Sunday, February 26, 2017

चारी मुंड्या चीत !



'घरच्या मैदानावर साधारण अडीच दिवसांत ३३३ धावांनी पराभव'.

ह्या वरच्या ओळीत खरं तर 'दारुण' शब्दही टाकायला हवा. पण तो फारच नकारात्मक आहे. म्हणून टाळतो. पण हा एक 'वेक अप कॉल' आहे. जो आपल्याला अधूनमधून लागतच असतो. थोडंसं यश मिळालं की आपण हुरळून जाण्यासाठी मशहूर आहोतच ! आपला कप्तान, आपले फलंदाज, गोलंदाज सगळेच स्वप्नील दुनियेत रममाण होऊन जात असतातच. डाराडूर झोपलेल्याच्या कानाशी भोंगा वाजावा किंवा डोक्यावर थंडगार पाणी ओतावं किंवा खाडकन् कानशिलात द्यावी, तशी जाग ह्या ३३३ धावांच्या फरकाने येईल का ?

I hope, Yes. येईल.

कप्तानाने आपल्या माजातून बाहेर येऊन स्मिथच्या डावपेचांचा अभ्यास करायला हवा. तेज गोलंदाजांना तो ३-३, ४-४ ओव्हर्सचेच स्पेल्स देत होता. ओ'कीफचा एंड बदलल्यावर त्याने ६ विकेट्स काढल्या. हे का ? कसं ?
फलंदाजांनी लक्ष्मणच्या वॉर्न आणि इतर उत्तम स्पिनर्सविरुद्धच्या अनेक वर्षांच्या बॅटिंगचा अभ्यास करायला हवा. काही नाही तर, ह्याच पीचवर स्मिथने कशी बॅटिंग केली आणि आपण कशी केली हे पाहायला हवं. कसं फूटवर्क होतं. माझ्या मते स्पिन होणाऱ्या खेळपट्टीवर थोडंसं across the line खेळणं बरं. स्वीप वगैरे सढळ वापरायला हवे. सरळ बॅटनेच खेळत राहिलं तर एखादा उसळणार, सरळ जाणार, हातभर वळणार, खाली बसणार असतोच. मग आयतंच गिऱ्हाईक बनायचा धोका ! माझं चूकही असेल. पण ह्यांचं तरी कुठे बरोबर ठरलंय ?

स्पिनर्सनी पाहायला हवं की त्या ओ'कीफने अशी काय जादू केली, जी आपल्याला जमली नाही ? त्याच्या चेंडूची गती, लेंग्थ व लाईन, बघा की जरा. तुमच्याकडे अनुभव आहे, कौशल्य आहे, घरचं मैदान आहे, अजून काय हवं ?



ऑस्ट्रेलियासारखा चिवट प्रतिस्पर्धी संघ मिळालेली आघाडी सहजासहजी हातातून जाऊ देणार नाहीय. ते काही आपल्यासारखी नांगी टाकणारे नाहीत. तुम्ही जसे कॅचेस टाकले, मूर्खासारखे शॉट खेळले, बिनडोकासारखे रिव्ह्यू वापरले तसे काही ते करणार नाहीत. त्यामुळे सिरीजवर पकड मिळवायची असेल, तर चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत हे नक्की करायलाच हवं.
नुसतेच खेळपट्टीचे सापळे लावून उपयोग नाही.
सापळा लावून उंदीर पकडता येतो, कांगारू नाही. आपण त्या सापळ्यात अडकलो कारण उंदरासारखे भ्यालो.

Having said this, पुढच्या सामन्यासाठी लगेच खेळपट्टीचं स्वरुप बदलू देऊ नये. भारतात खेळताय तर वळू द्या चेंडूला चांगला हात-हातभर. आपण जेव्हा बाहेर जातो, तेव्हा आपल्यालाही ते हिरव्या खेळपट्ट्या देतातच की ! हे टेस्ट क्रिकेट आहे. इथे असंच पाहिजे. इथेसुद्धा फलंदाजांसाठी काही आव्हान नसेल, तर सरळ बोलिंग मशीन्सकडूनच बोलिंग करवा की !
चूक पूर्णपणे आपल्या इम्प्लीमेंटेशनचीच होती, हे समजायला हवं. १०५ मध्ये ऑल आऊट आणि ११ रन्समध्ये ७ विकेट्स, असली हाराकिरी, असले घपले ऑस्ट्रेलियासमोर खपून जाणार नसतातच. त्यामुळे हा निकाल अगदी अटळच होता.
आपल्याला अति-आत्मविश्वास नडला आहे, बाकी काही नाही.

पण.... हरलेल्या प्रत्येक मॅचमध्ये मन जिंकायची एक संधी दडलेली असते. एकाही भारतीयाला ती साधता आली नाही, ह्याचं दु:ख जास्त आहे.
हार-जीत तो होती रहती हैं. पण हरणंसुद्धा असं असायला हवं की जिंकलेल्यालाही काही तरी कमावल्यासारखं वाटावं. हरण्याआधीच हरलं, तर काय लढलो ? आपल्याच घरात, आपल्या मनासारख्या पीचवर, दुनियेतला नं.१ चा बोलर आणि नं. १ चा बॅट्समन घेऊन आपण खेळतोय आणि तोंड लपवायलाही जागा उरु नये?
करीयरची पाचवी मॅच खेळणारा कुणी तरी एक परदेशी खेळाडू आपल्या नाकावर टिच्चून २० पैकी १२ विकेट्स घेतो आणि आपल्या नं. १ बोलरला इनिंगमध्ये पाचसुद्धा जमू नयेत? तेही पूर्णपणे फेवरेबल कन्डिशन्स असताना ! आजची रात्र झोप हराम झाली पाहिजे ह्यामुळे !

There is something miserably wrong with the attitude, nothing else.

थंड डोक्याच्या धोनीचा परिपक्व शांतपणा अश्या वेळी खूप किंमतीचा वाटतो. विजय असो की पराजय, तो पचवायला लागतो. सलग १९ सामन्यांतले विजय जर पचवलेले असते, तर ह्या २० व्या सामन्यात पित्त बाहेर आलं नसतं.
धोनीच्या कसोटीतून निवृत्त होण्याच्या निर्णयाचं मला इतकं दु:ख नव्हतं झालं जितकं जास्त दु:ख विराट कोहलीसारखा उथळ कर्णधार असणार आहे, ह्याचं झालं होतं. धोनी टेस्ट क्रिकेटमध्ये फार काही चांगला नव्हताच. पण सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेटला जी आक्रमकता शिकवली, ती कायम ठेवत धोनीने त्याच्या कुवतीनुसार व मिळालेल्या थर्डक्लास खेळाडूंकडून होणार होतं तितकं करून घेऊन चांगले काम केले. धोनी मैदानावर कधीच कुठल्याच वादात, शाब्दिक चकमकींत आला नाही. प्रतिस्पर्धी खेळाडूही त्याच्या वाटेला कधी जात नसत. पण विराट तसा वाटत नसे. तो वादप्रिय वाटायचा. असं वाटायचं की त्याला आवड आहे, भांडणं करायची, प्रतिस्पर्धांना चिथवायची. एका कर्णधारासाठी हे कितपत चांगलं आहे माहित नाही. कारण असाच रिकी पॉन्टिंगसुद्धा होता, पण तो यशस्वी ठरला कारण त्याच्या ताफ्यात तसे खेळाडूसुद्धा होते. आपल्याकडे आनंदीआनंद आहे. त्यामुळे त्याचा कित्ता कोहलीने गिरवू नये, असं वाटायचं.
पण thankfully नंतर कोहली बराच 'टोन डाऊन' झाला.
तरी अजूनही हवी तितकी परिपक्वता त्याच्याकडून दिसत नाहीच. कारण there is a thin line between AGGRESSION and ARROGANCE, जी बहुतेक तरी तो अजून शोधतोच आहे. त्याला ती समजलेली असती, तर आपण ऑस्ट्रेलियाला इतकं किरकोळ लेखलं नसतं.

असो.
Not the end of the world. As I already said, खूप मेहनतीने आणि जिगर दाखवून ह्यापुढे खेळावं लागेल, जर सिरीज परत ओढायची असेल तर. त्यासाठी हवा असलेला शांतपणा कोहलीने कुंबळेकडून उधार घ्यावा किंवा धूर्तपणा धोनीकडून घ्यावा. पण घ्यावा.
फलंदाजीत करायचा बदल लक्ष्मणकडून शिकावा किंवा स्मिथकडून चोरावा, पण बदल करावा.

४-० वगैरे अंदाज हास्यास्पदच होते. इथून पुढे २-१ किंवा २-२ तरी जमतंय का पाहावं. ३-१ करता येऊ शकेल, पण त्यासाठी Controlled aggression नावाचा धूर्तपणा तरी असायला हवा किंवा नशिबाची जोरदार साथ तरी. अल्लाह मेहरबान, तो गधा पहलवान !
But then, in sport the always say.. Fortune favors the brave.

बघू, कोण शौर्य दाखवतंय इथून पुढे..!!

एक मात्र निश्चित. हा नुसता पराभव नाही. '२० सामन्यांत पहिलाच तर हरलेयत' इतकं साधं सरळ नाही. ८५ वर्षांत न उडालेली धूळधाण आहे ही. स्वत:च्याच घरात यजमानाचा झालेला अपमान आहे हा. स्वाभिमान डिवचला जावा, जिव्हारी लागावा असा मानहानीकारक पराजय आहे हा.
चारी मुंड्या चीत करणारा.

- रणजित पराडकर


Saturday, February 18, 2017

'द गाझी अटॅक' आणि 'इरादा' (Movie Review - 'The Ghazi Attack' and ' Irada')

बऱ्याच दिवसांनी एका दिवसात २ सिनेमे पाहिले ! 'द गाझी अटॅक' आणि 'इरादा'.
दोन्ही सिनेमे मला चांगले वाटले. जमणार असेल, तर तुम्हीसुद्धा दोन्ही पाहा. पुढील लेखांत दोन्ही सिनेमांवर संक्षिप्त लिहिले आहे. वेळ नसल्याने स्वतंत्र लिहिले नाही.

------------------------------------------


'द गाझी अटॅक' आवडला.

१९७१ च्या युद्धापूर्वी पाकिस्तानची एक पाणबुडी बंगालच्या उपसागरात बुडली होती. त्या घटनेसंदर्भात एक थिअरी अशीही आहे ती पाणबुडी 'बुडली' नव्हती, तर भारतीय नौसेनेने तिला 'बुडवलं' होतं. पण दोन्ही बाजूंनी एक मिशन क्लासिफाईड असल्याने कुठलाही सबळ पुरावा देता येत नाही. सिनेमा ह्या छोट्याश्या युद्धावर आधारित आहे. पाकच्या तुलनेने खूप ताकदवान व मोठ्या पाणबुडीचा सामना भारताच्या नौसेनेने कसा केला आणि ह्या छोट्याश्या युद्धात कसा विजय मिळवला, ह्याची रोमहर्षक कथा ह्या सिनेमात आहे.

पात्रांचे आपसांतले बरेचसे संवाद टेक्निकल भाषेत आहेत. हे मुद्दामही केलं असणार. ऑथेन्टिसिटी वाटावी म्हणून. आता, मी कॉमर्स शिकलो असलो, तरी अकौंटन्सीच्या नावानेही बोंबच आहे म्हटल्यावर सबमरीन किंवा एकंदरीतच इंजिनियरिंग विषयक माझं ज्ञान किती महान असावं, हे सांगायची गरज नसावी. त्यामुळे ते सगळं ऐकायला भारी वाटलं. खरं-खोटं, चूक-बरोबर वगैरे काहीच माहित नाही.

सगळ्यांची कामं भारी झालेली आहेत.
के के मेनन तर कमालीच्या ताकदीचा अभिनेता आहेच. ते तो पुन्हा एकदा दाखवून देतो. जोडीला अतुल कुलकर्णीसुद्धा कमाल करतो. बहुतेक दोघांच्या भूमिका समानच लांबीच्या असाव्यात. दोघांनीही जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'राणा दागुबाती' मर्यादित क्षमतेचा अभिनेता आहे. पण तो त्याचं काम प्रामाणिकपणे करतो. तापसी पन्नू बहुतेक सहज म्हणून शूटिंग पाहायला आली असावी. आणि मग ही आलीच आहे तर करून घ्या हिचेही ४-५ सीन म्हणून घुसडलं आहे तिला सिनेमात. अदरवाईज तिचा आहे ह्या सिनेमाचा. स्टोरीचा काही एक संबंध नाही.

अंडरवॉटर कॅमेरा विशेष कमाल करत नाही. खूप स्कोप होता, पण बजेट आड आलं असावं. एरव्ही थरारदृश्यं जबरदस्त चित्रित झाली आहेत.

सिनेमा अगदी नक्की पाहावा, असा आहे. युद्धपट असला, तरी सैनिक काही समोरासमोर येऊन तुंबळ जुंपत नाहीत. स्फोट, गोळीबार, भोसकाभोसकी वगैरे भडकपणाही नाहीय. जे आहे, ते खरोखरीच खूप संयतपणे दाखवलं आहे. त्यामुळे पोरा-बाळांसह पाहू शकता ! (दोन वेळा राष्ट्रगीतही आहे. त्यांना देशप्रेमाचे चांगले धडेही मिळतील. ;-) )

रेटिंग - * * *

-------------------------------------



'इरादा' सुद्धा आवडला.

वैयक्तिक सांगायचं तर 'द गाझी अटॅक' पेक्षा जssरा जास्तच आवडला. एक तर अर्शद वारसी आणि नसीरुद्दीन शाह दोघे स्वतंत्रही खूप आवडतात आणि एकत्र तर जामच आवडतात. त्यांची 'ईश्किया' आणि 'डेढ ईश्किया' मधली 'केमिस्ट्री' सॉलिडच होती. हे दोन अभिनेते 'कॉम्प्लिमेंटिंग' अभिनेते आहेत. म्हणजे, त्यांचा अभिनय दुसऱ्यावर कुरघोडी करणारा नसतो. पण त्याच वेळी, तो दमदारही असतो. म्हणजे, 'जॉली एल एल बी' मध्ये अर्शद वारसीने अप्रतिम काम केलेलं असलं, तरी त्याच सिनेमातलं सौरभ शुक्लाचं अप्रतिम काम झाकायचा प्रयत्न त्याच्या अभिनयातून दिसत नाही. नसीरुद्दीन शाहने तर ही कमाल गेली कित्येक वर्षं केलेलीच आहे. त्यामुळे, मी तर ह्या दोघांसाठीच सिनेमा पाहायला गेलो होतो.

सिनेमा जबरदस्त गंडला आहे पब्लिसिटीमध्ये. बजेट आड येत असावं. पण विकीपिडीया, फेसबुक वगैरेवर पेज सिनेमाचं पेज बनवायला काय खर्च येतो असा ? सिनेमाचं विकी पेज आत्ता दिसतंय, पण ट्रेलर रिलीज झाला तेव्हा तर कुठेही त्याचा साधा उल्लेखही नव्हता. म्हणजे अर्शदच्या विकी पेजवरही 'इरादा'चा उल्लेख नव्हता. इतकी झोपाळू पब्लिसिटी टीम असल्यावर सिनेमाचं जे होणार, तेच होण्यात आहे. पहिल्या दिवशीच्या शोचीच अशी अवस्था होती की अख्ख्या थिएटरमध्ये आम्हा दोघांशिवाय अजून फक्त दोनच जण होते. टोटल ४.
असो.
सिनेमा जमीन व भूजल प्रदूषणासंबंधीतल्या एका मोठ्या स्कॅमवर आहे. कथानक भटिंडात घडतं. अर्शद एक इंव्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहे तर नसीर एक व्हिक्टिम, जो बदला घेतो.
शरद केळकर आणि दिव्या दत्ता नकारात्मक भूमिकांत. केळकर मोठा कारखानदार/ उद्योजक तर दिव्या दत्ता मुख्यमंत्री.

पटकथेत काही बाबी खटकतात. जसं की, दिव्या दत्ताचं मुख्यमंत्री असणं. माझ्या मते, ती एमएलए किंवा कॅबिनेट मंत्री वगैरे दाखवायला हवी होती. पण असो. दुसरी बाब अशी की वेळ मिळाला की सिनेमातली बहुतेक पात्र प्यायलाच बसतात. दुसरा काही पासटाईमच नसावा की काय ! :-D

सिनेमातले संवाद साधे-साधे असले तरी खूप इंटरेस्टिंग आहेत.

'रुमाना मोल्ली' नावाच्या एका अभिनेत्रीने नसीरच्या मुलीचा रोल केला आहे. जबरदस्त परफॉर्मन्स ! छोटा रोल आहे पण एका प्रसंगात तर तिने अक्षरश: कमालच केली आहे. तिला अजून काही आव्हानात्मक भूमिका भविष्यात नक्कीच मिळायला हव्या.
दिव्या दत्ता माझी एक आवडती अभिनेत्री आहे. तिला जरा मोठ्या लांबीची भूमिका मिळाली आहे, ह्याचा खूप आनंद झाला. तिचं काम मस्त आहे, ही काही सांगायची गोष्ट नाहीच. It goes without saying !
शरद केळकर आणि राजेश शर्माही स्वत:ची कामं ताकदीने करतात.
सागारिका घाटगेसुद्धा आहे. ती नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसते आणि नेहमीप्रमाणेच सदैव अपचन झाल्यासारखं वाकडं, रडवेलं तोंड घेऊन वावरते. तरीही सुसह्य नक्कीच आहे.

एकंदरीत 'इरादा' हा सगळ्याच्या सगळ्या कलाकारांच्या दमदार अभिनयाने नटलेला एक चांगला सिनेमा आहे. एक चांगला सिनेमा केवळ बिनडोक आणि झोपाळू पब्लिसिटी टीममुळे वाया जाणार आहे, ह्याचं मात्र खूप दु:ख वाटतंय.

रेटिंग - * * * १/२

- रणजित पराडकर

Saturday, February 11, 2017

पुनर्प्रक्षेपित मनोरंजन - जॉली एलएलबी - २ (Movie Review - Jolly LLB - 2)

'जॉली एलएलबी - २' चा फर्स्ट हाफ जबरदस्त आहे. अगदी जबरदस्त !
नंतर मात्र सिनेमा जरासा ढेपाळतो.

इथला 'जॉली' म्हणजे पुन्हा एकदा एक धडपड्या वकील आहे. फरक इतकाच की मागच्या भागात तो अर्शद वारसी होता, इथे अक्षय कुमार आहे आणि कहाणी दिल्लीऐवजी लखनऊत घडते.

अ‍ॅडव्होकेट रिझवी (राम गोपाल बजाज) हे 'लखनऊ'च्या न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रातलं एक खूप मोठं प्रस्थ. ह्याच क्षेत्रातलं नव्हे तर एकंदरीतच समाजातलं एक खूप इज्जतदार नाव. त्यांच्या 'लॉ फर्म'मध्ये कारकुनी काम करणारा जगदीश्वर मिश्रा उर्फ जॉली (अक्षय कुमार) स्वत:चीही एक 'लॉ फर्म' असावी, असं स्वप्न बाळगणारा धडपड्या वकील असतो. ह्या महत्वाकांक्षेपोटी माणुसकी, तत्वमूल्ये वगैरे किरकोळ गोष्टी सोयीस्करपणे पाळणारा जॉली, एकदाच जरा जास्तच भ्रष्ट वागतो आणि त्याची चांगलीच किंमत मोजतो. पुढे होणारी न्यायालयीन लढाई एका अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठीची कमी आणि त्याच्या अपराधगंडावरचा एकमेव इलाज म्हणून जास्त असते.


पहिल्या भागामुळे सौरभ शुक्लाची व्यक्तिरेखा आधीच establish झालेली असल्याने, पुढे काय होणार आहे आणि कसं होणार आहे, हे आधीच माहित असतं. बरेचसे पंचेससुद्धा त्यामुळे अपेक्षितच ठरल्याने कमजोर पडतात. स्टोरीलाईन दमदार होती, पण जॉलीचा सत्यशोधाचा प्रवास योग्य दिशेने झाल्यासारखं वाटलंच नाही. पहिल्या भागात ज्याप्रमाणे, एक महत्वपूर्ण व्यक्ती कोर्टात पेश करून केस निर्णायक केली जाते, तोच प्रकार इथेही आहे. पण त्या व्यक्तीपर्यंत लीड करणारे अनेक महत्वाचे क्ल्यूज् परिस्थितीत असतानाही त्यांवर जॉली लक्ष देत नाही, किंबहुना लेखकाने लक्ष दिलेलं नाही आणि योगायोगाची ठिगळं जोडावी लागली आहेत. माझ्या मते, हा एक जर बदल घडला असता तर कदाचित दुसरा भागही अजून जास्त उत्कंठावर्धक झाला असता.

अक्षय कुमार अत्यंत आवडता आहे. महान अभिनेता म्हणून कधी त्याचं नाव घेतलं जाणार नाही, पण एक अतिशय समंजस अभिनेता म्हणून त्याला नक्कीच पाहिलं जाऊ शकतं. त्याला पडद्यावर वास्तववादी दिसण्यासाठी आमुलाग्र मेकओव्हर करायची कधीही आवश्यकता वाटत नाही. जी व्यक्तिरेखा असेल, ती तो त्याच्याकडे असलेल्या कुवतीचा पुरेपूर वापर करून खरीखुरी उतरवतोच.

अन्नू कपूर हा एक तगडा अभिनेता आहे, असं माझं मत. बऱ्याच दिवसांनी त्याला एक चांगल्यापैकी लांबी व महत्व असलेली भूमिका मिळालेली आहे. पण त्याने तिचं पूर्ण चीज केलं, असं वाटत नाही. ही माझ्यासाठी खूप मोठी निराशेची बाब होती. कारण मला त्याच्या कामाबाबत प्रचंड उत्सुकता होती. पहिल्या भागात बोमन इराणीने साकार केलेला हाय प्रोफाईल वकील खूपच उच्च दर्ज्याचा ठरावा. कदाचित पुन्हा एकदा, predictability मुळे काही ठिकाणी फुसकेपणा आलेला असू शकतो. मात्र तरीही रुबाब आणि माज ह्यांचं जे मिश्रण अपेक्षित होतं, ते अन्नू कपूरला करता आलेलं नाही. उलटपक्षी, काही वेळेस तर त्याचा अति-अभिनय इरीटेटही करतो !

कुमुद मिश्रा आणि सयानी गुप्ता ह्या दोघांना अगदी कमी लांबीच्या भूमिका आहेत. तरीही दोघांचा उल्लेख करणं खूप आवश्यक आहे कारण दोघांनीही अगदी अफलातून परफॉर्मन्स दिला आहे.
ही कहाणी इन्स्पेक्टर सूर्यवीर सिंग (कुमुद मिश्रा) ह्या सुपर कॉपच्या एका फेक एन्काऊन्टरसंबंधीच्या केसची आहे. सूर्यवीर सिंगला जेव्हा सीबीआयचे अधिकारी काही प्रश्न करतात, त्यानंतर ते अधिकारी गेल्यानंतर कमिशनरच्या केबिनमधून बाहेर पडणाऱ्या सूर्यावीरला कमिशनर एकच प्रश्न विचारतो आणि त्याचं तो उत्तर देतो. साधारण मिनिटभराचा प्रसंग. त्यातही कुमुद मिश्राचं उत्तर काही सेकंदांचंच. त्या काही सेकंदांत त्याची नजर जे काही बोलते, ते केवळ लाजवाब आहे.
'सयानी गुप्ता' ही अभिनेत्री ह्या आधी काही सिनेमांत किरकोळ भूमिकांत दिसली आहे. त्या भूमिकांत लक्षात राहावं असं काही नव्हतंच. पण तरी हा चेहरा ओळखीचा वाटत होता म्हणून जरा शोध घेतल्यावर ओळख पटली. हिला मी 'बार बार देखो' आणि 'फॅन' मध्ये पाहिलं आहे. इथे तिला मोजून ३-४ प्रसंग आहेत. प्रत्येक वेळी तिने कमालीचा सहजाभिनय केला आहे.

'सौरभ शुक्ला' ची व्यक्तिरेखा 'जॉली एलएलबी-१' मधून पुढे आली आहे. (आधीच्या भागात दिसलेले इतर सहाय्यक अभिनेते इथेही सहाय्यक म्हणून दिसतात, पण त्यांच्या व्यक्तिरेखा बदलल्या आहेत.) शुक्लांचा जज त्रिपाठी काही जागांवर अति वाटतो. पण चालसे. ओव्हरऑल, पुन्हा एकदा मजा आणली आहे त्यांनी.

हुमा कुरेशीसुद्धा आहे. ती नेहमीसारखीच भक्कम दिसते. ह्याउप्पर तिच्याविषयी काही लिहावं, असं काहीही नाही.

एक होळीचं गाणं म्हणून काही तरी आहे, त्याला गाणं का म्हणावं हा प्रश्न पडतो. आजकाल कोणत्या निकषांवर गाण्यांची निवड केली जाते, हा एक प्रश्न मला काही वेळी भयानक सतावतो. 'ओ रे रंगरेजा..' ही कव्वाली आणि 'बावरा मन' हे रोमॅण्टिक गाणं, अशी दोन गाणी मात्र खूपच सुंदर जमली आहेत.

विनोदातला खुसखुशीतपणा लोप पावत जात असतानाच्या काळात काही मोजकेच लोक अस्तित्व टिकवू शकत आहेत. 'जॉली एलएलबी' हा ब्रॅण्ड जर एस्टॅब्लिश झाला, तर त्यांपैकी एक असणार आहे. कदाचित पहिल्या भागइतका दुसरा भाग आवडणार नाही, पण तरीही एक स्वतंत्र सिनेमा म्हणून विचार करता निखळ मनोरंजनाची खात्री निश्चितच आहे. मुलांना कॉपीसाठी मदत करणे, गुरुजी (संजय मिश्रा) चं बनारसमध्ये क्रिकेटच्या 'कल्पक' मॅचेस घेणे अश्या काही वेगळ्याच गंमतीजंमती इथे आहेत. जोडीला मुख्य अभिनेत्यांचे चांगले परफॉर्मन्सेस आहेत. वेगवान कथानकही आहे आणि दमदार संवादही.

एकच गोष्ट जी खूपच खटकली ती म्हणजे अर्शद वारसीच्या जागी अक्षय कुमार. अक्षयने चांगलंच काम केलं आहे आणि तो कुठेही अर्शदपेक्षा कमीही पडलेला नाही, हे खरं पण अश्या रिप्लेसमेन्ट्स इंडस्ट्रीची स्टारशरणता दाखवतात. समजा उद्या तिसरा भागही आला आणि त्यात पुन्हा वेगळा अभिनेता 'जॉली'च्या भूमिकेत असला, तर वेगळी गोष्ट. पण आजचा विचार करता, जी कमाल अर्शदने पहिल्या भागात केली होती, ते आठवता दुसऱ्या भागात त्याचा नंबर लागायला हवा होता.

असो.
सेन्सॉर बोर्डाच्या बिनडोक कारभारामुळे दोन ठिकाणी लावलेल्या कात्र्या समजून येतात. सेन्सॉर बोर्ड आपलं उपद्रवमूल्य जेव्हा शून्य करेल, तो 'सोनियाचा दिनू' असेल.

एनीवे, फायनल प्रोडक्ट काही वाईट झालेलं नाही. काही डिफेक्ट्स आहेतही, पण त्यांसकटही, जॉली आवडून घेतला जाऊ शकेल. आपण 'लाईव्ह' पाहिलेल्या एखाद्या क्रिकेट सामन्याचं पुनर्प्रक्षेपण जितकं मनोरंजन करेल, तितकं (इफ नॉट मोअर) 'जॉली एलएलबी - २' देतो.

वन्स नक्कीच वॉचेबल !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

Saturday, February 04, 2017

'दंगल' बाबत - जरा उशीरानेच ! (Dangal Movie)

सहसा सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्या दोन-तीन दिवसांत, म्हणजे रविवारपर्यंत जमलं तरच मी थिएटरमध्ये जाऊन पाहतो. त्यानंतर मला उत्साह नसतो तिकिट विकत घेऊन पाहण्याचा. पण 'दंगल' पाहिला. तोही तब्बल एक आठवडा उशीरा. तो असा पहिलाच शुक्रवार होता, जेव्हा मी मागच्या शुक्रवारी रिलीज झालेला सिनेमा पाहिला, ह्या एका कारणासाठी तर 'दंगल' ऐतिहासिक ठरतोच !

सिनेमाबद्दल जाणकार व अजाणकार, अश्या दोन्ही लोकांनी भरपूर लिहून झालेलं असताना आणि आता तो सुपर डुपर हिट वगैरेही होऊन गेलेला असताना मी पामर, जो दोन्हींपैकी कशातही नक्कीच येत नाही, तो नवीन ते काय लिहिणार ? आणि आता ह्या शिळ्या कढीला कशाकरता ऊत आणायचा, ह्या विचाराने सिनेमाबद्दल काहीही लिहिलं नाही. पण तरी कीडा वळवळलाच आणि आता टंकतोयच !

First thing first, 'दंगल' आवडला का?
होच तर! इतका की मी अजूनही एकदा तो पाहू शकलो असतो. तसं पाहता खेळावर आधारित सिनेमांचा टिपिकल मसालाच इथेही आहे. तोच फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरला आहे, जो ह्यापूर्वीही अनेकदा वापरुन झाला आहे. तोच संघर्ष, तीच जिद्द वगैरे आणि शेवटी एखाद्या मोठ्या स्पर्धेत एक-एक राउंड पार करत यश संपादन करून, त्याआधी वाट्यास आलेल्या अपयशाच्या डागांना धुवून काढणं, वगैरे. त्यामुळे कंटेंट वाईज काहीही नवीन अगदीच नाहीय.
मात्र तरी 'दंगल' वेगळा ठरतो.
कथानकाला दिग्दर्शक नितेश तिवारी ह्यांनी दिलेली एकंदर ट्रीटमेंट खासच आहे. पण त्याच्या सोबतीने सर्वच कलाकारांनी अगदी जीव तोडून केलेलं काम, अप्रतिम कॅमेरावर्क आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चित्रित केलेल्या कुस्त्या. ह्या कुस्त्या साहजिकच स्क्रिप्टेड होत्याच, मात्र त्या अश्या काही सफाईदारपणे करवून घेतल्या आहेत की वाटतच नाही, हे सगळं खोटं आहे !

'महावीर सिंग फोगाट' ज्या सफाईने आमीरने साकारला आहे, ते तोच करु जाणे. समहाऊ, 'आमीर खान' हा काही माझा सगळ्यात आवडता नाही, पण तो प्रत्येक भूमिकेसाठी जी मेहनत घेतो, त्यासाठी सलाम !
आमीर तरी आता 'व्हेटरन' झालाय, पण त्याच्यासमोर फातिमा शेख आणि सान्या मल्होत्रा ज्या ताकदीने उभ्या राहिल्या आहेत, त्याचा जवाबच नाही. 'गीता कुमारी' बनलेली 'फातिमा' आणि 'बबिता कुमारी'च्या भूमिकेतल्या 'सान्या मल्होत्रा'कडून जबरदस्त म्हनत करुन घेतलेली आहे. व्यावसायिक कुस्तीगिराप्रमाणे त्यांच्या हालचाली वाटतात. लुटुपुटूचे सामने दाखवण्याचा जमाना आता गेलाय. आताशा खेळाच्या सिनेमातले सामने खूप रियलिस्टिक वाटतातच. मात्र, इथली बात कुछ औरही हैं. ह्या तिघांनाही बहुतेक काही महिने रोज आखाड्यात तिंबून काढलेलं असावं. कुस्ती ह्या तिघांच्या नसानसांत भिनवली आहे 'कृपाशंकर पटेल बिश्नोई' ह्यांनी. त्यांच्या मेहनतीचं पूर्णपणे चीज झालेलं आहे.

आमीर, फातिमा, सान्या ह्या तिघांचीही कामं अप्रतिम झाली आहेतच. सोबत, साक्षी तन्वर ह्या माझ्या आवडत्या अभिनेत्रीनेही आपली छाप सोडलीच आहे. साक्षी तन्वर आणि दिव्या दत्ता ह्या दोघींच्या अफाट अभिनयक्षमतेला आव्हान देणारी भूमिका अजून तरी त्यांच्या वाट्याला आलेली नाहीय. कधी ना कधी ती येईलच, अशी आशा वाटते.

⁠⁠⁠गीता, बबिता साकारणाऱ्या दोघी लहान पोरीही जबऱ्या चंट आहेत ! खत्तरनाक टायमिंगने त्यांनी काही प्रसंग तर खाऊनच टाकले आहेत !

आवर्जून उल्लेख करावा असे अनेक प्रसंग सिनेमात आहेत. आत्ता एक वर्णन करतो.
राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेल्या गीता कुमारीला भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडलं जातं आणि हरयाणातल्या तिच्या गावातून व वडिलांच्या तालमीतून बाहेर पडून तिची रवानगी 'नॅशनल स्पोर्ट्स अकॅडमी'मध्ये होते. इथे तिचा कोच बदलतो. (गिरीश कुलकर्णी) आजपर्यंत वडिलांनी शिकवलेल्या कुस्तीपेक्षा वेगळं काही तरी तिला इथे शिकवलं जातं. तिचा खेळही बदलतो आणि भोवतालच्या एकंदरीत वातावरणामुळे तिचं व्यक्तिमत्वही बदलतं. अशी बदललेली 'गीता' गावात येते आणि वडिलांच्या आखाड्यात जाते. तिथे ती इतरांना आपण शिकून आलेल्या नव्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करते आणि इथेच बाप महावीर सिंग व स्वत: गीता कुमारी ह्यांच्या मनांत एकमेकांबद्दल असलेल्या नाराजीला वाचा फुटते. किंबहुना, हातपाय फुटतात असं म्हणू. कारण त्यांच्या मतभेदांचं पर्यावसान एका सामन्यातच होतं. हा महावीर सिंग आणि गीता कुमारीची कुस्ती असलेला प्रसंग इतका जबरदस्त झालाय की तेव्हढ्यासाठी सिनेमा पुन्हा एकदा तिकिट काढून पाहावा. ती फक्त कुस्ती नाही, ती वैचारिक आणि भावनिक लढाई आहे. लहानपणापासून निरनिराळी बंधनं लादणाऱ्या बापाविरुद्ध मुलीच्या मनात असलेला असंतोष आणि मोठ्या लोकांमध्ये जाऊन आपल्या शिकवणीला विसरुन गेल्याबद्दल बापाच्या मनात मुलीबद्दल असलेली नाराजी ह्यांच्यातली ही लढत आहे. त्या कुस्तीतल्या त्या दोघांच्या चढाया, आवेश आणि तडफ वर्णन करुन सांगण्यासारखं नाहीय. त्यासाठी ती पाहायलाच लागेल. संमिश्र भावनांचा एक अनावर आक्रोश त्यावेळी आमीरच्या आणि 'गीता'चं काम करणाऱ्या 'फातिमा सना शेख'च्या चेहऱ्यावर दिसतो. त्यांचे डोळे खूप काही बोलत असतात. नैराश्य, संताप, असंतोष, चरफड असं सगळं त्या लाल मातीत लोळवलं, आपटलं आणि हरवलं जातं. एक बाप हरतो, एक मुलगी हरते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुस्तीच हरते. कारण वर्चस्वाच्या लढाईसाठी कुस्तीला वेठीस धरलं जातं.
आधी म्हटल्याप्रमाणेच सर्व कुस्तीचे सामने अप्रतिम कोरिओग्राफ केलेले आहेत. हा अनौपचारिक सामनाही तसाच. पण इतर सर्व सामने व्यावसायिक असतात, तर हा अस्सल भावनिक. त्यामुळे खूप वेगळा आहे. आवर्जून पाहावा असाच.

एकूणातच 'दंगल' हा २०१६ च्या सगळ्यात चांगल्या सिनेमांपैकी एक आहे आणि खेळावर आधारित भारतीय सिनेमांत सर्वोत्कृष्टच. साजेसं संगीत, गाण्यांची अचूक पेरणी, कुठलाही अनावश्यक मालमसाला अजिबात म्हणजे अजिबातच नाही आणि खेळाबाबतचा पूर्ण अभ्यास अशी अनेक वैशिष्ट्यं 'दंगल'मध्ये जाणवतात.
चित्रपटाच्या शेवटी आमीरला खोलीत कोंडून ठेवण्याचा आचरट मेलोड्रामा म्हणजे मुद्दाम लावलेलं गालबोट समजू !

- रणजित पराडकर

(जाता जाता.....
सान्या मल्होत्रा अगदी 'गर्ल नेक्स्ट डोअर' आहे. दिसायला तर आवडलीच, पण तिचं कामही खूप सहज वाटलं. तिच्या पुढच्या सिनेमांबाबत खूप उत्सुकता आहे कारण इथे तिला सेकंडरी रोल मिळालाय, ज्यात तसं खूपच कमी फुटेज आहे.)


Related Posts Plugin for WordPress, Blogger...