Sunday, February 28, 2016

समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग ! (India vs Pakistan - Asia Cup T20 - 2016)


भारत व पाकिस्तानची मॅच म्हणजे 'भारतीय फलंदाजी' वि. 'पाकिस्तानी गोलंदाजी'. कालची ट्वेंट२० ही तशीच. त्यात भारत जिंकला नसता तरच आश्चर्य वाटलं असतं कारण दोन्ही संघांच्या कमजोर बाजूंची तुलना केल्यास त्या गरिबांतला भाग्यवान श्रीमंत भारतच ठरतो. I mean, पाकिस्तानची फलंदाजी जितकी दरिद्री आहे, त्याहून भारताची गोलंदाजी निश्चितच बरी आहे. ट्वेंटी२० क्रिकेट हा काही अस्सल तंत्रशुद्ध फलंदाजीसाठीचा खेळ नाहीच. पण गोलंदाजीला मदत करणाऱ्या पीचवर खेळत असताना फलंदाजाकडे आवश्यक असलेल्या किमान तंत्रशुद्धतेचाही सपशेल अभाव पाकिस्तानच्या फलंदाजीत असावा, इथेच तो संघ पराभूत ठरतो. एकही भेदक गोलंदाज नसलेल्या गोलंदाजीने माफक ८३ धावांत एखाद्या संघाला उखडावं, ही त्या संघाची फलंदाजदारिद्र्य दाखवणारी कामगिरीच. भारताच्या ठीकठाक गोलंदाजीसमोरही जर हे फलंदाज अश्या प्रकारे नांगी टाकत असतील, तर दर्जेदार गोलंदाजीसमोर त्यांची काय दाणादाण उडू शकते, सांगता येत नाही !

कालच्या मॅचचे हायलाईट्स माझ्या मते तीन होते -
१. भारताची फिल्डिंग
२. मोहम्मद आमीरची बोलिंग
३. विराट कोहलीची फलंदाजी

भारतीय फिल्डर्स एक-एक रन जीव तोडून वाचवत होते आणि आधीच उसळत्या पीचवर खेळताना भंबेरी उडत असलेल्या पाकिस्तानी फलंदाजांनी दिलेल्या छोट्यातल्या छोट्या संधीचाही पुरेपूर फायदा भारतीयांनी उठवला. त्यामुळेच पाकिस्तानी खूप दबावाखाली आले आणि त्या मानाने सामान्य गोलंदाजीही जबरदस्त ठरली. विराट कोहलीने कव्हर्समधून धावत येत चेंडू उचलून बोलरच्या बाजूला मारलेली डायरेक्ट हिट आणि रवींद्र जडेजाने स्क्वेअर लेगकडून मारलेला सपाट थ्रो ज्यावर धोनीने अक्षरश: प्रकाशाच्या गतीने उडवलेले स्टंप्स ही चित्रं तर डोळ्यांसमोरून जाणार नाहीत. ह्याच संधी जर पाकिस्तानी फिल्डर्सना मिळाल्या असत्या तर त्यांनी तिथे दोन विकेट्स सोडल्या आहेत, हे कुणाला जाणवलंसुद्धा नसतं ! तीस यार्डांच्या वर्तुळाच्या आत आणि बाऊंड्री लाईनजवळ वाचवलेले रन्ससुद्धा खूप महत्वाचे. आशियाई संघांना फिल्डिंगचं महत्व जरा उशीराच कळलं आहे. पण पाकिस्तानला तर अजूनही कळलेलं दिसत नाही. कारण अशी चपळाई त्यांच्या फिल्डर्समध्ये अजिबातच दिसली नाही. ते कसेबसे कॅचेस पकडत होते, कसेबसे चेंडू अडवत होते. एकूणच आपल्याला काहीही जमत नसतानाही सगळं येत असल्याचा नाटकी आविर्भाव त्यांच्या देहबोलीत स्पष्टपणे जाणवत होता.

फिल्डिंगकडून 'बेसिक मिनिमम'पेक्षा जास्त अपेक्षा नसताना आणि स्कोअर बोर्डवर धावांचं 'कुशन'ही नसताना बोलर्सचं मनोबल खच्ची होतं. पण इथेच पाकिस्तानी बोलर्स वेगळे ठरतात. अश्याच वेळी त्यांच्यात एक विजीगिषु वृत्ती संचारते. पहिल्या ओव्हरपासून ते असे काही आक्रमक होतात की जणू त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असावा !
मोहम्मद आमीरची झणझणीत बोलिंग पाहणं, हा एक रोमांचित करणारा अनुभव होता ! 'मॅच फिक्सिंग करून देशाचं नाव खराब करणारा खेळाडू' हीच मोहम्मद आमीरची ओळख. तत्पूर्वी, तो खरोखरच एक अत्यंत गुणी वेगवान डावखुरा गोलंदाज होता. पण खेळातल्या गैरव्यवहारांची सोबत नेहमीच पाकिस्तानी क्रिकेटशी राहिली आहे. त्यात हा गुणी तरुण खेळाडू ओढला गेला. थोडक्यात वाचला कारण त्याने गुन्हा केला तेव्हा त्याचे वय 'सुजाण' नव्हते ! तर शिक्षा भोगून परत आलेला हा मोहम्मद आमीर आजही त्यात तिखटपणे बोलिंग करतो आहे, हे पाहून कुणाही सच्च्या क्रिकेटरसिकाला आनंदच झाला असेल. फलंदाजांना आंदण दिलेल्या आजच्या क्रिकेटमध्ये आमीरसारखे गोलंदाज मोजकेच बनतात. त्याने आपली चुणूक पहिल्याच चेंडूपासून दाखवली. रोहित शर्माला बेनिफिट ऑफ डाऊट मिळाला. पण दुसऱ्या चेंडूवर मात्र तो वाचला नाही आणि इनिंगच्या तिसऱ्या चेंडूपासून कोहली मैदानात आला. मोहम्मद आमीरच्या चार ओव्हर्सपैकी प्रत्येक चेंडू फलंदाजांची परीक्षा पाहणारा होता. तो चेंडूला 'कट' करत होता, 'स्विंग' करत होता, उसळीसुद्धा देत होता. जनरली डाव्या-उजव्या हाताचे फलंदाज एकत्र असले की गोलंदाजाला लाईन पकडताना जरा त्रास होतो. पण दोन उजव्या हाताचे फलंदाज आउट केल्यावर समोर आलेल्या डावखुऱ्या सुरेश रैनाला आमीरने टाकलेला पहिला चेंडू रैनाला दिसला तरी होता का, कुणास ठाउक !
दुसरीकडूनही मोहम्मद इरफान नावाचा साडेसात फूट उंचीचा पहाड धावत अंगावर येत होता आणि त्याचीही लाईन-लेंग्थ impeccable च होती. तेव्हाही समोर युवराज सिंग - विराट कोहली अशी फलंदाजांची डावी-उजवी जोडी होती. तरी आमीर आणि इरफान आग ओकत होते.

हे एक अग्निदिव्य होते आणि ते कोहलीने पार पाडले. कोहलीची खेळी रेकॉर्ड्समध्ये 'जस्ट अनदर इनिंग' म्हणूनच नोंदवली जाईल. कारण तो ४९ वर बाद झाला. तसं झालं नसतं तर तिची एक 'फिफ्टी' म्हणून स्वतंत्र नोंद झाली असती. दुर्दैवाने तसं होणार नाही. अम्पायर लोकांनी काही वेळेस जराशी माणुसकी ठेवावी. इतकं सुंदर खेळल्यानंतर एखाद्याला १ रनसुद्धा नाकारावा, असा विघ्नसंतोषीपणा करू नये. बरं, आउट दिला तोसुद्धा डाउटफुल होताच. मग द्यायचा होता की बेनिफिट ऑफ डाऊट ! ह्या न मिळालेल्या एका रनमुळे कोहलीची ही इनिंग रेकॉर्ड्समध्ये लपून जाईल, पण लोकांच्या आठवणींतून पुसली जाणार नाही. सापासारखे फुत्कार सोडणाऱ्या चेंडूंचा त्याने ज्या आत्मविश्वासाने सामना केला, त्याला तोडच नाही ! असं वाटत होतं की युवराज वेगळ्या पीचवर खेळतोय आणि कोहली वेगळ्या ! जर कोहलीने आपला सर्वोत्कृष्ट खेळ काल केला नसता, तर ८३ धावा भारतालाही झेपल्या नसत्याच कदाचित ! गोलंदाजांना मदत करणाऱ्या पीचवरच्या मॅचमध्ये एक फलंदाज कोहली म्हणूनच 'मॅन ऑफ द मॅच' ठरला.

कालची मॅच खरं तर अपेक्षाभंग करणारी होती. पाकिस्तानच्या बोलिंगच्या पहिल्या ८-९ ओव्हर्स वगळल्या तर पूर्णपणे एकतर्फी मॅच ! भारत-पाकिस्तानकडून क्रिकेटच्या फॅन्सना अजून काही तरी हवं असतं. ठस्सन, खुन्नस तर दिसली नाहीच, पण 'फाईट'ही फारशी पाहायला मिळाली नाही. लोक अगदीच निराश होणार नाहीत, ह्याची काळजी मोहम्मद आमीरने घेतली. 'भारत जिंकला, पाकिस्तान हरलं' हा आनंद असला, तरी तेजतर्रार बोलिंगवर मनापासून प्रेम करणाऱ्या माझ्यासारख्याला ह्या निकालापेक्षा जास्त आनंद मोहम्मद आमीरच्या चार ओव्हर्सनी आणि त्या तोफखान्याचा निडरपणे यशस्वी सामना करणाऱ्या कोहलीच्या ४९ धावांनी दिला ! पुरेसं नव्हतं, पण समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग !

ह्या निमित्ताने एक प्रश्न पडतो. जसे तेज गोलंदाज पाकिस्तानकडे बनतात, तसे भारताकडे का बनत नाहीत ? ही काही आजची कहाणी नाही. वर्षानुवर्षं हेच चित्र का आहे ? बहुतेक हा फरक आपल्या दृष्टीकोनातच आहे, 'कल्चर'मध्येच आहे. आपल्याकडे लहान लहान मुलांना सिक्सर मारण्यातच आनंद मिळतो. सेंच्युरी मारुन, शेवटच्या चेंडूवर सिक्स मारुन आपल्या संघाला विजयी करणारा 'भुवन' च 'लगान' ला सुपरहिट सिनेमा बनवू शकतो. पण चक्रव्यूह, सापळा रचून फलंदाजांना बाद करणाऱ्या जलदगती 'इक़्बाल' चा चित्रपट मात्र येतो आणि जातो. आपल्याकडे 'हीरो' हा नेहमी फलंदाजच राहिला आहे आणि गोलंदाज साईड हीरो. ह्या साईड हीरोच्या 'ब्रेक ऑफ' वर चित्रपटात विनोद केले जातात आणि क्रिकेटमध्ये ह्याच साईड हीरोला बळीचा बकरा बनवून पाटा पीचेसवर डावांचे मनोरे रचले जातात. म्हणूनच गेल्या काही वर्षांत आपल्याकडे जलदगतीच काय, फिरकी गोलंदाजही फारसे पुढे आलेले नाहीत. तीच ती २-४ नावं आहेत आणि त्यांच्यातही नियमितता नाही. अश्विन आपला सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज. पण स्पष्टपणे जाणवतंय की त्याला जर थोडं उशीराने बोलिंगला आणलं, तर तो हमखास मार खातो. बरं, त्याच्या जोडीला कोण ? रवींद्र जडेजा. ही काही गोलंदाजीतली श्रीमंती नक्कीच नाही.

थोडक्यात आपल्याकडे ना धड तेज गोलंदाज आहेत, ना फिरकी. आपण फक्त काम चालवून घेतो आहे आणि हाच जो दृष्टीकोन आहे तो बदलणं गरजेचं आहे. आपल्या क्रिकेटमधला भेदभाव जेव्हा आपण संपवू, तेव्हाच आपल्याकडेही तेज तिखट बोलर्स बनतील. तोपर्यंत इशांत शर्मा, उमेश यादव आणि आशिष नेहराशिवाय पर्याय नसेल.

- रणजित पराडकर

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...