Sunday, November 30, 2008

शपथ घे


आग शमली,
धुराचे लोटही विरले
आता पुन्हा गायले जातील
मुंबापुरीचे पोवाडे
स्तुतीसुमनं उधळणारे..
पण मला सांग,
ही सहिष्णुता की हतबलता?
ही शांतता की उदासीनता?
ही सहनशक्ती की कचखाऊ वृत्ती?
ही चिकाटी की लाचारी?

आग स्फोटांची विझली असेल
पण चितांची..??
ती नेहमीच धगधगत राहील.
चल, एक कोलीत उचल
अन् लाव चटका स्वत:ला
आत.... खोल.. स्वत:च्या मनाला..
हा चटका झोंबू दे
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा चिघळू दे..भळभळू दे
इथून पुढे तुलाही लढायचंय, कारण..
देशांना सीमा असतील
पण युद्धांना राहिल्या नाहीयेत
शस्त्र घ्यायचं तेव्हा घ्यावंच लागेल..
अन् घेच.. पण आज..
आज शपथ घे..
त्या हुतात्म्यांची
त्या वीर बहद्दुरांची
डौलदार तिरंग्याची
अन् लाडक्या मुंबापुरीची
आठव ते माधव ज्युलियनांचे शब्द --
"लेखणी बंदूक घ्या वा तागडी वा नांगर
हिंदवी व्हा चाकर
एक रक्ताचेच आहो साक्ष देई आतडे..
भ्रांत तुम्हां का पडे?


....रसप....
३० नोव्हेंबर २००८

Tuesday, November 25, 2008

तू भिड बिनधास्त


जातीचा तू लढवय्या लढवून एकटा किल्ला
उलट परतला हरेक हल्ला शत्रूही भिरभिरला
...................तू भिड बिनधास्त....

कितीक पडले धारातीर्थी कितीक अन् शरणार्थी
नतमस्तक जाहले चालले कितीक गुडघ्यावरती
...................तू भिड बिनधास्त....

मैदानीच्या रणांगणी तव अनेक विजयी गाथा
तोडू न शकल्या तटबंदीला सहस्त्र सागर लाटा
...................तू भिड बिनधास्त....

काय तुझा लौकीक अन् तुझी किती गावी महती
अद्वितीय तू अभेद्य असशी "WALL" म्हणूनचि म्हणती
...................तू भिड बिनधास्त....


....रसप....
२५ नोव्हेंबर २००८

Thursday, November 20, 2008

मैत्री.. (लघु कविता)

ओळख असली नवी
तरी जुनी वाटते
शब्द तुझे तरी
भावना माझी भासते

दोन शब्दांत तुझ्या
एक जग लपते
दिसत नाहीस तरी
नजर मला भिडते

कळत नकळत म्हणे
असेच बंध जुळतात
मैत्रीच्या बीजाला
कोवळे अंकुर फुटतात....

....रसप....
२० नोव्हेंबर २००८

Sunday, November 16, 2008

पुन्हा रांगच पावली....


मेल्यानंतर यमदूताने
माझा खोळंबा केला
एअरपोर्टला उतरून
बावळा टॅक्सीने आला..
पाच मिनिटांच्या प्रवासाला
दोन तास लागले
जीवंतपणी प्राण गेले
मेल्यानंतर थांबले!!

घरापासून एअरपोर्टला
पुन्हा दोन तास लागले
क्षणभर मला ऑफीसचेच
दिवस येऊ भासले

विमानात पण त्याच्या
गर्दी 'लोकल'सारखीच
लटकायला दारापाशी
जागा माझ्यापुरतीच !

प्राण घेऊन हातावर
आयुष्यभर लटकलो
मेल्यानंतर भीती कसली
छपरावरतीच विसावलो

स्वच्छ मोकळी शुद्ध हवा
मनमुराद चाखली
चित्रगुप्तासमोर पटकन
उडी पहिली मारली

पाप-पुण्य हिशोब माझा
मांडला जात होता
छोट्या-छोट्या घटना सा-या
बराच व्याप होता

कसेबसे जुळून शेवटी
गणित मांडले गेले
स्वर्गात कमी, नरकामधले
दिवस जास्त ठरले

स्वर्गद्वारी गेलो तिथे
अनपेक्षित घडले!
पाय ठेवायला जागा नाही
बाहेरुनच कळले !

पाप-घडे उतू चालले
पृथ्वीवरती किती
कुठून केले ह्यांनी इतके
पुण्यकर्मी भरती??

विचारपूस करता थोडी
खरं काय ते कळलं
आरक्षणाचं लोण म्हणे
'वर'पर्यंत पसरलं..!!

पृथ्वीवरती जागा भरपूर
स्वर्गामध्ये इवली
इवल्यामधली अगदी थोडी
अनारक्षित राहिली

शाळेनंतर कॉलेजसाठी
बस-ट्रेन-रेशन साठी
लग्नाकरता मुलीसाठी
मेल्यानंतर जळण्यासाठी
छोट्या-मोठ्या सगळ्यासाठी
नेहमीच रांग लावली
सवयीचा गुलाम होतो
पुन्हा रांगच पावली....


....रसप....
१६ नोव्हेंबर २००८

Friday, November 14, 2008

शाळा..२


माझी पाचवी पूर्ण झाल्यावर आम्ही मुंबईला स्थायिक झालो.. इथली माझी शाळा म्हणजे एक अतिशय गरीब, छोटीशी संस्था.. एका छोट्याशा भाड्याच्या जागेतली.. जागा पालिकेची.. लागूनच पालिकेची पण शाळा होती, जी कालांतराने बंद झाली अन् तिची जागा एका "प्रतिष्ठित" स्पोर्ट्स क्लबने त्याच्या मैदानात "सामावून" घेतली.. आमच्या शाळेवरही गंडांतर आले होते, परंतु टळले.. असो.
शाळेची सर्वात मोठी आठवण.. नव्हे, साठवण म्हणजे 'चव्हाण सर.' आमचे मुख्याध्यापक.
आठवण म्हणजे त्यांचे शिकवणं पाऊण वर्गाला समजायचं नाही आणि त्यांचा चापटी/ धपाटा वजा फटका झणझणीत झोंबायचा.. अन् साठवण म्हणजे.. त्यांनी लिहिलेली पत्रं.. त्यांचा आजही दर वाढदिवशी मलाच नव्हे, त्यांच्या शेकडो विद्यार्थ्यांना जाणारा फोन.. त्यांचं शाळेला वाहून घेतलेलं आयुष्य.. बरंच काही..


शाळेला जाण्याच्या रस्त्यावर एक बार लागायचा.. believe it or not.. पण का कुणास ठाऊक तो बार मला नेहमी मंदिर असल्याचा भास व्हायचा.. अनेकदा मी तिथे हात सुद्धा जोडले..!!


एक 'चिकन शॉप' पण लागायचं.. अनेकदा मान कापून टाकलेल्या कोंबडीचं प्लास्टिकच्या पिंपातलं तडफडणं काळीज पिळवटायचं..


ह्या शाळेत आल्यावर मी अचानक पुढच्या बाकावर बसू लागलो.. वर्गात पहिला मी कधीच नव्हतो पण पहिल्या 'काहीं'मध्ये येऊ लागलो. माझ्यातल्या बाथरूम सिंगरला एक स्टेज मिळालं.. अनेक बदल घडले..
पण..
शाळा आजही बदलली नाही.. स्थिती बदलली नाही.. परिस्थितीही बदलली नाही..
आजही चव्हाण सर रात्री ९.३०-१०.०० पर्यंत शाळेत असतात..
आजही अनेक आजी-माजी, दुस-या शाळान्चे विद्यार्थी संध्याकाळी शाळेत येतात.. कुणी सहज सरांना, मित्र-मैत्रिणीना भेटायला.. कुणी अभ्यास करायला.. एखाद्या माजी विद्यार्थ्याकडून काही शिकायला..


आज ही मी मुंबईला आल्यावर शाळेत जरूर जातो..
पण आजही डोळ्यात खुपतं ते मोडकं फाटक.. अन् ते सरांचं एकटेपण..

शाळा..१


बदलापूरची माझी शाळा प्रचंड मोठी... नावाजलेली.. आम्ही थोडे गावाबाहेर राहात होतो. त्यामुळे तशी दूरच होती, परंतु एक "short-cut" होता. डोंगरातून.. मी, ताई आणि अजून १-२ मुलं त्याच रस्त्याने जात असू. शाळेत जाणं-येणं मला शाळेपेक्षा जास्त आवडायचं.
ह्या शाळेतली एक आठवण मी कधीच विसरणार नाही..

दुपारची वेळ होती, मधल्या सुट्टीनंतरची..खामकर सर. गणिताचा तास. आदल्या दिवशी मी गैरहजर होतो व त्याच दिवशी इंग्रजीचे पेपर मिळाले होते.
बाई आल्या आणि त्यांनी सरांना काल गैरहजर असलेल्या साऱ्यांना एकेक करून वर्गाबाहेर पाठवायला सांगितले.. पेपर देण्यासाठी. परेड सुरु झाली. ७-८ मुलं होती एकूण.
पेपर घेऊन परत वर्गात आलेल्या प्रत्येकाला खामकर सर "किती..?" विचारत.
माझी धडधड माझा नंबर जसजसा जवळ येऊ लागला तसतशी वाढतच होती. अखेरीस माझाही नंबर आला. गेलो. बाईंकडून पेपर घेऊन मी आधी चमकलेले तारे विझवले आणि वर्गात शिरलो.
सर फळ्यावर काहीतरी खरडत होते. अर्जुनाला जसा पक्ष्याचा डोळा दिसत होता, तसा मला फक्त माझा बाक दिसत होता. मी जवळजवळ धावतच जागेवर जायला सुटलो. पण इतक्यात सर वळलेच अन् मला हाक मारली, "पराडकर.. किती..??"
मला काहीच सुचेना. मी ढीम्म. सर जवळ आले.. धडधड अजून वाढली..
"किती मिळाले?"
"सर, कमी आहेत."
"सर कमी नाहीत, एकच आहेत.. मार्क किती मिळाले.."
सगळा वर्ग हसला..
"सर.... कमी आहेत..."
"अरे, पण किती..??"
मी हळूच चोरून 'ती'ला पाहिलं.. ती सुद्धा हसत होती.. मला शरमेने मेल्यासारखं झालं....
"सर, कमी आहेत.." माझा आवाज अचानक कमी झाला आणि सरांचा मात्र वाढला.
"आता सांगतोस.. की देऊ एक...??"
त्यांनी हातात पट्टी घेतली होती. काय करावं कळेना.. साऱ्या वर्गासमोर मार्क सांगितले तर काही इज्जतच राहणार नाही. त्यात 'ती' किती हुशार होती ! 'ती' तर माझी 'छी: थू'च करेल आणि नाही सांगितलं तर पट्टी..!
"सांग लौकर..!!"
मी नकारार्थी मान हलवली..
"हात पुढे.."
मी केला..
सट्ट.. कळवळलो..
"जो पर्यंत सांगणार नाहीस, पट्टी खावी लागेल..
मनात म्हटलं,"ह्यांना काय करायच्यात चांभार चौकश्या..उगाच त्रास देतायत मला.."
अजून चार-पाच पट्ट्या खाल्ल्यावर मात्र मी रडू लागलो.. शेवटी क्षीण आवाजात माझे एक आकडी (अव)गुण सागितले.. कुणाही कडे न बघता तडक बाक गाठला आणि आडव्या हाताच्या घडीत तोंड खुपसलं..(त्या वयात येत असणा-या सा-या शिव्या देऊन झाल्या.. हे सांगायलाच नको..)

त्या दिवशी पासून 'ती'च्या नजरेला नजर देण्याची उरली-सुरली हिंमतसुद्धा विरली-जिरली.

आज खामकर सर भेटले तर त्यांना माझी इंग्रजी जरूर ऐकवीन, पण त्यांनी अजून कुठल्या विषयाबद्दल विचारलं, तर मात्र पुन्हा पट्टी खावी लागेल..!!

Sunday, November 09, 2008

मरण प्रेमवीराचे..

ह्या कंठाच्या घोटासाठी
तू आसुसलेला होतास
कितीक वेळा घाला
तू भ्याड घातला होतास

मी घाव तुझे असंख्य
सहजीच पचवले होते
घायाळ हृदयासाठी
घायाळ शरीरही होते

आशेचा दीप तो विझला
अन् जगणे मरणचि झाले
हे प्राण घेऊनी हाती
तुज हाती ठेवले होते

मी मिटूच शकलो नाही
डोळे, ती दिसली होती
मेल्यावरही हृदयी
धडधड ही चालूच होती

जळण्याही उरलो नाही
आधीच जाहलो खाक
डोळे अन् हृदयाची बघ
लोकांनी रचली राख..


....रसप....
०९ नोव्हेंबर २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...