Sunday, April 26, 2009

OUT of COVERAGE


सारं काही मनात ठेवायला
माझं मन लहान
भावनांना आवरायला
मी न कुणी महान

कुठे काढू कशी काढू
भडास सांग माझी
तुझ्याशिवाय ऐकतंय कोण
वटवट कटकट माझी?

शेवटी तळ्याकाठचा दगड घेतला
समोर त्याला ठेवला
म्हटलं बोलू ह्याच्याशीच
तर तो स्वत:च बोलला..!!

"माणसासारखा माणूस तू
कसा मूर्ख इतका?
सावली कधी तुटेल काय
पायांस देऊन झटका?

मातीशिवाय झाड नाही
वेगाशिवाय वारा
सूराविना गीत नाही
धाग्याविना माला

आज मी दगड आहे
कारण शेंदूर फासला नाही
मूर्ती आणि माझ्यामध्ये
दूसरा फरक नाही

तुझा सुद्धा दगड झालाय
शेंदूर तूच पुसलास
माझं तरी नशीब आहे
तुझा तूच फसलास.."

दात विचकून हसू लागला
मला संताप आला
माझा की त्याचा, माहीत नाही
पण फेकून त्यालाच दिला

त्याने सुद्धा पङता पङता
पाणी थोडं उडवलं
गाठण्याआधी तळ त्याने
तरंगांना फ़ुलवलं..

खिशातून मोबाईल काढला
नेटवर्क मध्ये नव्हता
पण तू नसशील "OUT of COVERAGE"
विश्वास मला वाटला..


....रसप....
२४ एप्रिल २००९

Friday, April 24, 2009

टून् झाल्यावर

फुंकून पीतो बियर
टून् झाल्यावर
जीभ सुटे मोकाट
मी आरूढ़ ढगांवर

खेकड्यासारखा वाकडा
टून् झाल्यावर
डावं-उजवं सारं एक
चालतो अधांतर

मला म्हणतात बेवडा
टून् झाल्यावर
सारे पीवट पेताड
खुद्द झोक्यावर

फास्ट रिवाईंड सिनेमा
टून् झाल्यावर
प्रश्न करा काहीही
उत्तर माझ्यावर

उद्धार सा-या जगाचा
टून् झाल्यावर
मीच भाई, सारं काही
एका इशा-यावर

BMW, फेरारी
टून् झाल्यावर
रात्र जाते सुपर फास्ट
चंद्र घोड्यावर

तारवटलेले डोळे
शुद्धीत आल्यावर
मेंदू गोटा २५ किलो
फिरतो गरगरगर.....



....रसप....
२४ एप्रिल २००९

Saturday, April 11, 2009

बंध रेशमाचे


जरी गेय नाही तरी बोल काही
तुला मी असे हे ना कधी पाहिले
असे सांजवेळी तुझे लाजणे हे
जणू पाकळ्या येथ खुल्या सांडणे

ठेविले जपूनी मनाच्या तळाशी
इथे आज माझे-तुझे तेच गाणे
कधी सूर माझा तुझ्या सूरताली
कधी अन् तुझाही एकरूप होणे

नदीच्या किनारी जसे झाड वेडे
तुझ्या खोल नेत्री तसा मुग्ध झालो
कुणाला कळावे मला काय झाले
जगाचा न माझा असा मी राहिलो

प्रिये ना कधी आपले दूर जाणे
बंध रेशमाचे कधी ना तुटावे
भले दूर होवो नदी अन् किनारा
तुला मी मला तू सदा सावरावे


....रसप....
११ एप्रिल २००९

Tuesday, April 07, 2009

अंगूर (चित्रपट कविता)




घोळात घोळ झाला
बट्ट्याबोळ झाला
सरळ साध्या आयुष्यात
केव्हढा गोंधळ झाला

कुणास काही कळण्या आधी
गडबड झाली सारी
पडल्या होत्या बुचकळ्यात
मोठ्या मोठ्या स्वारी

देवाच्या करणीलाही
काही तोड नाही
जोड्या सुद्धा अश्या ज्यांना
काहीच विजोड नाही!!

ह्याच्या जागी तो
आणि त्याच्याजागी हा
सज्जन होते सारे तरी
कसे फसले पाहा


सरतेशेवटी नशीबानेच
सोडवला तो गुंता
एकमेकासमोर आणली
गोंधळलेली जनता

चूक भूल देऊ घेऊ
हसण्यावारी नेऊ
भले-बुरे विसरून जाऊ
म्हणती जुळे भाऊ

....रसप....
०७ एप्रिल २००९

Monday, April 06, 2009

येशील जेव्हा स्वप्नात माझ्या

येशील जेव्हा स्वप्नात माझ्या
दूर दूर जाऊ
संपेल जेथे नभाचा किनारा
गोड गाणी गाऊ


डोळ्यातले, हृदयातले..
श्वासातले, भासातले..
क्षण हे सारे
हसरे तारे
वेचून मोजून ठेवू..

संपेल जेथे नभाचा किनारा
दूर दूर जाऊ


फुलता फुले पवनामुळे
उधळीत गंध चोहिकडे
गंधात न्हाले
गंधीत झाले
मनधुंद बेधुंद होऊ

संपेल जेथे नभाचा किनारा
दूर दूर जाऊ


ही रात चाली हळुवार चाली
निश्चिंत मी हा असा
पाहून तुजला तो चंद्र मजला
निस्तेज वाटे कसा
नयनाताले चांदणे त्यास थोडे
देऊन उजळून जाऊ

येशील जेव्हा स्वप्नात माझ्या
दूर दूर जाऊ



....रसप....
०६ एप्रिल २००९
Related Posts Plugin for WordPress, Blogger...