Saturday, April 07, 2012

फुल्ल गोंधळ 'हाउसफुल्ल - २' - (Review -House full -2)

कितीही मोठे झालो तरी कधी कधी मोठ्ठ्या आकाशपाळण्यात बसल्यावर मजा येतेच ना? तस्संच, कितीही कळत असलं तरी कधी कधी काही सिनेमे लॉजिक-फिजीक.. डोकं-बिकं.. समज-बिमज.. बाजूला ठेवून पाहिले ना की सॉल्लिड मज्जा येते बुवा.. "हाउसफुल्ल -२" त्यातलाच एक..!
आजकाल विनोदी सिनेमा म्हटलं की प्रचंड गुंतागुंतीचं कथानक हे एक समीकरणच झालं आहे. इथेही तोच प्रकार आहे. 
चिंटू कपूर (ऋषी कपूर) आणि डब्बू कपूर (रणधीर कपूर) हे सावत्र भाऊ. चिंटू 'रिअल सन' आणि डब्बू 'नाजायाझ!' पण त्यांच्या वडिलांनी त्यांची ब्रिटनमधील कंपनी व इतर मिळकत दोघांच्याही नावावर समसमान केली असते. ह्यामुळे 'रिअल सन' चिंटू चा डब्बूवर  फार राग असतो. त्याची घृणा असते. आणि अर्थातच दोन्ही कुटुंबात हे वितुष्ट असते. भावजय-भावजय, बहिण-बहिण एकमेकांवर खार खाऊन असतात. असंच एका बाचाबाचीत चिंटू-डब्बू एकमेकांना आव्हान देतात की, "मी माझ्या मुलीचं लग्न ब्रिटनमधील 'सबसे अमीर खानदान में' करीन...!!" 
ईन कम्स 'पास्ता'! 
खाण्याचा नाही हो! 'आखरी पास्ता' (चंकी पांडे) हा 'लग्न जुळवायची कामं' करत असतो.. हो हो.. वधु-वर सूचन ! 'पास्ता' चिंटूकडे 'जय' (श्रेयस तळपदे)चं स्थळ घेऊन येतो. पण मस्तवाल चिंटू अद्वातद्वा बोलून जयच्या आईवडिलांचा असा काही अपमान करतो की आधीच 'कमजोर दिल के' जयचे वडील हृदयविकाराचा झटका येऊन थेट इस्पितळ गाठतात..
ईन कम्स 'जय'! 
वडिलांची ही अवस्था पाहून 'जय' पेटून उठतो. आणि ठरवतो की 'चिंटू'लाही असाच झटका देणार.. चिंटूला अतिश्रीमंत घरचं स्थळ हवं असतं ना? ब्रिटनमधील सर्वांत श्रीमंतांपैकी एक 'जे.डी.' (मिथुन) चा मुलगा 'जॉली' (रितेश) त्याचा जिगरी दोस्त असतो. हे दोघे कॉलेजातल्या अस्सल बदमाश दोस्त मॅक्स (जॉन अब्राहम) सोबत मिळून चिंटूला धडा शिकविण्यासाठी एक प्लान आखतात. 'जे.डी.'चा मुलगा अशी ओळख सांगून लग्न ठरवायचं आणि अगदी ऐन वेळी स्वत:ची खरी ओळख सांगायची.. अस्सा झटका की डायरेक्ट हॉस्पिटलातच पोहोचवेल! मॅक्स खोटा 'जॉली - जे.डी.चा मुलगा' आणि जय त्याचा ड्रायव्हर बनतात. पण चुकून चिंटूऐवजी डब्बूकडे पोहोचतात! आता?
ईन कम्स 'सनी' (अक्षय कुमार)!
जय -जॉली चा कॉलेजातला अजून एक बदमाश दोस्त आणि मॅक्सचा जानी दुश्मन.. प्लान तोच.. टार्गेट - चिंटू. सनी खोटा जॉली बनून आणि जॉली त्याचा खोटा अंगरक्षक बनून चिंटूकडे दाखल होतात. 
ह्या कहाणीत हळूहळू करत गुंता वाढतच जातो.. खुमासदार संवाद, शाब्दिक कोट्या, यमकायमकी आणि प्रासंगिक विनोदातून हा गुंता तुम्हालाही गुरफटवून टाकतो आणि सरतेशेवटी सगळा गोंधळ कसाबसा उरकून गोड शेवट होतो! इतका पसारा मांडल्यावर अखेरीस घाई-घाईने उरक णं अपेक्षितच होतं.
काही ठिकाणी खो-खो हसवणारा हा सिनेमा काही ठिकाणी रेंगाळला आहेच आणि काही ठिकाणी गुंडाळलाही आहे. एकंदरीत हा विनोदाचा प्रयत्न आधीच्या 'हाउसफुल्ल' पेक्षा तरी बरा जमला आहे. पण मी अजूनही निखळ विनोदी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे, जो हृषीकेश मुखर्जी नंतर काही प्रमाणात प्रियदर्शनने केलाय आणि दिबाकर बानर्जीसारख्या अजून काहींनी एखाद सिनेमात (खोसला का घोसला) ती झलक दाखवली. पण साजीद खान कडून दर्जेदार विनोदाची अपेक्षा करणं हे जॉन अब्राहम कडून चांगल्या अभिनयाची अपेक्षा करण्यासारखंच! 
संगीताच्या (साजिद-वाजीद) नावाने खरोखरच अक्षरश: बोंबाबोंब आहे. इतकी की शब्दच कळू नयेत. कुठलीच चाल 'ओरिजिनल' वाटत नाही, इतकं हे संगीत घीसं पीटं आहे.  

ह्या सिनेमात 'नॉट टू मिस' म्हणावं असं काहीच नाही, पण बघितलाच तर डोकं आपटून घ्याल असाही काहीच नाही. (अपवाद - संगीत) पाचपैकी अडीच तारे देण्यास हरकत नसावी! 



Thursday, April 05, 2012

पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..



जगाच्या पटी हा तुझा खेळ सारा
हरेकासमोरी तुझा मोहरा
तुझा ना भरोसा जरी वाटला रे
तरी वाटतो का तुझा आसरा ?

'लढावे' असे वाटले ना मनाला
जसे ठेवले तू तसा नांदलो
तुला खोड होती मला छेडण्याची
तरीही कधीही न मी भांडलो

मला ठाव होता तुझा धूर्त कावा
'धरूनी दबा एकटे गाठणे'
चहूबाजुनी घेरुनी एकट्याला
विजेत्यापरी आवही आणणे !

तुझी चाल दैवा कधी वाकडी वा
कधी चाल होती तुझी थेटही
मला जिंकणेही न मंजूर होते
दिली जिंकण्याची तुला भेट ही

अखेरीस केलीस कोंडी इथे तू
मनापासुनी हार मी मानतो
जरी खेळ आयुष्य झाले तरीही
पुन्हा डाव तू मांड, मी हारतो..

....रसप....
४ एप्रिल २०१२

Wednesday, April 04, 2012

इथे थांबुनी घे विसावा जरा


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९" मध्ये माझा दुसरा सहभाग -

नसे मी तुझा तू तरी खास माझा
मना जाणवावे कधी हे तुला ?
तुझ्या प्रकृतीला, तुझ्या विकृतीला
असे चेहरा मीच माझा दिला

तुझे कालचक्रापुढे धावणे हे
मना, गुंतवाया तुला ना कुणी
मला तूच देशी नव्या स्वप्नगाठी
दिसे सप्तरंगी मला ओढणी

कधी पाहिले तू कुणा दूर गावी
सुखाचे खजीने कुणाच्या घरी
मला ते नको मी सुखासीन आहे
जरी ओढतो फाटक्या चादरी

तुला भावतो अंबराचा पसारा
मला पावलाएव्हढी वाटही
तुला पाहिजे प्राशणे सागराला
मला एक डोळ्यातली धारही

जुन्या वेदनांना नव्याने उजाळा
सहानूभुतीचे वृथा भार का ?
उगाळूनही दु:ख गेल्या दिसांचे
सुगंधास दे चंदनासारखा

पहा आज तूही जरा भोवताली
कसा गंध देती फुलांचे सडे
खरे ह्या क्षणाचेच तू मान वेड्या
भरूनी पुन्हा घे सुखांनी घडे

कुठे चाललो मी मला ठाव नाही
तुझ्यामागुनी मी निघालो खरा
तुझ्या ह्या प्रवासास ना अंत काही
इथे थांबुनी घे विसावा जरा


....रसप....
४ एप्रिल २०१२

Sunday, April 01, 2012

तू घे विसावा जरा........!


"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ८९ मध्ये माझा सहभाग.. (एक हलकं फुलकं 'सुनीत' लिहिण्याचा प्रयत्न आहे..)

होते रोज सुरू पहाटसमयी गर्दी इथे धावती 
सारे शांतपणे कसे समजुनी वेगास त्या पाळती ?
कंटाळा करती कधी न बसती काट्यासवे चालती 
पाहूनी तुज वाटले गजब ना ही मुंबईची गती ? 

जागेला धरण्यास लोकलमधे घेती उड्या धावुनी  
हॉटेलात कधी पहा बसुनिया खाती भुका मारुनी 
जो-तो येउन हो अधीर बनुनी होतो उभा मागुनी 
घाई ही कसली असे? कळ नसे, थांबावया जाणुनी

घेणे श्वास जरा नसेच जमणे ह्या धावणाऱ्या जगा
नाही मंजुरही कुणास दमणे, रेंगाळणेही उगा 
विश्रांती नच लाभते क्षणभरी आकाशवेड्या ढगा
त्याला ठाउक एक केवळ असे होणे जळाचा फुगा !   

तूही आजच जुंपलास झटण्या गाड्यास ऐसा खरा 
झाला थोर जरी 'मनी*' कमवुनी, तू घे विसावा जरा........!  

....रसप....
१ एप्रिल २०१२ 
शार्दूलविक्रीडीत - गागागा ललगा लगा लललगा गागा लगागालगा 
मनी* = Money, पैसा  
Related Posts Plugin for WordPress, Blogger...