतच्या मोजक्याच सिनेमांतून रणबीरने जी परिपक्वता दाखवली आहे, त्याला तोड नाही. एकाही, अगदी एकाही दृश्यात तो 'रणबीर' वाटत नाही. तो फक्त आणि फक्त 'बर्फी'च वाटतो. दु:ख, हताशा, विनोद, निरागसता अश्या वेगवेगळ्या छटांनी सजवून तो बर्फी असा काही आकर्षक रंगवतो की शारीरिक अपंगत्व, आर्थिक डबघाई, गुन्हेगारी बट्टा असं सगळं असतानाही एखाद्या सुशिक्षित सुसंस्कृत लग्न ठरलेल्या/ झालेल्या स्त्रीने त्याच्यात गुंतणं अजिबातच आश्चर्यकारक वाटत नाही.
नवा चेहरा 'इलिएना डि'क्रुझ', खूपच आशादायक आहे. तिचाही वावर अगदी सहज आहे आणि चेहऱ्यात एक मिश्कील गोडवा आहे.
इतर अभिनेत्यांमध्ये सौरभ शुक्लाचा पोलीस उपनिरीक्षक 'दत्ता' खूप प्रभावशाली. त्याची आणि बर्फीची काही दृष्यं खसखस पिकवतात, काही खळखळून हसवतात आणि उरलेली मनाला स्पर्श करून जातात. अनेक ठिकाणी चार्ली चाप्लीन व मि. बीन छाप धमाल आहे.
'प्रीतम'चं संगीत अतिशय म्हणजे अतिशय कर्णमधूर आहे. 'इतनीसी हसी, इतनीसी खुशी..' हे गाणं तर मनात घर करतं.

जराशी धीमी गती, जी बहुतकरून भारतीय सिनेमांची असतेच, वगळता 'बर्फी' अगदी बरोब्बर गोडीचा आहे. दातात कळ येईल इतकी जास्त गोडही नाही आणि प्युवर साजूक तुपातली जिभेवर ठेवताच विरघळणारी बर्फी जर तुम्हाला आवडत असेल, तर 'बर्फी'ही आवडेलच.

रेटिंग - * * * *

Thursday, September 13, 2012

नक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव..


नक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव
नकोस आणू बहादुरीचा उगाच आविर्भाव

होते घर माझेच तरीही होतो उपरा मीच
माझ्या नावाच्या पाटीवर तू चिकटवले नाव

ज्याच्या त्याच्या लेखी झालो मीच खरा बदनाम
म्हणून आलो परक्या देशी सोडुन माझा गाव

जे जे माझे होते ते ते सारे केले दान
अंगावरच्या कपड्यांची पण भिकाऱ्यास त्या हाव

ही दुनिया माझ्या शब्दाला पाळत होती चोख
मलाच कळले नाही माझा कधी उतरला भाव

प्रवास माझा चालू आहे, किती लोटला काळ
अजूनही पण मलाच माझा गवसेना का ठाव ?

मेलो मी, पण चालुन ये तू नव्या दमाने चाल
छातीवरती घावांसाठी अजून आहे वाव

बांधण्यास स्वप्नांची थडगी बरेच होते हात
'जितू', ह्याच हातांनी केले होते वर्मी घाव


....रसप....
१३ सप्टेंबर २०१२

Monday, September 10, 2012

चोरीलाही म्हणता येते उधार हल्ली

इथे-तिथे पडतात गझल बेसुमार हल्ली
फुटकळ लिहिणाराही झाला हुशार हल्ली

अनुभूती अन् अभिव्यक्तीचा पत्ता नाही
सांभाळुन वृत्तास लिहावे टुकार हल्ली

शेपुट म्हणून जोडुन द्यावे रदिफ-कवाफी
मिसरे सरपटणारे झाले चिकार हल्ली

चुलीवरी दुसऱ्याच कुणाच्या शिजवा खिचडी
चोरीलाही म्हणता येते उधार हल्ली

आविर्भाव असा आणा की 'गझलदेव मी'
खरे काय? हा कुणी करेना विचार हल्ली

'जितू' तुझा तू तुझ्याचपुरता होय शहाणा
ज्याला त्याला अभिमानाचा विकार हल्ली !

....रसप....
१० सप्टेंबर २०१२

Sunday, September 09, 2012

म्हातारा

नाक्यावरच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचे घर
तिथे राहतो म्हातारा वय त्याचे अंदाजे सत्तर
सारी गल्ली त्याला म्हणते खडूस अन माणुसघाणा
खुरटी दाढी वाढवून तो दिसतोही ओंगळवाणा

रोज सकाळी लौकर उठतो विविधभारती वाजवतो
खोकुन-खोकुन मोठ्याने तो शेजाऱ्यांना जागवतो
चहा ठेवताना हातातुन रोज निसटते पातेली
'ठठम् ठठम्' ऐकून वाहते कुणी तरी मग लाखोली !

मंद पावले टाकत टाकत पहाट जेव्हा ओसरते..
उजेड झाल्यावर मग स्वारी फिरून येण्याला निघते
नित्यक्रमाने चार वेगळ्या कोड्यांचे पेपर घेई
लाल-पांढऱ्या फुलांस वेचुन परतुन म्हातारा येई

शुचिर्भूत झाल्यावर होई देवपुजा, घंटा खणखण
खिडकीपाशी खुर्ची नेउन डोळा लागे क्षणैक पण
मग सोडवतो पेपरातली एक-एक सारी कोडी
करता करता सकाळमागुन दुपारही सरते थोडी

असेच सरले जीवनसुद्धा संध्याकाळच उरलेली
अशीच सुटली सारी कोडी सुटूनही ना कळलेली
लौकर उगवे दिवस रोजचा सरून जाई, सांज उरे
एकांकी मरण्याची भीती म्हाताऱ्याला पिसे करे

खिडकीपाशी बसल्या बसल्या म्हातारा बडबड करतो
नाक्यावरचा कुणी टपोरी हसून वेड्याला बघतो
असाच म्हाताऱ्याचा मुलगा त्याच्यावर हसला होता
जेव्हा परदेशातुन त्याला परतुन बोलवला होता

म्हातारी तर मरून गेली मुलास त्या हाका मारुन
म्हाताऱ्याच्या डोळ्यामधले पाणीही गेले वाळुन
दिसायला दिसतो म्हातारा खडूस अन माणुसघाणा
पण त्याच्या चर्येवरती का भाव दिसे केविलवाणा ?

....रसप....
८ सप्टेंबर २०१२

Friday, September 07, 2012

सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक


सुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक
मी हसताना पाहुन माझे दु:ख मुरडते नाक !

जबाबदाऱ्या वाढत गेल्या जसे वाढले वय
ओझे वाहुन पाठीला ना कधीच आला बाक

संसाराच्या रहाटगाड्याची अडखळती चाल
परंतु वंगण सरल्यावरही पुढेच जाते चाक

लळा जिव्हाळा नको वाटतो, करून झाले प्रेम
तोंड पोळल्याचे कळल्यावर फुंकुन प्यावे ताक

एकच होता तुझ्या स्मृतीचा मनात जपला क्षण
स्वर्गाच्या दारावर लिहिले होते 'झटकुन टाक!'

मनात म्हटले बघुन मंदिराचे छोटेसे दार
'जितू, जबरदस्तीने आता दगडासमोर वाक !'


....रसप....
६ सप्टेंबर २०१२

Thursday, September 06, 2012

आरसा नेहमी खरं बोलतो.. (उधारीचं हसू आणून.... भाग - २)


२.
आरसा नेहमी खरं बोलतो
जे आहे.. जसं आहे..
तसंच्या तसं दाखवतो
पण.. तोही मला फसतो !
कारण, त्याला फक्त माझा चेहराच दिसतो
त्याला तेच दिसतं,
जे मी दाखवतो..

मी त्याला दाखवतो...
माझ्या खिश्यातले पैसे
तो खूष होतो... म्हणतो "मी श्रीमंत आहे!"

मी त्याला दाखवतो...
माझे नीटनेटके कपडे
तो चमकतो.. म्हणतो "मी राजबिंडा आहे !"

मग मी त्याला दाखवतो
तुझी छबी.. माझ्या डोळ्यात असलेली
तो हबकतो.. म्हणतो, "मी नशीबवान आहे!"

त्याच्या निरागस भोळेपणाचं
मला कौतुक वाटतं
मला बघून नेहमी आनंदण्याचं
मला कौतुक वाटतं

मग मीही त्याच्यासोबत खूष होतो
त्याला थोडं अजून फसवून..
मी नशीबवान असल्याचं मान्य करतो
उधारीचं हसू आणून...

....रसप....
२० मार्च २०१२


उधारीचं हसू आणून.... (भाग - २)


घरी जाणं रोजच जीवावर येतं.. (उधारीचं हसू आणून....भाग - २)

१.

घरी जाणं रोजच जीवावर येतं
डोळ्यात खुपतं ते घर, रितं-रितं
त्या भिंतींना सुरकुत्या पडल्या आहेत
दारं-खिडक्या केविलवाणे आवाज करून रडतात

माझी आवडती आरामखुर्ची
हिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसली आहे
आणि छत...
सताड, कोरड्या, निस्तेज डोळ्यांनी
माझ्याकडे रात्र रात्रभर टक लावून पाहात असतं..
की कधी मी तुझं नाव उच्चारीन
कधी भावनांच्या पायात घातलेल्या
उदासीनतेच्या बेड्यांना तोडीन
कधी बांध फुटेल मनाचा
आणि घरासारखाच रिता-रिता होईन एकदाचा

रोजच्या वळणांची पावलांना सवय झाली आहे
आपोआप घरापर्यंत येतात..
आणि मग मीही येतोच त्यांच्या मागून
जीवावर आलेलं असतानाही
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ मार्च २०१२


उधारीचं हसू आणून.... (भाग - २)



उधारीचं हसू आणून.... (भाग - २)

१.

घरी जाणं रोजच जीवावर येतं
डोळ्यात खुपतं ते घर, रितं-रितं
त्या भिंतींना सुरकुत्या पडल्या आहेत
दारं-खिडक्या केविलवाणे आवाज करून रडतात

माझी आवडती आरामखुर्ची
हिरमुसून कोपऱ्यात जाऊन बसली आहे
आणि छत...
सताड, कोरड्या, निस्तेज डोळ्यांनी
माझ्याकडे रात्र रात्रभर टक लावून पाहात असतं..
की कधी मी तुझं नाव उच्चारीन
कधी भावनांच्या पायात घातलेल्या
उदासीनतेच्या बेड्यांना तोडीन
कधी बांध फुटेल मनाचा
आणि घरासारखाच रिता-रिता होईन एकदाचा

रोजच्या वळणांची पावलांना सवय झाली आहे
आपोआप घरापर्यंत येतात..
आणि मग मीही येतोच त्यांच्या मागून
जीवावर आलेलं असतानाही
उधारीचं हसू आणून....

....रसप....
१९ मार्च २०१२

====================

२.
आरसा नेहमी खरं बोलतो
जे आहे.. जसं आहे..
तसंच्या तसं दाखवतो
पण.. तोही मला फसतो !
कारण, त्याला फक्त माझा चेहराच दिसतो
त्याला तेच दिसतं,
जे मी दाखवतो..

मी त्याला दाखवतो...
माझ्या खिश्यातले पैसे
तो खूष होतो... म्हणतो "मी श्रीमंत आहे!"

मी त्याला दाखवतो...
माझे नीटनेटके कपडे
तो चमकतो.. म्हणतो "मी राजबिंडा आहे !"

मग मी त्याला दाखवतो
तुझी छबी.. माझ्या डोळ्यात असलेली
तो हबकतो.. म्हणतो, "मी नशीबवान आहे!"

त्याच्या निरागस भोळेपणाचं
मला कौतुक वाटतं
मला बघून नेहमी आनंदण्याचं
मला कौतुक वाटतं

मग मीही त्याच्यासोबत खूष होतो
त्याला थोडं अजून फसवून..
मी नशीबवान असल्याचं मान्य करतो
उधारीचं हसू आणून...

....रसप....
२० मार्च २०१२

====================

३.
त्याने विचारलं, "रडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही."
त्याने विचारलं, "चिडत का नाहीस?"
मी म्हटलं, "माहित नाही"
त्याने विचारलं, "का झालास उद्ध्वस्त?"
मी म्हटलं, "माहित नाही!"
त्याने विचारलं, "कसा रे तू इतका आश्वस्त?"
मी म्हटलं..... "माहित नाही!!"
तो कंटाळला.. म्हणाला, "माहित तरी काय आहे?"
मी म्हटलं.. "माहित नाही!"

अखेरीस तो गप्प झाला..
मी छद्मी हसलो.. अन् बोललो,
"अरे नशिबा.. तू तर जन्मजात रडका आहेस..
पिढीजात चिडका आहेस..
म्हणूनच फुटका आहेस!!
पण मी तसा नाही....

तू खरडलंस काही-बाही माझ्या कपाळावर
अगदी दात-ओठ खाऊन..
अन् मी त्याचाही स्वीकार केला..
उधारीचं हसू आणून.....

....रसप....
२२ मार्च २०१२
====================

४.
आज परत एकदा प्रेमात पडावं म्हणतो..!

दु:खाची नशा आणि वेदनेची झिंग
उतरत चालली आहे
जगण्यातली गंमत आणि जळण्यातली मजा
ओसरत चालली आहे

परत एकदा नख लावायचंय
काळजातल्या हळव्या पडद्याला
अन अनुभवायचाय तोच एक शहारा..
पापणीवर तरळून आभाळ हेलावणारा

परत एकदा मनाच्या दगडाला पाझर फुटेल
अन डोळ्यांच्या विहिरी भरतील
हळव्या हवेच्या झुळुकीने
वाळलेली पानं उडतील..

परत एकदा घ्यायचीय
काटेरी उबदार शाल ओढून
अन फुटून ठिकऱ्या उडालेल्या स्वप्नांना
परत एकदा जोडायचंय
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२२ मार्च २०१२

====================

५.


उसळणाऱ्या लाटांनी
किनारा भिजतो
अन उधाणलेल्या वाऱ्याने
क्षणार्धात सुकतो

मीही चार इंचाच्या पेल्यात
स्वप्नं भिजवून घेतो
आणि सगळ्यांच्या नकळत
पापण्यांना देतो !

स्वप्नं असतात -
कधी तिची
कधी माझी
कधी जे जमलं नाही त्याची
कधी जे उरलं नाही त्याची
कधी हातून निसटलेली
कधी गुपचूप हरवलेली
कधी इतस्तत: विखुरलेली
कधी मुद्दामच उधळलेली

पण सकाळ होते..
आणि मिटलेल्या पापणीतल्या अंधाराला
उजेड देते, वास्तव दाखवते
नकली प्रसन्नतेच्या रखरखीत वाऱ्याने
परत पापणी सुकते

रुजवायला भिजवलेली स्वप्नं
डोळ्यात उरतात रुतून
मी नव्या दिवसाचं स्वागत करतो
उधारीचं हसू आणून....

....रसप....
२९ मार्च २०१२

====================


६.
तू असतानाच्या आठवणी..
आठवणीतला एकेक क्षण
डोळ्यात साठवला होता...
त्या एकेक क्षणाने डोळ्यातलं पाणी शोषलं आहे

शेवाळलेल्या हिरवट डबक्यातल्या चिखलात
जसं कमळ उमलतं..
तसं त्या आठवणींतून उमलतात काही शब्दपाकळ्या..
आणि फुलते कविता..

रोज कातरवेळी माझं मन
मीच स्वत: लपवतो
त्या कमळाच्या मिटणाऱ्या पाकळ्यांत
आणि रोज सकाळी
एका प्रसन्न कवितेच्या उमलत्या पाकळ्यांतून
ते बाहेर येतं.... सुगंधित होऊन
अन दिवसभर बागडतं...
.
उधारीचं हसू आणून....

....रसप....
९ ऑक्टोबर २०१२

====================

७.

दु:ख फुलपाखरासारखं..!
मी अनेकदा अलगद चिमटीत पकडलंय
अगदी निरागस शांतपणे
ते दोन बोटांना शरण आलंय
त्याचा तो मलमली स्पर्श..
मोहवणारे रंग..
पण तो निष्पाप चेहरा..
मन भरून न्याहाळल्यावर
मी जेव्हा पुन्हा त्याला सोडून देतो..
इथे तिथे बागडायला..
तेव्हा बोटांवर राहतो
एक करडा रंग
त्याच्या पंखांचाच रंग मागे राहिलेला असतो
पण पंखांवर बोटांचा ठसा मात्र नसतो

असंख्य फुलपाखरं अवतीभवती असतात
मी पुन्हा पुन्हा
चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करत असतो
एकावर तरी माझा ठसा उमटेल म्हणून
अन् दरवेळी फक्त बोटांवरचा करडा
रंग पाहात राहातो -
उधारीचं हसू आणून....

....रसप....
०३ मार्च २०१३

====================

८.
उबदार काळी शाल ओढून घेतल्यावर
माझी माझ्याशीच
एक अस्वस्थ कुजबुज सुरु होते
स्वत:कडे पाठ फिरवण्यासाठी
मी कूस बदलतो
मिटलेले डोळे गच्च आवळतो
थोडा वेळच, मग टक्क उघडतो
भिंतीवरच्या घड्याळ्याच्या टिकटिकीतून
एक क्षण निसटल्याचं जाणवतं
आणि छातीत काही तरी हेलावतं
पुन्हा एकदा एक कुजबुजणारी रात्र
डोळ्यांतून मनात झिरपणार असते

बाजूच्या निश्चल उशीच्या
कोरड्या अनभिज्ञतेतून
छळणारा तिचा आणि माझा एकटेपणा
काळोखाला छेदत दूरवर पसरतो

आणि एका बेसावध क्षणी
रात्र गुपचूप निघून जाते
मला जागं ठेवून
अनभिज्ञ उशी बघत असते सगळं
उधारीचं हसू आणून..

....रसप....
३ सप्टेंबर २०१३ 

उधारीचं हसू आणून.. भाग - १

Saturday, September 01, 2012

कासावीस


दिस सरला सरला, असे वाटता उरला
एक क्षण धारदार, गळ्यावरून फिरला
जीव करी तडफड, हृदयात धडधड
क्षण रुतून राहिला, सुटण्याची धडपड

गेलं घरटं सोडून, एक पाखरू उडून
कुठल्याश्या दूरदेशी, साऱ्या धाग्यांना तोडून
तिथे दिवस सुखात, इथे जातो काळोखात
रोज आणखी गडद, मन रंगते दु:खात

काळ आता तरी यावा, जीव एकदाचा जावा
किती वाटले तरीही, माझा अपुराच धावा
एक क्षण कासावीस, रोज धरतो ओलीस
क्षण एकेक पुढचा, होतो घटिका चोवीस

कमजोर खांद्यावर जीवनाचा वाढे भार
पाय लटपट होती, कसा धरावा मी धीर ?
तुला जाणवत नाही, असे मानवत नाही
देवा उदासीनता ही मला साहवत नाही

सोडवितो श्वासगाठी माझ्या मीच मुक्तीसाठी
आता थांबणार नाही देवा तुझ्या दयेसाठी
आज क्षण धारदार जावो उरी आरपार
लख्ख दिवस काळोखी व्हावा निपचित गार

....रसप....
१ सप्टेंबर २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...