Sunday, January 08, 2017

ओम पुरी - एक जबरदस्त एक्झिट

एक ३४-३५ वर्षांची कारकीर्द, जिच्यात विविध भाषांतले मिळून १५० च्या आसपास सिनेमे असल्यावर, तिचा संपूर्ण आढावा घेणं माझ्या कुवतीच्या बाहेरचं आहे. मात्र 'ओम पुरी' म्हटल्यावर माझ्या ज्या ज्या सिनेमांच्या आठवणी जाग्या होतात, ते मी फक्त उल्लेखतो आहे.


विजय तेंडूलकरांच्या 'घाशीराम कोतवाल'वर फिल्म इन्स्टीट्युट तर्फे बनवल्या गेलेल्या सिनेमात ओम पुरींनी 'घाशीराम' केला होता. ही होती त्यांची पहिली भूमिका. त्या काळी समांतर सिनेमाचा एक प्रवाह होता. 'समांतर' म्हणून नावाजलेले (क्रिटीकली अक्लेम्ड) बहुतांश सिनेमे मला कंटाळवाणे आणि अतर्क्यही वाटतात. त्यामुळे मी आवर्जून फार क्वचित त्या प्रवाहातले सिनेमे पाहिले व पाहतो. मात्र अर्धसत्य, आक्रोश, मिर्च मसाला, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्युं आता हैं.. असे सिनेमे ज्यांपैकी काहींत ओम पुरी प्रमुख किंवा महत्वाच्या भूमिकांत होते, पाहिले आहेत.

अर्धसत्य मधला त्यांचा इन्स्पेक्टर वेलणकर तर ट्रेंडसेटर होता. माझ्या मते 'अर्धसत्य' हा एक असा सिनेमा होता, ज्यात एका कमर्शियल सिनेमाचा पुरेपूर मसाला होता. मात्र त्याची हाताळणी वास्तववादी होती आणि तथाकथित 'समांतर' सिनेमाच्या व्यामिश्र व्याख्येत बसणारी होती. ही कसरत फार क्वचित यशस्वीपणे करता आलेली आहे. गोविंद निहलानी हा माणूस म्हणूनच एक 'बाप' दिग्दर्शक आहे ! 'अर्धसत्य'सारख्या सिनेमांमुळे समांतर सिनेमा व्यावसायिकतेकडे आणि व्यावसायिक सिनेमा समांतरतेकडे आकर्षित झाला, असं मला वाटतं.
'अर्धसत्य' मधल्या इन्स्पेक्टर वेलणकरमुळेच बहुतेक नंतर काही काळाने ओम पुरी 'घायल' द्वारे मुख्य प्रवाहात आले. १९९०. 'समांतर' सिनेमा अवांतर होत, लोप पावत चालला होता. त्या चळवळीतले सगळे कलाकार लोक मुख्य प्रवाहात आपली जागा बनवू, शोधू पाहत होते. पवन मल्होत्रा, पंकज कपूर, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी अश्या अनेक गुणवान अभिनेत्यांची पाउलं मुख्य धारेकडे जाऊ पाहत होती. ह्यांपैकी अनेकांनी आपलं स्थान बनवलंच. पण हे जे एक प्रकारचं स्थलांतर होतं, ते ओम पुरींनी लीलया आणि नैसर्गिकपणे केलं. 'समांतर सिनेमातला ओम पुरी' आणि 'व्यावसायिक सिनेमांतला ओम पुरी' असा फरक त्यांच्या बाबतीत करता येत नाही, जो इतर बहुतांश लोकांच्या बाबतींत करता येऊ शकेल. उदाहरण म्हणून निहलानींच्या 'अर्धसत्य'मधला पोलीस इन्स्पेक्टर वेलणकर आणि राजकुमार संतोषींच्या 'घायल'मधला एसीपी डिसुजा बघा. दोन्ही व्यक्तिरेखा एकाच उत्कटतेने सादर होतात.

'घायल'नंतर ओम पुरींनी अनेक व्यावसायिक सिनेमे केले. विद्रोहाला व्यावसायिक यशस्वीपणे मांडण्याचं अवघड कसब असणारे एन. चंद्रा, राजकुमार संतोषी, ह्यांसारखे दिग्दर्शक ह्या काळात भारतीय सिनेमाच्या बिघडत चाललेल्या प्रतिमेला सुधरवत होते. त्यांच्या दिमतीला असणाऱ्या सामर्थ्यवान अभिनेत्यांच्या ताफ्यात एक महत्वाचं नाव 'ओम पुरी' होतं. अधूनमधून वाट चुकल्यासारखे जे काही मोजके 'समांतर' सिनेमे धडपडत पुढे येत होते, त्यांतही अनेकदा ओम पुरी झळकत होतेच. पण 'नरसिंहा' (दिग्दर्शक - एन चंद्रा) मधल्या 'बापजी'च्या व्यक्तिरेखेने व्यावसायिक सिनेमात त्यांचं स्थान पक्कं केलं. चेहऱ्यावर देवीचे व्रण आणि जरब असलेला वजनदार आवाज, ह्यामुळे ओम पुरींकडे एका खलनायकासाठीची प्रतिमा होती. तिला 'नरसिंहा'ने समोर आणलं आणि तमाम व्यावसायिक सिनेमाकर्त्यांचं लक्ष ह्या अभिनेत्याकडे वळलं.

पुढील २५ वर्षांत ओम पुरींनी प्रमुख, सहाय्यक, नकारात्मक, विनोदी, चरित्र भूमिका अश्या हर तऱ्हेच्या भूमिका केल्या. कुठेही, एका क्षणासाठीही ते 'मिसफिट' वाटले नाहीत, इतकं प्रत्येक भूमिकेला त्यांनी आपलंसं केलं. ह्यात चांगले, वाईट सगळेच सिनेमे होते. सिनेमा वाईट असो वा चांगला, ओम पुरींचं काम कधीच वाईट झालं नाही. खासकरून २००० सालानंतरच्या काळात कुंवारा, दुल्हन हम ले जायेंगे, फर्ज, दिवाने हुए पागल, बुढ्ढा मार गया, किस्मत कनेक्शन, डर्टी पॉलिटिक्स, घायल - वन्स अगेन अश्या अनेक सामान्य सिनेमांत त्यांनी काम केलं. त्यातले कित्येक मी पाहिलेही नाहीत, पण लॉटरी तत्वावर कुठलेही २-४ सिनेमे बघितले, तरी त्यांत ओम पुरींचं काम सामान्य नसेल, ह्याची पूर्ण खात्री आहे ! युवा, मक़बूल, रंग दे बसंती सारख्या क्रिटीकली अक्लेम्ड यशस्वी सिनेमांत त्यांच्या सहाय्यक भूमिका होत्या. 'युवा'मधला बंगाली राजकारणी त्यांनी ज्या खुबीने सादर केला, त्याच सहजतेने 'रंग दे बसंती'मधला मुसलमान बाप त्यांनी उभा केला. तर 'मक़बूल'मधली विनोदी ढंगाची नकारात्मक सहाय्यक भूमिकासुद्धा चोख वठवली. भूमिकेची लांबी, रुंदी, उंची वगैरे ह्या अभिनेत्यासाठी महत्वाची नव्हती. त्या त्या व्यक्तिरेखेला समजून घेऊन तिला पडद्यावर सफाईदारपणे उतरवणं, हे महत्वाचं होतं. 'डॉन' मधला सीबीआय ऑफिसर मलिक, 'लक्ष्य'मधला सुभेदार वगैरे तर अगदीच छोट्या छोट्या भूमिकांतही त्यांनी आपली छाप सोडलीच.

विनोदी भूमिका, किंबहुना विनोदनिर्मितीच, खूप कठीण असते असं मला वाटतं. लोकांना हसवणं, वाटतं तितकं सहज, सोपं नसतं. त्यातही आचरटपणा आणि आगाऊपणा न करता निखळ विनोद करणं म्हणजे तर अजूनच कठीण ! ओम पुरी इथेही कमी पडले नाहीत. 'जाने भी दो यारों' मधला त्यांचा 'आहुजा' आणि खासकरून महाभारताचा एकंदरच प्रसंग आज २५ वर्षांनंतरही कुणी विसरू शकत नाही. 'मालामाल वीकली' मधला 'बल्लू', 'चाची ४२०' मधला 'सेक्रेटरी', 'मेरे बाप पहले आप' मधला लंपट म्हातारा, 'हेराफेरी' मधला 'खडकसिंग' आणि 'मिस तनकपूर हाजीर हो' मधला पोलीस ऑफिसर अश्या त्यांच्या काही विनोदी भूमिका मला चटकन आठवतात. ह्या भूमिका म्हणजे 'ओम पुरी'साठीच होत्या अश्यातला भाग नाही. पण त्यांनी त्या जश्या सादर केल्या, त्यावरुन तरी तसंच म्हणावं लागेल ! दिग्दर्शक प्रियदर्शन ह्यांच्या बहुतांश विनोदी सिनेमांत 'ओम पुरी' झळकायचेच. हेराफेरी, मालामाल वीकली, मेरे बाप पहले आप, चुप चुप के, ढोल असे अनेक सिनेमे सांगता येतील.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंजाबमध्ये सुरु झालेले पोलिसांचे अत्याचार आणि त्यांमुळे जनमानसात वाढत चाललेला असंतोष, ह्या पार्श्वभूमीवरची एक स्फोटक कथा गुलजार साहेबांच्या 'माचीस' मध्ये होती. ह्यातला अतिरेक्यांचा म्होरक्या 'सनातन' ओम पुरींनी केला होता. व्यवस्थेबद्दल असलेली आत्यंतिक चीड आणि तरीही मनात ओल धरुन असलेला एक हळवा कोपरा, असा 'सनातन' ओम पुरींनी दाखवला. ही व्यक्तिरेखा ना पूर्ण नकारात्मक, ना पूर्ण सकारात्मक होती. तिला दोन्ही प्रकारचे पैलू होते. कोणत्या प्रसंगी कोणता रंग दाखवायचा, हे महत्वाचं होतं आणि ओम पुरींनी तेच केलं.

पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी अनेकदा काम केलं आहे. सुरुवात 'अर्धसत्य'पासून केल्यास, घायल, द्रोहकाल, गुप्त, प्यार तो होना ही था, विनाशक, फर्ज, मक़बूल, आन, देव, दबंग, अग्निपथ, मिस तनकपूर हाजीर हो असे बरेच सिनेमे सांगता येतील. पण 'ए.के. 47' ह्या कन्नड सिनेमातल्या कमिशनरचं काम तर असं काही झालं की त्याचे हिंदी डायलॉगही कन्नड प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून गेले. (हा सिनेमा बरेच दिवस 'वॉच लिस्ट' वर आहे. आता त्याला पुन्हा उजाळा मिळाला !)

कितीही झालं, तरी प्रत्येक अभिनेत्याची एक विशिष्ट इमेज आपल्या मनात असतेच. एखादा सिनेमा त्याची ओळख असतो आपल्यासाठी. ह्या मागे काही विशेष असं कारण नसतं. असंही नाही की त्या अभिनेत्याचम तेच सर्वोत्कृष्ट काम असतं, पण तरीही इमेज बनून जाते. हे अगदी पर्सनल असतं. उदा. - 'नसीरुद्दीन शाह' म्हटलं की मला 'कथा'मधला 'राजाराम जोशी'च आठवतो. 'पंकज कपूर' म्हटलं की मला 'सहर'मधला 'प्रो. तिवारी' आठवतो. तसंच 'ओम पुरी' म्हटलं की मला आठवतो 'चायना गेट'मधला कर्नल पुरी.
राजकुमार संतोषींचा 'चायना गेट' म्हणजे ओम पुरी, अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, डॅनी डेंग्झोंग्पा, टिनू आनंद, कुलभूषण खरबंदा, जगदीप अशी सगळी आजपर्यंत न कल्पना केलेली स्टारकास्ट ! आर्मीतून हकालपट्टी झालेले म्हातारे लोक एका मिशनवर येतात आणि त्यांचा लीडर असतो कर्नल कृष्णकांत पुरी. 'चायना गेट' मधले अनेक प्रसंग अप्रतिम अभिनयाविष्काराने स्तिमित करणारे आहेत. त्या सगळ्याचा परमोच्च बिंदू म्हणजे ओम पुरी 'मिशन इज ओव्हर' म्हणतो तो प्रसंग. परस्परांशी असलेले वैयक्तिक मतभेद, धार्मिक द्वेष बाहेर आल्यावर त्यांचे सहकारी एकमेकांवर पिस्तुलं रोखतात. हा प्रसंग म्हणजे हळूहळू तापमान वाढत जाऊन मग थडाथड उकळायला लागणाऱ्या पाण्यासारखा आहे. तो बॉयलिंग पॉइन्ट म्हणजे 'आप बार बार मेरी कौम के खिलाफ...' असं काहीसं म्हणून अमरीश पुरीच्या अंगावर जाणाऱ्या नसीरुद्दीनवर अमरीश पुरी पिस्तुल रोखतो आणि ताबडतोब डॅनी 'बॅक ऑफ' म्हणून स्वत:चं पिस्तुल काढतो, असा आहे. ह्यानंतर काही सेकंदांची शांतता, मग नसीरुद्दीन जमिनीवर २-३ दा फायर करतो आणि मग ओम पुरी टेक्स चार्ज. 'मिशन इज ओव्हर' पासून सुरु करून कर्नल पुरी त्याची, आर्मीत असताना फेल गेलेल्या आणि त्याची भारी किंमत सर्वांना चुकवायला लागलेल्या मिशनची आणि आत्ताच्या मिशनवर येण्यामागची कहाणी सांगतो. त्वेषाने पेटलेला एकेक जण निस्तब्धपणे ऐकत असतो, पाहत असतो. मला 'ओम पुरी' म्हटलं की 'चायना गेट' आणि त्यातला हा विशिष्ट प्रसंगच आठवतो. संवादफेकीच्या अभ्यासासाठी म्हणून तो पाहायला हवा. 'लड सकते हैं, मर सकते हैं..', 'हम सिपाही हैं, क़ातिल नहीं..' वगैरे शब्द उच्चारताना आवाजातला आणि देहबोलीतला बदल केवळ जबरदस्त आहे.


हिंदी सिनेमाव्यतिरिक्त अनेक पंजाबी सिनेमांत भूमिका करणाऱ्या ओम पुरींनी ब्रिटीश सिनेमातही आपला ठसा उमटवला. त्यांच्या ब्रिटीश सिनेसृष्टीसाठीच्या योगदानासाठी त्यांना 'ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' पुरस्कार दिला गेला.
'अर्धसत्य' आणि 'आरोहण' साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला तर 'फिल्मफेअर'चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार 'आक्रोश' साठी मिळाला. 'फिल्मफेअर' तर्फे २००९ साली जीवनगौरवही दिला गेला.
१९९० साली त्यांना 'पद्मश्री' किताबाने गौरवले गेले.

पुरस्कारांनी कार्याचं मोजमाप होत नाही. किंबहुना, पुरस्कार कुठलाही असो, तो फार क्वचितच योग्य उमेदवारास दिला जातो, असं मला वाटतं. 'ओम पुरी' त्या 'फार क्वचित' मधले एक आहेत. मात्र अनेकांना असं वाटतं की इतकं काम करूनही त्यांना पुरेसं यश व कौतुक मिळालं नाही, म्हणून ही यादी दिली. मला वाटतं, त्यांचे समकालिन इतर अभिनेते, जे त्यांच्याप्रमाणेच 'समांतर'कडून 'व्यावसायिक'कडे आले, त्यांच्या तुलनेत ओम पुरी खूपच चांगल्या प्रकारे स्थिर झाले. त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकाही मिळाल्या आणि त्या त्या भूमिका व चित्रपटांचं जे जे उद्दिष्ट्य होतं, ते ते त्यांनी साध्यही केलं. काही सिनेमे व भूमिका बॉक्स ऑफिससाठी होत्या, त्यांना तिथे यश मिळालं. काही पुरस्कारयोग्य होत्या, त्यांना पुरस्कारही मिळाले. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की त्यांच्याकडे कुठलं दुर्लक्ष वा अन्याय वगैरे झाला.

काही महान कलाकार वैयक्तिक आयुष्यामुळे वादग्रस्त ठरतात. 'ओम पुरी' त्यांपैकी एक.

माणसाकडून चूक होते. In fact, चुकतो, तोच तर माणूस असतो ! नाही तर ह्या देशाच्या पंतप्रधानाने 'सव्वा सौ करोड भगवानों..' अशी आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात नसती का केली ?
ओम पुरींची चूक म्हणजे त्यांनी एका वाहिनीवरील कसल्याश्या चर्चेत एक संतापजनक विधान केले. खरं तर, ती चर्चा म्हणजे 'चर्चा' नव्हतीच ! नुसता कल्लोळ होता, गोंधळ होता. मी तो व्हिडियो नंतर पाहिलाय. पाहतानाच माझं डोकं भणभणायला लागलं ! त्या कल्लोळात, गोंधळात एक वाक्य ओम पुरींच्या तोंडून निघून गेलं आणि तत्क्षणी त्यांनी त्याविषयी क्षमा मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षरश: बिनशर्त क्षमायाचना करून सपशेल शरणागतीही पत्करली. झाली गोष्ट त्याच क्षणी संपून जायला हवी होती. पण लोक आजही विसरलेले नाहीत.
असो.
मला काही कुणाला सुधरवायचं वगैरे नाहीय.

मी षंढ, थंड रक्ताचा
मी कुणी न क्रांतीकारक
अभिनिवेश दाखवणारा
मी हताश कवितासाधक

त्यामुळे लोकांचा उन्माद चालू राहो. आजकाल कुणालाही काही सांगायची सोय राहिलेली नाहीय. त्यामुळे मी फक्त माझ्यापुरतंच सांगतो.

माझ्यासाठी ती फुटकळ चर्चा, त्यात ओम पुरींनी केलेलं विधान वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या माफीनाम्यानंतर संपल्या आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात ते माणूस म्हणून कसे होते, काय होते, ह्याचाही इथे काही संबंध नाही. एक अभिनेता म्हणूनच माझ्यासाठी त्यांची ओळख होती आणि राहील. ती ओळख हीच आहे की, तो एक महान अभिनेता होता. ज्याने हर तऱ्हेच्या भूमिका केवळ अतुलनीय सफाईदारपणे अजरामर केल्या आहेत. असा अभिनेता पुन्हा होणार नाही.

ओम पुरींचं निधन अकाली आहे. त्यांच्याच वयाचे त्यांचे अनेक सहकारी (नसीरुद्दीन शाह वगैरे) पाहिले की लक्षात येतं की त्यांनी तब्येतीकडे कधी फारसं लक्ष दिलंच नसावं. गेल्या काही वर्षांत त्यांना पाहताना असं वाटत होतं की हा महान कलाकार आत्मनाशाकडे जातो आहे की काय ? अतिमद्यपान असेल किंवा इतर काही सवयी असतील किंवा वैयक्तिक वा इतर कुठला ताणतणाव असेल, पण कसला तरी विचित्र परिणाम त्यांच्यावर झाल्यासारखं दिसत होतं. चेहऱ्यावरचा तजेला हरवत चालला होता. डोळ्यांतला निखारा विझत चालला होता. शरीर बेढब बनत होतं आणि आपल्या खऱ्या वयापेक्षा वीसेक वर्षं जास्त वयस्कर ते दिसत होते. त्यांच्या निकटवर्तीयांसाठी त्यांचं हे अकाली निधन कदाचित आश्चर्यकारक नसेलच. ह्या इंडस्ट्रीने असे किती तरी लोक स्वत:ला संपवताना पाहिले आहेत. ह्यांनीही संपवलंच बहुतेक.

शेवटी नुकसान सिनेमाचं झालं आहे.
एका अज्ञात विश्वाकडे निघून गेलेल्या ह्या तेजोमय ताऱ्याच्या अंधाऱ्या वाटेवरच्या प्रवासासाठी शुभेच्छा देताना मला शैलेन्द्र साहेबांच्या काही ओळी आठवत आहेत -

कल खेल में हम हों न हों, गर्दिश में तारे रहेंगे सदा
भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहीं अपने निशाँ इसके सिवा जाना कहाँ..

ओम पुरींसारख्या अभिनेत्यांची खरी शोकांतिका ही की त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण होते, मात्र सिनेसृष्टीच्या भल्या मोठ्या सर्कशीत ही अनुपस्थिती कुणाला खटकत नाही. आनंद बक्षी साहेब म्हणतात -

कुछ रीत जगत की ऐसी हैं, हर एक सुबह की शाम हुई
तू कौन हैं, तेरा नाम हैं क्या ? सीता भी यहाँ बदनाम हुई !

कुणाला काही फरक पडत नाही, कुणाला काही जाणवत नाही. पण काही लोक तरी असे असतात, जे ह्याची सगळ्याची जाण ठेवतात.
आपण ती ठेवू. तीच खरी श्रद्धांजली !


हिरोच्या एन्ट्रीच्या वेळी 'आ' वासला जातो. इतरांच्या 'एक्झिट'च्या वेळी लोकांनी 'का ?' तरी विचारावं. ह्या एक्झिटनंतर लोक 'का ?' विचारत आहेत, हेही नसे थोडके !

__/\__

- रणजित पराडकर

2 comments:

  1. मार्मिक....सुंदर

    ReplyDelete
  2. रणजीत,
    खुपच छान लिहलय. मी मानत असलेल्या या कलाकाराच्या कामाचा आढावा बरच काही सांगून गेला. थॅन्क्स.
    अशोक अटनेरकर

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...