Friday, January 27, 2017

काबिल-ए-तारीफ (Movie Review - Kaabil)

हृतिक रोशन हा आजच्या काळातल्या अतिशय मेहनती अभिनेत्यांपैकी एक आहे. कदाचित अभिनय क्षमतेत इतर काही लोक त्याच्याहून सरस असतीलही, नव्हे आहेतच. खास करून संवादफेकीत तो खूप कमी पडतो, असं माझं एक निरीक्षण आहे. बऱ्याचदा त्याच्या वाक्यांच्या शेवटचा शब्द नीट समजून येत नाही. वाचिक अभिनयात कमी पडत असला तरी आपल्या मेहनतीतून तो त्यावर मात करत असतो. भारतात लोकप्रिय ठरलेला आजवरचा एकमेव देशी सुपरहिरो म्हणूनच तर तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरवू शकला आहे !
'काबिल' ही त्याने गाठलेली अजून एक उंची मानता येईल. 'मोहेंजोदडो'च्या वेळी  'रुस्तम' अक्षय कुमारशी हृतिकची टक्कर झाली होती. तेव्हा नकारात्मक प्रसिद्धीचा फटका त्याला बसला होता. मात्र तरीही पुन्हा एकदा एका मोठ्या सिनेमासमोर उभं राहताना हृतिक डगमगत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच, ह्यासाठी दाद द्यायला हवी. ह्या वेळी तर चक्क किंग खान च्या 'रईस' समोर हृतिकचा 'काबिल' उभा ठाकला आहे आणि believe me, ह्यावेळी तो नक्कीच मात खाणार नाही.



'काबिल'मध्ये 'काबिल-ए-तारीफ' होण्यासाठीचे जवळजवळ सर्व ingredients आहेत.
रोहन भटनागर (हृतिक रोशन) आणि सुप्रिया भटनागर (यामी गौतम) हे एक अंध दांपत्य. नवीनच लग्न होऊन आलेल्या सुप्रियावर स्थानिक नगरसेवक माधवराव शेलार (रोनित रॉय) च्या लहान भावाची (अमित - रोहित रॉय) वाईट नजर असते. तो व त्याचा मित्र तिच्यावर अत्याचार करतात. हे सगळं कथानक ट्रेलर्समधून स्पष्ट समजून आलंच असेल. ह्यानंतर, सूडभावनेने पछाडलेला अंध रोहन ह्या सगळ्या बाहुबलींचा बदला घेण्याचा प्लान आखतो. कसा ? तो किती यशस्वी ठरतो ? आणि त्यानंतर त्याला काय परिणाम भोगावे लागतात ? हे उर्वरित कथानक, जे ट्रेलर्सनी दाखवलेलं नाही.

पटकथेत काही त्रुटी आणि काही पळवाटाही आहेत. सगळ्यात मोठी पळवाट म्हणजे रोहन आणि सुप्रियाला कुणीही नातेवाईक नसणं. ह्यामुळे कुठलाही पसारा न होता फक्त मुद्द्याचं कथानकच मांडता येण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. अश्या अजूनही काही बाबी आहेत, पण ते सगळं किरकोळच.

दिग्दर्शकं संजय गुप्ता, त्यांच्या उचलेगिरीसाठी (कु)प्रसिद्ध असले, तरी कथानकाची वेगवान मांडणी मात्र त्यांच्या सिनेमात दिसून येतेच. तशीच ती इथेही आहे. नाही म्हणायला, अगदी सुरुवातीला गती जराशी धीमी आहे, पण लौकरच वेग पकडला जातो. त्यांच्या नेहमीच्या आवडत्या पिवळ्या व लाल रंगांची अनावश्यक उधळण इथे नाही, हे एक विशेष !

यामी गौतम अतिशय सुंदर दिसते. अंध व्यक्तीचा वावर सहज नसतोच. मात्र ते अवघडलेपण पडद्यावर सहजपणे आलं पाहिजे, अशी काहीशी विचित्र मागणी ह्या भूमिकांची होती आणि त्यात दोघेही कमी पडलेले नाहीत. यामीच्या भूमिकेला फारशी लांबी नाहीय. मात्र असलेल्या वेळेत तिने स्वत:ला चांगलंच सिद्ध केलेलं आहे.

'रोहित रॉय' गुप्तांचा आवडता असावा. इंडस्ट्रीतील साईड लाईन झालेल्या अनेक चांगल्या अभिनेत्यांपैकी रोहित रॉय एक असावा. कुवत असूनही एकही लक्षणीय भूमिका आजपर्यंत त्याला मिळू नये, हे एक दुर्दैवच. त्याचा बॅड बॉय अमित खूपच कन्व्हीन्सिंग आहे. अगदी पहिल्या फ्रेमपासून त्याची इमेज आपल्या मनात बनूनच जाते.

'रोनित रॉय' च्या करियरने गेल्या काही वर्षांत जो आकार घेतला आहे, त्याची अपेक्षा त्याने स्वत:देखील कधी केली नसावी. सोनी टीव्हीवरील एका टुकार मालिकेतील दमदार भूमिकेनंतर ह्याचे सगळे गहच पालटले आहेत ! ९० च्या आसपासच्या हिंदी सिनेमाच्या दळभद्रीणाचे जे काही चेहरे होते, त्यांच्यापैकी एक रोनित रॉय. पण आजकाल त्याला पडद्यावर पाहताना विश्वासच बसत नाही की जान तेरे नाम, बॉम्ब ब्लास्ट वगैरे टुकारक्यांतून सहनशक्तीचा अंत पाहणारा तो हाच का ? त्याचा हा कायापालट केवळ अविश्वसनीय आहे. गुंड आणि बेरकी 'माधवराव शेलार' लक्षात राहील. ग्लासआडून त्याने फिरवलेली नजर - ट्रेलरमध्येही दिसेल - तर हायलाईटच !

सिनेमा हृतिकसाठी आहे आणि त्याचाच आहे. सिनेमाच्या सुरुवातीला असलेल्या 'कदम से कदम जो मिले...' गाण्यावरील हृतिकच्या नाचासाठी त्याला सलाम आहे ! अप्रतिम कोरिओग्राफ केलेलं आणि सादर केलेलं गाणं खासकरून पाहायलाच हवं असं आहे.
वर म्हटल्याप्रमाणे अंध व्यक्तीच्या अवघडलेपणाला अत्यंत सहजपणे हृतिकने सादर केलं आहे. त्याची हताशा आणि नंतर मनात भडकलेला सुडाग्नी त्याने अप्रतिम रंगवला आहे. प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्या एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या प्रयत्नांत पूर्णपणे यशस्वी होते, तेव्हा एक त्रयस्थ म्हणूनही आपल्याला एक समाधान मिळतं. हृतिकचा 'रोहन भटनागर' पाहताना ते समाधान मिळेल.

व्हेटरन राजेश रोशन आजच्या काळाशी सुसंगत संगीत देतात. काबिल हूं, कदम से कदम.. आणि 'सारा जमाना..'चं रिमिक्स मस्त जमली आहेत.

अधिक काही लिहित नाही. बऱ्याच दिवसांनी 'रईस' आणि 'काबिल' अशी डबल ट्रीट आहे. बॉक्स ऑफिसचे आकडे ह्याला 'लढत' ठरवतील आणि दोघांतल्या एकाला विजेताही बनवतील. पण प्रेक्षकांनी ह्याकडे लढत म्हणून न बघता मनोरंजनाची मेजवानी पाहायला हवं. कारण जर एक 'दमदार' आहे तर दुसराही 'काबिल-ए-तारीफ' आहे.


रेटिंग - * * * *

- रणजित पराडकर

Thursday, January 26, 2017

अँग्री यंग शाहरुख (Movie Review - Raees) - रईस

सुपरस्टार म्हणजे, 'तो येतो, तो पाहतो आणि तो जिंकतो'. आता 'हे, असं होतं' म्हणजे नेमकं काय आणि कसं होतं, ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर 'रईस' पाहा.
'फॅन' आणि 'डिअर जिंदगी' नंतर शाहरुखच्या लोकप्रियतेला उतरण लागली आहे, असं वाटत असेल तर 'रईस' पाहाच.
१९७०-७५ च्या आसपास आलेलं 'अँग्री यंग मॅन' वालं असंतोषी वारं, नंतर 'समांतर सिनेमा'च्या नावाने सुरु झालेला विद्रोहाचा प्रवाह आणि 'सत्या'नंतर सुरु झालेलं व 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या सिनेमांपर्यंत पोहोचलेलं 'निओ नॉयर' टाईप गँगवॉर मूव्हीजचं लोण हे सगळं जर तुम्ही एकसारखंच एन्जॉय केलं असेल तर 'रईस' नक्की पाहा.
चोप्रा, जोहर व तत्सम साचेबद्ध लोकांच्या ठोकळेबाज सिनेमांमधल्या एकसारख्या भूमिकांच्या जोरावर अमाप पैसा व लोकप्रियता कमावून त्यातच रमणारा शाहरुखसारखा चांगला अभिनेता कधी काही तरी वेगळं करेल, ह्याची वाट पाहणंही तुम्ही कंटाळून सोडून दिलं असेल तर 'रईस' आवर्जून पाहा.

ट्रेलर, इतर चर्चा ह्या सगळ्यांतून 'रईस' च्या कहाणीचा बऱ्यापैकी अंदाज आलेला असावाच. त्यापेक्षा ती वेगळीही नाही. गरिबीत खितपत असणाऱ्या कोवळ्या वयात बेकायदेशीर धंद्यांच्या वाटेवर जाऊन, पुढे त्या वाटेला आपल्या मनानुसार हवं तसं वळवत मोठा होणाऱ्या व्यक्तिरेखा सिनेमासाठी नवीन नाहीत. 'दिवार' पासून अश्या व्यक्तिरेखांच्या 'एक्स' फॅक्टरने भारतीय सिनेमाला मोहवलं आहे. 'रईस' अशीच एक कहाणी आहे ड्राय स्टेट 'गुजरात'मध्ये बेकायदेशीर दारूचा धंदा करत मोठा झालेल्या एका 'रॉबिन हूड'ची. लहान वयात शाळेच्या दप्तरातून दारूचं स्मगलिंग सुरु करणारा 'रईस' (शाहरुख खान) नंतर दारूच्या ह्या हजारो कोटींच्या काळ्या बाजारावर अधिसत्ता मिळवतो. अपेक्षेप्रमाणे त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीचं केवळ तो सिनेमाचा हिरो आहे म्हणून भरपूर उदात्तीकरणही इथे होतं. त्याच्या वाटेवर वारंवार त्याला आडवा येणारा पोलीस ऑफिसर मजमुदार (नवाजुद्दिन सिद्दिकी) कितीही कर्तव्यदक्ष असला आणि त्याच्याविषयी आपल्याला आदर वाटत असला तरी प्रेम मात्र 'रईस' बद्दलच वाटेल, ह्याची पुरेपूर काळजी घेतली गेलेली आहे.
'रईस' चा हा प्रवास गुजरातमधील एका छोट्याश्या गावातून आणि दारूपासून सुरु होऊन समुद्र, मुंबई, सोने, खून, दंगली, राजकारण, स्फोटके अशी वेगवेगळी वळणे आणि टप्पे घेत जातो. ह्या दरम्यान त्याला मित्र लाभतात, शत्रू मिळतात आणि मित्रांचे शत्रूही होतात. ह्या सगळ्यातून पुढे निघत, आपला रस्ता बनवत अखेरीस तो त्याच एका अपेक्षित व अटळ मुक्कामी येऊन पोहोचतो, जिथे सिनेमातला प्रत्येक मोठा गुन्हेगार पोहोचत असतो. कोण जिंकलं, कोण हरलं, हा सवाल इथे उरत नाही, किती जिंकलं आणि किती हरलं, हा हिशोब राहतो, जो पूर्ण होत नाही.

'कहता हैं दिल बार बार' आणि 'लम्हा' असे पूर्णपणे नाकारले गेलेले सिनेमे बनवतानाच 'परजानिया' सारखा अगदी वेगळ्या संवेदनशीलतेचा सिनेमा देणारे दिग्दर्शक राहुल ढोलकिया 'रईस' कसा करतात, ह्याचं कुतूहल होतं. एक मोठा व्यावसायिक नट केंद्रभागी असल्यावर साहजिकपणेच त्यांनी विविध मसाल्यांचं समतोल मिश्रण करायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळेस सगळं खूपच सिम्प्लिफाईड वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी वास्तवदर्शी. काही वेळेस हे कथानक अतिरंजित वाटतं तर काही वेळेस बऱ्यापैकी संयत. काही वेळेस 'रईस' हा फक्त एक गुन्हेगार असतो, तर काही वेळेस 'हिरो'. शत्रूच्या अड्ड्यावर एकट्याने जाऊन १०-१२ जणांना अगदी पूर्ण आत्मविश्वासाने ठोकणारा 'डॅशिंग' 'रईस' दोन वेळा दाखवून त्यांनी अतिरंजन, हिरोगिरी आणि सिम्प्लीफिकेशनचं पारडं थोडंसं जड केलंच आहे. पण चालायचंच. व्यावसायिक सिनेमा बनवणे म्हणजे काय कुठली बेईमानी नाहीच. तो किती सफाईने बनवला, हे महत्वाचं. गाणी, प्रसंग आणि पात्रांची थोडीफार अनावश्यक घुसवाघुसवी वगळता एकंदर हा मसाला बऱ्यापैकी चविष्ट झाला आहेच.

शाहरुख, नवाझुद्दिन आणि मोहम्मद झीशान अयुब हे कास्टिंग खूप 'इंटरेस्टिंग' होतं.
'रांझणा', 'तनु वेड्स मनू रिटर्न्स' मधून धमाल उडवणारा अयुब इथे पूर्ण वेळ झाकून ठेवलेलाच वाटतो. अयुबने साकारलेला 'सादिक' म्हणजे 'रईस'चा साईड किक. 'उजवा हात'. भूमिकाच अशी असल्यामुळे त्याचा एकट्याचा असा एकही स्वतंत्र प्रसंग नाही. खरं तर देता येऊ शकले असते किंवा दिलेही असलेले असू शकतात, मात्र ते आपल्या समोर तरी येत नाहीत. शाहरुखसोबतच सतत असल्यामुळे त्याला मुख्य व्यक्तिरेखेवर भारी पडू न देण्याची खबरदारी घेतली गेलेली आहे. सिनेमा संपून जातो आणि आपण आजपर्यंत पाहिलेला 'अयुब' आपल्याला एकदाही जाणवत नाही. तो इतर कुणाही सहाय्यक अभिनेत्यासारखा दुर्लक्षितच राहतो.

नवाझुद्दिन मात्र 'मजमुदार'च्या भूमिकेत जान ओततो. 'कहानी'त त्याने साकारलेल्या सीबीआय ऑफिसरच्या भूमिकेपासूनच त्याच्या करियरला दिशा, वेग,आकार वगैरे मिळत गेलं आहे. इथे तो पुन्हा एकदा तो सीबीआय ऑफिसर आठवून देतो. खरं तर अगदीच किरकोळ देहयष्टीमुळे तो ह्या (अश्या) भूमिकेसाठी आयडियल नाहीच, मात्र तरीही तो ती व्यक्तिरेखा विश्वसनीय बनवतोच. त्याचा चाणाक्ष, तडफदार आणि जिगरबाज पोलीस ऑफिसर 'रईस' चं एक हायलाईट आहे.

शाहरुख न आवडणाऱ्यांनाही शाहरुख आवडेल, असा शाहरुख 'रईस' मध्ये दिसतो. 'शाहरुख' म्हटल्यावर ज्यांना फक्त 'स्वदेस' आणि 'चक दे इंडिया' ह्या दोनच सिनेमांचा उल्लेख करावासा वाटतो, ते इथून पुढे 'रईस' चाही उल्लेख नक्की करतील. २५ वर्षांच्या अनुभवात शाहरुखने एक अभिनेता म्हणून जे काही कमावलं आहे, त्याचा कस ह्या तीन सिनेमांत लागलेला आहे. 'रईस' म्हणून त्याने जपलेली देहबोली वेगळी आहे. जाणीवपूर्वक काही तरी वेगळं केलं आहे आणि तेही यशस्वीपणे. गेल्या काही वर्षांत 'शाहरुख असह्य आहे' पासून 'शाहरुख काही वेळी खूप आवडतो' पर्यंत माझ्यासारख्या काही सिनेरसिकांना शाहरुख घेऊन आला आहे, हे काही कमी नाही !

पाकिस्तानातून आवर्जून इम्पोर्ट करण्याइतकं 'माहिरा खान' मध्ये आणि तिने साकारलेल्या अत्यंत फडतूस भूमिकेत आहे तरी काय, हा प्रश्न मात्र सतावतो. आपण भारतीय लोक गोऱ्या रंगावर उगाच भाळतो आणि गोरेपणा हे सौंदर्याची एक महत्वाचं लक्षण मानत असतो. माहिरा खानचा गौरवर्ण वगळला, तर ती शब्दश: कुरूप आहे. कुणी तिच्यावर भाळावं असे फीचर्स किंवा चार्म तिच्या व्यक्तीमत्वात व तिने साकारलेल्या व्यक्तिरेखेत अजिबात जाणवत नाही. अभिनयाच्या नावाने तर शंखच आहे. ज्या काही १-२ संधी तिला स्वत:ची कुवत दाखवण्यासाठी मिळाल्या होत्या, त्या संधींची तिने छानपैकी माती केलेली आहे.

राम संपत ह्यांचं संगीत विशेष लक्षात राहत नाही. 'धिंगाणा' गाणं थोडा वेळ मनात रेंगाळतं. पण त्यांचं पार्श्वसंगीत मात्र विशेष लक्षात राहतं. 'रईस' चं थीम म्युझिक येणाऱ्या काळात 'कल्ट' होणार आहे, असा माझा अंदाज आहे.

एका आयटम नंबरपुरती सनी लिओन सिनेमात येते आणि असं वाटतं की हिच्या आणि माहिरा खानच्या भूमिकांची अदलाबदली करायला हवी होती. इतपत अभिनय तर सनीही करू शकते आणि इतपत नाच तर माहिरालाही जमत असेलच.

'रईस' आणि 'काबिल' हा तिकीट बारीवरचा मुकाबला कदाचित दिवसागणिक रंगत जाईल. पण ओपनिंगचा विचार करता अपेक्षेनुसार 'रईस' ने सरशी केलेलीच आहे. ह्या वेळी सिनेमा पाहत असताना एक खूप विचित्र बाब जाणवली. गाण्यांवर 'झिंगाट' कल्चरचा हुल्लडबाज नाच करत, हल्लागुल्ला करणारं पब्लिक पहिल्यांदाच शाहरुखच्या सिनेमाला दिसलं. ह्या पूर्वी हे लोक सलमानपटांना हजेरी लावत.

विथ ऑल दॅट, 'रईस' म्हणजे अगदी 'नॉट टू मिस' नसला तरी एकदा पाहावा असा नक्कीच आहे. कारण शाहरुखचा 'अँग्री यंग मॅन' 'अमिताभ' इतकाच प्रभावी आहे.

रेटिंग - * * *१/२

- रणजित पराडकर

Wednesday, January 25, 2017

बाबा

नसेल काहीही बोलत पण समजत असतो बाबा
आई जर का चिडली तर समजावत असतो बाबा

नेहमीच हळवेपण त्याचे लपवत असतो बाबा
पाकिटातला फोटो चोरुन पाहत असतो बाबा

क्षणाक्षणाला नोंदवून टिपणार कधीही नसतो
हिशोब गेलेल्या वेळेचा मांडत असतो बाबा

सहा वाजता गेल्यानंतर दहा वाजता येतो
पोरांना रविवारी केवळ भेटत असतो बाबा

घोडा बनतो, लपून बसतो, पकडापकडी करतो
आपल्याच तर बालपणाशी खेळत असतो बाबा

धडपडण्याची भीती गोंधळ उडवत असते तेव्हा
सायकलीला धरून मागे धावत असतो बाबा

दूर पसरल्या माळाच्या खडकाळपणाचे जीवन
एकटाच गुलमोहर होउन डोलत असतो बाबा

रणरणती दुनियादारी मन रुक्ष कोरडे करते
एक कोपरा मनात गुपचुप भिजवत असतो बाबा

....रसप....
२४ जानेवारी २०१७

Sunday, January 22, 2017

मंदीर खुणावत आहे

संदिग्ध कालची पाने
फडफडती वाऱ्यावरती
रंगांची पसरण नाही
संध्येच्या क्षितिजावरती

धूसरता गूढ हवीशी
हाकेचे अंतर करते
निर्वात ओढ अज्ञात
संपृक्त मनाला भरते

झुळझुळून ऐकू येती
अस्फुटश्या काही ओळी
वाटेवर गातो कोणी
भटियार चुकीच्या वेळी

गवताची सळसळपाती
देतात सुरांची साथ
उसवत जाते प्रश्नांची
भिजरी आवळली गाठ

निश्चिंत क्लांत माळावर
आकाश पांघरत आहे
नि:शब्द प्रवासी बघतो
मंदीर खुणावत आहे

....... मंदीर खुणावत आहे

....रसप....
२२ जानेवारी २०१७


Sunday, January 15, 2017

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक' - श्री. अक्षयकुमार काळे

'गझलांमधील वाढ केवळ संख्यात्मक'

सध्याच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. अक्षयकुमार काळे ह्यांचे हे वक्तव्य. ह्यावरुन सोशल नेटवर्कवर खूप गदारोळ चालू आहे. ह्या गदारोळात हा थोडासा आवाज माझाही !! :D

माझ्या मते, संख्यात्मक वाढ गझलेपेक्षा खूप जास्त पसरट कवितांत झालेली असून त्यांत दर्जाही वाढलेला नाहीच. कवितेतला जो 'तेच-ते'पणा आहे, त्यामुळे झालं असं आहे की वेगवेगळ्या गावांतले आघाडीचे सगळे कवी एकसारखेच लिहितात. त्यांचे विषय व व्यक्त होण्याची पद्धत इतकी तीच ती असते की एका रचनेतल्या दोन-चार ओळी दुसऱ्या रचनेत टाकल्या किंवा अगदी गाळूनही टाकल्या तरी चालून जावं !

अक्षयकुमार काळे साहेबांचं उपरोक्त विधान कदाचित अगदीच गैरलागू नसेलही. गझल क्षेत्रात दर्जात्मक वाढीपेक्षा जास्त वाढ संख्यात्मक होते असेलही. पण हे निरीक्षण तर कुठल्याही क्षेत्रात असंच असेल ना ?
आणि जर मराठी साहित्याबाबत बोलायचं झालं तर हे गझलेपेक्षा कवितेबाबत जास्त लागू नाही का ? नक्कीच आहे. पण ते छातीठोकपणे बोलायचा दम कुणाच्याही फेफड्यांत नाही !

बोला की कुणी तरी की, 'उथळ विद्रोहाचा भडकपणा आणि अट्टाहासी मुक्ततेचा भोंगळेपणा ह्यामुळे अधिकाधिक विद्रूप होत जात असलेल्या मराठी कवितेची फक्त संख्यात्मक वाढ होते आहे!'
हे कुणी बोलणार नाही. कारण त्यामुळे बहुसंख्यांचा रोष ओढवला जाईल ना !
कुणाच्या तरी छाताडात दम आहे का बोलायचा की, जोपर्यंत कविता ओढून ताणून आंबेडकरांपर्यंत आणली जात नाही, तोपर्यंत कवी 'पुरोगामी' आणि म्हणूनच पुरस्कारयोग्य मानला जात नाही?
कुणाला तरी हे खटकतंय का की, 'वृत्तात लिहिणं' ही गोष्ट सपशेल त्याज्य मानली गेली असून आजच्या काळात अक्षरश: हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके (तथाकथित 'मुख्य धारेतले') लोकही वृत्तात लिहित नाहीत?

पूर्वी एखाद्या सामान्य मध्यमवर्गीय माणसाच्या घरातही कवितांची पुस्तकं असत. त्याच्या तोंडी कवितेच्या ओळी असत. आज 'कविता' हा शब्द जरी उच्चारला तरी दूर पळतात लोक ! आजच्या पिढीचे कवी कोण आहेत, कुणाला माहितही नसतं आणि त्यांच्या तथाकथित कविता तर त्यांच्या व त्यांच्या काही चेल्या-चपाट्यांशिवाय कुणाला ठाऊकही नसतात. एक काळ असा होता की इंजिनिअरिंग, मेडिकल, अकौंटन्सी वगैरे साहित्याशी संबंध नसलेली क्षेत्रं निवडणाऱ्या लोकांनाही कित्येक कविता मुखोद्गत असत. कवितेवर त्यांचं मनापासून प्रेम असे. आज असे किती लोक आहेत ?

अनियतकालिक व नियतकालिक आणि दिवाळी अंकांतून छापून येणाऱ्या कविता तर कुणी वाचतही नाही, ही शोकांतिका माहित आहे का ? एक तर त्या कविता आहेत, हेच अर्ध्याहून जास्त लोकांना पटत नसतं. त्यात त्यांच्यातला दुर्बोधपणा व पसरटपणा अजून दूर लोटतो.
सामान्य माणसाला 'कविता' श्या शब्दाची अक्षरश: एलर्जी व्हायला लागली आहे.

Why is this apathy ? ह्यामागची कारणमीमांसा कोण करणार आणि कधी ?
कविता सामान्य लोकांना इतकी नकोशी का झाली आहे ? का ती सामान्य लोकांच्या ओठांवर जराही रुळत नाही ? का त्यांच्या मनात अजिबात वसत नाही ?
ह्या मागचं कारण तिच्यातला रसाळपणा हरवला असण्यात नाहीय का ? कवितेची जी काही वाढ झाली व होते आहे, ती संख्यात्मक नाहीय का ?

ह्या उलट, जे काही 'काव्य' सामान्य माणसाला आकर्षित करून घेत आहे, ते सामावलं आहे 'गझल' ह्या प्रकारात. लोक गझलेचे शेर आपलेसे मानतात, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आवडलेले शेर नोंद करून ठेवतात. सामान्य माणूस आणि कविता (गझल हीसुद्धा एक कविताच) ह्यांना जोडणारा जो एक अगदी शेवटचा धागा सद्यस्थितीत आपले अस्तित्व टिकवून आहे, तो म्हणजे 'गझल'.

साहित्य संमेलनात जो 'कवी कट्टा' म्हणून बैलबाजार भरतो, त्यांत मीही एकदा मिरवून आलो आहे. त्या शेकडो लोकांच्या गर्दीत श्रोता एकही नव्हता. सगळे आपापली बाडं घेऊन आलेले कवीच होते. ह्यांच्या कविता कुणीही ऐकत नाही.

एक असं करून पाहावं.
एखाद्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोन सभागृहांत एकाच वेळी दोन कार्यक्रम ठेवावे. एकीकडे, आजच्या मान्यवर, प्रथितयश कवी/ कवयित्रींचे 'कवी संमेलन' आणि दुसऱ्या सभागृहात एक 'केवळ संख्यात्मक वाढ झालेल्या लोकांचा' 'गझल मुशायरा'. मी ग्यारंटीने सांगतो, सेलेब्रेटेड कवींकडे न जाता तमाम आम जनता, ह्या अ-प्रसिद्ध गझलकारांना ऐकायला जाईल.
ही परिस्थिती आहे सध्याच्या कवितेची. तिला नागवलं आहे तिच्या ठेकेदारांनी आणि समीक्षकांनी. तिला इतकं भ्रष्ट केलं आहे की ती त्यांच्याशिवाय कुणालाही हवीहवीशी वाटत नाही.

हे सगळं चित्र विदारक वाटत नसेल आणि गझलेतर काव्यक्षेत्राची वाढ अगदी योग्य प्रकारे चालली आहे, असं जर वाटत असेल, तर मग बोलायलाच नको !

साहित्य संमेलनवाल्यांनी गझल व गझलकारांना नेहमीच दूर ठेवलं आहे, हा तर उघड इतिहास व वास्तव आहे. मराठी गझलेचे सम्राट सुरेश भटांना ह्यांनी कधी अध्यक्षपद दिलं नाही आणि आता गझलेच्या उत्कर्ष व वाढीबद्दल टिपं गाळायला पाहतायत !
वाह रे वाह !

तुम्ही गझल नाकारणार, वृत्तबद्धता नाकारणार, आंतरजालीय साहित्य नाकारणार आणि संख्यात्मक वाढ प्रत्यक्षात तुमच्याच कंपूत होत असताना दुसरीकडे बोट दाखवून दिशाभूल करायला पाहणार?

साहित्य संमेलनाध्यक्ष असलेल्या व्यक्तीने केलेलं विधान अभ्यासपूर्ण तर असायला हवंच. पण ते नाही तर नाही, पण किमान जबाबदार तरी असावं !
मी फेसबुकवर ज्या अनेक गझलकार मंडळींशी कनेक्टेड आहे, ज्यांना मी वाचत असतो, त्यांच्यापर्यंत काळे साहेब बहुतेक पोहोचलेले नसावेतच. कारण त्यांतल्या ९९% लोकांनी आपली गझल पुस्तकरूपी प्रकाशित केलेली नाहीय. ते लोक ब्लॉगवर, फेसबुकवर लिहितात, मुशायऱ्यात सादर करतात आणि त्यांना स्वत:ला जितकी अपेक्षा आहे, त्यापेक्षा खूप जास्त लोकांपर्यंत लीलया पोहोचतात. पुस्तक छपाईच्या बाजारात उतरण्याची त्यांच्या गझलेला गरज नाही आणि म्हणून ते उतरतही नाहीत. मागच्या पिढीतल्या आउटडेटेड अभ्यासूंनी स्वत:ला उशिरा का होईना, अपग्रेड करायची गरज आहे. मुख्य धारेत जी काही साहित्य निर्मिती होते आहे, त्याच्या कैक पटींनी चांगल्या दर्ज्याचं लिखाण आंतरजालावर (इंटरनेटवर) होत आहे, हे कडवट सत्य स्वीकारण्याची गरज आहे. आजच्या काळाचा उद्गार 'इंटरनेट' आहे. तुम्ही जर त्याला ऐकत नसाल, तर ती तुमची चूक आहे आणि त्यामुळे तुमची माहिती (ज्याला काही लोक 'ज्ञान' म्हणतात) अपूर्णही आहे. ह्या लोकांनी आंतरजाल सरसकट टाकाऊ मानला असल्याने तिथे पूर्णपणे दुर्लक्ष करून एका प्रचंड मोठ्या संकलानाकडे सपशेल कानाडोळा केला आहे आणि आपल्या अर्धवट माहितीआधारे आपली काहीच्या काही मतं बनवलेली आहेत.

अक्षयकुमार काळे साहेबांचं वक्तव्य हे आंतरजालिय साहित्याबद्दल असलेल्या उदासिनतेचं एक उदाहरण तर आहेच पण कवितेच्या विद्रुपीकरणाकडे सोयीस्कर (कातडी बचाव) दुर्लक्ष करण्याचा प्रयत्नही आहे.

- रणजित पराडकर

Monday, January 09, 2017

सदाचार नष्ट

स्तुतीपाठकांच्या
तश्या निंदकांच्या
भिडवल्यात सेना
इथे कौरवांच्या

म्हणे येथ जो तो
नसे मी जसा 'तो'
तरी वागताना
कसा तोल जातो?

कुणी अंधभक्त
कुणी अंधत्रस्त
भल्या माणसांचा
सदाचार नष्ट

कुणा ना पहावे
कुणा ना दिसावे
स्वत:च्या मनाचे
कुणा ना कथावे

....रसप....
७ जानेवारी २०१७

Sunday, January 08, 2017

ओम पुरी - एक जबरदस्त एक्झिट

एक ३४-३५ वर्षांची कारकीर्द, जिच्यात विविध भाषांतले मिळून १५० च्या आसपास सिनेमे असल्यावर, तिचा संपूर्ण आढावा घेणं माझ्या कुवतीच्या बाहेरचं आहे. मात्र 'ओम पुरी' म्हटल्यावर माझ्या ज्या ज्या सिनेमांच्या आठवणी जाग्या होतात, ते मी फक्त उल्लेखतो आहे.


विजय तेंडूलकरांच्या 'घाशीराम कोतवाल'वर फिल्म इन्स्टीट्युट तर्फे बनवल्या गेलेल्या सिनेमात ओम पुरींनी 'घाशीराम' केला होता. ही होती त्यांची पहिली भूमिका. त्या काळी समांतर सिनेमाचा एक प्रवाह होता. 'समांतर' म्हणून नावाजलेले (क्रिटीकली अक्लेम्ड) बहुतांश सिनेमे मला कंटाळवाणे आणि अतर्क्यही वाटतात. त्यामुळे मी आवर्जून फार क्वचित त्या प्रवाहातले सिनेमे पाहिले व पाहतो. मात्र अर्धसत्य, आक्रोश, मिर्च मसाला, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्युं आता हैं.. असे सिनेमे ज्यांपैकी काहींत ओम पुरी प्रमुख किंवा महत्वाच्या भूमिकांत होते, पाहिले आहेत.

अर्धसत्य मधला त्यांचा इन्स्पेक्टर वेलणकर तर ट्रेंडसेटर होता. माझ्या मते 'अर्धसत्य' हा एक असा सिनेमा होता, ज्यात एका कमर्शियल सिनेमाचा पुरेपूर मसाला होता. मात्र त्याची हाताळणी वास्तववादी होती आणि तथाकथित 'समांतर' सिनेमाच्या व्यामिश्र व्याख्येत बसणारी होती. ही कसरत फार क्वचित यशस्वीपणे करता आलेली आहे. गोविंद निहलानी हा माणूस म्हणूनच एक 'बाप' दिग्दर्शक आहे ! 'अर्धसत्य'सारख्या सिनेमांमुळे समांतर सिनेमा व्यावसायिकतेकडे आणि व्यावसायिक सिनेमा समांतरतेकडे आकर्षित झाला, असं मला वाटतं.
'अर्धसत्य' मधल्या इन्स्पेक्टर वेलणकरमुळेच बहुतेक नंतर काही काळाने ओम पुरी 'घायल' द्वारे मुख्य प्रवाहात आले. १९९०. 'समांतर' सिनेमा अवांतर होत, लोप पावत चालला होता. त्या चळवळीतले सगळे कलाकार लोक मुख्य प्रवाहात आपली जागा बनवू, शोधू पाहत होते. पवन मल्होत्रा, पंकज कपूर, स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, ओम पुरी अश्या अनेक गुणवान अभिनेत्यांची पाउलं मुख्य धारेकडे जाऊ पाहत होती. ह्यांपैकी अनेकांनी आपलं स्थान बनवलंच. पण हे जे एक प्रकारचं स्थलांतर होतं, ते ओम पुरींनी लीलया आणि नैसर्गिकपणे केलं. 'समांतर सिनेमातला ओम पुरी' आणि 'व्यावसायिक सिनेमांतला ओम पुरी' असा फरक त्यांच्या बाबतीत करता येत नाही, जो इतर बहुतांश लोकांच्या बाबतींत करता येऊ शकेल. उदाहरण म्हणून निहलानींच्या 'अर्धसत्य'मधला पोलीस इन्स्पेक्टर वेलणकर आणि राजकुमार संतोषींच्या 'घायल'मधला एसीपी डिसुजा बघा. दोन्ही व्यक्तिरेखा एकाच उत्कटतेने सादर होतात.

'घायल'नंतर ओम पुरींनी अनेक व्यावसायिक सिनेमे केले. विद्रोहाला व्यावसायिक यशस्वीपणे मांडण्याचं अवघड कसब असणारे एन. चंद्रा, राजकुमार संतोषी, ह्यांसारखे दिग्दर्शक ह्या काळात भारतीय सिनेमाच्या बिघडत चाललेल्या प्रतिमेला सुधरवत होते. त्यांच्या दिमतीला असणाऱ्या सामर्थ्यवान अभिनेत्यांच्या ताफ्यात एक महत्वाचं नाव 'ओम पुरी' होतं. अधूनमधून वाट चुकल्यासारखे जे काही मोजके 'समांतर' सिनेमे धडपडत पुढे येत होते, त्यांतही अनेकदा ओम पुरी झळकत होतेच. पण 'नरसिंहा' (दिग्दर्शक - एन चंद्रा) मधल्या 'बापजी'च्या व्यक्तिरेखेने व्यावसायिक सिनेमात त्यांचं स्थान पक्कं केलं. चेहऱ्यावर देवीचे व्रण आणि जरब असलेला वजनदार आवाज, ह्यामुळे ओम पुरींकडे एका खलनायकासाठीची प्रतिमा होती. तिला 'नरसिंहा'ने समोर आणलं आणि तमाम व्यावसायिक सिनेमाकर्त्यांचं लक्ष ह्या अभिनेत्याकडे वळलं.

पुढील २५ वर्षांत ओम पुरींनी प्रमुख, सहाय्यक, नकारात्मक, विनोदी, चरित्र भूमिका अश्या हर तऱ्हेच्या भूमिका केल्या. कुठेही, एका क्षणासाठीही ते 'मिसफिट' वाटले नाहीत, इतकं प्रत्येक भूमिकेला त्यांनी आपलंसं केलं. ह्यात चांगले, वाईट सगळेच सिनेमे होते. सिनेमा वाईट असो वा चांगला, ओम पुरींचं काम कधीच वाईट झालं नाही. खासकरून २००० सालानंतरच्या काळात कुंवारा, दुल्हन हम ले जायेंगे, फर्ज, दिवाने हुए पागल, बुढ्ढा मार गया, किस्मत कनेक्शन, डर्टी पॉलिटिक्स, घायल - वन्स अगेन अश्या अनेक सामान्य सिनेमांत त्यांनी काम केलं. त्यातले कित्येक मी पाहिलेही नाहीत, पण लॉटरी तत्वावर कुठलेही २-४ सिनेमे बघितले, तरी त्यांत ओम पुरींचं काम सामान्य नसेल, ह्याची पूर्ण खात्री आहे ! युवा, मक़बूल, रंग दे बसंती सारख्या क्रिटीकली अक्लेम्ड यशस्वी सिनेमांत त्यांच्या सहाय्यक भूमिका होत्या. 'युवा'मधला बंगाली राजकारणी त्यांनी ज्या खुबीने सादर केला, त्याच सहजतेने 'रंग दे बसंती'मधला मुसलमान बाप त्यांनी उभा केला. तर 'मक़बूल'मधली विनोदी ढंगाची नकारात्मक सहाय्यक भूमिकासुद्धा चोख वठवली. भूमिकेची लांबी, रुंदी, उंची वगैरे ह्या अभिनेत्यासाठी महत्वाची नव्हती. त्या त्या व्यक्तिरेखेला समजून घेऊन तिला पडद्यावर सफाईदारपणे उतरवणं, हे महत्वाचं होतं. 'डॉन' मधला सीबीआय ऑफिसर मलिक, 'लक्ष्य'मधला सुभेदार वगैरे तर अगदीच छोट्या छोट्या भूमिकांतही त्यांनी आपली छाप सोडलीच.

विनोदी भूमिका, किंबहुना विनोदनिर्मितीच, खूप कठीण असते असं मला वाटतं. लोकांना हसवणं, वाटतं तितकं सहज, सोपं नसतं. त्यातही आचरटपणा आणि आगाऊपणा न करता निखळ विनोद करणं म्हणजे तर अजूनच कठीण ! ओम पुरी इथेही कमी पडले नाहीत. 'जाने भी दो यारों' मधला त्यांचा 'आहुजा' आणि खासकरून महाभारताचा एकंदरच प्रसंग आज २५ वर्षांनंतरही कुणी विसरू शकत नाही. 'मालामाल वीकली' मधला 'बल्लू', 'चाची ४२०' मधला 'सेक्रेटरी', 'मेरे बाप पहले आप' मधला लंपट म्हातारा, 'हेराफेरी' मधला 'खडकसिंग' आणि 'मिस तनकपूर हाजीर हो' मधला पोलीस ऑफिसर अश्या त्यांच्या काही विनोदी भूमिका मला चटकन आठवतात. ह्या भूमिका म्हणजे 'ओम पुरी'साठीच होत्या अश्यातला भाग नाही. पण त्यांनी त्या जश्या सादर केल्या, त्यावरुन तरी तसंच म्हणावं लागेल ! दिग्दर्शक प्रियदर्शन ह्यांच्या बहुतांश विनोदी सिनेमांत 'ओम पुरी' झळकायचेच. हेराफेरी, मालामाल वीकली, मेरे बाप पहले आप, चुप चुप के, ढोल असे अनेक सिनेमे सांगता येतील.

इंदिरा गांधींच्या हत्येनंतर पंजाबमध्ये सुरु झालेले पोलिसांचे अत्याचार आणि त्यांमुळे जनमानसात वाढत चाललेला असंतोष, ह्या पार्श्वभूमीवरची एक स्फोटक कथा गुलजार साहेबांच्या 'माचीस' मध्ये होती. ह्यातला अतिरेक्यांचा म्होरक्या 'सनातन' ओम पुरींनी केला होता. व्यवस्थेबद्दल असलेली आत्यंतिक चीड आणि तरीही मनात ओल धरुन असलेला एक हळवा कोपरा, असा 'सनातन' ओम पुरींनी दाखवला. ही व्यक्तिरेखा ना पूर्ण नकारात्मक, ना पूर्ण सकारात्मक होती. तिला दोन्ही प्रकारचे पैलू होते. कोणत्या प्रसंगी कोणता रंग दाखवायचा, हे महत्वाचं होतं आणि ओम पुरींनी तेच केलं.

पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी अनेकदा काम केलं आहे. सुरुवात 'अर्धसत्य'पासून केल्यास, घायल, द्रोहकाल, गुप्त, प्यार तो होना ही था, विनाशक, फर्ज, मक़बूल, आन, देव, दबंग, अग्निपथ, मिस तनकपूर हाजीर हो असे बरेच सिनेमे सांगता येतील. पण 'ए.के. 47' ह्या कन्नड सिनेमातल्या कमिशनरचं काम तर असं काही झालं की त्याचे हिंदी डायलॉगही कन्नड प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवून गेले. (हा सिनेमा बरेच दिवस 'वॉच लिस्ट' वर आहे. आता त्याला पुन्हा उजाळा मिळाला !)

कितीही झालं, तरी प्रत्येक अभिनेत्याची एक विशिष्ट इमेज आपल्या मनात असतेच. एखादा सिनेमा त्याची ओळख असतो आपल्यासाठी. ह्या मागे काही विशेष असं कारण नसतं. असंही नाही की त्या अभिनेत्याचम तेच सर्वोत्कृष्ट काम असतं, पण तरीही इमेज बनून जाते. हे अगदी पर्सनल असतं. उदा. - 'नसीरुद्दीन शाह' म्हटलं की मला 'कथा'मधला 'राजाराम जोशी'च आठवतो. 'पंकज कपूर' म्हटलं की मला 'सहर'मधला 'प्रो. तिवारी' आठवतो. तसंच 'ओम पुरी' म्हटलं की मला आठवतो 'चायना गेट'मधला कर्नल पुरी.
राजकुमार संतोषींचा 'चायना गेट' म्हणजे ओम पुरी, अमरीश पुरी, नसीरुद्दीन शाह, डॅनी डेंग्झोंग्पा, टिनू आनंद, कुलभूषण खरबंदा, जगदीप अशी सगळी आजपर्यंत न कल्पना केलेली स्टारकास्ट ! आर्मीतून हकालपट्टी झालेले म्हातारे लोक एका मिशनवर येतात आणि त्यांचा लीडर असतो कर्नल कृष्णकांत पुरी. 'चायना गेट' मधले अनेक प्रसंग अप्रतिम अभिनयाविष्काराने स्तिमित करणारे आहेत. त्या सगळ्याचा परमोच्च बिंदू म्हणजे ओम पुरी 'मिशन इज ओव्हर' म्हणतो तो प्रसंग. परस्परांशी असलेले वैयक्तिक मतभेद, धार्मिक द्वेष बाहेर आल्यावर त्यांचे सहकारी एकमेकांवर पिस्तुलं रोखतात. हा प्रसंग म्हणजे हळूहळू तापमान वाढत जाऊन मग थडाथड उकळायला लागणाऱ्या पाण्यासारखा आहे. तो बॉयलिंग पॉइन्ट म्हणजे 'आप बार बार मेरी कौम के खिलाफ...' असं काहीसं म्हणून अमरीश पुरीच्या अंगावर जाणाऱ्या नसीरुद्दीनवर अमरीश पुरी पिस्तुल रोखतो आणि ताबडतोब डॅनी 'बॅक ऑफ' म्हणून स्वत:चं पिस्तुल काढतो, असा आहे. ह्यानंतर काही सेकंदांची शांतता, मग नसीरुद्दीन जमिनीवर २-३ दा फायर करतो आणि मग ओम पुरी टेक्स चार्ज. 'मिशन इज ओव्हर' पासून सुरु करून कर्नल पुरी त्याची, आर्मीत असताना फेल गेलेल्या आणि त्याची भारी किंमत सर्वांना चुकवायला लागलेल्या मिशनची आणि आत्ताच्या मिशनवर येण्यामागची कहाणी सांगतो. त्वेषाने पेटलेला एकेक जण निस्तब्धपणे ऐकत असतो, पाहत असतो. मला 'ओम पुरी' म्हटलं की 'चायना गेट' आणि त्यातला हा विशिष्ट प्रसंगच आठवतो. संवादफेकीच्या अभ्यासासाठी म्हणून तो पाहायला हवा. 'लड सकते हैं, मर सकते हैं..', 'हम सिपाही हैं, क़ातिल नहीं..' वगैरे शब्द उच्चारताना आवाजातला आणि देहबोलीतला बदल केवळ जबरदस्त आहे.


हिंदी सिनेमाव्यतिरिक्त अनेक पंजाबी सिनेमांत भूमिका करणाऱ्या ओम पुरींनी ब्रिटीश सिनेमातही आपला ठसा उमटवला. त्यांच्या ब्रिटीश सिनेसृष्टीसाठीच्या योगदानासाठी त्यांना 'ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर' पुरस्कार दिला गेला.
'अर्धसत्य' आणि 'आरोहण' साठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला गेला तर 'फिल्मफेअर'चा सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार 'आक्रोश' साठी मिळाला. 'फिल्मफेअर' तर्फे २००९ साली जीवनगौरवही दिला गेला.
१९९० साली त्यांना 'पद्मश्री' किताबाने गौरवले गेले.

पुरस्कारांनी कार्याचं मोजमाप होत नाही. किंबहुना, पुरस्कार कुठलाही असो, तो फार क्वचितच योग्य उमेदवारास दिला जातो, असं मला वाटतं. 'ओम पुरी' त्या 'फार क्वचित' मधले एक आहेत. मात्र अनेकांना असं वाटतं की इतकं काम करूनही त्यांना पुरेसं यश व कौतुक मिळालं नाही, म्हणून ही यादी दिली. मला वाटतं, त्यांचे समकालिन इतर अभिनेते, जे त्यांच्याप्रमाणेच 'समांतर'कडून 'व्यावसायिक'कडे आले, त्यांच्या तुलनेत ओम पुरी खूपच चांगल्या प्रकारे स्थिर झाले. त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या भूमिकाही मिळाल्या आणि त्या त्या भूमिका व चित्रपटांचं जे जे उद्दिष्ट्य होतं, ते ते त्यांनी साध्यही केलं. काही सिनेमे व भूमिका बॉक्स ऑफिससाठी होत्या, त्यांना तिथे यश मिळालं. काही पुरस्कारयोग्य होत्या, त्यांना पुरस्कारही मिळाले. त्यामुळे मला तरी असं वाटत नाही की त्यांच्याकडे कुठलं दुर्लक्ष वा अन्याय वगैरे झाला.

काही महान कलाकार वैयक्तिक आयुष्यामुळे वादग्रस्त ठरतात. 'ओम पुरी' त्यांपैकी एक.

माणसाकडून चूक होते. In fact, चुकतो, तोच तर माणूस असतो ! नाही तर ह्या देशाच्या पंतप्रधानाने 'सव्वा सौ करोड भगवानों..' अशी आपल्या प्रत्येक भाषणाची सुरुवात नसती का केली ?
ओम पुरींची चूक म्हणजे त्यांनी एका वाहिनीवरील कसल्याश्या चर्चेत एक संतापजनक विधान केले. खरं तर, ती चर्चा म्हणजे 'चर्चा' नव्हतीच ! नुसता कल्लोळ होता, गोंधळ होता. मी तो व्हिडियो नंतर पाहिलाय. पाहतानाच माझं डोकं भणभणायला लागलं ! त्या कल्लोळात, गोंधळात एक वाक्य ओम पुरींच्या तोंडून निघून गेलं आणि तत्क्षणी त्यांनी त्याविषयी क्षमा मागितली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अक्षरश: बिनशर्त क्षमायाचना करून सपशेल शरणागतीही पत्करली. झाली गोष्ट त्याच क्षणी संपून जायला हवी होती. पण लोक आजही विसरलेले नाहीत.
असो.
मला काही कुणाला सुधरवायचं वगैरे नाहीय.

मी षंढ, थंड रक्ताचा
मी कुणी न क्रांतीकारक
अभिनिवेश दाखवणारा
मी हताश कवितासाधक

त्यामुळे लोकांचा उन्माद चालू राहो. आजकाल कुणालाही काही सांगायची सोय राहिलेली नाहीय. त्यामुळे मी फक्त माझ्यापुरतंच सांगतो.

माझ्यासाठी ती फुटकळ चर्चा, त्यात ओम पुरींनी केलेलं विधान वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्या माफीनाम्यानंतर संपल्या आहेत आणि वैयक्तिक आयुष्यात ते माणूस म्हणून कसे होते, काय होते, ह्याचाही इथे काही संबंध नाही. एक अभिनेता म्हणूनच माझ्यासाठी त्यांची ओळख होती आणि राहील. ती ओळख हीच आहे की, तो एक महान अभिनेता होता. ज्याने हर तऱ्हेच्या भूमिका केवळ अतुलनीय सफाईदारपणे अजरामर केल्या आहेत. असा अभिनेता पुन्हा होणार नाही.

ओम पुरींचं निधन अकाली आहे. त्यांच्याच वयाचे त्यांचे अनेक सहकारी (नसीरुद्दीन शाह वगैरे) पाहिले की लक्षात येतं की त्यांनी तब्येतीकडे कधी फारसं लक्ष दिलंच नसावं. गेल्या काही वर्षांत त्यांना पाहताना असं वाटत होतं की हा महान कलाकार आत्मनाशाकडे जातो आहे की काय ? अतिमद्यपान असेल किंवा इतर काही सवयी असतील किंवा वैयक्तिक वा इतर कुठला ताणतणाव असेल, पण कसला तरी विचित्र परिणाम त्यांच्यावर झाल्यासारखं दिसत होतं. चेहऱ्यावरचा तजेला हरवत चालला होता. डोळ्यांतला निखारा विझत चालला होता. शरीर बेढब बनत होतं आणि आपल्या खऱ्या वयापेक्षा वीसेक वर्षं जास्त वयस्कर ते दिसत होते. त्यांच्या निकटवर्तीयांसाठी त्यांचं हे अकाली निधन कदाचित आश्चर्यकारक नसेलच. ह्या इंडस्ट्रीने असे किती तरी लोक स्वत:ला संपवताना पाहिले आहेत. ह्यांनीही संपवलंच बहुतेक.

शेवटी नुकसान सिनेमाचं झालं आहे.
एका अज्ञात विश्वाकडे निघून गेलेल्या ह्या तेजोमय ताऱ्याच्या अंधाऱ्या वाटेवरच्या प्रवासासाठी शुभेच्छा देताना मला शैलेन्द्र साहेबांच्या काही ओळी आठवत आहेत -

कल खेल में हम हों न हों, गर्दिश में तारे रहेंगे सदा
भूलोगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा
रहेंगे यहीं अपने निशाँ इसके सिवा जाना कहाँ..

ओम पुरींसारख्या अभिनेत्यांची खरी शोकांतिका ही की त्यांच्या जाण्याने एक पोकळी निर्माण होते, मात्र सिनेसृष्टीच्या भल्या मोठ्या सर्कशीत ही अनुपस्थिती कुणाला खटकत नाही. आनंद बक्षी साहेब म्हणतात -

कुछ रीत जगत की ऐसी हैं, हर एक सुबह की शाम हुई
तू कौन हैं, तेरा नाम हैं क्या ? सीता भी यहाँ बदनाम हुई !

कुणाला काही फरक पडत नाही, कुणाला काही जाणवत नाही. पण काही लोक तरी असे असतात, जे ह्याची सगळ्याची जाण ठेवतात.
आपण ती ठेवू. तीच खरी श्रद्धांजली !


हिरोच्या एन्ट्रीच्या वेळी 'आ' वासला जातो. इतरांच्या 'एक्झिट'च्या वेळी लोकांनी 'का ?' तरी विचारावं. ह्या एक्झिटनंतर लोक 'का ?' विचारत आहेत, हेही नसे थोडके !

__/\__

- रणजित पराडकर

Saturday, January 07, 2017

लहान होतो म्हणून..

चुकार चिमणी करायची ती अबोध चिवचिव कळायचीही
पन्हाळरांगांमधून थेंबांसमेत गट्टी जमायचीही

खट्याळ वाटायचे मला जे घड्याळ आता खडूस वाटे
मला हव्या त्या क्षणास टिकटिक निवांत थांबून जायचीही

जरा चुकीचे नि बोबडे पण मनातले बोलणे खरोखर
मला व्याकरण न ठाव होते परंतु भाषा जमायचीही

चवीचवीने कधी लापशी, निवट दूध अन् भात गुरगुट्या
'मिळेल खाऊ उद्या' ऐकुनी कळी मनाची खुलायचीही

दिवसभराचा प्रचंड थकवा छळत असे त्या वयातही, पण
निवांत होण्यास फक्त आई हवी असे अन् मिळायचीही

जिथे जशी जेव्हढी मिळे ती तशी झोप आवडायचीही
लहान होतो म्हणून माझी सकाळ हसरी असायचीही

....रसप....
०७ जानेवारी २०१७
Related Posts Plugin for WordPress, Blogger...