Sunday, June 12, 2016

अमितुद्दिन सिद्दिकी (Movie Review - Te3n / Teen)

क्रिकेटचं भूत मानगुटीवर बसलेलं असतानाच्या काळातली गोष्ट. भारतीय संघ परदेशात (खासकरून भारतीय उपखंडाबाहेर) खेळायला गेला की पानिपत ठरलेलं असायचं. 'हे हरणार आहेत' हे इतकं व्यवस्थित माहित असायचं की वाटायचं, 'जातात कशाला तिथे खेळायला ?'
पण 'निकाल लागणार' हा निकाल माहित असतानासुद्धा सामन्याची वेळ लक्षात ठेवून मी बरोब्बर तेव्हा टीव्हीसमोर बसायचोच. कधी कधी पहाटे लौकरही उठायचो त्यासाठी. त्यामागे विचार हाच की, 'फाईट किती देतात पाहू !'
'फाईट'.
जिंकणार नाहीत, ह्याची खात्रीच. फक्त 'फाईट'.

'तीन' (TE3N) बद्दलची उत्सुकताही अशीच काहीशी. ही बच्चन वि. नवाझुद्दिन अशी लढत होती. निकाल काय लागणार हे मला आधीच माहित होतं. पण 'फाईट' किती दिली जातेय, हे पाहायचं होतं. अपेक्षेनुसारच निकाल लागला. पण फाईटही चांगली दिली.
बच्चनने नवाझुद्दिनला.

बच्चन हा माझ्या मते एक चांगला अभिनेता आणि महान सुपरस्टार आहे आणि नवाझुद्दिन स्टारही नाही, पण एक महान अभिनेता ! बच्चन पडद्यावर येतो तेव्हा त्याच्या स्टारपणाचं वलय पडदा व्यापून उरतं. नवाझुद्दिन जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा त्याचं काम पडदा व्यापून उरतं. एखादा महासागर किनाऱ्यावरच्या दगडासमोर जसा धडका देऊन देऊन निष्प्रभ ठरतो, तसं बच्चनचं महास्टारपण नवाझुद्दिनच्या खमक्या अभिनयासमोर उसळ्या खाऊन खाऊन कमी पडलं. मला ह्याचाच सगळ्यात जास्त आनंद झाला. 'काव्यात्मक न्याय' दिसला की आपल्यातल्या न्यूनपिडीत सामान्य माणसाला उगाच स्वत:च जिंकल्यासारखं वाटतं, तसंच काहीसं मला वाटलं. 'गडगंज श्रीमंतीपुढे एक मध्यमवर्गीय जिंकला' असा एक भास मला झाला.
मी खूष ! पिक्चर कसा आहे, हा भाग पुढचा !

'तीन' बद्दलची उत्सुकता त्याच्या शीर्षकापासूनच सुरु झाली. अनेक दिवस हे 'टीईथ्रीएन' असंच वाटत होतं. अजूनही काही जणांना तसंच वाटतही असावं. हा पांचटपणा असला, तरी मला आवडला ! पण मुळात सिनेमाचं नाव 'तीन' का असावं, हे नाही आवडलं. 'तीन मुख्य व्यक्तिरेखा असणं', ह्या फुटकळ कारणाशिवाय ह्या शीर्षकाला दुसरं काहीही समर्थनीय मला तरी गवसलं नाही. ह्यापेक्षा तर 'जजबा' शीर्षक चांगलं होतं. ('जजबा'कारांना जर हा व्यक्तिरेखांचा हिशोब मांडायचा असता तर 'देढ' करावं लागलं असतं आणि ते D3DH असं लिहिता आलं असतं. अर्र्र.. कुठे भरकटतोय मी !)

'मॉन्टाज' (Montage) ह्या कोरियन (अर्थातच दक्षिण) चित्रपटावर 'तीन' अधिकृतपणे आधारला आहे.
कोलकात्यात घडणारं हे कथानक. जॉन बिस्वास (अमिताभ बच्चन) ची नात आठ वर्षांपूर्वी अपहृत होऊन नंतर मृतावस्थेत सापडलेली असते. गुन्हेगाराचा छडा लावण्यात यंत्रणा अपयशी ठरलेली असते. मात्र म्हातारा जॉन चिवटपणे रोज पोलीस स्टेशनात येऊन तपासकार्याची चौकशी करत असतो. आठ वर्षांपूर्वी ही केस ज्याने हाताळली असते, तो पोलीस अधिकारी आलेल्या अपयशामुळे निराश होऊन नोकरी सोडून एका चर्चमध्ये पाद्री बनलेला असतो. (फादर मार्टिन/ इन्स्पेक्टर मार्टिन - नवाझुद्दिन सिद्दिकी). तर आता पोलीस ठाण्याचा व पर्यायाने ह्या आठ वर्षं जुन्या केसचा चार्ज सरिता (विद्या बालन) कडे आलेला असतो.
चिवट जॉन, निराश मार्टिन आणि अननुभवी सरिता आपापल्या पद्धतीने ह्या आठ वर्षं जुन्या घटनेच्या स्मृती उगाळत, जपत किंवा दुर्लक्षित करत असतात आणि तेव्हाच अजून एक अपहरण घडतं. ह्या नव्या अपहरणात आणि त्या जुन्या केसमध्ये काही साधर्म्य असतं का ? दोन्हीच्या मागे एकच व्यक्ती असते का ? खरं काय आहे ? ह्या प्रश्नांची उत्तरं सरिता आणि मार्टिन शोधायला लागतात, तर दुसरीकडे जॉन मात्र जुन्या केसचा छडा स्वत:च लावत असतो. अश्या ह्या तिघांची कहाणी म्हणजे 'तीन.'


मांडणी जराशी, नव्हे, बऱ्यापैकी संथ आहे आणि जराशी गुंतागुंतीचीही. दोन कहाण्या एकत्र दाखवत असताना, जी एक विशिष्ट पद्धत वापरली आहे (ह्याविषयी मी नेमकं लिहू शकत नाही कारण त्यामुळे विचका होऊ शकतो.), ती पटेलच असं नाही. कदाचित काही जणांना चटकन लक्षातही येणार नाही. मला ती पटली नाही, पण तरी आक्षेपार्ह काहीच नाही. एक वेगळा प्रयोग आहे असं म्हणू. आपण आजपर्यंत तसं पाहिलेलं नसल्यानेही खटकणं स्वाभाविक आहे. मात्र चित्रपटाची लांबी तरी कमी करता आलीच असती. थ्रिलर आहे, तर पसारा असू नये हा एक अलिखित नियम आहे, असं मी मानतो. अनेक दृश्यांना सरसकट कात्री लावताच आली असती.

'कहानी'ने कोलकात्याचं जे जबरदस्त चित्रण केलं होतं, त्यामुळे आता मी कुठल्याही चित्रपटात 'कोलकाता' पाहिलं की थेट त्याच्याशीच तुलना होते. त्यात हाही सुजॉय घोषचीच निर्मिती असलेला सिनेमा. त्यामुळे तर तुलना अपरिहार्यच ! नाही दिसलं कोलकाता ! हे 'दिसणं' म्हणजे शहराचं पर्यटन नव्हे, ते 'कहानी'तही नव्हतंच. 'कोलकाता' माणसांत दिसायला हवं होतं. ते नाही दिसलं.

विद्या बालनने पोलीस अधिकाऱ्याची देहबोली उत्तम दाखवली आहे. ती दाखवण्यासाठी तिला दृश्यममधल्या तब्बूसारखी 'युनिफॉर्म' आणि विझलेल्या डोळ्यांची गरज पडली नाही. (तब्बूला तर त्यासहसुद्धा जमलं नव्हतंच !) विद्याने स्वत:च्या एकंदरच हालचालीत एक पुरुषीपणा जबरदस्त दाखवून दिला आहे. तिच्या बोलण्यातूनही 'खाक्या' जाणवतो.
तिची व्यक्तिरेखा 'सहाय्यक' म्हणून आहे. मुख्य पात्रं 'जॉन' आणि 'मार्टिन'च आहेत.
'जॉन बिस्वास' हा घटनेला आठ वर्षं उलटून गेल्यावरही रोज पोलीस स्टेशनात येणारा, आजही पुन्हा पुन्हा आपल्या नातीच्या जुन्या ऑडियो व व्हिडियोंना पाहणारा, झोप हरवलेला आणि चोवीस तास फक्त 'तो गुन्हेगार कोण आहे' हाच विचार करणारा एक वयोवृद्ध मनुष्य आहे. त्याच्या मनावर झालेल्या आघातामुळे त्याच्या डोक्यावरही थोडासा परिणाम झालेला आहे म्हणूनच तो इतक्या चिवटपणे एकाच गोष्टीचा पाठपुरावा करतो आहे. त्याची पत्नी आणि मित्र (मार्टिन) सुद्धा त्याला टाळत आहेत. हा जो एक प्रकारचा वेडगळपणा आहे, तो बच्चनला दाखवता आलेला नाही. बच्चनचा 'जॉन' फक्त करुण दिसतो. त्याची दया येते, वाईट वाटतं त्याच्याकडे पाहून. पण 'जॉन'चं कारुण्य इतकं मर्यादित नाहीय. त्याच्या कारुण्याला असलेली वेडसर छटा समोर यायला हवी होती. ती आली नाही. तो खिन्नतेचा झाकोळलेला चेहरा ओढून अख्खा सिनेमाभर वावरतो.
दुसरीकडे, निराश होऊन नोकरी सोडून पाद्री बनलेला 'मार्टिन'. He is basically trying to run away from his failure. एक प्रामाणिक पोलीस अधिकारी असतो तो. त्याला आलेलं अपयश त्याचा पिच्छा इतक्यात सोडणार नसतंच. तो जितका त्यापासून पळायचा प्रयत्न करतो आहे, तितकंच ते त्याला जवळ ओढत असणार. ही जी एक प्रकारची कुतरओढ आहे, ती नवाझुद्दिनने जाणवून दिली आहे. ठळकपणे दाखवून देण्याची संधी कथानकात त्याला नाही मिळालेली. पण आतल्या आत ही घुसमट त्याला छळते आहे, हे मात्र तो व्यवस्थित जाणवून देतो.
सव्यसाची चक्रवर्तीला लहान भूमिका आहे. ती त्याने चोख निभावली आहे.

बच्चनने स्वत:च गायलेलं 'क्यूँ रे' हे गाणं लक्षात राहतं. इतरही २-३ गाणी आहेत. त्यांचा कथानकात अडसर होत नाही आणि टिपिकल आजच्या गाण्यांसारखी उच्चस्वरात जाणारी असली, तरी 'गोंगाट' नसल्यामुळे त्रास तरी देत नाहीत.
संवादांबाबत, काही 'वन लायनर्स' चांगले आहेत.
पण संगीत आणि संवादांपेक्षा पार्श्वसंगीत जास्त महत्वाचं होतं आणि ते प्रभावी झालं आहे.

थोडीशी वाढीव लांबी, थोडीशी गुंतागुंत हे जर स्वीकारलं, तर नवाझुद्दिनचं (पुन्हा एकदा) उत्तम काम आणि बच्चनचा (पुन्हा एकदा) जबरदस्त 'स्क्रीन प्रेझेन्स' असा एक मस्त अनुभव 'तीन' देतो.
'फाईट' लक्षात राहते ! सोप्या शब्दांत सांगायचं तर नवाझुद्दिन बच्चनला 'खातो' !

रेटिंग - * * *

- रणजित पराडकर

4 comments:

  1. Thanks for review. Now I will see the film. - Asmita Phadke.

    ReplyDelete
  2. आता बघतोच. 'वजीर'ला झोप काढल्यानंतर बच्चनसाहेबांच्या सिनेमाला जायचं की नाही यावर विचार घोळ घोळ घोळत होता. तू बोल्ला; सब निकाल लाग गया रे.

    ReplyDelete

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...