Sunday, September 28, 2008

थेंबभर जमीन....

थेंबभर जमीन
इंचभर हवा
कणभर पाण्यावर
मला हक्क हवा

तो गंध पाहिलेला
आवाज शोषलेला
चेहरा ऐकलेला
माझ्यासमोर असावा

पाउस वाहलेला
मृदगंध बरसलेला
दरवळुन चंद्र माझ्या-
-सोबती असावा

क्षण एक थांबलेला
अंधार उजळलेला
मी धुंद जाहलेला
एकदा तरी असावा



....रसप....
२८ सप्टेंबर २००८ 

Friday, September 26, 2008

शेवटचा डाव.....जिंकायचाय.

 

आता कुठे मला क्षितिज दिसतंय
आता कुठे आकाश मला खुणावतंय

रात्री चंद्र दिवसा रवि
एकटक मला पाहतात
अन् भरारी भरण्यासाठी
माझे बाहू शिवशिवतात

पण नाही...

ताकद असेल माझ्यात
तरी शिदोरी अपुरी
पल्ला मोठा आहे
केवळ हिंमत नसे पुरी

कणकण अन् क्षणक्षण
साठवून मला ठेवायचाय
आणि सारे काही पणाला लावून
एकच डाव खेळायचाय

आरंभशूर मी नेहमीच होतो
आता वेग राखायचाय
एकच लक्ष्य एकच ध्येय
शेवटचा डाव जिंकायचाय....
..शेवटचा डाव.....जिंकायचाय.



....रसप....
२६ सप्टेंबर २००८

Tuesday, September 02, 2008

स्पर्श मलमली भासत राही ---- (भाग २ )


दिवस उजाडे सांज मावळे स्तब्धपणे मी पाहत राही
त्या किरणांच्या लालीतुनही  रूप निरागस भुलवू पाही

समजावुनही समजत नाही मृगजळ प्याया धावत राही
पोळुन भाजुन जाळुन झाले मार्ग तरी मन बदलत नाही

शून्यातुन मी आलो उदयी शून्याकडेच वाटचाल ही
ठाउक नाही कोण शक्ति ही पुन्हा खेचुनी मागे नेई

महत्प्रयासी विझलो आहे नको पुन्हा ती लाही लाही
जळून गेले अणु-रेणुही भस्म कराया काहीच नाही

उधळुन टाकुन मखमाली ह्या संचित माझे डाचत राही
सुट्या मोकळ्या धाग्यांतुनही स्पर्श मलमली भासत राही



....रसप....
०२ सप्टेम्बर २००८
Related Posts Plugin for WordPress, Blogger...