Tuesday, March 03, 2009

आशिर्वाद देहि

हा जीव ना जळावा
अमृतास प्याया
हे घोट जीवनाचे
मजला मधुर व्हावे

मी घोट-घोट घ्यावे
जे प्राशले, पचावे
रानात मोर नाचे
ते वागणे असावे

कोणास ना कधीही
फसवून मी हसावे
अन् भाट होउनीही
मी ना कधी झुकावे

उधळीत रंग यावे
उधळून तृप्त व्हावे
जिंकून मैफलींना
मागे सुखी उरावे

ना संत मी न थोर
बाहूंत क्षीण जोर
लाटांवरी तरुनी
मी फक्त पार व्हावे

देवा तुझ्या कृपेने
सुखवंत आज आहे
शब्दांस एकदाही
वाया न घालवावे

आयु सरून जाई
नच मित्र एक लाभे
मज लाभले परि जे
कश्चित् न दूर जावे

आशीर्वाचास देहि
तुज सर्वदा स्मरावे
माणूस तू घडवले
माणूस मी रहावे

….रसप….
०१ मार्च २००८

1 comment:

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...