Saturday, February 04, 2017

'दंगल' बाबत - जरा उशीरानेच ! (Dangal Movie)

सहसा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसांत, म्हणजे रविवारपर्यंत जमलं तरच मी थिएटरमध्ये जाऊन पाहतो. त्यानंतर मला उत्साह नसतो तिकिट विकत घेऊन पाहण्याचा. पण 'दंगल' पाहिला. तोही तब्बल एक आठवडा उशीरा. तो असा पहिलाच शुक्रवार होता, जेव्हा मी मागच्या शुक्रवारी रिलीज झालेला सिनेमा पाहिला, ह्या एका कारणासाठी तर 'दंगल' ऐतिहासिक ठरतोच !

सिनेमाबद्दल जाणकार व अजाणकार, अश्या दोन्ही लोकांनी भरपूर लिहून झालेलं असताना आणि आता तो सुपर डुपर हिट वगैरेही होऊन गेलेला असताना मी पामर, जो दोन्हींपैकी कशातही नक्कीच येत नाही, तो नवीन ते काय लिहिणार ? आणि आता ह्या शिळ्या कढीला कशाकरता ऊत आणायचा, ह्या विचाराने सिनेमाबद्दल काहीही लिहिलं नाही. पण तरी कीडा वळवळलाच आणि आता टंकतोयच !

First thing first, 'दंगल' आवडला का?
होच तर! इतका की मी अजूनही एकदा तो पाहू शकलो असतो. तसं पाहता खेळावर आधारित सिनेमांचा टिपिकल मसालाच इथेही आहे. तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरला आहे, जो ह्यापूर्वीही अनेकदा वापरुन झाला आहे. तोच संघर्ष, तीच जिद्द वगैरे आणि शेवटी एखाद्या मोठ्या स्पर्धेत एक-एक राउंड पार करत यश संपादन करून, त्याआधी वाट्यास आलेल्या अपयशाच्या डागांना धुवून काढणं, वगैरे. त्यामुळे कंटेंट वाईज काहीही नवीन अगदीच नाहीय.
मात्र तरी 'दंगल' वेगळा ठरतो.
कथानकाला दिग्दर्शक नितेश तिवारी ह्यांनी दिलेली एकंदर ट्रीटमेंट खासच आहे. पण त्याच्या सोबतीने सर्वच कलाकारांनी अगदी जीव तोडून केलेलं काम, अप्रतिम कॅमेरावर्क आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रित केलेल्या कुस्त्या. ह्या कुस्त्या साहजिकच स्क्रिप्टेड होत्याच, मात्र त्या अश्या काही सफाईदारपणे करवून घेतल्या आहेत की वाटतच नाही, हे सगळं खोटं आहे !

'महावीर सिंग फोगाट' ज्या सफाईने आमीरने साकारला आहे, ते तोच करु जाणे. समहाऊ, 'आमीर खान' हा काही माझा सगळ्यात आवडता नाही, पण तो प्रत्येक भूमिकेसाठी जी मेहनत घेतो, त्यासाठी सलाम !
आमीर तरी आता 'व्हेटरन' झालाय, पण त्याच्यासमोर फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा ज्या ताकदीने उभ्या राहिल्या आहेत, त्याचा जवाबच नाही. 'गीता कुमारी' बनलेली 'फातिमा' आणि 'बबिता कुमारी'च्या भूमिकेतल्या 'सान्या मल्होत्रा'कडून जबरदस्त म्हनत करुन घेतलेली आहे. व्यावसायिक कुस्तीगिराप्रमाणे त्यांच्या हालचाली वाटतात. लुटुपुटूचे सामने दाखवण्याचा जमाना आता गेलाय. आताशा खेळाच्या सिनेमातले सामने खूप रियलिस्टिक वाटतातच. मात्र, इथली बात कुछ औरही हैं. ह्या तिघांनाही बहुतेक काही महिने रोज आखाड्यात तिंबून काढलेलं असावं. कुस्ती ह्या तिघांच्या नसानसांत भिनवली आहे 'कृपाशंकर पटेल बिश्नोई' ह्यांनी. त्यांच्या मेहनतीचं पूर्णपणे चीज झालेलं आहे.

आमीर, फातिमा, सान्या ह्या तिघांचीही कामं अप्रतिम झाली आहेतच. सोबत, साक्षी तन्वर ह्या माझ्या आवडत्या अभिनेत्रीनेही आपली छाप सोडलीच आहे. साक्षी तन्वर आणि दिव्या दत्ता ह्या दोघींच्या अफाट अभिनयक्षमतेला आव्हान देणारी भूमिका अजून तरी त्यांच्या वाट्याला आलेली नाहीय. कधी ना कधी ती येईलच, अशी आशा वाटते.

⁠⁠⁠गीता, बबिता साकारणाऱ्या दोघी लहान पोरीही जबऱ्या चंट आहेत ! खत्तरनाक टायमिंगने त्यांनी काही प्रसंग तर खाऊनच टाकले आहेत !

आवर्जून उल्लेख करावा असे अनेक प्रसंग सिनेमात आहेत. आत्ता एक वर्णन करतो.
राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या गीता कुमारीला भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलं जातं आणि हरयाणातल्या तिच्या गावातून व वडिलांच्या तालमीतून बाहेर पडून तिची रवानगी 'नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी'मध्ये होते. इथे तिचा कोच बदलतो. (गिरीश कुलकर्णी) आजपर्यंत वडिलांनी शिकवलेल्या कुस्तीपेक्षा वेगळं काही तरी तिला इथे शिकवलं जातं. तिचा खेळही बदलतो आणि भोवतालच्या एकंदरीत वातावरणामुळे तिचं व्यक्तिमत्वही बदलतं. अशी बदललेली 'गीता' गावात येते आणि वडिलांच्या आखाड्यात जाते. तिथे ती इतरांना आपण शिकून आलेल्या नव्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करते आणि इथेच बाप महावीर सिंग व स्वत: गीता कुमारी ह्यांच्या मनांत एकमेकांबद्दल असलेल्या नाराजीला वाचा फुटते. किंबहुना, हातपाय फुटतात असं म्हणू. कारण त्यांच्या मतभेदांचं पर्यावसान एका सामन्यातच होतं. हा महावीर सिंग आणि गीता कुमारीची कुस्ती असलेला प्रसंग इतका जबरदस्त झालाय की तेव्हढ्यासाठी सिनेमा पुन्हा एकदा तिकिट काढून पाहावा. ती फक्त कुस्ती नाही, ती वैचारिक आणि भावनिक लढाई आहे. लहानपणापासून निरनिराळी बंधनं लादणाऱ्या बापाविरुद्ध मुलीच्या मनात असलेला असंतोष आणि मोठ्या लोकांमध्ये जाऊन आपल्या शिकवणीला विसरुन गेल्याबद्दल बापाच्या मनात मुलीबद्दल असलेली नाराजी ह्यांच्यातली ही लढत आहे. त्या कुस्तीतल्या त्या दोघांच्या चढाया, आवेश आणि तडफ वर्णन करुन सांगण्यासारखं नाहीय. त्यासाठी ती पाहायलाच लागेल. संमिश्र भावनांचा एक अनावर आक्रोश त्यावेळी आमीरच्या आणि 'गीता'चं काम करणाऱ्या 'फातिमा सना शेख'च्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांचे डोळे खूप काही बोलत असतात. नैराश्य, संताप, असंतोष, चरफड असं सगळं त्या लाल मातीत लोळवलं, आपटलं आणि हरवलं जातं. एक बाप हरतो, एक मुलगी हरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुस्तीच हरते. कारण वर्चस्वाच्या लढाईसाठी कुस्तीला वेठीस धरलं जातं.
आधी म्हटल्याप्रमाणेच सर्व कुस्तीचे सामने अप्रतिम कोरिओग्राफ केलेले आहेत. हा अनौपचारिक सामनाही तसाच. पण इतर सर्व सामने व्यावसायिक असतात, तर हा अस्सल भावनिक. त्यामुळे खूप वेगळा आहे. आवर्जून पाहावा असाच.

एकूणातच 'दंगल' हा २०१६ च्या सगळ्यात चांगल्या सिनेमांपैकी एक आहे आणि खेळावर आधारित भारतीय सिनेमांत सर्वोत्कृष्टच. साजेसं संगीत, गाण्यांची अचूक पेरणी, कुठलाही अनावश्यक मालमसाला अजिबात म्हणजे अजिबातच नाही आणि खेळाबाबतचा पूर्ण अभ्यास अशी अनेक वैशिष्ट्यं 'दंगल'मध्ये जाणवतात.
चित्रपटाच्या शेवटी आमीरला खोलीत कोंडून ठेवण्याचा आचरट मेलोड्रामा म्हणजे मुद्दाम लावलेलं गालबोट समजू !

- रणजित पराडकर

(जाता जाता.....
सान्या मल्होत्रा अगदी 'गर्ल नेक्स्ट डोअर' आहे. दिसायला तर आवडलीच, पण तिचं कामही खूप सहज वाटलं. तिच्या पुढच्या सिनेमांबाबत खूप उत्सुकता आहे कारण इथे तिला सेकंडरी रोल मिळालाय, ज्यात तसं खूपच कमी फुटेज आहे.)


4 comments:

  1. Was waiting for this..To the point as usual.

    Nirmiti.

    ReplyDelete
  2. आवडला हा रिव्ह्यू. तुझ्याशी बऱ्याच चित्रपटांवर चर्चा करायची आहे खरतर. भेटूच

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद !
      नक्की करू चर्चा. :)

      Delete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...