Wednesday, May 29, 2019

हंड्रेड पर्सेंट इमोशन ! (म्युझिक टीचर - Music Teacher - Review)


विचारशक्ती आणि भावनिकता ह्यांच्यातला संघर्ष, हे माणसाच्या व्यथांचं खरं मूळ असावं. 
फार सहजपणे आपण म्हणत असतो 'दिल की सुन' किंवा 'विचारपूर्वक निर्णय घे' वगैरे. पण मनाचं किंवा डोक्याचं, कुणाचंही ऐकून जो कोणता निर्णय आपण घेऊ तो चूक की बरोबर हे कालांतरानेच ठरणार असतं आणि घेतलेला निर्णय चुकीचा ठरला की पश्चात्तापाचा वेताळ मानगुटीवर बसून उलटसुलट प्रश्नांनी हैराण करून सोडत असतो. ज्या परिस्थितीत एखादा निर्णय घेतला तो तेव्हा क्रमप्राप्तच होता आणि म्हणून बरोबरच होता, हे आपण स्वत:ला समजावू शकत नसलो की नेटफ्लिक्सच्या 'म्युझिक टीचर'मधल्या गायकासारखी आपली अवस्था होत असते.

'बेनी माधव सिंग' (मानव कौल) हा ह्या कहाणीतला म्युझिक टीचर. त्याची एक शिष्या 'ज्योत्स्ना रॉय' (अमृता बागची) आणि शेजारी राहणारी एक गृहिणी 'गीता' (दिव्या दत्ता) असा हा त्रिकोण आहे. ज्योत्स्ना मुंबईला जाऊन बॉलीवूडमध्ये एक सुपरस्टार झालेली असते आणि तिला संगीताचे धडे देणारा बेनी ज्याच्यावर ज्योत्स्नाचं प्रेमही असतं, तो शिमल्यातच लहान-सहान ट्युशन्स करण्यात गुरफटलेला. ज्योत्स्ना शिमला सोडून गेल्यानंतरच्या ८ वर्षांत 'मी जे केलं ते बरोबर केलं की चूक', 'माझं तिच्यावर प्रेम होतं की नाही', 'मला आता नक्की काय हवं आहे' ह्या आणि अश्या काही प्रश्नांच्या गुंत्यात बेनी अधिकाधिक गुंतत जात असतानाच 'शिमला कल्चरल क्लब' तर्फे ज्योत्स्नाचा एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो आणि पुन्हा एकदा एक ओढाताण सुरु होते. बेनी, त्याची आई (नीना गुप्ता) आणि लहान बहिण (निहारिका दत्त) सगळ्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतात. 
शेजारी राहणारी 'गीता' कळत नकळत बेनीच्या द्विधा मनस्थितीत त्याला सहारा देते आणि एका निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करते. ह्यात तिची स्वत:चीही होलपट होते. पण तिच्यात असलेली स्त्रीसुलभ खंबीरता बेनीचा पुरुषसुलभ वैचारिक गोंधळ सोडवते. 

सिनेमाची सुरुवात 'इक मोड तू मिली जिंदगी..' ह्या गाण्याने होते. हिमाचलचा रमणीय परिसर, 'पॅपोन'चा वजनदार आवाज आणि गाण्याची गोडवा असलेली चाल, ह्यांमुळे सिनेमा लगेच पकड घेतो, ती शेवटपर्यंत सोडत नाही. मात्र एकंदरीत सिनेमाला नावाला साजेसं संगीत काही 'रोचक कोहली'ला बनवता आलेलं नाही. ओरिजिनलिटीवर भर देऊन श्रवणीय गाणी देण्यापेक्षा 'फिर वोही रात है..', 'रिमझिम गिरे सावन..' अशी जुनीच गाणी नव्याने बनवली आहेत. आजकाल ह्या पाट्या टाकण्याच्या प्रकाराला 'रिक्रीएट करणं' असं एक गोंडस नाव दिलं जातं. 
संगीतशिक्षण, तालीम म्हणजे सिनेमातली गाणी घोकून घेणे आणि तेव्हढ्यावरच एखाद्याची जणू काही लॉटरी लागून त्याने/ तिने सुपरस्टार बनणे; हा एक सोयीस्कर शॉर्ट कट मारला असल्याचं काही लपत नाही. ह्या सगळ्या भागासाठी अजून खूप मेहनत घेणे आवश्यक होतं. पण दुर्दैवाने परिपूर्णतेसाठी तेव्हढं आग्रही राहणं अजूनही आपल्याकडे व्यावासायिक गणितांत बसत नसावं आणि सर्जनशीलतेच्या परिघाला ओलांडायची हिंमत त्यामुळेच होत नसावी. जे असेल ते असो, पण ह्या एका कमजोर भागामुळे हा सिनेमा एका वेगळ्याच उंचीवर जाता जाता राहिल्याची हुरहूर लागते.

मानव कौल आणि दिव्या दत्ता अतिशय आवडते असल्याने 'म्युझिक टीचर' आवर्जून पाहिला. दोघांनी अजिबात निराश केलं नाही. फार सहजपणे आपलं काम उत्तम निभावणाऱ्या आजच्या अभिनेत्यांपैकी हे दोघे, इथेही आपापल्या भूमिका सुंदर निभावतात. बराच काळ आणि चांगलं काम करूनही हे दोघेही फार 'साईडलाईन्ड' राहिले आहेत.
घरच्या जबाबदाऱ्या आणि घेतलेल्या निर्णयांचे परिणाम ह्यांच्या ओझ्याखाली दबलेला 'बेनी माधव' मानव कौलने जिवंत केला आहे. शिमल्याच्या थंड हवेत स्वत:च्या मनातला विस्तव विझवण्याचा अयशस्वी प्रयत्न तो अनेक वर्षं करतो आहे. अपयश पचवण्यातही आलेलं अपयश त्याने फार प्रभावीपणे मांडलं आहे. त्याची व्यक्तिरेखा अनेक हिंदोळे घेते. कधी ताबा सुटणं, कधी उद्रेक होणं, कधी मूकपणे सहन करणं, कधी अव्यक्त राहणं अश्या अनेक उंचींवर ही व्यक्तिरेखा ये-जा करते आणि कुठेही मानव कौल कमी पडत नाही.
नवऱ्याने नाकारल्यावर एकटीवर आलेली जबाबदारी खंबीरपणे सांभाळणारी आणि एकटेपणातून आलेलं रितेपण डोळ्यांत न लपवू शकणारी 'गीता' साकारणारी दिव्या दत्तासुद्धा जबरदस्त आहे. तिच्याबाबतीत मला नेहमीच असं वाटत आलं आहे की तिच्या अफाट क्षमतेला आव्हान देणारी भूमिका तिला कधी तरी मिळावी. ही भूमिका अगदी तशीच आहे, असं नाही म्हणता येणार, पण तरी तिला बऱ्यापैकी वाव तरी मिळाला असल्यामुळे आनंद झाला.
अमृता बागचीला फार काम नाहीय. जितकं आहे, त्यात ती जबाबदारी पार पाडते. तिने 'सिटी ऑफ ड्रीम्स'मध्ये फार कंटाळा आणला आणला होता, त्यामुळे इथला तिचा मर्यादित पण चांगला वावर सुखद वाटला.

'कौशिक मंडल' ह्यांनी टिपलेलं डोंगराळ सौंदर्य डोळ्यांना प्रचंड सुखावतं. आणि हवेतला गारवा तर पडद्यातून बाहेर येऊन आपल्याला जाणवावा ! (सध्याच्या ४३-४४ अंश तापमानाच्या रखरखत्या हवेत हा गारवा फारच हवाहवासा वाटला !)

लेखक-दिग्दर्शक सार्थक दासगुप्तांचा बहुतेक हा पहिलाच हिंदी सिनेमा आहे, जो कुठलाच अनावश्यक पसारा नसलेला आणि 'टू-द-पॉइन्ट' आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सांगीतिक तालीमेचा भाग अजून खूप प्रभावी करता आला असता, पण तो खरं तर कहाणीतला दुय्यम भाग आहे. नाव जरी 'म्युझिक टीचर' असलं तरी गाभा 'भावनिकता'च आहे. सिनेमात एक संवाद आहे - 'म्युझिक पहले हंड्रेड पर्सेंट थिओरी होता है, फिर वो हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल होता है और उसके बाद हंड्रेड पर्सेंट इमोशन !' तसंच ही कहाणी थिओरी/ प्रॅक्टिकल नसून फक्त 'इमोशनल' आहे असं पाहिलं, तर दासगुप्ता खूप कन्व्हीन्सिंग वाटतात.

फक्त पावणे दोन तासांचा हा सिनेमा त्यातल्या काही कमकुवत बाजूंसह एकदा तरी नक्कीच पाहण्यासारखा आहे. आपल्याही मनात काही 'विचार वि. भावना' अशी द्वंद्वं चालू असतात. अश्या कहाण्यांच्या निमित्ताने त्यांच्याकडे आपण त्रयस्थपणे पाहू शकतो.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...