Wednesday, December 28, 2016

शब्द शोधत थबकली कविता जशी

चल मना, ये, बस इथे माझ्याजवळ
आज माझ्याशी जरा संवाद कर
सांगतो ख्यालीखुशाली मी तुला
हात मित्रासारखा हातात धर

एकटेपण दाटते, अंधारते
पसरतो काळोख माझ्या आतला
भोवताली फक्त मी माझ्याविना
जाणिवांचा खेळ फसवा चालला

एक रस्ता मूक होउन धावतो
एक गोंधळतो हरवल्यासारखा
गुरफटे पायांत रस्ता जो कुणी
तो स्वत:पासून दिसतो पारखा

अक्षरे विरलीत एकांतात अन्
शब्द गोंगाटात भरकटले कधी
भावनेचा वेध घेउन नेमका
खूप आहे लोटला कालावधी

ही व्यथा, ही वेदना, घुसमट अशी
सांग सांगावी कुणाला मी कशी
जायचे आहे कुठे नाही कळत
शब्द शोधत थबकली कविता जशी

....रसप....
१२ जून २०१५ ते २८ डिसेंबर २०१६

Saturday, December 10, 2016

एकशे त्रेपन्न मिनिटांची 'राख' - (Raakh (1989))

'राख' म्हणून एक सिनेमा १९८९ ला येऊन गेला. बासुदांचे (बासू भट्टाचार्य) पुत्र आदित्य भट्टाचार्य दिग्दर्शक आहेत. आमीर खानचा हा दुसराच सिनेमा. बहुतेक मर्यादित रिलीज झाला होता कारण काही दिवसांपूर्वी एका मित्राने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये उल्लेख केला तोपर्यंत मला असा कुठला सिनेमा आहे, हेसुद्धा माहित नव्हतं !
युट्युबवर ह्याची प्रिंट आहे म्हणून आवर्जून पाहिला.

जर तंदुरी चिकनला साखरेच्या पाकात घोळवलं किंवा गुलाब जामसोबत हिरवी चटणी घेतली किंवा टीव्हीवर येणाऱ्या कुठल्याश्या सुमार जाहिरातीत दाखवतात तसं ब्लेझर, टाय वगैरेखाली लुंगी नेसली किंवा सायकलला ट्रकचं टायर लावलं किंवा... अशी अजून बरीच उदाहरणं देता येतील, तर ते किती विजोड वाटेल, तसंच काहीसं ह्या 'राख'चं झालं आहे. कथानक फुल्टू व्यावसायिक आणि बळंच त्याला समांतर सिनेमाच्या वाटेवर ओढलंय.

एकंदरीत हा सिनेमा तुकड्या तुकड्यांत हास्यास्पद, रटाळ आणि फुसका झाला आहे.
{मी अख्खी स्टोरी सांगणार आहे. काहीही न लपवता. स्पॉयलर वाटत असेल तर पुढे वाचू नका !}

तर काय असतं की, आमीरचं एकीवर प्रेम असतं. त्यांचं बहुतेक अफेअर असतंही, पण ब्रेक ऑफ होतो. सिनेमात ते दाखवलेलं नाहीय. डायरेक्ट ब्रेक ऑफ नंतर पुढे सुरु होतो सिनेमा. एका पार्टीत तिला पार्टीबाहेरचा एक जण छेडतो. न राहवून आमीर त्याला एक ठोसा मारतो. त्या गुंडासोबत त्याचे ४-५ पंटर असतात. पण तो काही करत नाही. गपगुमान निघून जातो ! (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) पार्टी संपल्यावर आमीर तिला घरी सोडायला जात असताना त्याची गाडी ते गुंड लोक रस्त्यात अडवतात, रस्त्यावरच त्याला बदडतात आणि तिचा बलात्कार करतात. ह्या प्रकारानंतर आमीर डिस्टर्ब होतो. डिप्रेस होतो. स्वत:ला अपराधी समजायला लागतो. तो पोलिसांत जातो, पण तिथे त्याला कुणी विशेष दाद देत नाही. In fact, पोलीस इन्स्पेक्टर झालेला पंकज कपूर त्या रात्री रस्त्यावर बलात्कार होत असताना तिथूनच आपल्या बाईकवर गेलेला असतो आणि आमीरने त्याला मदतीसाठी हाका मारलेल्या असतात. तो आमीरचं ऐकून घेतो आणि त्याला मदत करायचं आश्वासन वगैरे देतो. दुसरीकडे डिप्रेस्ड आमीरला त्याचा बाप झापून काढतो. मग हा थेट घर सोडून रस्त्यावर राहायला लागतो. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) एकदा पंकज कपूर त्याला झापत असताना अचानक आमीरला बोलायला सुचतं की, 'अरेच्या लबाडा... त्या रात्री तूच तर होतास बाईकवर ! मी तुला 'हेल्प.. हेल्प' बोललो, तर तू पळून गेलास की !' ही गोष्ट त्याला इतके दिवस बोलावीशी वाटत नाही. (का ? विचारायचं नसतं, कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) हा पंकज कपूर म्हणे अनेक दिवस त्या गुंडाच्या मागावर असतोच पण त्याला पुरेसा पुरावा वगैरे मिळत नसतो ! असेल बुवा.. पण एकदाच आमीर त्याला इमोशनल डोस देतो तर त्यावरून ह्याला काय सुरसुरी येते की, हा डायरेक्ट एका पार्टीत त्या गुंडावर शाब्दिक चढतो आणि बंदूकही दाखवतो, हवेत फायरही करतो ! मग काय ? सस्पेंड...!! हे सोयीचं व्हावं म्हणून कमिशनरही त्या पार्टीत असतोच. मग सस्पेंड झाल्यावर हा आमीरला हुडकून काढतो आणि त्याला बदल्यासाठी ट्रेन करतो. त्याच्याकडून व्यायाम वगैरे करवून घेतो. लैच फिल्मी. पण ह्या सगळ्याला अजिबात फिल्मी मानायचं नाही. का ? कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय ! बराच व्यायाम केल्यावरही आमीरचे स्नायू टरटरत वगैरे नाहीत. पण ट्रेनिंग पुरेसं झालेलं असतं. मग पंकज कपूर त्याला एक पिस्तुल आणून देतो. ह्या प्रसंगी आमीर जी प्रतिक्रिया देतो ती म्हणजे लेखक-दिग्दर्शकांच्या खुळचट आणि बिनडोकपणाचा कडेलोट आहे. त्यांच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद द्यायला हवी असं हास्यास्पद वर्तन, एक सूडाला पेटलेला, कठोर शारीरिक प्रशिक्षण घेत असलेला मनुष्य ते पिस्तुल पाहून करतो. पिस्तुल समोर पाहून, आमीर ते हातात घेतो आणि अक्षरश: लहान मुलाप्रमाणे ते इथे, तिथे रोखून तोंडाने 'ढिश्क्यांssव.. ढिश्क्यांssव' असे आवाज करतो.
हे दृश्य पाहून मी तत्क्षणी सिनेमा बंद केला. कारण तो एक मानसिक धक्का होता. धक्का पचवला आणि मग तमाशा पूर्ण करावा म्हटलं.
ह्यानंतर आमीर बाजारात जाऊन भाजी घेऊन यावी त्या सहजपणे वेगवेगळ्या जागी जाऊन गुंडाच्या डाव्या, उजव्या हातांना मारत सुटतो. हे मारणं, त्याचं चित्रण म्हणजे बाष्कळपणाचा अजून एक नमुना. कुठेही त्यातली तीव्रता जाणवतही नाही.
ह्या फुसकेपणामागे महत्वाचा हात पार्श्वसंगीतकार रणजित बारोटचा आहे. पडद्यावर चाललेल्या प्रसंगाशी अधिकाधिक विसंगत पार्श्वसंगीत कसं देता येईल, ह्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ते सिनेमाभर करतात. (असं खरं तर बोलायचं नसतं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !) सिनेमात एकही गाणं नाही, ह्यासाठी मात्र मनापासून आभार मानायला हवे. कारण तेव्हढ्या मिनिटांनी ही रटाळ लांबी थोडीशी कमी झाली ना !

सिनेमा आमीरच्या आत्मकथनातून उलगडत जातो. त्याचा दुसराच सिनेमा आहे, त्यामुळे त्याचं ते बोलणं सराईत नाही. एकसुरी, अभिनिवेशशून्य आणि (जसं आजही त्याचं बोलणं बऱ्याचदा असतं तसंच) सपाट कथन सिनेमाभर कंटाळा समसमान राहील, ह्याची दक्षता घेतं.
सिनेमाच्या शेवटी आमीर म्हणतो, 'यह मेरी ज़िन्दगी की राख हैं'
सिनेमाच्या शेवटी आपण म्हणतो, 'यह मेरे १५३ मिनिटों की राख हैं'

युट्युबवरची प्रिंट खराब असावी कदाचित पण संपूर्ण सिनेमा अतिशय काळोखा आहे. त्याचा कंटाळा स्वतंत्रपणे येतो.
छायाचित्रक संतोष सिवन आणि संकलक ए. श्रीकर प्रसाद ह्या दोन दिग्गजांचा हा पहिला सिनेमा होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात. बहुतेक सिवन व प्रसाद साहेबांनी ह्या सिनेमानंतर नवीन पाळणे घेतले असावेत.

सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेता (पंकज कपूर), विशेष पुरस्कार (आमीर खान) आणि सर्वोत्कृष्ट संकलन (ए. श्रीकर प्रसाद) असे तीन राष्ट्रीय पुरस्कार ह्या सिनेमाला मिळाले आहेत. (इथे आपण कुत्सितपणे हसू शकतो.)



खरं तर सुरुवातीला येणाऱ्या नामावलीत 'Dialogue' ऐवजी 'Dialog' पाहिल्यावर मला जे आश्चर्य वाटलं होतं, त्यावरुनच हे समजायला पाहिजे होतं की सिनेमा किती काळजीपूर्वक बनवला असेल. पण आपलं पण - 'वोह नहीं सुनता उसको जल जाना होता हैं' - असंच आहे ना ! आणि थोडा डाऊट येऊनही मीच माझ्याकडे दुर्लक्ष केलं. कारण हा समांतर सिनेमा आहे. सगळं कलात्मक असतंय !

- रणजित पराडकर

Sunday, December 04, 2016

हव्याश्या वेदनेवर काळ अडला

परीटाच्या घडीची कापडे झाली नकोशी
हवासा वाटतो बेबंद वारा
व्यथांच्या फेनलाटा तुंबल्या माझ्या उश्याशी
मला माझीच सीमा, मी किनारा

सुखाची वाढली आहे उधारी फार आता
हिशोबाची वही जाळून टाका
खुणावू देत काट्यांच्या मला पाऊलवाटा
फुलांचे चेहरे चुरडून टाका

कफल्लक होत जाणे पाहतो आहे स्वत:चे
कुणाला वाटते हे आत्मघाती
मुठीतुन सांडते वाळू तसे ऐश्वर्य माझे
इथे राहीन मी होऊन माती

तसे काहीच नाही पण तरी भरपूर वाटे
रित्या संपन्नतेवर जीव जडला
मनाच्या किलकिल्या दारातुनी हुरहूर दाटे
हव्याश्या वेदनेवर काळ अडला

....रसप....
०४ डिसेंबर २०१६
(संपादित - ३१ जानेवारी २०२४) 

Saturday, December 03, 2016

एका ब्रॅण्डची हानी - कहानी २ (Movie Review - Kahaani 2)

सुजॉय घोषचा 'कहानी' आजपर्यंतच्या सर्वोत्कृष्ट थरारक भारतीय सिनेमांपैकी एक असावा. त्याच्या नुसत्या आठवणींनीही रोमांच उठतात. त्यात विद्याने साकारलेली विद्या बागची असो की नवाझुद्दिन सिद्दीकीचा सीबीआय अधिकारी खान असो की परमब्रत चटर्जीचा 'सात्योकी', चार वर्षांनंतरसुद्धा अगदी आत्ताच पाहिल्यासारखे वाटावेत इतके प्रभावी होते. 'कहानी'त दाखवलेलं कोलकाता शहरही अगदी जसंच्या तसं आत्ताही डोळ्यांसमोर उभं राहतं. त्या सिनेमातली प्रत्येक गोष्ट अगदी हवी तशी जुळून आलेली होती.
ह्या सगळ्यामुळे 'कहानी' हा एक ब्रॅण्ड बनला, एक 'बेंचमार्क' ठरला आहे. हे 'ब्रॅण्ड नेम' वापरून काही नवीन बनवायचं तर रिस्क ही आहे की तो 'बेंचमार्क'ही विसरला जाणार नाहीय. सुजॉय घोषसारखी व्यक्ती हा विचार करणार नाही, असं वाटत नाही. But, you never know ! सोन्याचं अंड देणारी कोंबडी सुज्ञ मनुष्याला सारासार विचार करण्यापासून परावृत्त करते, ही गोष्ट सर्वश्रुत आहेच. 'कहानी २' चा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम हा की त्याचा 'कहानी १' शी काही एक संबंध नाही ! एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता. पण तरीही घोष साहेबांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी असलेल्या मनुष्याचाच कित्ता गिरवला आणि कोंबडीचा हकनाक बळी गेला !
वाईट वाटलं ?
मला तरी वाटलं. कारण मनाच्या अगदी जवळ असलेल्या काही सिनेमांपैकी एक 'कहानी' आहे. ह्या तथाकथित 'सीक्वल'ची मी आतुरपणे वाट पाहिली होती. पण महागड्या हॉटेलच्या मेन्यू कार्डवर एखाद्या डिशचं अलंकृत शब्दांनी अत्यंत रोचक वर्णन असावं आणि म्हणून ती मागवावी तर ते पिठलं असावं आणि तेही बिना-मिरचीचं, असं काहीसं झालं.

डायरी वाचून उलगडणाऱ्या सिनेमाची ह्यापूर्वीची आठवण भयानक होती, मात्र इथे 'सुजॉय घोष' आणि 'कहानी' ब्रॅण्ड असल्याने ट्रेलरमध्ये डायरी असूनही मला तिकीट काढताना कुठलाही किंतु-परंतु वाटला नाही. सिनेमा सुरु होतो पश्चिम बंगालमधील चंदननगर ह्या छोट्या शहरात. विद्या सिन्हा (विद्या बालन) आणि तिची अपंग मुलगी मिनी (तुनिशा शर्मा) एक मध्यमवर्गीय आयुष्य जगत आहेत. मिनीच्या वैद्यकीय उपचाराकरिता अमेरिकेस जाण्यासाठी विद्या तयारी करते आहे. मात्र अश्यातच राहत्या घरातून मिनीचं अपहरण होतं आणि तिच्या सुटका करवण्यासाठी जाताना विद्याचा अपघात होतो. एक नेहमीची 'हिट अ‍ॅण्ड रन केस' समजून इंदरजित सिंग (अर्जुन रामपाल) औपचारिकता पूर्ण करत असताना वेगळीच कहाणी उलगडते आणि विद्या, मिनी व इंदरजितचा भूतकाळ समोर येतो.
इथे सगळ्यात मोठा अपेक्षाभंग होतो तो हा की आपण एखादा सस्पेन्स ड्रामा अपेक्षित करून पाहायला आलो असतो आणि तसं काहीही न होता केवळ एका पेचातून सुटका कशी होईल, हाच एक सस्पेन्स विरहित ड्रामा घडतो. पात्रांचं सुरेख डिटेलिंग, एखाद्या प्रमुख वाटणाऱ्या पात्राची धक्कादायक एक्झिट (सास्वत चटर्जीने साकारलेला कॉण्ट्रॅक्ट किलर बॉब बिस्वास), अकल्पित क्ल्यू (हॉटेलातल्या लहान मुलाच्या शाळेच्या युनिफॉर्मवरील नाव) असं बरंच काही 'कहानी'त होतं. किंबहुना, थरारपटात हे असलंच पाहिजे. ह्यातलं काहीही नसून अनावश्यक जुळवाजुळव, ठिगळं जोडल्यासारखे योगायोग आणि उपरी पात्रं मिळमिळीतपणा आणतात. इंदरजित सिंग आणि विद्या सिन्हाची पूर्वीची काही ओळख, नातं वगैरे असण्याची काही एक आवश्यकता नसताना कथानकात ते बळंच घुसडलं आहे. ह्याचा परिणाम असा झाला आहे की पुढे काय घडणार आहे, खरं काय घडलेलं असणार आहे, अश्या सगळ्याचाच अंदाज आधीपासूनच येतो आणि 'सरप्राईज एलिमेंट' नामक फुग्याला बेमालूमपणे टाचणी लागते.

विद्या बालन आवडली नाही, असं आजपर्यंत तरी झालेलं नाही. अगदी टुकार 'हमारी अधुरी कहानी'मध्येही तिचं पात्र कितीही बंडल असलं तरी तिने काम चांगलंच केलं होतं. ती मुळातच एक 'नो नॉनसेन्स प्रोडक्ट' आहे. त्यामुळे तिला पाहत असताना कितीही ठिसूळ असलं, तरी 'विद्या सिन्हा'चं पात्रही पटत राहतं. विद्या सिन्हाचं एकटेपण, मुलीसाठीची तिची ममता, परिस्थितीपुढे असलेली असहाय्यता ती खूप सहजपणे साकार करते.
अर्जुन रामपालने एक इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर म्हणून फक्त फिट्ट दिसण्याव्यतिरिक्त बाकी काही विशेष केलेलं नाही. त्याला स्कोप अगदीच नव्हता, असं काही नाही. बऱ्यापैकी होता, पण 'एफर्ट' जाणवला नाही.
नकारात्मक भूमिकेत जुगल हंसराज शोभला आहे. पण त्याला तर खूपच कमी काम आहे. त्याच्या भूमिकेची लांबी जराशी अजून असायला हवी होती, असंही वाटलं. त्याचे लुक्स नाकारात्मक भूमिकांसाठीच सुयोग्य आहेत, ही बाब इतरांना खूप आधीच कळली होती. त्याने हे स्वीकारायला खूप उशीर लावला. वेळीच स्वीकारलं असतं, तर कदाचित काही महत्वाच्या भूमिका त्याने स्वत:च्या नावावर करून घेतल्या असत्या. असो. देर आये, दुरुस्त आये !
सहाय्यक भूमिकांत विशेष उल्लेखनीय मानिनी चढ्ढा आहे. इंदरजितच्या बायकोची महत्वशून्य भूमिका साकारताना थोड्या वेळातही तिने बऱ्यापैकी कंटाळा आणला आहे. तिची बोलण्याची ढब विचित्र आहे, इतकी विचित्र की दुर्लक्ष करता येत नाही.
संवाद, छायाचित्रण, संगीत. तिन्हीतही प्रकर्षाने खटकावं असंही काही नाही आणि लक्षात ठेवावं असंही काही नाही.
समजले ना ती कधी येऊन गेली
पाहण्यातच वाट इतका दंगलो मी
अश्या बेमालूमपणे सगळं घडून जातं आणि सिनेमा संपल्यावर लक्षात येतं की काहीच लक्षात राहिलेलं नाहीय !


कदाचित 'कहानी' ह्या 'ब्रॅण्ड' अंतर्गत काही स्त्री-प्रधान सिनेमे करायचा घोष आणि कंपनीचा विचार असावा म्हणून ते वापरलं असावं. अन्यथा लेखामध्ये आधीच म्हटल्याप्रमाणे एक स्वतंत्र सिनेमा म्हणूनही हा बनवता आला असता आणि खरं तर, तसंच असायला हवं होतं. ह्या सिनेमापासून 'कहानी' आणि 'सुजॉय घोष' ही दोन नावं जर वेगळी केली, तर तो नक्कीच सामान्य आणि असामान्य ह्या दोन्हींच्या मधला म्हणता आला असता. एकदाही असं अजिबात वाटत नाही की, 'आवरा आता !' मात्र जी काही रहस्यमयता आहे ती बाळबोध वाटते, धक्कातंत्र फसलेलं असल्यामुळे थरारातली हवाही निघून जाते.

जर सिनेमा वाईट नाही तर मग इतकी नाराजी का बरं ?
अरे ! तुम्ही जर मटन बिर्यानी सांगून कौआ बिर्यानी (कुछ याद आया ?) खायला देणार असाल, तर आम्हीसुद्धा ढेकर न देता काव-कावच करणार ना ?

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर
Related Posts Plugin for WordPress, Blogger...